...भारताचा संघर्ष सुरूच राहिला

सन १२०६ मध्ये महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक यानं दिल्लीत स्वतःची ‘दिल्ली सल्तनत’ ही राजवट सुरू केली, हे याआधीच्या लेखात आपण पाहिलं.
delhi sultanate slave dynasty muhammad of ghor death reason Muhi al-Din Muhammad Aurangzeb mughal india
delhi sultanate slave dynasty muhammad of ghor death reason Muhi al-Din Muhammad Aurangzeb mughal indiasakal
Updated on
Summary

सन १२०६ मध्ये महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक यानं दिल्लीत स्वतःची ‘दिल्ली सल्तनत’ ही राजवट सुरू केली, हे याआधीच्या लेखात आपण पाहिलं.

सन १२०६ मध्ये महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक यानं दिल्लीत स्वतःची ‘दिल्ली सल्तनत’ ही राजवट सुरू केली, हे याआधीच्या लेखात आपण पाहिलं. घोरीचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्याची इच्छा अनेक वाचकांनी व्यक्त केली.

इतिहासकार फेरिश्ता यानं लिहून ठेवल्यानुसार, ‘ ‘खोखर गोत्री जाट’ या जमातीतील लोकांनी सुलतान महंमद घोरीशी सगळ्यात कडवा संघर्ष केला. ता. १५ मार्च १२०६ रोजी महंमद घोरीच्या सैन्याशी लाहोर इथं झालेल्या चकमकीत रामलाल खोखर या योद्ध्यानं महंमद घोरीला ठार केलं.’

सन १२०६ मध्ये दिल्लीत सुरू झालेली इस्लामी राजवट १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे पाचशे वर्षं, अविरत सुरू राहिली. त्यानंतरही काही वर्षं मुघलांचं राज्य टिकून राहिलं तरीही त्यांचा अधिकार आणि दरारा औरंगजेबाबरोबर संपला असं म्हणता येईल.

या पाचशे वर्षांत दिल्लीतील इस्लामी राजवटी अधिकाधिक शक्तिशाली होत गेल्या असल्या तरी हिंदूंचा संघर्ष कधीच शमला नाही. परकीय इस्लामी राज्यकर्त्यांना व आक्रमकांना नेहमीच कडव्या प्रतिकाराला सामोरं जावं लागलं.

यापैकी विजयनगर साम्राज्य, राणा प्रताप, छत्रपती शिवाजीमहाराज व मराठेशाही यांच्याबद्दल आपल्याला माहिती असते; पण अनेक वीर आणि वीरांगना अशा आहेत की, ज्यांनी परकीय आक्रमकांना फक्त तीव्र प्रतिकारच केला नाही तर, अनेकदा त्यांचा सपशेल पराभवही केला.

मात्र, त्यांच्या आठवणी आपण जपल्या नाहीत, त्यांचा इतिहास कधी शिकवला गेला नाही. इतकंच नव्हे तर, त्यांची नावंही पार विस्मृतीत टाकून दिली गेली. यापैकी नायकीदेवीचं उदाहरण आपण याआधीच बघितलं. अशी अनाम उदाहरणं आणखीही भरपूर आहेत.

कुर्मादेवी

नायकीदेवीची कन्या कुर्मादेवी हिचा विवाह चितोडगडचा राजा समरसिंह याच्याशी झाला होता. अरबांना धूळ चारणारा राजा बाप्पा रावळचा हा वंशज होता. तराईच्या दुसऱ्या लढाईत पृथ्वीराजच्या बाजूनं लढताना समरसिंह मारला गेला. त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा कल्याणरायही कामी आला.

पहिली पत्नी प्रीथाबाई हिला हा धक्का सहन न झाल्यामुळे तिनं प्राणत्याग केला. कुर्मादेवीनं मात्र आपल्या आईप्रमाणे घोरीचा बदला घ्यायचं ठरवलं. तिचा मुलगा कर्णसिंह याला चितोडच्या राजगादीवर बसून तिनं इतर राजपूत राजवटींकडे मदत मागून सैन्य उभं केलं आणि दिल्लीवर स्वारीसाठी कूच केलं.

दिल्लीत कुतुबुद्दीन ऐबक याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा सैन्य घेऊन तो तिच्या दिशेनं निघाला. जयपूरच्या अंबर किल्ल्याजवळ दोन्ही सैन्यांची गाठ पडली. कुर्मादेवीनं कुतुबुद्दीनला तिच्याशी द्वंद्वयुद्ध करण्याचं आव्हान दिलं.

एका स्त्रीला आपण सहज हरवू शकू या विचरानं ऐबक यानं ते लगेच स्वीकारलं; पण कुर्मादेवी त्याला आटोपेनाशी झाली. शेवटी एका क्षणी तिची तलवार त्याच्या छातीत घुसली व तो खाली कोसळला.

हे पाहून तुर्की सैन्यात गोंधळ उडाला व त्यांनी माघार घेतली. कुर्मादेवीला वाटलं की कुतुबुद्दीन मृत्युमुखी पडला आणि तिचा हेतू साध्य झाला. शिवाय, माघार घेणाऱ्या सैन्यावर हल्ला करायचा नाही हा धर्मयुद्धाचा नियम. त्यामुळे ती विजयाच्या आनंदात परत गेली व आता आपलं जीवितकार्य संपलं असं म्हणून तिनं पतीच्या स्मृतीत प्राणत्याग केला.

कुतुबुद्दीन गंभीर जखमी झाला असला तरी जिवंत होता. जखमा बऱ्या झाल्यावर त्यानं बदला घेण्यासाठी सन १२१० मध्ये चितोडवर हल्ला केला. राजपूतांचा पराभव करून त्यानं कुर्मादेवीचा मुलगा कर्णसिंह याला अटक केली व तो त्याला लाहोरला घेऊन गेला.

चितोडच्या राजघराण्याचा घोडा शुभ्रक याची कीर्ती तेव्हा दूरवर पसरलेली होती. कुतुबुद्दीनला घोड्यांचा अतिशय नाद होता, म्हणून त्यानं शुभ्रकाला आवर्जून बरोबर घेतलं. लाहोरमध्ये कर्णसिंहानं पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तो दुर्दैवानं पकडला गेला.

पुन्हा डोकं वर काढता येणार नाही असा धडा या बंडखोर राजपूतांना शिकवायचा असं कुतुबुद्दीननं ठरवलं. त्यानं एक योजना आखली. चेंडूच्या जागी कापलेल्या बकऱ्याचं मुंडकं वापरून पोलो खेळण्याची पद्धत अफगाणिस्तानात प्रचलित होती.

कुतुबुद्दीननं ठरवलं की कर्णसिंहाचा शिरच्छेद करून त्याच्या मस्तकासह पोलो खेळायचा. दुसऱ्या दिवशी शुभ्रकावर बसून कुतुबुद्दीन पोलोच्या मैदानात आला. तिथं साखळदंडानं जखडून ठेवलेल्या आपल्या धन्याला पाहून शुभ्रक अनावर झाला व अस्वस्थ होऊन थयथयाट करू लागला.

रागानं बेभान झालेल्या शुभ्रकानं कुतुबुद्दीनला खाली पाडलं व टापांखाली तुडवलं. तो जागीच गतप्राण झाला. त्या वेळी उडालेल्या गोंधळात कर्णसिंहानं स्वतःची सुटका करून घेतली आणि शुभ्रकावर बसून तो चितोडकडे दौडू लागला. पाठलाग करणाऱ्या सैन्याच्या हाती लागू नये म्हणून सतत तीन दिवस घोडदौड केल्यानंतर कर्णसिंह चितोडला पोचला.

अतिश्रमानं दमलेल्या त्या इमानी प्राण्यानं, आपला मालक आता सुखरूप आहे, याची खात्री झाल्यानंतरच जीव सोडला. या घटनेचा उल्लेख ‘पृथ्वीराज रासो’ या ग्रंथात आहे. काही वर्णन कदाचित थोडंफार अतिरंजित असेलही; पण कुर्मादेवीचं शौर्य आणि शुभ्रकाचं स्वामीप्रेम हे मात्र वादातीत आहे.

भारताच्या उत्तर व पश्चिम भागात घोरी व कुतुबुद्दीनच्या मोहिमा सुरू असताना पूर्वेकडे बख्तियार खिलजीचा दहशतवाद सुरू होता. बख्तियार खिलजी हा अतिशय शूर; पण कमालीचा धर्मवेडा आणि काफिरांचा द्वेष करणारा तुर्की सरदार होता. त्याच्या मोहिमा म्हणजे जुलूम, अत्याचार, कत्तली, मंदिरांचा विध्वंस, बलात्कार, लुटालूट यांचा प्रलयंकारी आविष्कार होता.

त्यानं ‘काफिरां’च्या ज्ञानाचं भांडार असलेल्या नालंदा विद्यापीठाला सन ११९३ मध्ये आग लावली. तिथल्या गुरुजनांची व देश-विदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांची कत्तल केली. नालंदा विद्यापीठाच्या भव्य परिसरात दोन हजार अध्यापक कोरिया, जपान, चीन, ग्रीस, इंडोनेशिया, कम्बोडिया, पर्शिया इथून आलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांना विविध विषयांचं ज्ञानदान करत असत. तिथल्या ग्रंथालयातील ९० लाख ग्रंथ तीन महिने जळत होते. बख्तियार खिलजीनं केलेली कत्तल,

तलवारीच्या धाकानं घडवलेलं धर्मांतर आणि ग्रंथालयांचा संहार याविषयी इतिहासकार मीनाज-ई-शिराज यानं त्याच्या ‘तबाकत-ई -नसीरी’ या ग्रंथात लिहून ठेवलं आहे. तो लिहितो : ‘जळणाऱ्या ग्रंथांमधून निघणाऱ्या धुराचा पडदा कित्येक दिवस आजूबाजूच्या टेकड्यांवर पसरला होता.’ नालंदाचा विध्वंस बख्तियार खिलजीनं केला हे नाकारण्याचा खूप प्रयत्न डाव्या इतिहासकारांनी अर्थातच केला.

‘हिंदू आणि बौद्ध यांच्यातील भांडणामुळे हिंदूंनीच ग्रंथालयाला आग लावली...’ ‘एकमेकांत खेळणाऱ्या गुराख्यांच्या पोरांकडून चुकून एक पेटता बोळा पडला आणि आग पसरली’ असे अनेक ‘सिद्धान्त’ या ‘इमिनंट हिस्टोरिअन्स’नी मांडले.

‘तबाकत-ई-नसीरी’सारखे असंख्य ठोस पुरावे नसते तर त्यांना हवा तोच इतिहास त्यांनी लादला असता. आजही या घटनेबद्दल ‘वेगवेगळी मतं’ असल्याची मखलाशी ते करतातच. यानंतर बख्तियार खिलजीनं विक्रमशीला आणि ओदंतपुरी या बिहारमधील इतर प्रमुख विद्यापीठांनाही आगी लावून असाच विनाश घडवला.

(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेवजयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.