पुरंदर-वज्रगड गाती बुलंद आत्मविश्वासाचे पोवाडे

Fort
Fortesakal
Updated on

लेखक - देवदत्त गोखले

‘शिवशाहीचा तुरा’ असा ज्याचा गौरवशाली उल्लेख इतिहासात आढळतो, तोच हा शिवकाळातील गाजलेला किल्ला. पुरंदर (Purandar fort) म्हणजे इंद्र. हा किल्ला देखील इंद्रासारखाच बलाढ्य आणि अजिंक्य असल्यामुळे याचे नाव पुरंदर ठेवले असावे. पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. या मजबूत किल्ल्यावर मोठी तटबंदी राहू शकत होती. तसचं दारुगोळा आणि धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवतालच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येत होती. पुरंदरची उंची, विस्तार, नैसर्गिक रित्या लाभलेले संरक्षण, आणि मोक्याची जागा यामुळेच या किल्ल्याला स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व होते. याच किल्ल्यामुळे स्वराज्याच्या सैन्यात सुद्धा कायमच आत्मविश्वास असायचा. पुरंदरचे रक्षण करण्यासाठी शेजारीच वज्रगड आहे. या जोड किल्ल्याने पाठीराख्याची भूमिका पार पाडली.

पुरंदराची उंची चार हजार ५०० फूट आहे. शत्रूपासून बचाव आणि पुणे शहर यावर बारीक नजर ठेवता येईल, अशी मोक्याची जागा हेरून हा किल्ला बांधला गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sanbhaji Maharaj) जन्म याच किल्ल्यावर झाला. म्हणूनच हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. तसचं काही काळ हा किल्ला पेशव्यांचीही राजधानी होती. पुरंदर म्हणजे वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा बोलका साक्षीदार. दिलेरखानसोबत झालेल्या लढाईत मुरारबाजींना वीर मरण आले. यानंतरच इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला.
पुरंदर घेतल्यावर महाराजांच्या लक्षात आले की शेजारीच असलेल्या टेकडीवरून पुरंदर वर तोफा चालवणे शक्य होते. मुख्य किल्ल्याच्या शेजारी असलेली उंच टेकडी एकतर बांधून घ्यावी अन्यथा सुरुंग लावून जमीनदोस्त करावी, असे उल्लेख महाराजांच्या आज्ञापत्रात आढळतात. महाराजांनी दूरदृष्टी आणि मुख्य किल्ल्याचे संरक्षण हा त्या मागचा विचार! म्हणूनच पुरंदरच्या शेजारीच असलेली ही जागा बांधून घेतली गेली आणि त्याला गडाचे स्वरूप दिले. इंद्र देवाचे अस्त्र वज्र असल्यामुळे आणि ही टेकडी सुद्धा पुरंदरचे रक्षण करणार असल्यामुळे महाराजांनी या टेकडीचे नामकरण ‘वज्रगड’ असे केले. हा किल्ला बांधून महाराजांनी पुरंदराकडे येणारी एकमेव सोपी वाट शत्रूसाठी कायमची बंद करून टाकली आणि लढाई करताना या किल्ल्याची सोबत सुद्धा महत्त्वाची ठरणार होती.

Fort
कुठून येतो आपलेपणा-परकेपणा?

कार्यसंस्कृतीचा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सोबत असण्याची भावना. असे जोड किल्ले बांधून महाराजांनी ‘सोबत’ आणि ‘विश्वास’ अत्यंत महत्त्वाचे घटक असतात, हाच संदेश पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम केले. यातूनच ज्याप्रमाणे स्वराज्य उभे राहिले, त्याचप्रमाणे प्रत्येक संस्था उभी राहू शकते हा महत्वाचा विचार या जोड किल्ल्यांच्या माध्यमातून महाराजांनी रुजविला असे आपण म्हणू शकतो. सध्या हे दोन्ही किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत.
माची आणि बालेकिल्ला अशा दोन भागात हा किल्ला विभागलेला आहे. पुरंदर वर चढायला एकच सोपा मार्ग आहे. इतर सर्व बाजू अतिशय दुर्गम आहेत. पूर्वी इथे तोफा ओतण्याचा कारखाना आणि टांकसाळ असल्याचे उल्लेख आढळतात. गडाच्या माचीवर मंदिरे, पद्मावती - राजाळे तलाव, पेशवेकालीन इमारतीच्या जोत्यावर ब्रिटिशांनी बांधलेले बंगले, चर्च, बराकी, आणि मुरारबाजींचा आवेशपूर्ण पुतळा अशा अनेक वास्तू आहेत. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पुरंदरेश्वर आणि पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. याच किल्ल्यावर सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म झाला. बालेकिल्ल्यावर दिल्ली दरवाजा, खंदकडा, पाण्याची टाकी, केदार दरवाजा, केदारेश्वराचे मंदिर, आणि अंबररखान्याचे अवशेष दिसतात. केदारेश्वर मंदिर उंचावर असल्याने येथून चारही बाजूचा परिसर व किल्ल्याचा आवाका लक्षात येतो. या ठिकाणावरून खूपसे गड दिसतात.

व्यक्तिमत्त्व विकास साधत असताना आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा असतो. पुरंदर आणि वज्रगड हे दोन्ही किल्ले स्वराज्याच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढविणारे होते. पुरंदर
किल्ल्याला स्वराज्यात महत्त्वाचे स्थान देण्यामागे शिवाजी महाराजांच्या एका प्रजाहित दक्ष राजाचे दर्शन आपल्याला घडते. पुरंदरमुळे राज्यावर बारीक नजर आणि शत्रूपासून बचाव शक्य होते. तसेच शेजारीच असलेला वज्रगड सुद्धा महाराजांनी आवर्जून बांधून घेतला आणि तो पुरंदरचा रक्षणकर्ता झाला. आपले व्यक्तिमत्त्व घडवताना, त्याचा विकास करताना अनेक गोष्टी आपल्याला कटाक्षाने कराव्या लागतात. यात सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात सुद्धा आपले व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनविण्यासाठी हाच आत्मविश्वास उपयोगी ठरतो.

Fort
युद्धग्रस्त देशात प्रवेश

इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदराच्या तहात’ सुद्धा 'एकदा माघार घ्यावी लागली तरी पुन्हा जिंकू शकतो' हाच आत्मविश्वास झळकतो. तसेच स्वराज्य ते सुराज्य घडवण्याची एक झलक याच किल्ल्यांच्या माध्यामतून आपल्याला दिसते. त्यामुळे किल्ले पुरंदर – वज्रगड हे जोड किल्ले स्वराज्याच्या आत्मविश्वासाचे पोवाडे गात आजही आपल्याला साद घालत आहेत, याची प्रचिती तिथे गेल्यावर अनुभवायला मिळते.

(लेखक हे गोखलेज अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (‘गती’) जळगावचे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()