सीताराम मडावी हे भामरागड तालुक्यातील जिंजगाव येथील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी. महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार 2012 साली त्यांना मिळाला आहे. सह्याद्री वाहिनीनेसुद्धा त्यांचा सन्मान केला आहे. साधारण वयाच्या 50-60 कडे झुकलेले सीतारामजी अतिशय उत्साही व्यक्तिमत्त्व. गुरनूर गाव हे त्यांचे मूळ गाव. तरुण वयात त्यांनी पोलिसाची नोकरी स्वीकारली होती. संवेदनशील परिस्थितीमुळे त्यांना ती वर्षभरात सोडावी लागली. गेली 30 ते 35 वर्षे ते जिंजगाव येथे वास्तव्यास आहेत. गाव हे दुर्गम आहे. गोंड व माडिया आदिवासी बांधव या गावात वास्तव्यास आहेत. साधारण 90 घरांचे गाव आहे.
B.A. पर्यंत शिक्षण घेतलेल्या सीतारामजींना सुरुवातीपासूनच वाचनाची गोडी होती. शेतीचा विकास करायचा तर त्याचे आधुनिकीकरण व्हायला हवे. त्यासाठी त्यांनी कृषी विभाग भामरागड यांच्यामार्फत कृषीविषयक पुस्तकांची एक लायब्ररी स्वतःच्या घरीच सुरू केली. या भागात पाऊस चांगला पडत असल्याने आणि जमीन भात पिकाला पूरक असल्याने सर्व जण भाताचे बियाणे जमिनीवर उधळायचे. त्यामुळे पीक कमी यायचे. कोणीही पद्धतशीर लावणं करीत नसे. भाताची लावणं कशी करायची याचे शिक्षण या भागात नव्हते. सीतारामजी यांना सुरुवातीला लोकांना समजावून देणे खूप अवघड गेले. त्यांनी पुस्तके वाचून स्वतःची शेती उत्तम केली. या भागात पहिल्यांदा त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने श्री पद्धतीने भाताची लागवड केली. त्यांच्या भाताच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाली. आधुनिक शेती अवजारांचा वापर केला. ट्रॅक्टरचासुद्धा उपयोग केला. स्वतः केले आणि मग जनतेला पटवून दिले. गावातील शेतकरी मंडळी अशिक्षित होती. त्यांना मराठी वाचता येत नसे. मग सीतारामजी रोज आदिवासी बांधवांचे क्लास घ्यायचे. त्यांना कृषीविषयक तसेच आधुनिक शेतीविषयक ज्ञान द्यायचे. गोंडी भाषेत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे महत्त्व समजावून सांगायचे. मराठीत पुस्तक वाचायचे आणि त्याचे गोंडीत भाषांतर करून लोकांना सांगायचे. आदिवासी बांधवांसाठी असलेल्या शासकीय योजना गावाला आणि व्यक्तीला कशा मिळतील यासाठी ते सतत धडपडत असतात. सातत्याने पाठपुरावा करून त्या मिळवितात. कृषी विभाग, वनविभाग जलसंधारण विभाग अशा अनेक शासकीय विभागाकडून त्यांनी गावाच्या सर्व बाजूंनी तलावाची निर्मिती करवून घेतली. गावात बोअरवेल खोदाईचे काम करायचे नाही हा निर्णय गावातील ग्रामसभेने घेतला आहे. तलावांची निर्मिती झाल्याने गावकऱ्यांच्या शेतात असलेल्या विहिरींची पाण्याची पातळी 10 फुटाने वाढली आहे. पावसाळ्यानंतरची पिके त्यांना घेता येऊ लागलीत. विविध प्रकारचा भाजीपाला स्वतःपुरता का होईना गावातील लोक आज घ्यायला लागले आहेत. अनेकांनी कलमी आंब्यासारखी फळझाडे शेतात लावलीत. शासकीय योजनांचा फायदा घेऊन सीतारामजी यांनी इतर शेतकऱ्यांबरोबर महाराष्ट्रातील समृद्ध शेती असलेल्या भागाला भेटी दिल्या. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन तेथील शेती बघितली. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार या व्यक्तींची कामे त्यांनी बघितली आणि समजून घेतली. या व्यक्तींचे मार्गदर्शन आणि भेटसुद्धा त्यांना घेता आली. त्यामुळे त्यांचा उत्साह खूपच वाढला. गावात पाणी असेल तर विकास शक्य आहे हे समजले. जिंजगाव येथे खूप मोठा आणि जुना मालगुजारी तलाव आहे (मामा तलाव). त्याची निर्मिती झाल्यापासून गाळ काढलाच गेला नव्हता. 2015 मध्ये सीतारामजी याच्याशी बोलताना हा विषय निघाला. गावाच्या सभोवतालची तळी ही छोट्या आकाराची शेततळी होती. मुख्य तलाव जो 20-30 एकरांमध्ये पसरलेला आहे तो गाळाने भरला होता. त्याचे खोलीकरण व्हावे व त्याकरिता शासनाने निधी मंजूर करावा म्हणून सीतारामजी 3 वर्षे शासनाकडे पाठपुरावा करीत होते. आम्ही लोकबिरादरी प्रकल्पातर्फे त्यांना हा तलाव खोल करून देण्याचे आश्वासन दिले आणि देणग्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून 15 लाख खर्च करून तलावाचे खोलीकरण आणि तलावाच्या पाळीचे रुंदीकरण मे 2016 मध्ये करून दिले. लगेच जुलैमध्ये कोसळलेल्या दमदार पावसाने तलाव काठोकाठ भरला. तलावाचे पाणी कालव्यामार्फत शेतामध्ये पोहोचविण्याचे काम सध्या सुरू आहे. डिझेल इंजिन पंप, सोलर पंपाच्या माध्यमातून सध्या शेतीला पाणीपुरवठा केला जातो. गावात लाईट आहेत पण अनियमितता खूपच आहे. या तलावाच्या खोलीकरणामुळे अनेकांच्या शेतांना पाणी मिळाले. उत्पन्न वाढले. मत्स्य व्यवसाय करायला मुबलक पाणीसाठा निर्माण झाला. गेल्यावर्षी साधारण 3 लाख रुपयांची मस्त्यविक्री या गावकऱ्यांनी केली. सीतारामजी व गावकऱ्यांशी बोलून हे गाव आदर्श करूया म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. गावात आम्ही हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पामार्फत 50 हजार लिटरची उंच टाकी, 40 फूट खोल विहीर, सोलर पंप आणि सर्व 90 घरांत पाइपलाइनने नळांमार्फत पाणीपुरवठा केला आहे. आदर्श गाव व्हावे यासाठी हागणदारीमुक्त गाव होणे आवश्यक आहे. घरपोच पाणी मिळत नसेल तर शौचालयाचा वापर होणे अशक्य आहे. म्हणून ही पाण्याची योजना आम्ही केली. गावातील 70 टक्के जनता आता संडासचा वापर करू लागली आहेत. इतरांना शौचालयाचे महत्त्व समजावण्याचे काम सुरूच आहे. गाव व्यसनमुक्त व्हावे म्हणून अधूनमधून प्रबोधन/पथनाट्य केली जातात. सीतारामजी हे या भागातील लोकनेते असल्याने तेसुद्धा लोकांना व्यसनमुक्तीसंदर्भात मार्गदर्शन करीत असतात. सीतारामजी आणि आजूबाजूच्या खेड्यातील जनतेने खूप आग्रह केल्यामुळे 5 मे 2019 रोजी या गावात साधना विद्यालय नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही संस्थेमार्फत सुरू केली आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग सुरू झाले आहेत.
सीताराम मडावी यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सर्वांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रमशाळेत झाले आहे. एक मुलगा बी. टेक. झाला दुसरा इंजिनिअरिंग करतोय. मुलगी 12 वी मध्ये शिकते आहे.
जिंजगावचा विकास व्हावा यासाठी सातत्याने धडपडणारे सीतारामजी सध्या डायबेटीस आणि पायाला झालेल्या जखमेने आजारी आहेत. तरीही न थकता ते सातत्याने कामात व्यस्त असतात.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.