याद हमारी भुला न देना (धनंजय कुलकर्णी)

dhananjay kulkarni write article in saptarang
dhananjay kulkarni write article in saptarang
Updated on

शमशाद बेगम यांनी आपल्या वेगळ्या आवाजानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. "गाडीवाले गाडी धीरे हाक रे', "दूर कोई गाये', "तेरी मेहफिलमे किस्मत आजमाकर...', "धरती को आकाश पुकारे', "कहींपे निगाहें कहींपे निशाना', "कजरा मुहब्बतवाला' अशी एकापेक्षा एक उत्तम गाण्यांद्वारे रसिकांच्या हृदयात त्यांनी अढळ स्थान मिळवलं. या गुणी गायिकेची जन्मशताब्दी ता. चौदा एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर एक नजर.

भारतीय चित्रपटांच्या दुनियेत लता मंगेशकर या ताऱ्याचा उदय होण्यापूर्वी ज्या गायिकांची आपली संगीतकारकिर्द फुलवली होती, त्यात एक होत्या शमशाद बेगम. तशा नूरजहां, जोहराबाई अंबालीवाला, आमीरबाई कर्नाटकी, गीता रॉय, खुर्शीद, सुरैय्या यांनीदेखील आपला स्वरांची जादू दाखवायला चाळीसच्या दशकाच्या प्रारंभीच सुरवात केली होती; पण शमशाद बेगम लता यांच्यासमोर सर्वांत मोठी इनिंग खेळू शकल्या, हे लक्षात घ्यावं लागेल. या गुणी गायिकेच्या स्वरांत एक आगळीवेगळी जादू होती. काहीशा अनुनासिक; तिखट, झणझणीत आणि काळजात आरपार शिरणाऱ्या आवाजामुळं रसिकांच्या हृदयात त्यांनी वेगळी जागा मिळवली. आज मोबाईलच्या युगात त्यांच्या आवाजांतल्या गाण्यांची रिमिक्‍स जास्त होताना दिसतात, हे कशाचं द्योतक आहे? येत्या शनिवारपासून (ता. चौदा एप्रिल) त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होतो आहे. त्या निमित्तानं या गायिकेच्या सुरील्या कारकिर्दीचं स्मरणरंजन करूया.

खरं तर चित्रपटांतून गायचं शमशाद यांनी साठच्या दशकाच्या उत्तरार्धातच बंद केलं होतं. त्यांचं शेवटचं गाजलेलं गाणं म्हणजे 1968 मध्ये आलेल्या "किस्मत' या चित्रपटातलं. आशा भोसले यांच्यासोबत गायलेलं "कजरा मोहब्बतवाला' हे ते गाणं. त्यानंतर शमशाद यांनी चित्रपटांच्या दुनियेला रामराम ठोकला आणि त्या मुलीसोबत राहू लागल्या. जवळपास चाळीसएक वर्षांनंतर त्यांना केंद्र सरकारचा "पद्मश्री' पुरस्कार 2009 मध्ये मिळाला, तेव्हा त्या पुन्हा थोड्या चर्चेत आल्या. तशा चित्रपटाच्या दुनियेत असूनही त्या कधीच गॉसिप्स, चर्चा यांमध्ये अडकल्या नाहीत. कधी कुठल्या पार्टीला गेल्या नाहीत, की कधी प्रीमियरला गेल्या नाहीत. "आपण बरं आणि आपलं काम बरं' या संन्यस्त वृत्तीनं त्या आयुष्यभर जगल्या. मागणी होती, तोवरच चित्रपटांच्या दुनियेत थांबल्या- मग स्वत:हून बाजूला झाल्या. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं त्यांनी कधी भांडवल केलं नाही, की त्याचा डंका पिटून सहानुभूती मिळवली नाही. हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. कधी त्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या नाहीत, तर कधी पुरस्कारसोहळ्यात दिसल्या नाहीत. प्रसिद्धीसाठी आयुष्यातलं पहिलं छायाचित्र त्यांनी वयाच्या पन्नाशीत काढलं! असं असलं, तरी रसिक त्यांना विसरले नाहीत.

शमशाद बेगम यांचा जन्म लाहोरचा. 14 एप्रिल 1919. (तारखेचा एक योगायोग बघा. त्यांच्या जन्माच्या एक दिवस आधीच जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं!) लाहोरच्या गर्ल्स स्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या मुख्याध्यापिकेचं लक्ष त्यांच्या आवाजाकडं गेलं आणि रत्नपारखी नजरेनं त्यांनी हा "हिरा' टिपला. शाळेतून शमशाद यांच्या गायकीला प्रोत्साहन मिळत गेलंच, शिवाय घरातूनसुद्धा रीतसर संगीताचे धडे मिळण्यासाठी उस्तादांकडं "शागिर्दी' सुरू झाली. घरी कर्मठ वातावरणामुळं आई-वडिलांचा जाहीर गायकीला ठाम विरोध; पण काकांच्या आग्रहानं वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी "जेनोफोन' कंपनीसाठी त्या काळचे प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडं गायकीची पहिली ऑडिशन दिली. मास्टरजींना त्यांचा कोवळा अनुनासिक स्वर एवढा आवडला, की ताबडतोब त्यांनी शमशाद यांच्याशी गायकीचा करार करून टाकला. मास्टरजींनी त्यांच्या गळ्यातली "जादू' ओळखली अन्‌ बारा गाण्यासाठी केलेला करार शंभर गाणी रेकॉर्ड करण्यापर्यंत गेला! लाहोर, पेशावर, दिल्ली या आकाशवाणी केंद्रांवर त्यांच्या भन्नाट आवाजातली गाणी गाजत होती. इकडं चित्रपटसृष्टीतदेखील आमूलाग्र बदल घडत होता. बोलपट आणि त्या पाठोपाठ आलेल्या पार्श्वगायनाच्या तंत्रानं शमशाद यांना नवं व्यासपीठ उपलब्ध झालं. (त्यांच्या घरातल्या खानदानी वातावरणामुळं रुपेरी पडद्यावर चमकणं सोडाच; पण स्वतःचं साधं छायाचित्रंही प्रसिद्ध करणं त्यांना नाही जमलं; पण याबाबत त्यांना ना खेद ना खंत.) पांचोली आर्टसच्या "खजांची' (इसवीसन 1941) चित्रपटातल्या "सावन के नजारे है' या गीतानं त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट एकूणच भारतीय चित्रपटसंगीतात मोठं मन्वंतर घडवणारा ठरला. सायकलीवरून तरुणींचा घोळका पंजाबी ड्रेस घालून आणि ओढणी फडकावत शमशाद यांच्याप्रमाणं "अहा अहा' म्हणत जात होता, तेव्हा भारतीय चित्रपटसंगीताला नव्या तरुणाईची पालवी फुटत होती. (नायिका रमोला आणि संगीत गुलाम हैदर.) शमशाद यांच्या मोकळ्याढाकळ्या, पारदर्शी आवाजावर रसिक फिदा झाले.

"खजांची' चित्रपटाच्या यशानं शमशाद यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडून दिले. त्यानंतर आलेल्या "जमीनदार',"खानदान', "पुंजी' या गुलाम हैदर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. त्या वेळी शमशाद बेगम लाहोरला होत्या. लाहोरदेखील चित्रपटांचं एक केंद्र होतंच. अभिनेत्री नर्गिस यांचा पहिला चित्रपट "तकदीर' 1943 मध्ये आला. त्याचे दिग्दर्शक होते मेहबूब. मेहबूब यांच्या आग्रहामुळं शमशाद पहिल्यांदा मुंबईत आल्या, या चित्रपटासाठी गायल्या. संगीत होतं रफिक गझनवी यांचं. या काळात जगात दुसऱ्या महायुद्धाचं आणि भारतात स्वातंत्र्यलढ्याचं वातावरण होतं. हा जमाना खरं तर कुंदनलाल सैगल आणि नूरजहां यांचा होता. शमशाद यांनी त्यांच्या चित्रपटांतून गाणी गायली; पण त्यांच्यासोबत मात्र गाता आलं नाही. खरं तर त्या सैगल यांच्या मोठ्या चाहत्या होत्या; पण योग आला नाही. (नूरजहां यांना तरी कुठं सैगल यांच्यासोबत गाता आलं?) मेहबूब यांच्या "अनमोल घडी' (1946) या सुपरहिट चित्रपटातली नूरजहां यांची सगळी गाणी गाजली. यात शमशाद यांचं एक गाणं होतं ः "उडन खटोले पे उड जाऊं तेरे हाथ न आऊ.' संगीतकार नौशाद यांच्याकडचं त्यांचं हे पहिलं आणि लोकप्रिय गाणं! त्यांना शमशाद यांचा स्वर आवडला आणि पुढची दहा-बारा वर्षं त्यांनी लता सोबत असतानादेखील काही गाणी जाणीवपूर्वक शमशाद यांच्याकडून गाऊन घेतली. 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली. लाहोरच्या असूनदेखील शमशाद यांनी भारतात राहणं पसंत केलं. नौशाद यांच्याकडं त्यांनी गायलेलं "मेला' (1948) या चित्रपटातलं "धरती को आकाश पुकारे आजा आजा प्रेम दुआरे' हे गाणं मला वाटतं त्यांच्या सर्वोत्कृष्ट पाच गाण्यांपैकी असावं. "शिवरंजनी' रागावर आधारित या गीताची चाल नौशाद यांना स्वप्नात सुचली होती, असं ते सांगायचे! यातल्याच "मैं भंवरा तू है फूल ये दिन मत भूल', "मेरा दिल तोडनेवाले' या मुकेश यांच्यासोबतच्या आणि "तकदीर बनी बनकर बिगडी' या दर्दभऱ्या गीतांतून शमशाद यांचा आणखी एक "अंदाज' रसिकांपुढं आला. दिलीप-नर्गिस ही जोडी असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. यू. सन्नी यांचं होतं. पुढं "अंदाज' (1949) या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये त्यांचं लता मंगेशकर यांच्यासोबत एक गाणं होतं "डरना मुहोब्बत करले.' यात त्यांचा आवाज कुक्कू यांच्यासाठी वापरण्यात आला होता. याच वर्षी आलेल्या "दुलारी'मध्ये "चांदनी आई बनके प्यार ओ साजना' आणि "ना बोल पी पी मोरे अंगना' ही त्यांची दोन गाणी होती. पन्नासच्या दशकाच्या प्रारंभी "बाबूल' प्रदर्शित झाला. यात त्यांची खच्चून पाच गाणी होती. "मिलते ही आंखे दिल हुआ दिवाना किसीका', "दुनिया बदल गई मेरी दुनिया बदल गई' या तलत मेहमूद यांच्यासोबतच्या दोन उत्तम गाण्यांसोबतच "छोड बाबूल का घर मोहे पीके नगर आज जाना पडा' हे "बिदाईगीत' खूप गाजलं.

संगीतप्रधान "बैजूबावरा'त (1952) त्यांच्या वाटेला एकच गाणं आले; पण काय गायलंय त्यांनी! "दूर कोई गाये धून ये सुनाये तेरे बिन छलिया रे.' आजही या गाण्याचे ओपनिंग म्युझिक पिसेस ऐकले, तरी शब्द ओठी येतात. याच दशकात नौशाद यांना दोन ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाले, ज्यांत त्यांनी शमशाद यांच्या आवाजाचा मस्त वापर केला. पहिला होता मेहबूब यांचा "मदर इंडिया' (1957). यात "पीके घर आज प्यारी दुल्हनिया चली', "गाडीवाले गाडी धीरे हाक रे', "होली आई रे कन्हाई रंग' आणि "दुखभरे दिन बिते रे भैया आज सुख आयो रे' ही त्यांची गाणी खूप गाजली. के. असिफ यांच्या "मुघले आझम'मध्ये (1960) "तेरी महफिलमे किस्मत आजमाकार हम भी देखेंगे' ही लता यांच्यासोबतची कव्वाली होती. नौशाद यांच्याकडचा त्यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला.

नौशाद यांची पहिली पसंती लता मंगेशकर होत्या आणि ओ. पी. यांची पसंती आशा भोसले या होत्या. मात्र, तरी या दोघांकडं ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्यांचं शमशाद यांनी सोनं केलं. गुरू दत्त यांच्या "आरपार'मधली (1954) सगळी गाणी गीता दत्त यांना आहेत, फक्त एकाच गाण्यात शमशाद आहेत. हे गाणं चित्रित झालं होतं बालकलाकार जगदीपवर! गाण्याचे बोल होते "कभी आर कभी पार लागा तिरे नजर.' गुरू दत्त यांनी आपल्या पुढच्या "सीआयडी'मध्ये मात्र त्यांना चक्क चार गाणी दिली आणि सगळी हिट झाली. "पूछ मेरा क्‍या नाम रे', "कहींपे निगाहे कहींपे निशाना' आणि "लेके पहला पहला प्यार भरके आंखोमें खुमार.' ओ.पी. आणि शमशाद हे कॉंबिनेशन आता जमू लागलं होतं. पुढं "नया दौर'मध्ये (1957) त्यांचं आशा यांच्यासोबत पंजाबी तडक्‍याचं गाणं होतं "रेशमी सलवार कुर्ता जालीका.' याच वर्षी आलेल्या "नया अंदाज'मध्ये त्यांचे सहगायक होते किशोरकुमार आणि गाणं होतं "मेरे निंदोमें तुम मेरी ख्वाबो में तुम.' मात्र, नंतर आशा यांचा स्वर ओ.पी. यांच्या संगीताचा प्राणस्वर ठरला. साठच्या दशकाच्या अखेरीस "किस्मत'मध्ये "कजरा मुहोब्बतवाला' हे आशा यांच्यासोबतचं गीत त्यांच्याकडं आले. या गीतात शमशाद यांचा स्वर चक्क विश्वजितसाठी वापरला आहे. दुर्दैवानं शमशाद यांचं हे शेवटचं लोकप्रिय गाणं ठरलं.
इतर संगीतकारांकडं त्या भरपूर गायल्या. "सैंया दिल मे आना रे मोहे लेके जाना रे', "दुनिया का मजा लेलो दुनिया तुम्हारी है' (बहार ः सचिनदेव बर्मन), "एक दो तीन आजा मौसम है रंगीन' (आवारा ः शंकर- जयकिशन), "शरमा के यूं सब परदा' (चौदहवी का चांद ः रवी), "काहे कोयाळ शोर मचाये रे मोहे अपना कोई', "देख चांद की ओर' (आग ः राम गांगुली)

शमशाद यांच्यासाठी संगीत ही एक "इबादत' होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी कधी उन्माद केला नाही, की विजनवासाचं दुःख केलं नाही. आयुष्याची चाळीस वर्षं त्यांनी विजनवासात काढली. शमशाद यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी चक्क आंतरधर्मीय प्रेमविवाह (गणपतलाल बट्टो या वकिलाशी!) केला होता! मला वाटतं हीच काय ती त्यांच्या आयुष्यातली "ब्रेकिंग न्यूज' असावी- अन्यथा संत प्रवृत्तीच्या या गायिकेला आयुष्यातल्या कोणत्याही चढ-उतारांनी ना आनंद दिला, ना दु:ख दिलं! बॉलिवूडच्या इतक्‍या जवळ ठाण्याच्या पवई परिसरात त्या शांतपणे आयुष्यातली चाळीस वर्षं राहत होत्या, याची कुणाला कल्पना होती? 1982 मध्ये नूरजहां पाकिस्तानातून भारतात आल्या, तेव्हा सगळं बॉलिवूड त्यांच्यापुढं झुकलं होतं. त्या वेळी नूरजहां यांचे सगळे समकालीन षण्मुखानंद हॉलमध्ये जमा झाले होते; पण शमशाद यांची आठवण कुणालाच नव्हती. 23 एप्रिल 2013 रोजी शमशाद यांचं निधन झालं. आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होतो आहे. अनुल्लेखानं मारत आपण सर्वांनी आजवर त्यांच्यावर अन्यायच केला आहे. या वर्षात सरकारी पातळीवर नसलं, तरी रसिक आपापल्या परीनं या गुणी गायिकेची आठवण जागवतील अशी अपेक्षा!

एकूण गाणी तेराशेवर
शमशाद बेगम यांनी एकूण तीस वर्षांत गायलेल्या हिंदी चित्रपटातल्या गाण्यांची संख्या तेराशेच्या आत आहे. यातही पुन्हा दशकांनुसार विभागणी केली, तर चाळीसच्या दशकात त्यांची 502, पन्नासच्या दशकात 706, तर साठच्या दशकात अवघी 75 गाणी आली. संगीतकारांनुसार आपण त्यांच्या कारकिर्दीकडं बघितलं, तर सर्वाधिक 86 गाणी त्यांनी पंडित गोविंदराम यांच्याकडं गायली. नौशाद यांच्याकडं 59, तर ओ.पी. नय्यर यांच्याकडं 40 गाणी गायली. द्वंद्वगीतांमध्ये महंमद रफी यांच्यासोबत सर्वाधिक 168 गाणी आहेत. मुकेश यांच्यासोबत 22, तर किशोरकुमार यांच्यासोबत 24 गाणी आहेत. शमशाद यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत 26, तर आशा भोसले यांच्यासोबत 39 गाणी गायली. त्यांच्या सोलो गीतांची संख्या 708, तर इतर गायक- गायिकांसोबत गायलेल्या गीतांची संख्या 576 आहे.

लता यांनी गायलं शमशाद यांचं गाणं!
शमशाद बेगम यांच्या आवाजातल्या गाण्यांनी "खजांची' चित्रपट सुपरहिट ठरला. यातल्या "सावन के नजारे हैं अहा अहा' या गाण्यानं तर धमाल केली. याच गाण्याचा फायदा लता मंगेशकर यांनाही झाला. त्या वेळी पुण्यात या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं ग्लोब (आताचं श्रीनाथ) थिएटरमध्ये नवोदित कलाकारांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बारा-तेरा वर्षांच्या चिमुरड्या लतानं भाग घेऊन "खजांची'मधलं गाणं गाऊन पहिला क्रमांक पटकावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.