भारतीय सिनेमाच्या ‘गोल्डन इरा’मधील गीतकारांचा जेव्हा आपण विचार करू लागतो, तेव्हा पहिल्या रांगेतील गीतकार आपल्याला लगेच आठवतात; पण या काळात असेही काही गीतकार होते, ज्यांना भलेही चित्रपट कमी मिळाले असतील, त्यांच्या गाण्यांना तुलनेने यश कमी मिळालाले असेल; पण जनसामान्यावर त्यांच्या गीतांनी नक्कीच छाप सोडली होती. त्यापैकीच एक होते गीतकार अंजान. आज २८ ऑक्टोबर गीतकार अंजान यांचा जन्मदिन आहे, त्या निमित्त...
आजची पिढी गीतकार अंजान हे नाव ऐकून कदाचित अचंबित होईल; पण आजच्या पिढीचे आवडते गीतकार समीर यांचे वडील म्हणजे गीतकार अंजान! त्यांनी आयुष्यभर प्रचंड मेहनत घेतली. खूप काम केलं; पण नशीब त्यांच्यावर फारसं कधीच प्रसन्न होत नसे. आपल्या तब्बल ४० वर्षांच्या चित्रपट कालखंडात त्यांना कोणतेही सन्मानाचे पुरस्कार मिळाले नाहीत. सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल त्यांच्या वाट्याला आला.
असे असतानादेखील ते हिंमत हरले नाहीत आणि परिस्थितीशी मुकाबला करत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये अमिताभ बच्चन यांच्या अनेक लोकप्रिय चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली होती. त्यामुळे ती पटकन रसिकांपर्यंत पोहोचली. हेराफेरी, डॉन, मुकद्दर का सिकंदर, कालिया, शराबी, महान, लावारिस... ही त्याचीच काही उदाहरणे.
सुरुवातीचा काळ त्यांचा खऱ्या अर्थाने संघर्षाचा होता. २८ ऑक्टोबर १९३० या दिवशी बनारस येथे जन्मलेल्या अंजान यांचं जन्मनाव होतं लालजी पांडेय. एम. कॉम. ही पदवी त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून प्राप्त केली. इतके उच्च विद्याविभूषित असताना त्यांना त्या काळात सहज कुठेही चांगली नोकरी मिळाली असती; पण त्यांना सुरुवातीपासून साहित्य, कविता यांची आवड होती. चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची स्वप्न ते पाहत होते.
बनारसला होणाऱ्या कविसंमेलनात ते त्यांच्या कविता सादर करीत. त्या वेळी त्यांनी आपले ‘अंजान’ हे तखल्लूस वापरायला सुरुवात केली. एका कविसंमेलनात त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या कवितेचे विडंबन ‘मधुबाला’ या नावाने केले आणि त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. एकदा पार्श्वगायक मुकेश बनारसला आले असताना त्यांची भेट घेतली. मुकेश अंजान यांच्या कविता ऐकून खुश झाले आणि मुंबईला येण्याचा सल्ला दिला.
मुंबईत आल्यानंतर मुकेश यांनी त्यांची भेट राज कपूर यांच्याशी करून दिली. राज कपूर यांनी अंजान यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला, ‘‘चित्रपटात जर टिकून राहायचे असेल तर कवितेच्याऐवजी गीतकार बनवण्याचे कौशल्य विकसित करा; तरच इथे टिकाव लागेल.’’ राज कपूर यांचा सल्ला खूप महत्त्वाचा होता. नंतर अंजान यांनी अभिनेता प्रेमनाथ यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांचा ‘गोलकोंडा का कैदी’ (१९५३) हा चित्रपट फ्लोअरवर होता.
या सिनेमाची गाणी लिहिण्याची संधी अंजान यांना मिळाली. चित्रपट फ्लॉप झाला; मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. पुन्हा संघर्ष सुरू झाला. या काळात अंजान अक्षरशः या स्टुडिओतून त्या स्टुडिओत, या निर्मात्याकडून त्या निर्मात्याकडे भटकत होते. त्यांचा मुंबईच्या लोकलमध्येच फार वेळ जायचा. संध्याकाळी कुठल्या तरी अपार्टमेंटमधील जिन्याखाली ते झोपायचे.
मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात त्यांचा जीव घाबराघुबरा व्हायचा. मुंबई महानगरीचं एक वेगळंच चित्र त्या काळात त्यांनी अनुभवलं. कदाचित याच अनुभवावरून त्यांनी पुढे ‘डॉन’ या चित्रपटातील ‘इ है बंबई नगरीया तू देख बबुवा...’ हे गाणं लिहिलं असावं.
यानंतर संगीतकार जी. एस. कोहली यांच्या ‘लंबे हाथ’ या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यातील ‘प्यार की राह दिखा दुनिया को, रोके जो नफ़रत की आँधी’ हे रफीने गायलेलं गाणं खूप गाजलं. अंजान यांच्याकडे आता संगीतकारांचे लक्ष जाऊ लागले. गीतकार अंजान यांच्या लेखणीला न्याय मिळेल, असा सिनेमा १९६४ मध्ये त्यांना मिळाला.
ख्यातनाम साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या गाजलेल्या ‘गोदान’ या कादंबरीवरील चित्रपटाला संगीत पंडित रविशंकर यांचे होते तर गाणी अंजान यांनी लिहिली होती. या सिनेमाच्या कथानकाला पोषक अशी उत्तर प्रदेश बोलीभाषेतील गाणी निर्मात्याला हवी होती. अंजान यांनी खरोखरच तिथल्या लोकगीतातील भाषा, ते शब्द या चित्रपटातील गाण्यासाठी वापरले. या चित्रपटांमध्ये त्या काळातील सर्वश्रेष्ठ गायकांचा स्वर होता.
हिया जरत राहत दिन रैन हो रामा (मुकेश), पिपरा के पतवा सरीख डोले मोरा मनवा (रफी), जाने कहा मोरा जिया डोले रे (लता), ओ बेदर्दी क्यू तडपाये (गीता दत्त - महेंद्र कपूर) ‘गोदान’ या चित्रपटातील गाण्यासाठी अंजान यांनी खरोखर कलात्मक उंची गाठली होती. उत्तर प्रदेशातील भाषेचा ‘परफेक्ट फ्लेवर’ त्यांच्या शब्दातून आला होता.
संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी आपल्या ‘बहारे फिर भी आयेगी’ (१९६५) या चित्रपटासाठी ‘आपके हसीन रुख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है....’ गाणं लिहून घेतलं, जे खूप गाजले. साठच्या दशकाच्या अखेरीस जी. पी. सिप्पी यांच्या ‘बंधन’ (१९६९) या चित्रपटापासून मात्र त्यांचा हा अपयशाचा उपवास संपला. या चित्रपटात राज राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या भूमिका होत्या.
भोजपुरी भाषा आणि तिथली गाणी या सिनेमात मस्त वापरली गेली होती. ‘बिना बदरा के बिजुरिया कैसे बरसे’ हे मुकेश यांनी गायलेले गाणं त्या काळात प्रचंड गाजलं आणि सर्वांचं लक्ष अंजान यांच्याकडे गेलं. आता गीतकार अंजान यांना निर्मात्यांकडून बोलावणे येऊ लागले. सत्तरच्या दशकामध्ये प्रकाश मेहरा यांच्या अनेक चित्रपटांसाठी अंजान यांनी गाणी लिहिली.
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचा हिट गीतकार अशी त्यांची प्रतिमा बनली. या काळातील त्यांची ही गाणी खूप गाजली. विशेष म्हणजे ॲक्शन सिनेमाचा काळ असूनदेखील अंजान यांच्या गीतांमधील शब्दांची श्रीमंती वाखाणण्यासारखी होती. संगीतकार कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन, आर. डी. बर्मन, बप्पी लहरी यांच्यासोबत त्यांची मस्त जोडी जमली!
अमिताभ बच्चनस् टॉप टेन विथ अंजाम
खाई के पान बनारसवाला (डॉन), मंजिले अपनी जगा है (शराबी), ओ साथी रे (मुकद्दर का सिकंदर), इंतहा हो गई इंतजार की (नमक हलाल), छू कर मेरे मन को (याराना), जिधर देखू तेरी तस्वीर नजर आती (महान), गोरी है कलाईया (आज का अर्जुन), चल मुसाफिर तेरी मंझील दूर है तो क्या हुआ (गंगा की सौगंध), मेरी जिंदगी ने मुझपे अहसान क्या किया है (दो और दो पांच), मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है (लावारीस).
गीतकार अंजान यांचं खरं दुर्दैव म्हणजे ज्या काळात ॲक्शन मारधाड सिनेमाचा बोलबाला होता; त्याच काळात त्यांना चित्रपट जास्त मिळत होते. ऐंशीचे दशक हे हिंदी सिनेमाच्या संगीतासाठी अतिशय वाईट दशक होते. नेमके याच काळात अंजान यांची चलती होती.
डिस्को डान्सर, अरमान, प्यारा दुश्मन या चित्रपटांतील डिस्को गाणी असो किंवा यशोदा का नंदलालासारखं भजन असो, तसेच ‘दिल तो है दिल’सारखं अप्रतिम गाणं ही सर्व गाणी गीतकार अंजान यांनी लिहिली होती! गीतकाराला किती वैविध्यपूर्ण आणि काळाशी सुसंगत लिहावं लागतं, हा राज कपूर यांचा सल्ला अंजान यांना पुढे नेणारा ठरला.
गीतकार अंजान यांना चाळीस वर्षं अफाट संघर्ष करावा लागला; पण त्यांचा मुलगा समीर याला मात्र त्याच्या पहिल्याच ‘आशिकी’ या सिनेमासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना समीर यांनी त्यांच्या वडिलांना स्टेजवर बोलावले. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘गेल्या ४० वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे; पण या काळ्या बाहुलीने मला कायम चकवले! पण आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.
माझ्या मुलाला त्याच्या पहिल्याच प्रयत्नात हा पुरस्कार मिळतो आहे. एक बाप म्हणून मला फार आनंद झाला आहे. गीतकार समीर याच्या पहिल्या इनिंगची सुरुवात नाही तर अंजान यांच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात आहे.’’ अर्थात तसं व्हायचं नियतीच्या मनात नव्हतं.
गंगा नदीच्या तीरावर असलेल्या बनारस येथे बालपण घालवलेल्या अंजान यांचे पुढचे आयुष्य मात्र अरबी समुद्राच्या किनारी मुंबईत गेलं; पण त्यांनी त्यांच्या मनातील गंगा नदी, तिथली भाषा, लहेजा आणि तो परिसर कधीच विसरू दिला नाही. त्यांचा ‘गंगा तट का बंजारा’ हा हिंदी कवितासंग्रह त्यांच्या मृत्यूच्या अक्षरशः काही दिवस आधी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अंजान यांच्या आयुष्यातील ही एक फार मोलाची गोष्ट होती.
कारण कुठल्याही पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या या गुणी गीतकाराला त्याच्या पुस्तक प्रकाशनासाठी अमिताभ बच्चनसारखे महानायक लाभले होते. त्यानंतर काही वर्षांतच ३ सप्टेंबर १९९७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंजान यांचे निधन झाले.
अंजान यांची क्लास दहा गाणी
बाबुल का ये घर गोरी बस कुछ दिन का ठिकाना है (दाता), यशोदा का नंदलाला (संजोग), सोचना क्या है जो भी होगा देखा जायेगा (घायल), यार बिना चैन कहा रे (साहेब), याद तेरी आयेगी मुझको बडा सतायेगी (एक जान है हम), ऐसा समा ना होता (जमीन आसमान), माना मेरे हसीन सनम (द एडवेंचर ऑफ रॉबिन हूड), जब जब तू मेरे सामने आये (श्याम तेरे कितने नाम), मौसम मस्ताना है दिल दिवाना है (लालच), याद तोरी आयी मै तो छम छम रोयी रे (फौलाद).
dskul21@gmail.com
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.