- दिया मिर्झा
जागतिक हवामान बदलाचे चटके प्रत्येकाला बसत आहेत. त्यामुळे मी माझ्यापुरता सात छोट्या-छोट्या गोष्टींचा इंद्रधनुषी संकल्प सुरू केला, तो तुम्हालाही करता आला तर नक्की करा...
मानवनिर्मित तापमानवाढीचा दर २०१३ ते २०२२ या काळात प्रतिदशक ०.२ डिग्री सेल्सिअसने वाढल्याचे ‘अर्थ सिस्टम सायन्स डेटा’च्या अहवालात मी या वर्षीच्या जूनमध्ये वाचले. या काळात कार्बन डायऑक्साईडचे सरासरी वार्षिक उत्सर्जन आतापर्यंतचे उच्चांकी म्हणजे ५४ बिलियन टन एवढे वाढले आहे.
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे भारतातच नव्हे, तर जगभरात अन्नधान्याची महागाई वाढत आहे. दुसरीकडे पूर, बेभरवशी पाऊस आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या हवामान बदलाच्या घटना विनाशकारी ठरत आहेत.
अमेरिकी सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ मार्गरेट मीड म्हणतात, ‘विचारशील, ध्येयनिष्ठ नागरिकांचा छोटा समूह जग बदलू शकतो यात शंका नाही.’ आणि जेव्हा मी मुंबईत जगातील सर्वांत मोठ्या समुद्रकिनारी स्वच्छतेचा प्रकल्प राबवणारे अफ्रोज शाह यांना भेटते किंवा मित्राच्या घरी गळणारा नळ पाहिल्यानंतर २००७ मध्ये ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’ स्थापन करणाऱ्या अबिद सुरती यांच्याबद्दल ऐकते, तेव्हा मला आशा वाटते.
आपण एक जागरूक नागरिक बनण्याच्या दिशेने पाऊल टाकतो, तेव्हा आपला प्रवास निष्क्रिय निराशेकडून सकारात्मक क्रियाशीलतेकडे होतो. माझे स्वतःचेच उदाहरण घ्या. मी सात गोष्टींचा अंतर्भाव असणाऱ्या इंद्रधनुष्य संकल्पेनुसार काम करते. पृथ्वीची काळजी असणारा कुणीही ते आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो.
पहिला टप्पा आहे इंग्रजी ‘आर’पासून सुरू होणारे तीन शब्द, रिड्यूस (कमी करणे), रियूज (पुनर्वापर), रिसायकल (पुनरुत्पादन) हे तीन शब्द आठवणीत ठेवण्याचा. यामुळे प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या अविघटनशील, अशाश्वत पदार्थांचा वापर कमी होण्यास मदत होईल. झाडापासून बनणाऱ्या आणि पुनर्वापर न होऊ शकणाऱ्या टिश्यू पेपरच्या वापराला नकार द्या.
प्लास्टिक असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर, स्टायरोफोम आर्टिकल्स आणि सर्व सिंगल यूज प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा. खरेदीसाठी जाताना स्वतःची कटलरी, पाण्याची बाटली, कॉफीचे कप, मेटल स्ट्रॉ घेऊन जा आणि काही सुती पिशव्या सोबत बाळगा. तसेच तुम्ही बांबूचा टूथब्रश, कानकोरणे यांचा वापर करू शकता. हे सर्व बाजारात उपलब्ध आहेत.
दुसरे म्हणजे ऊर्जा बचतीकडे लक्ष द्या. सीएफएल बल्बऐवजी एलईडी बल्बच्या वापरावर जोर द्या. कार्यक्षम ऊर्जा उपकरणांचा वापर करा. तिसरे पाऊल आहे पाण्याचा अपव्यय कमी करा, गळणारा नळ दुरुस्त करा, शक्य असेल तर सांडपाण्याचा पुनर्वापर करा आणि पावसाच्या पाण्याची साठवण करा.
चौथ्या टप्प्यात मी तुम्हाला वनस्पती आधारित आहार घेण्याचा सल्ला देईन. ज्यामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. स्थानिक ठिकाणी पिकवलेल्या, सेंद्रिय उत्पादनाचा अन्नात समावेश करा, जेणेकरून शाश्वत शेतीला प्रत्साहन मिळेल.
पाचवा टप्पा आहे कचऱ्याचे व्यवस्थापन आणि त्याचे विलगीकरण करण्याचा. मी माझ्या घरातील सर्व ओल्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करते आणि तेच खत घरातील झाडांसाठी वापरते.
सहावा टप्पा आहे स्वच्छता करावयाची पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त उत्पादने वापरण्याचा आणि सातवा टप्पा आहे अधिकाधिक झाडे लावा आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मदत करा. माझ्या मित्रांचा, नातेवाईकांचा वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आतापर्यंत आठशेहून अधिक झाडे लावली आहेत. ती मला आणि माझ्या प्रियजनांना सतत आनंद देत राहतील, याची मला खात्री आहे.
मला वाटते हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि प्रदूषण या तीन संकटांनी पृथ्वीला ग्रासलेले असताना, जगाचे संरक्षण करण्यासाठी केलेली प्रत्येक छोटी कृती ही स्वतःचे संरक्षण करण्यासारखीच आहे, हे पुन:पुन्हा सांगण्याची गरज नाही. रॉबर्ट स्वॅन म्हणतात, की या जगाला दुसरे कोणी तरी वाचवेल असे वाटणे हीच सर्वांत धोकादायक बाब आहे.
हवामान बदलामुळे जगभरात अन्नधान्याची महागाई वाढत आहे. दुसरीकडे पूर, बेभरवशी पाऊस आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या घटना विनाशकारी ठरत आहेत. मला वाटते हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि प्रदूषण या तीन संकटांनी पृथ्वीला ग्रासलेले असताना, जगाचे संरक्षण करण्यासाठी केलेली प्रत्येक छोटी कृती ही स्वतःचे संरक्षण करण्यासारखीच आहे.
(लेखिका या अभिनेत्री आणि पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.