रोबोटनं खरंच आत्महत्या केली?

रोबोटच्या कामाचं स्वरूप बातमीत सांगितलं आहे. कामाचा ताण असह्य झाल्यानं रोबोटनं आत्महत्या केल्याचंही म्हटलं आहे.
did the robot really commit suicide in south korea
did the robot really commit suicide in south korea Sakal
Updated on

दक्षिण कोरियातल्या एका बातमीनं गेल्या आठवड्यात लक्ष वेधून घेतलं. ती बातमी होती, रोबोटनं स्वतःला संपवल्याची. कामाचा ताण असह्य झाल्यानं रोबोटनं आत्महत्या केल्याचं बातमीचं स्वरूप. जगभरातल्या अनेक ठिकाणी ही बातमी प्रसिद्ध झाली. दक्षिण कोरियातल्या गुमी नगर परिषदेचा हवाला बातमीत आहे.

रोबोटच्या कामाचं स्वरूप बातमीत सांगितलं आहे. कामाचा ताण असह्य झाल्यानं रोबोटनं आत्महत्या केल्याचंही म्हटलं आहे. एखादा खिळवून ठेवणारा सायन्स-फिक्शन चित्रपट असावा असं हे कथानक. रोबोटला कामाचा ताण येतो का...ताण ही संकल्पना रोबोटमध्ये कशी मोजली जाते... आत्महत्या करायचं रोबोट ठरवू शकतो का...ठरवणं म्हणजे विचार करणं आलं...

विचार करणारा रोबोट अजून माणसाला जन्माला घालता आला आहे का...अशा शेकडो प्रश्नांची साखळी बातमीनं निर्माण केली. खरं तर ही एकूणच बातमी म्हणजे अत्याधुनिक अभियांत्रिकीवर मानवी संवेदनांचं आरोपण करण्याचा प्रकार.

रोबोट हा एक माणूसच आहे, अशी कल्पना करायची आणि मग रोबोटमध्ये राग-लोभ-प्रेमाच्या भावनांचं काल्पनिक आरोपण करायचं अशी एकूण ही पद्धत. या पद्धतीचा आधार घेऊन कित्येक चित्रपट निर्माण झाले. कित्येक पुस्तकांना जन्म दिला गेला.

तथापि, गेल्या शंभर वर्षांतल्या अत्याधुनिक विज्ञानाला, सर्वोत्तम अभियांत्रिकीला अद्याप असा रोबोट प्रत्यक्ष निर्माण करता आलेला नाही. अशा रोबोटला मानवाला जन्म देता आलेला नाही. सध्याच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्राची प्रगती विचारात घेतली तरी मानवी संवेदनांनी युक्त असा रोबोट फार दूर आहे हे लक्षात येतं.

केवळ कल्पनाविलास

दक्षिण कोरियात कामाच्या अतिताणामुळं रोबोटनं स्वतःला संपवल्याचं सांगितलं गेलं. कामाच्या अतिताणानं मानवी शरीर, मेंदू विलक्षण थकतो. या स्थितीला एक इंग्लिश शब्द सर्रास वापरला जातो. तो शब्द आहे बर्नआऊट. हा शब्द १९७४ मध्ये पहिल्यांदा अमेरिकी मानसशास्त्रज्ञ हर्बर्ट फ्रुडेनबर्गर यांनी वापरला.

खरं तर फ्रुडेनबर्गर यांनी आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या शब्दाची उपाययोजना केली होती. अत्युच्च दर्जाचे आदर्श आणि सातत्याचा ताण या क्षेत्रात असतो. दीर्घ काळ दुसऱ्याच्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये एक वेळ अशी येते की, त्यांना विलक्षण शारीरिक-मानसिक थकवा येतो.

हा थकवा इतका तीव्र असतो की, शरीर आणि मन अक्षरशः थंड पडून जातं. या थकव्याला बर्नआऊट असं नाव फ्रुडेनबर्गर यांनी दिलं. कालांतरानं हा शब्दप्रयोग सर्वच क्षेत्रांतल्या शारीरिक-मानसिक थकव्यासाठी वापरात यायला लागला.

बर्नआऊट अचानक येत नाही; तो हळूहळू विकसित होत जातो. त्यासाठीच्या बारा पायऱ्या असल्याचं फ्रुडेनबर्गर यांनी सांगितलं आहे. स्वतःला सिद्ध करण्यापासून ते नैराश्यापर्यंतच्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. या साऱ्या गोष्टी शरीराशी आणि मनाशी संबंधित आहेत. बर्नआऊट ही शरीर-मनाची अवस्था आहे.

शरीर-मनाच्या अवस्थांना ॲल्गरिदममध्ये परावर्तित करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी विद्यमान ज्ञानाच्या मर्यादेत हे प्रयत्न वास्तवात उतरलेले नाहीत. कामाचा ताण ही मानसिक अवस्था आहे. मानवी शरीर विशिष्ट क्षमतेचं वजन उचलू शकतं. त्यापलीकडचं वजन शारीरिक क्षमतांच्या बाहेरचं असतं. त्यातून शारीरिक ताण येतो. शारीरिक ताण ही अवस्था निश्चित करता येते. मात्र, मानसिक ताण अचूकतेनं मोजण्याचं तंत्रज्ञान किमान आज तरी विकसित नाही.

रोबोट हा आजघडीला तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. त्यामध्ये मानवी संवेदनांचा अभाव आहे. एखादा रोबोट पाचशे किलो सामान उचलण्यासाठी निर्माण केला गेला असेल तर तो त्याहून पाच-दहा टक्के जास्त सामान उचलून नेईल. त्यामध्ये त्याचे सुट्टे भाग खराब होतील आणि ते बदलता आले की रोबोट पुन्हा काम करेल.

मानवी संवेदनांचा अभाव असल्यामुळं कामाचा मानसिक ताण रोबोटवर येणं हा आजचा कल्पनाविलास आहे. मन आणि मानसिक या संज्ञांचा पुरेसा बोध आजच्या विज्ञानालाही होत नसल्यामुळं त्यावर आधारित कृत्रिम निर्मिती केवळ चित्रपट, पुस्तक अथवा कला यांत शक्य आहे.

रोबोटिक अभियांत्रिकी शाखेत आयझॅक असिमॉव्ह यांचे तीन नियम वापरले जातात. रोबोटपासून मानवी जीवांना धोका उत्पन्न होऊ नये अशी या नियमांची रचना. रोबोटनं मानवी जीवांना इजा करता कामा नये अथवा मानवी जीव स्वतःला इजा करून घेत असेल तर रोबोटनं निष्क्रिय राहू नये हा पहिला नियम.

मानवानं दिलेल्या सगळ्या सूचनांचं रोबोटनं पालन केलं पाहिजे; जेव्हा पहिल्या नियमाचं उल्लंघन होत नसेल, हा झाला दुसरा नियम. रोबोटनं स्वतःचं अस्तित्व संरक्षित केलं पाहिजे; जेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या नियमांशी त्याचा संघर्ष होत नसेल, हा तिसरा नियम. या नियमांमध्ये चौथाही नियम नंतर समाविष्ट करण्यात आला.

त्यामध्ये रोबोटनं मानवतेला हानी पोहोचवता कामा नये आणि मानवतेला हानी पोहोचत असेल तर रोबोटनं निष्क्रिय राहता कामा नये, असा विचार मांडला गेला. रोबोटसारखं क्लिष्ट अभियांत्रिकी उपकरण निर्माण करताना नियम काय असावेत याचा खल सुरू असतानाच्या काळात असिमॉव्ह यांचे सिद्धान्त आले. ते स्वीकारले गेले. त्यानुसार आजच्या रोबोटिक्सचा विकास झाला आहे. या नियमांमध्येही संवेदना हा विषय येत नाही.

मनच नाही...तर थकवा कुठून!

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा गेल्या दशकभरात झपाट्यानं विस्तार होत असताना रोबोटला संवेदनांचा प्रयोग पुन्हा चर्चेत आला. दक्षिण कोरियातल्या घटनेत रोबोट अतिश्रमानं थकून स्वतःला संपवत आहे, असं भासलं तरी तो रोबोट ज्या कंपनीचा आहे, त्या अमेरिकी कंपनीनं संवेदनशील रोबोटची निर्मिती अद्याप केलेली नाही.

बेअर रोबोटिक्स या कंपनीची ख्याती आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात आहे. रोजची नियमित कामं करण्यासाठी रोबोटची निर्मिती ही कंपनी करते. स्वच्छता, साफसफाई, वजनदार वस्तूंची हलवाहलव अशा स्वरूपाची ही कामं आहेत, ज्यांमध्ये प्रामुख्यानं शारीरिक श्रम असतात. ‘मॅकडोनाल्ड’सारख्या ठिकाणी हे रोबोट असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

अॅमेझॉनसारख्या ई कॉमर्स कंपनीच्या महाकाय गोदामांमध्ये लाखो वस्तू विशिष्ट पद्धतीनं रचून ठेवलेल्या असतात. त्या वस्तूंपर्यंत पोहोचणं, त्या नेमकेपणानं उचलणं आणि डिलिव्हरीसाठी ट्रकमध्ये ठेवणं असे मानवी श्रम हलके करणाऱ्या कामासाठी रोबोट्स सर्रास वापरले जातात.

या कष्टाच्या कामातल्या रोबोटनिर्मितीचं तंत्रज्ञान सातत्यानं विकसित होतं आहे. तरीही, मानवी भाव-भावनांची प्रतिनिर्मिती कोणत्याही स्वरूपाच्या रोबोट्समध्ये पूर्णाशांनं करता आलेली नाही. रोबोटच्या मनाची निर्मिती झालेली नसल्यामुळं मानसिक थकव्याचा प्रश्न किमान आजच्या तंत्रज्ञानाचा विचार करता उद्भवत नाही.

तूर्तास आरोपणच शक्य

भविष्यात मानवी संवेदनांचे रोबोट निर्माण होणारच नाहीत, असं छातीठोकपणे सांगता येत नाही. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, न्यूरॉलॉजी, जीवशास्त्र अशा विविध शाखांचा संगम होऊन ते शक्यही होईल. मात्र, आजचं विज्ञान त्यापासून मैलोगणती दूर आहे. मात्र, मानवी कल्पनाशक्तीची झेप आधीच तिथं पोहोचली आहे.

उपग्रहप्रक्षेपकांची निर्मिती होण्यापूर्वीच आर्थर सी. क्लार्क यांची कल्पनाशक्ती जशी अवकाशात झेपावली होती, तशीच मानवी संवेदनांनी युक्त रोबोटची परिस्थिती आहे. मानवाचा प्राचीन ‘डीएनए’,

मेंदूतल्या पेशींची रचना अशा कित्येक बाबींसह विद्यमान ॲल्गरिदमच्या कक्षेबाहेरच्या नैतिक मूल्यांपर्यंत संशोधन पोहोचेल, तेव्हाच मानवी संवेदनांची प्रतिनिर्मिती शक्य आहे. आणि, तेव्हाच रोबोट बर्नआऊटही होईल. तोपर्यंत आपण मानवी संवेदनांचं आरोपण करून रोबोटला माणसाच्या रूपात पाहणं इतकंच शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.