- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com
व्याख्यानासाठी मोरवंची येथील प्रार्थना बालग्राममधे मी मागील महिन्यात गेलो होतो. इथं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो. दरवर्षी इथं कृतिशील तरुणाई शिबिर भरवलं जातं. ज्यात अनेक नामवंत वक्ते, लेखक आणि कलाकारांचं युवकांना मार्गदर्शन मिळतं. त्या दिवशी माझं व्याख्यान सुरू असताना माझी नजर सारखी खुर्चीवर बसलेल्या एका शिबिरार्थीकडे जात होती. त्याचं नाव सनी जाधव. तो मूळचा नगर जिल्ह्यातील सोनईचा.
जन्मतःच त्याला कोपऱ्यापासून दोन हात आणि गुडघ्यापासून एक पाय नव्हता. तल्लीन होऊन त्यानं माझं व्याख्यान ऐकलं. व्याख्यान संपल्यानंतर तो मला आवर्जून भेटला आणि म्हणाला, ‘सर, माझी अशी इच्छा आहे की माझ्या फोटोग्राफी स्टुडिओचे उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं.” त्याची ही विनंती पाहून मी क्षणभर आश्चर्यचकित झालो आणि त्याच्या हातांकडं पाहत त्याला विचारले, “तू फोटोग्राफर आहेस ?” तो म्हणाला, “हो”
काही वेळ त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर त्याने त्याच्या डाव्या पायाला गुडघ्यापासून पुढे लावलेला जयपूर फूट वाकून दोन्ही हातांनी थोडा सावरला आणि कुणाचीही मदत न घेता उभा राहून तो पुढं चालत गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत मनात विचार आला, की जेव्हा मी उद्योजगतेसंदर्भात व्याख्यान देण्यासाठी जातो, तेव्हा हात, पाय, डोक्यानं समृद्ध असलेल्या युवकांना प्रेरित करतो पण सनीसारखी दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून नैसर्गिक कमतरतेवर आपल्या प्रयत्नातून मात करून यशस्वी झालेले तरुण मलाच प्रेरित करून जातात म्हणूनच इतरांना प्रेरित करण्याची क्षमता माझ्यात येते.आपल्यासारख्या धडधाकट माणसांना सनीकडं नुसतं बघून प्रेरणा मिळावी, अशी त्याची गोष्ट आहे.
सनीला जेव्हा शाळेत जायची इच्छा होती, तेव्हा त्याला शाळेत बसू दिले नाही. जेव्हा तो पहिलीत गेला तेव्हा दोन हात नसणारा आणि एका पायावर उड्या मारत चालणाऱ्या या पोराला पाहून इतर मुलं चिडवायची, त्रास द्यायची, म्हणून मग सनी नंतर शाळेत नाही गेला. कुटुंबाला शेती नसल्यानं घरची परिस्थिती प्रतिकूल होती. वडील पेंटर काम करून चार लेकरांचा संसार चालवायचे. सनी मधील जिद्द त्याला गप्प बसू देत नव्हती.
आजवर त्याला जे म्हणाले होते की ‘‘ तुला हे जमणार नाही ’’ त्या लोकांना त्याला कृतीतून उत्तर द्यायचे होतं. म्हणून मग पुढं सनी नं १७ नंबर फॉर्म भरून दहावी करायचं ठरवलं. परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी त्याला रायटर न मिळाल्यानं अखेर त्याच्या अपूर्ण हातांनी पेन धरत त्यानं स्वतः संपूर्ण पेपर दिले आणि चांगल्या टक्केवारीने पास झाला.
शिक्षणासोबतच त्यानं फोटोग्राफीचा छंद जोपासला. दोन हात आणि हातांला बोटे असणाऱ्या युवकांनाही सहजा सहजी कॅमेरा हाताळता येत नाही पण सनी मात्र ते काम लीलया करतो. त्याला फोटोग्राफी करताना आणि नंतर काढलेल्या फोटोंची कंप्युटरवर बसून एडिटिंग करताना पाहणं म्हणजे एक अद्वितीय अनुभव असतो. सध्या तो घरूनच व्यवसाय सुरू करून घरच्यांना आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय.
समाज कल्याण विभागात त्यानं स्टुडियो उभारण्यासाठी तीन लाखांची फाइल केली आहे. लवकरच ती मंजूर होईल आणि सनीचे स्वप्न साकार होईल. २६ वर्ष वय असलेल्या सनीला चार वर्षांपूर्वी जयपूर फूट मिळाल्यानं आता तो चांगला चालू शकतो.
चारपाच वेळा साधा बूट काढघाल करायचा म्हटलं तरी वैताग येतो आपल्याला. मग विचार करा ज्याला रोज झोपताना कृत्रिम पाय काढून ठेवावा लागत असेल आणि कुठं जायचं म्हणलं की आधी तो पाय बसवावा लागत असेल त्याच्या मनाची काय व्यथा असेल ? हे जग प्रचंड दुःखानी भरलेलं आहे. तरीही त्याच्याशी संघर्ष करून सनी सारखे तरुण जीवनात आनंद आणू पाहत आहेत.
जे निसर्गाने दिलंय त्यात समाधान मानून आहे एवढ्याच क्षमतेवर मी भविष्यात अजून काय करू शकतो याचा विचार करत आहेत. हे प्रचंड प्रेरणादायी आहे. रोनाल्डो नावाच्या फुटबॉलपटूनं त्याच्या पायाचा विमा एक हजार कोट रुपयांना उतरवला आहे. याहूनही लाख पट आपल्या अवयवांची किंमत असते. ज्याच्याकडे ते नाहीत त्यांना विचारा त्याचं महत्त्व, नाहीतर आपले काही युवक निसर्गाकडून धडधाकट मिळालेल्या शरीराला खुशाल फासावर लटकवतात तेव्हा त्यांची कीव येते.
चेहऱ्यावर साधी एक फुटकुळी आली तरी फोटो काढताना लपवणारे आपण. नैसर्गिक व्यंग लपवून आधार घेणारे आपण. फोटो चांगला यावा म्हणून काळ्या रंगावर पावडर थापणारे आपण. सनीसारख्या माणसांसमोर काहीच नाही आहोत. दिव्यांगात असलेल्या सकारात्मक विचारांची धडधाकट असलेल्या तरुणांवर नुसती सावली जरी पडली, तरी ते यशाच्या शिखरावर पोहोचतील. रडत बसण्यापेक्षा लढत राहणं महत्त्वाचं असतं.
स्वतः दिव्यांग असून फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जेव्हा तो हातात कॅमेरा पकडून ‘‘ स्माइल प्लिज’’ म्हणतो तेव्हा तो मला आजच्या दारू, गुटखा आणि जुगाराच्या जाहिराती करणाऱ्या हीरोंपेक्षा मोठा आणि रिअल हीरो वाटतो. सनीच्या कर्तृत्वास माझा सलाम.
(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.