Diwali 2020 : लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज

Diwali 2020 : लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज
Updated on

लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे तीन सण म्हणजे भारतीय संस्कृतीचा परमोच्च बिंदू कसा आहे, हे आपण पाहणार आहोत. दीपावली सणामागचे रहस्य समजून घेतले व त्यानुसार आपण सण साजरा करण्याचे ठरविल्यास प्रचलित प्रवास, फराळ, पाहुणे, पूजा वगैरे गोष्टी करता येतीलचच, त्याचबरोबर मनुष्यमात्राला लागणाऱ्या धनसंपदेचा, आरोग्यसंपदेचा आणि एकूणच उत्कर्षाचा फायदा होईल. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमळात बसलेल्या, चार हात असलेल्या लक्ष्मीच्या फोटोचे किंवा घरातील दागदागिने, नोटा एकत्र ठेवून त्यांचे पूजन केले जाते, व्यापारीवर्गाकडून त्यांच्या हिशेबाच्या वह्यांचे पूजन केले जाते. लक्ष्मी दोन प्रकारची, चल व अचल. चल लक्ष्मी म्हणजे दैनंदिन व्यवहार चालण्यासाठी, घेण्या-देण्याचा व्यवहार चालावा, यासाठी लागणारे पैसे, तसेच लागणारे धन, सोने, दागिने, व्यापार वगैरे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चल लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्याकडे असलेल्या चल लक्ष्मीचा हिशेब बरोबर ठेवला नाही, तर जीवन अस्ताव्यस्त होते. चल-अचल लक्ष्मीचा एकमेकींशी संबंध असतो. चल लक्ष्मीचा अपमान केला, केवळ पैसा-संपत्तीसंग्रह हेच जीवनाचे ध्येय व सर्वस्व आहे, असे समजलो, आरोग्याची काळजी घेतली नाही तर चालत नाही. शरीर स्थिर लक्ष्मी आहे, तर आरोग्य चल लक्ष्मी आहे. शरीराचा मान ठेवला नाही, आरोग्यासाठी प्रयत्न केला नाही, तर लक्ष्मीपूजनाचा काय उपयोग? आपल्याकडे असलेल्या अचल लक्ष्मीचे भान न ठेवता भरमसाट नोटा (चल लक्ष्मी) छापल्या जातात, तेव्हा जीवनाचे संतुलन बिघडायला सुरुवात होते. भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला देवता मानले आहे. या लक्ष्मीदेवतेचा सन्मान करणे, मनात व हृदयात तिच्यासाठी प्रेम व श्रद्धा असल्यास त्याचे प्रतीक म्हणून केलेल्या पूजेचा उपयोग होतो. आपण लक्ष्मीचा संग्रह करतो म्हणजे, आपण चल लक्ष्मीला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. जी कुठल्याही व्यापारात नाही, कुठल्याही कार्यात गुंतविलेली नाही अशी संग्रहित लक्ष्मी जीवनाचे संतुलन बिघडविते. लक्ष्मी चल राहिल्यास उद्योगधंदे चालू राहतात, काम नसणाऱ्यांना कामधंदा मिळू शकतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लक्ष्मीचा आदर महत्त्वाचा 
आपण चल लक्ष्मीचा आदर ठेवला आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दुसऱ्याला फसवून कमावलेल्या चल लक्ष्मीचाही काही उपयोग होत नाही, तिचा अपमान होतो. दुसरे असे, की आपल्याजवळ असलेल्या लक्ष्मीचा आपण दुरुपयोग करू लागलो, पैशाची मस्ती चढल्यास लक्ष्मीचा अपमान होतो. आपतकालीन गरज असलेल्यांना आपण आपल्याजवळ असलेल्या चल लक्ष्मीचा उपयोग करून दिला नाही, तरी लक्ष्मीचा अपमान होतो. उदा. ः उद्योग-व्यवसाय केल्यावर त्यात नफा मिळतोच, परंतु उद्योग सचोटीने केलेला असावा. फसवून, संधीचा फायदा घेऊन, दुसऱ्याला लुबाडून मिळालेला पैसा ही अलक्ष्मी. चल लक्ष्मीबरोबर आलेली अलक्ष्मी दिसायला लक्ष्मीसारखीच दिसत असली तरी ती नुकसान करते, जीवनाचे असंतुलन करते. लक्ष्मी स्वकमाईची असावी, त्यातील योग्य वाटे दिलेले असावेत. गरजूंच्या शिक्षणासाठी, संशोधनासाठी, अन्नदान करण्यासाठी, दानधर्मासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी, संस्कारपालनासाठी, आरोग्यासाठी स्वकमाईतून काही वाटा दिलेला असावा.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूजन श्रद्धादृढतेसाठी... 
यानंतर आपल्याजवळ राहिलेल्या लक्ष्मीचे आज पूजन असते. योग्य मार्गाने मिळविलेली व दान वगैरे दिल्यानंतर राहिलेली लक्ष्मी आदरणीय होते. म्हणून घरातील सोने, नाणे, रत्ने, पैसे वगैरे एका ठिकाणी ठेवून पूजा केली जाते. आपल्या भावना प्रकट करण्यासाठी केलेले कर्म म्हणजे पूजा. ‘मी धंदा सचोटीने करीन, माझ्याकडे आलेली लक्ष्मी ही अलक्ष्मी नसेल,’ याचे भान ठेवून व्यापारी आपल्या हिशेबाच्या वह्यांची पूजा करतात. वह्यांमध्ये लिहिताना वापरलेली काळी शाई ही महाकाली, पुस्तकाचे स्वरूप ही महासरस्वती आणि त्यात लिहिलेले हिशेब म्हणजे महालक्ष्मी होय. हे सर्व समजून हिशेबाच्या पुस्तकांची पूजा करणे आवश्‍यक असते. हे कर्म का करायचे, तर त्यामुळे आपल्या श्रद्धा दृढ व्हायला, आपल्या हातून गैरव्यवहार घडू नयेत, याचे भान असावे म्हणून असे चोपडापूजन करायची पद्धत आहे. लग्न करून घरात आलेली स्त्री लक्ष्मीरूप असते, तिचा मान ठेवला नाही, तरी लक्ष्मीचा अपमान होतो. सध्या जगावर आलेल्या संकटांमुळे स्थिर व चल या दोन्ही लक्ष्मी पृथ्वी सोडून निघून जात आहेत. या देवतांना पृथ्वीवर राहावेसे वाटत नाही. आगी लागल्याने किंवा कापल्यामुळे जंगलांचा नाश होतो आहे, अवेळी आलेल्या पावसामुळे पिके नष्ट होत आहेत, वाऱ्या-वादळांमुळे घरे-दारे उडून जात आहेत. माणसाच्या मनात एवढी भीती बसलेली आहे, की त्याला कर्म करता येत नाही. श्रीविष्णू ही कर्माची, श्रमाची देवता. लक्ष्मी ही श्रीविष्णूंची पत्नी. त्यामुळे कर्म केल्यावर श्रीविष्णूंच्या मागून लक्ष्मी येते. लक्ष्मीच्या मागे धावल्यास ती मिळणे अवघड असते. या दृष्टीने लक्ष्मीपूजन केल्यास खूप फायदा होऊ शकतो, जीवन पुन्हा संपन्न होऊ शकते. सध्याच्या काळात या गोष्टी समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे आवश्‍यक आहे.
विश्व उत्पन्न झाल्यावर आपण अष्टवसूंना प्रसन्न करून घेतले, लक्ष्मी घरात आली, जीवन संपन्न झाले, आता जीवनाचा विकास व उत्क्रांती झाली ती खरी सुरुवात. म्हणून, दीपावलीचा पाडवा हा मंगल दिवस.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाडवा 
दीपावलीच्या दिवसांत संगीत, प्रवचन, मनोरंजन, एकमेकांना भेटून सदिच्छा, भेटवस्तू देणे वगैरे कार्यक्रम केले जातात. स्त्री पतीला ओवाळते. ओवाळण्याच्या क्रियेमुळे शरीरातील अग्निदीपिका-शरीरातील हॉर्मोन्सच्या चक्राला उत्तेजित करण्यासाठी, त्याचा पुरुषार्थ जागविण्यासाठी मदत होते. स्त्रीला या दिवशी काहीतरी मोठी भेट दिली जाते. अशा तऱ्हेने पाडवा साजरा केल्यामुळे स्त्रीच्या मनात पतीच्या पुरुषार्थाबद्दल विश्वास द्विगुणित होतो. दोघांच्या मनात एकमेकांबद्दलचे प्रेम वाढते. संसाराच्या गाडीची दोन चाके - स्त्री व पुरुष यांची एकरूपता होऊन जे नवीन अस्तित्व आकाराला येणार असते, त्याचा बोध होतो.

भाऊबीज
पाडव्यानंतर येते भाऊबीज. स्त्री-पुरुषातील संबंध अतूट आहे. स्त्री-पुरुषाविना सृष्टी चालणार नाही. प्रत्येक वेळी एकमेकांचा उपयोग करून न घेता एकमेकांना उपयोगी पडावे, ही भावना दृढ व्हावी, यासाठीही स्त्री-पुरुषांनी एकमेकांकडे पाहावे. भाऊ आपल्या बहिणीकडे स्त्री या दृष्टिकोनातून पाहत नाही. भावाने बहिणीला भौतिक रूपाने - शरीर सामर्थ्य वापरून संरक्षण द्यावे. मिळविलेली धनसंपदा बहिणीला उपयोगी पडावी, हे भावाने पाहावे. ‘तू शक्‍तीचे स्वरूप आहेस, तू माझे संरक्षण करशील,’ ही बहिणीची भावना. ती भावाकडे आदराने पाहते. बहीण-भाऊ या नात्यात केवळ प्रेम, वात्सल्य असते. या दिवशी बहीण भावाला आपल्या घरी बोलावते, त्याला अभ्यंग वगैरे करते, प्रेमाने जेऊ-खाऊ घालते, ओवाळते. ओवाळण्यामुळे भावाच्या शरीरातील अग्नी चेतवण्याचे काम होते. भाऊ बहिणाला सुंदर भेट देतो. ‘तुला कधीही काही अडचण आली, तर मी तुझ्या पाठीशी आहे,’ असा विश्वास भाऊ तिला देतो.

अशा प्रकारे दीपावली साजरी झाल्यास 
रोगराईला प्रतिबंध होईल, बरोबरीने समृद्धीही वाढेल.

फटाके आणि तारतम्य
दीपावलीच्या दिवसांत फटाके फोडण्याचीही पद्धत आहे. यामुळे पावसाळ्यानंतर हवेत असलेले जीवजंतू कमी होतात, मनुष्यवस्तीत येणारे वाघ, बिबट्या वगैरे प्राणी पळून जातात. फुलबाजीतून जसा प्रकाश व ठिणग्या चारीकडे पसरतात तशी मनुष्याची शक्‍ती सर्वदूर पसरावी, अशी कल्पना असते. भुईचक्रासारखे गोल फिरणारे चक्र आपल्या शरीरातील कुंडलिनीची आठवण करून देते. फवाऱ्याप्रमाणे वर जाणारे अनारासारखे फटाके पाहून आपल्या शरीरातील शक्‍ती मस्तकाकडे जावी, अशी कल्पना असते. अशा प्रकारे फटाके हा उत्सवाचाच एक भाग आहे, तो संपूर्णतः बंद होऊ नये. जगातील सर्व देशांमध्ये तेथील सणांप्रमाणे फटाके फोडले जातात. फटाके फोडताना तारतम्य असावे, त्यांचा अतिरेक होऊ नये, दुसऱ्यांना त्रास होणार नाही, आगी वगैरे लागणार नाहीत, याकडे लक्ष असावे. 

Diwali festival

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.