विधीमंडळाच्या खेळात आकड्यांना महत्त्व. तो आकडा सध्या केवळ शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेच्या बालहट्टाने भाजपच्या दुढ्ढाचार्यांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्थिती महाभारतातील अभिमन्यू सारखी झाली आहे. राजकारणात वेळेला फार महत्त्व असते. अशी सुवर्णसंधी क्वचितच चालून येते. दिवाळीपर्यंत कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या शिवसेनेला अचानक महत्त्व प्राप्त झाले. कठोर निर्णय घेण्याची हीच ती शेवटची वेळ आहे. येथे निर्णय चुकला, तर मात्र शिवसेनेची घटका भरण्यास सुरवात होईल.
भाजपचा नैतिक पराभवच
भाजप हारला हेच कोणी मान्य करीत नाही. भाजपचे 122 आमदार. मेगाभरतीत आलेले सोळाजण. शिवसेना विरोधात नाही. केंद्रात पुन्हा मोदी सरकार. पराभूत मानसिकतेतील विरोधक. साम, दाम, दंड, भेद अशी सर्व अस्त्रे भात्यात असतानाही भाजपने कसाबसा धापा टाकत शंभरचा आकडा पार केला. मेगाभरतीत आलेल्यांची साथ नसती, तर स्वबळावर भाजपने शंभरी पार केली नसती. म्हणजे भाजपने केवळ गेल्या वेळी जिंकलेल्या मतदारसंघांत लढूनही भाजपला पराभूत व्हावे लागले. विदर्भ हा खरा भाजपचा गड. तेथे भाजप आमदारांच्या संख्या 44 वरून 29 पर्यंत घसरली. पराभव केला कोणी तर ते ज्यांना संपवू पाहतात त्या कॉंग्रेसच्या उमेदवारांनी. दुसऱ्या बाजूला भाजपचे अनेक मंत्री पराभूत झाले, संपले.
भाजपचे निवडून आले 105 आमदार. त्यांना पाठिंबा आणखी दहा-पंधरा जणांचा. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शंभरी पार करीत जेमतेम 105 पर्यंत पोहोचली. बहुमतासाठी हवा 145 आमदारांचा पाठिंबा. भाजप असो की कॉंग्रेस आघाडी, त्यांना राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा लागेल तो शिवसेनेचा. कारण या दोन्ही गटापैकी कोणालाही सत्ता स्थापन करण्यासाठी हवेत केवळ 30 ते 40 आमदार. शिवसेनेचे आमदार आहेत 56, तर त्यांना पाठिंबा दिलेले आणखी पाच-सहाजण. या साठ जणांचे नेतृत्व आहे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे.
उद्धव ठाकरे मुत्सद्दी नेते
शिवसेनेची बांधणी व त्यावरील मजबूत पकड राखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असली, तरी ते राजकारणात धुरंधर आणि मुत्सद्दी नेते आहेत. ते त्यांनी अनेकदा कृतीद्वारे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याचे धाडसही देशात सर्वांत प्रथम त्यांनी दाखविले. नोटाबंदी असो, अथवा अन्य निर्णय असो. ते थेट भिडले. एनडीएमध्ये भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे तो शिवसेना. त्यांचे अठरा खासदार. तिसऱ्या क्रमांकावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. त्यांचे 16 खासदार. मात्र, या दोघांनाही भाजप नेतृत्व फारसे महत्त्व देत नाही. मात्र भाजपची गरज असल्यास, भाजपने नेते लगेच झुकतात. थेट मातोश्री बंगल्यावर भेटीला येतात.
एकच आवाज राऊत यांचा
लोकसभा निवडणुकीत यशाची खात्री नसल्याने, अमित शहा थेट मातोश्रीवर पोहोचले. त्यावेळी ठाकरे यांच्या मुत्सद्दीपणाचे दर्शन घडले. सध्याच्या खेळीचे बिजारोपण त्या वाटाघाटीत झाले. समसमान पद व जागा वाटप, नाणार प्रकल्प रद्द या घोषणा त्यांनी फडणवीस यांना करावयास लावल्या. भाजपने सर्व ताकद शिवसेनेच्या उमेदवारांमागे उभी केली. कारण गरज त्यांची होती. केंद्रात सत्ता आल्यावर विधानसभेला युती करण्याची भाजपची फार इच्छा नव्हती. ते ताणत राहिले. भाजपने प्रदेशातील नेते समान जागावाटपाविरुद्ध बोलत राहिले. मात्र, भाजपशी पंगा घेणे परवडणार नाही, याची जाणीव ठाकरे यांना होती. शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्या. भाजपचे बंडखोर ठिकठिकाणी उभे राहिले. शिवसेना मुग गिळून गप्प राहिली. मात्र, आतून धुमसत होती. येथे लक्षात राहते ती ठाकरे यांनी निर्णयक्षमता.
विधानसभेचे निकाल जाहीर झाले. भाजपच्या नेत्यांना पुन्हा कंठ फुटले. खाते वाटप, मंत्रीपदाच्या किती जागा शिवसेनेला सोडणार, यांवर ते बोलत राहिले. पण, आता वेळ शिवसेनेची आहे. ठाकरे अद्याप बोललेच नाहीत. हळूहळू भाजपच्या नेत्यांचे आवाज बसले. आता केवळ एकच आवाज ऐकू येतो, तो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा.
चाणक्य प्रशांत किशोर
लोकसभा निवडणुकीच्या वेळी चाणक्य म्हणून गाजले अमित शहा. मात्र, त्याच वेळी निवडणूक स्ट्रॅटेजी आखण्यात आणखी एक नाव पुढे आले ते प्रशांत किशोर यांचे. भाजपच्या यशात त्यांचा वाटा होता. पुढे ते उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे सल्लागार झाले. आता बिहारचे नितीशकुमार, बंगालच्या ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रात ठाकरे यांचे ते सल्लागार. राजनितीत त्यांचा सल्ला मोलाचा ठरतो हीच खरी वस्तुस्थिती.
काय होणार महाराष्ट्रात
भाजपचा कोणीही नेता बोलणार नाही, असे फडणवीस यांनी जाहीर करून टाकले. सुत्रांनुसार असे सांगत बातम्या पेरल्या जात आहेत. आघाडीचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चर्चा झाली. ते प्रस्तावाची वाट पहात आहेत. त्यामुळे हुकमाचा पत्ता शिवसेनेचा आहे. त्यांनीच खेळी करावी, अशी या दोन्ही गटांची अपेक्षा. शिवसेनेने राज्यपालाची भेट घेत पहिले पाऊल उचलले. येत्या चार दिवसांत काहीतरी निर्णय होणारच.
राज्यपालांना भाजपला प्रथम बोलवावे लागेल. त्यानंतर नंबर लागतो तो शिवसेनेचा. भाजप नेत्यांना शिवसेनेकडे जाताना मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावीच लागेल. मंत्री पदे किती देतो, त्यावर चर्चा थांबणार नाही. भाजप गप्प बसले, तर तो त्यांना जिव्हारी लागणारा पराभव ठरेल. मग नंबर येतो तो शिवसेनेचा. त्यांचा प्रस्ताव गेल्यानंतर, त्यावर आघाडीचे नेते चर्चा करणार. पण शिवसेना कोणासमवेत भाजप की आघाडी? त्याचा निर्णय त्यांना घ्यावाच लागेल.
शिवसेनेचा मुख्यमंत्री
पदांचे समसमान वाटप येथून आता पहिल्यांदा मुख्यमंत्री शिवसेनेचे इथपर्यंत शिवसेना गेल्या आठवड्यात पोहोचली. भाजप झुकली, तर शिवसेनेची बल्लेबल्ले. आघाडीने पाठिंबा दिला, तरीही शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची संधी.
ही संधी घ्यायची का नाही, हा खरे तर महत्त्वाचा निर्णय. कारण आता भाजप-शिवसेनेत कधीही भरून न येणारी दरी पडली आहे. भाजप त्यांचा विस्तार करताना आता विरोधकांपेक्षा शिवसेनेवरच लक्ष केंद्रीत करणार. कॉंग्रेस आघाडीसमवेत शिवसेना गेल्यास भाजप राज्यव्यापी नव्हे, तर देशव्यापी गोंधळ घालून नैतिकतेचे पाठ पढविणार.
त्यामुळे मुख्यमंत्री होऊन राज्याची सुत्रे ताब्यात घ्यायची का, भाजपशी पंगा घ्यायचा का, यांसह अनेक मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी शिवसेनेकडे वेळ आहे जेमतेम शंभर तासांचा. कारण, चार दिवसांनी गेल्या विधानसभेची मुदत संपते. निर्णय घेण्याची हीच ती शेवटची वेळ आहे शिवसेनेसमोर. आता निर्णय चुकला, तर मग मात्र अशी सुवर्णसंधी पुन्हा चालून येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.