आपला स्वत:वर ‘कंट्रोल’ आहे का?

‘सी टी आर एल’ हा सिनेमा आपलं आपल्या भावनांवर, विचारांवर, मतांवर नियंत्रण राहिलं आहे का, असा प्रश्न अगदी समोर येऊन विचारतो.
ctrl movie
ctrl moviesakal
Updated on

- सुदर्शन चव्हाण, chavan.sudarshan@gmail.com

‘सी टी आर एल’ हा सिनेमा आपलं आपल्या भावनांवर, विचारांवर, मतांवर नियंत्रण राहिलं आहे का, असा प्रश्न अगदी समोर येऊन विचारतो. तो एका शैलीला वाहिलेला असला तरी फक्त थ्रिलरपट या एकाच संज्ञेत अडकत नाही. सामाजिक, खासगी, भावनिक आणि राजकीय धोरणं या सगळ्यांवर भाष्य करत पुढे जातो.

तुमचा दिवसाचा स्क्रीन टाइम किती आहे तुम्ही बघता का? तो हेल्दी आहे, असं तुम्हाला वाटतं का? त्यावर ९९ टक्के लोकांचं उत्तर ‘नाही’ असं असेल. तरीही आपण काही करू शकत नाही किंवा करण्याचा प्रयत्न करतो, तरी त्यात यशस्वी होत नाही.

इंटरनेट हे आजच्या काळातलं सर्वात मोठं आणि सर्वव्यापी व्यसन होत चाललं आहे आणि त्याद्दल कोणाचंही दुमत असणार नाही. मग इतक्या मोठ्या प्रश्नावर सिनेमा या माध्यमाने काही केलं नसतं तरच नवल. त्यावर अगदी उघड भाष्य करणारा एक सिनेमा नुकताच ‘नेटफ्लिक्स’वर आला आहे आणि त्याचं नाव आहे ‘सी टी आर एल’...

‘सी टी आर एल’ ही कॉम्प्युटरच्या भाषेत ‘कंट्रोल’ या शब्दासाठी वापरली जाणारी संज्ञा. आपलं आपल्या भावनांवर, विचारांवर, मतांवर नियंत्रण राहिलं आहे का? हा प्रश्न अगदी समोर येऊन हा सिनेमा विचारतो. याचं साधारण कथानक असं आहे, की नलिनी ऊर्फ नेल्ला ही समाजमाध्यमांवरची एक अत्यंत सुप्रसिद्ध व्यक्ती आहे. ज्यात तिचा जोडीदार जो मास्काऱ्हेनससुद्धा तिच्यासोबत आहे.

या दोघांची जोडगोळी कुमारवयात असल्यापासूनच जुळली आहे आणि ते इंटरनेटवर त्यांच्या गोष्टी टाकू लागले. त्यातूनच त्यांची प्रसिद्धी वाढत गेली. आता त्यांचे व्यक्तिमत्त्वच समाजमाध्यमांच्या गरजानुरूप घडत गेले असल्याने, त्यांच्या आवडीनिवडी तशाच होत जातात; पण यात एक मोठा बदल होतो जेव्हा नेल्लाला तिचा जोडीदार एका वेगळ्या मुलीसोबत दिसतो.

त्यांचं नातं संपतं, त्यांची समाजमाध्यमावरील ओळखही आता पुसण्याची गरज नेल्लाला वाटायला लागते. ती जोच्या सर्व आठवणी पुसायला सुरू करते. तिच्या आयुष्यातून त्याला पूर्ण काढून टाकते; पण त्याला एक गंभीर वळण मिळतं जेव्हा जो खऱ्या आयुष्यातूनही गायब होऊन जातो.

इथवर एक प्रेमकथा, सामाजिक भाष्य वाटणारी कथा अचानक थ्रिलरपटाकडे वळायला लागते. एका जोडीचा एक छोटा धागा पकडून त्यातून खूप मोठं भाष्य करायचा प्रयत्न ही कथा करते आणि तिथेच लेखक अभिषेक संपत अन् दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांचा कस लागतो. त्यातून नेल्लाला पुढे जे काही सापडत जातं त्यावरूनच ते भाष्य अधिकाधिक स्पष्ट होत जातं.

आपला समाजमाध्यमांचा वापर कंपन्या कशा करून घेत आहेत? त्यात आपलं खासगीपण पणाला लागतंय का? इथपासून ते त्यावर भारतीय कायदे काय बोलतात, असे अनेक प्रश्न हा थ्रिलरपट आपल्यापुढे मांडत जातो.

हे तर झालं फक्त कथेच्या बाबतीत; पण ते मांडण्याची हातोटी आणि त्यातील गांभीर्य बघता हा समाजमाध्यमांवर बोलणारा पहिला इतका स्टायलिश भारतीय सिनेमा म्हणावा लागेल. स्टायलिश किंवा शैलीदार यासाठी की तो कथा सरळ सरळ मांडत नाही.

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण हा संपूर्ण सिनेमा फक्त स्क्रीन्सवर दिसतो. म्हणजे मुख्य पात्र असणारी नेल्ला (अनन्या पांडे) ही आपल्याला तिचा लॅपटॉप स्क्रीन, मोबाईल स्क्रीन, सीसीटीव्ही फुटेज, टीव्हीवरील बातम्या अशा कुठल्या ना कुठल्या स्क्रीनमधूनच दिसते. हे करण्याचं कौशल्य दिग्दर्शकाने उत्तमरीत्या हाताळलं आहे आणि हे केल्याने सिनेमाची कथा कुठेही रेंगाळती राहत नाही, हे आणखी विशेष.

सिनेमाच्या निर्मितीबद्दल बोलतानाही दिग्दर्शक म्हणतो, की त्यात दिसणाऱ्या स्क्रीन, समाजमाध्यमांचे डिझाइन हे सर्व करता करता १६ दिवसांत शूट झालेल्या फिल्मला एडिट करायला मात्र तब्बल १६ महिने लागले. त्यावरूनच त्याचं या इतर गोष्टींकडे असलेलं बारीक लक्षही दिसून येतं. आजवर भारतीय सिनेमातील समाजमाध्यमांचं चित्रण फारच बालिश राहिलेलं आहे.

कोणीतरी पत्रकार सहज दुसऱ्याला बोलते, की आज असा असा # ट्रेंडिंग करूया आणि तसा तो होतो. असं काहीतरी प्रचंड बाळबोध आणि एककल्ली असं ते चित्रण असतं; पण ‘सी टी आर एल’ कदाचित पहिलाच असा सिनेमा असेल जो या गोष्टीला गांभीर्याने घेतो. (याचं दुसरं भारतीय उदाहरण म्हणून पुन्हा एकदा अनन्या पांडेच असणारा ‘खो गयें हम कहाँ’ हा सिनेमा आठवतो.) अगदी काही सेकंद स्क्रीनवर दिसून जाणारी कमेंटसुद्धा इथे फिल्म थांबवून वाचवीशी वाटते, असं त्याचं स्वरूप आहे.

सिनेमाने केलेली आणखी एक निवड म्हणजे तो फक्तच आजच्या काळात घडत नाही तर नजीकच्या भविष्यकाळात घडतो. त्यामुळे फक्त आजचे यू-ट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक इतकीच माध्यमं न दिसता कृत्रिम बुद्धिमत्ता अवघ्या काही वर्षांत येऊ घातलेलं ‘मेटा’चं आभासी वास्तवाचं (virtual reality) जगही यात दिसतं आणि त्यातून आजचं समाजमाध्यमांचं व्यसन वगैरे विषय आणखी किती मोठा आ वासून उभे राहणार आहेत हे समोर येतं.

‘सी टी आर एल’ची चर्चा त्याच्या प्रदर्शनाच्या आधीच चालू झाली होती ती त्यातील नावांच्या एकत्र येण्याने. अनन्या पांडे (गेहराइयाँ, खो गयें हम कहाँ) आणि विक्रमादित्य मोटवानी (उडान, लुटेरा) ही दोन नावं सहसा एका श्वासात घेतली जात नाहीत; पण दोघांनी एकत्र येत इथे धमाल काम केलं आहे. विक्रमादित्य मोटवानीच्या सिनेमात नेहमीच अडकल्याची भावना असणारी पात्रं असतात. ‘ट्रॅप्ड’मधील पात्र भौतिक स्वरूपात अडकलं आहे.

‘उडान’मध्ये एका छोट्या शहरात, वडिलांच्या सावलीत अडकलं आहे. तोच धागा पुढे नेत ‘सी टी आर एल’मधील पात्र समाजमाध्यमाच्या विळख्यात अडकलेलं त्याने दाखवलं आहे. दुसरीकडे आहे, अनन्या पांडे. प्रत्येक पिढीचे काही एक प्रातिनिधिक मोठे प्रश्न असतात आणि माझं असं निरीक्षण आहे, की त्याच्याबद्दलचे सिनेमे करणारे अभिनेते त्या पिढीसाठी मोठे होऊन जातात.

जे रणबीर कपूरच्या आपली स्वप्नं बघणाऱ्या हिरोच्या रोल्समधून घडलं. आलिया भटचं ‘डियर जिंदगी’, ‘हायवे’सारख्या सिनेमातील तिच्या पात्राच्या प्रश्नांतून घडलं. अनन्या पांडेचा ‘खो गयें हम कहाँ’ आणि त्या सिनेमातील भूमिका बरोबर तशाच आजच्या पिढीच्या प्राथमिक प्रश्नांना हात घालतात. त्यातून तिची कारकीर्द कशी मोठी होत जाईल, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

‘सी टी आर एल’बद्दलचा शेवटचा मुद्दा म्हणजे त्याचं शैलीदार असणं. आजचा काळच सिनेमा, संगीत, साहित्य सगळीकडे अशा शैलीदार गोष्टी चालण्याचा आहे. जे भारतात खूपच कमी बघायला मिळतं. सर्चिंग (२०१८), मिसिंग (२०२३) या सिनेमांनी स्क्रीनवर घडणाऱ्या सिनेमांची एक वेगळी शैली निर्माण केली. (त्याचाच एक भाग म्हणजे ‘सी टी आर एल’ आहे.) आपल्याकडे या वर्षात सर्वाधिक चालणारे हिंदी सिनेमे हे ‘स्त्री २’, ‘तुंबाड’ किंवा ‘कल्की’सारखे एका जॉनरला वाहिलेले, एका शैलीला महत्त्व देणारे सिनेमे आहेत.

त्या माळेत विक्रमादित्य मोटवानीसारखा महत्त्वाचा दिग्दर्शक इतक्या उत्साहाने उडी घेत असेल तर अशा जॉनर सिनेमांचं भविष्य चांगलं आहे, असं म्हणायला वाव आहे. कारण एका शैलीला वाहिलेला असला तरी ‘सी टी आर एल’ सिनेमा काही फक्त थ्रिलरपट या एकाच संज्ञेत अडकत नाही. तो आपल्याला प्रश्न विचारात राहतो. ‘एटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड’सारख्या सिनेमांची आठवण करून देतो.

सामाजिक, खासगी, भावनिक आणि राजकीय धोरणं या सगळ्यांवर तो भाष्य करत पुढे जातो आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतो. या सगळ्या समाजमाध्यमांच्या जंजाळात आपलं आपल्या स्वतःवर (भावना, सवयी, वेळ) नियंत्रण राहिलं आहे का? आपला त्यावर कंट्रोल (‘सी टी आर एल’) आहे का? आपला रिमोट नक्की आपल्याच ताब्यात आहे का?

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.