मिकी माऊस, प्लुटो आणि गुफी अशी एकापेक्षा एक सरस जगन्मान्य झालेली व्यंगचित्रे पात्रे असतानाही वॉल्ट डिस्ने कंपनीला मान-सन्मान, प्रसिद्धी अन् लौकिक सर्वांपेक्षा जास्त मिळवून देणारे पात्र म्हणजे डोनाल्ड डक. करोडो रसिकांचे मनोरंजन करणारा डोनाल्ड डक आता ९० वर्षांचा झाला. वॉल्ट डिस्ने कंपनीची कोणतीही आकांक्षा त्याने अपूर्ण ठेवली नाही. म्हणूनच त्याला डिस्नेची ‘पवित्र गाय’ उपाधी देण्यात आली.
सृजनशील व्यक्तीचे मन सतत काहीतरी नावीन्याचा शोध घेत असते. त्याच्या मनात विचारांचे काहूर उठलेले असते; परंतु त्यांना अपेक्षित आकार प्राप्त होत नसतो. तो बेचैन असतो आणि अचानक एखादा आवाज, वस्तू वा घटना अशी समोर ठाकते की त्या सृजनशील माणसाचे विश्वच बदलून जाते.
अनपेक्षित सापडलेल्या विचारांनी वा कृतीने तो मानवजातीच्या जगण्यात आमूलाग्र बदल घडवून आणतो... नवीन वाट चोखाळायला लावतो. आयझॅक न्यूटनच्या बाबतीत हेच घडले. सफरचंद झाडावरून खाली पडते या अतिसामान्य घटनेतून न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावतो. या शोधाने माणूस खडबडून जागा होतो, नावीन्याचा शोध घेण्यासाठी.
असाच प्रकार दोन वेळा ॲनिमेशनचे पितामह अमेरिकी वॉल्ट डिन्से यांच्या बाबतीत घडला. एका शुभ सकाळी आपल्या स्टुडिओतील ड्रॉईंग बोर्डच्या पेपरवर ॲनिमेशनसाठी नवीन पात्र निर्माण करण्यासाठी काहीही सुचत नसल्याने ते रेघोट्या मारत बसले होते. अचानक त्यांच्या त्या बोर्डवरून उंदराचे लहानसे पिल्लू उड्या मारत आले आणि गायब झाले. त्याच क्षणाला डिस्ने यांची ट्यूब पेटली आणि त्यांनी ते नवीन पात्र म्हणजे उंदीर असे ठरवून त्यावर काम करायला सुरुवात केली आणि मिकी माऊसचा जन्म झाला.
वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मिकी माऊस, गुफी व प्लुटो या पात्रांवर बेतलेले अनेक लघुपट, ॲनिमेशन फिल्म्स बाजारात होत्याच; पण कालांतराने त्यांना मिकी माऊसवर भरोसा राहिला नाही. मुलांमध्ये मिकी माऊसबद्दल ओढ-आवड कमी झाली. त्यामुळे त्यांना व्यावसायिक खोट वाटू लागली. मिकी माऊसला पर्याय म्हणून एखादे नवीन नकारात्मक पात्र निर्माण करण्याच्या विचारात ते होते, परंतु अनेक पर्यायांचा विचार करूनही पात्र आकार घेत नव्हते.
मिकी माऊसला सहाय्यक ठरणाऱ्या एका नकारात्मक पात्राची त्यांना गरज होती. वॉल्ट डिस्ने स्टुडिओत व्यंगचित्रातील प्राण्यांना आवाज देणारा सुविख्यात अभिनेता क्लेरेन नॅश ‘मेरी हॅड अ लिटील लॅम्ब’ हे गाणे गुणगुणत असताना अचानक त्यांनी तोंडाने प्राण्याचा आवाज काढला. बाजूलाच बसलेल्या वॉल्ट डिस्ने यांचे डोळे कुतूहलाने चमकले. ते पटकन ओरडले, ‘हा बदकाचा आवाज’... परंतु क्लेरेन नॅश म्हणाले ‘नाही, तो शेळीच्या पिल्लाचा आवाज आहे.’
वॉल्ट डिस्ने आपल्या मतावर ठाम राहिले. ते म्हणाले, की माझे पात्र मला सापडले ‘बदक’... ध्यानीममी नसतानाही न्यूटनप्रमाणे त्यांना एका पात्राचा शोध लागला. त्या बदकाची अनेक रेखाटने करून व्यंगचित्रकार डिक लुंडी यांच्या सहकार्याने पक्की रचना करून ते त्यांनी जगाच्या समोर मांडले. त्याचे नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवण्यात आले. १९३१ मध्ये डिस्ने स्टोरी पुस्तकात ते प्रथम छापण्यात आले. जगाला त्याचे प्रथम दर्शन ९ जून १९३४ साली ‘द वाईज लिटील हेन’ या ॲनिमेटेड फिल्ममधून झाले.
डोनाल्ड डक हे पांढरे बदक असून त्याची चोच आणि पाय केशरी व पिवळ्या रंगांचे आहेत. डोक्यावर नेहमीच नाविकाची हॅट, अंगात गडद निळा कोट, गळ्यात लाल किंवा काळा बो, मोठाले बोलके डोळे, गुबगुबीत शरीरयष्टी आणि पॅन्ट नाही... स्वभावाने शीघ्रकोपी - रागीट, असभ्यतेचा कळस गाठणारा, आक्रमक... वाद घालण्यास उत्सुक असल्याने कोणी जर त्याला धमकी दिली वा भीती दाखविली, तर तो अधिक आक्रमक होतो. त्याचा राग त्याला शक्तिमान बनवतो. त्याची परिणिती म्हणजे भूत, हिंस्त्र प्राणी, अवाढव्य घार, शार्क वा नैसर्गिक आपत्ती यांचा तो सहज पराभव करतो.
तो आळशी असून बढाई मारणे हा त्याचा छंद आहे. त्याची प्रेयसी डेझी. त्याला तीन पुतणे आहेत. ह्युई, ड्युई व लुई अशी त्यांची नावे. त्यांचे तो खूप लाड करतो. मुुलांसारखे त्यांच्यावर प्रेम करतो. त्याचे एक काका आहेत. नाव, स्क्रूज मॅकडक. डोनाल्ड उत्कृष्ट हॉकी खेळतो. तरबेज मच्छीमार आहे. अशी अनेक कौशल्ये त्याच्या ठायी आहेत. वेगवेगळ्या भूमिकांतून तो देशसेवा-सामाजिक कार्य करताे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ‘कमांडो डक’ चित्रपटात कमांडो बनून अमेरिकी लष्कराची सेवा करतो.
डोनाल्ड डक हे पात्र जगभर सर्वतोमुखी झाले. प्रसिद्धीच्या बाबतीत त्याने मिकी माऊसलाही मागे टाकले. त्याचाच फायदा अमेरिकी सरकारने घेतला. त्यांनी वॉल्ट डिस्ने यांना देशाला हितकारक संदेश देणारे, देशासाठी सेवा देण्यास प्रवृत्त करणारे लघुपट आणि ॲनिमेशनपट तयार करण्यास सांगितले.
डोनाल्ड डकचा वापर करून दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ‘युद्ध बाँड’ नागरिकांनी खरेदी करावे यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याकरिता, तसेच जनतेने सरकारी टॅक्स ताबडतोब भरावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी डोनाल्ड डकचा वापर चित्रपटांमधून करण्यात आला. ‘डक टेल्स’ या टेलिव्हिजन मालिकेत अमेरिकी नौदलासाठी तो आपली सेवा देतो.
देशासाठी त्याग करण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी युद्धकाळातील चित्रपट ‘नटझी लँड’ही महत्त्वाचा आहे. तोफखान्यातील कामगाराची भूमिका तो साकारतो. पुरेसे अन्न नाही, कामाचे जास्त तास, हिटलरचे अनेक ठिकाणी ठेवलेले फोटो व त्याला सलाम करणे डोनाल्डला आवडत नाही. तो नाझींचा तिरस्कार करतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डोनाल्ड डकने जनतेच्या गळ्यातील ताईत बनून मनोरंजनातून जनजागृती केली.
रंजक आणि विनोदी व्यक्तिरेखा असलेला आणि जगभर कीर्तिवंत झालेल्या डोनाल्ड डकच्या यशामध्ये त्याला ज्याने आवाज दिला तो व्हॉईस आर्टिस्ट अभिनेता क्लेरेन्स नॅश यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी सतत ५० वर्षे डोनाल्डला आवाज दिला. १९८५ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत डोनाल्डच्या जाहिराती, प्रोमोज व इतर विविध सामग्रींसाठी आवाज देण्याचे व्रत शेवटपर्यंत ते करीत राहिले. त्यानंतरच्या काळात नॅश यांचा शिष्य टोनी ॲनसोलम याने डोनाल्डला आवाज देण्याचे काम यशस्वीरीत्या पार पाडले.
टीव्ही मालिका, लघुपट, चित्रपट, व्हिडीओ गेम, इतर विक्रीच्या वस्तू ज्यावर डोनाल्ड राज्य करतो आणि कॉमिक्स पुस्तके या सर्वांमुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. कॉमिक्स पुस्तके अगणित छापली गेली. त्यामध्ये मासिक व साप्ताहिक कॉमिक्स पुस्तकांचा समावेश असून अनेक युरोपियन देशांमध्ये जसे, इटली, नाॅर्वे, जर्मनी, नेदरलँड इत्यादींमध्ये त्यांची सर्वोच्च विक्री होत असे.
कॉमिक्समधील डोनाल्डच्या भूमिका, कारवाया, त्याचा रागीटपणा, दुसऱ्याची छळवणूक करून त्यामधून त्याला मिळणारा असुरी आनंद इत्यादी गुण-अवगुणांची ख्याती जगभर पसरविण्याची कामगिरी सुप्रसिद्ध सृजनशील व्यंगचित्रकार अल चलाइफेरो, कार्ल बार्कस् आणि डॉन रॉसा यांनी स्वत:ला झोकून देऊन पार पाडली. १९३५ पासून मुलांच्या असंख्य कॉमिक्समध्ये डोनाल्ड हे पात्र आपले कारनामे दाखवित आहे.
आजपर्यंत काली ॲन्का आणि कंपनी या कॉमिक्स प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेने डोनाल्डची भूमिका असलेली अनेक कॉमिक्स युरोपमध्ये प्रसिद्ध करून त्याला उच्च पदावर नेऊन ठेवले (१९५० ते २००९). इटलीमधील अनेक कॉमिक्स डोनाल्ड प्रमुख पात्र असण्यावर बेतलेली आहेत. अनेक भाषांमध्ये विविध देशांमध्ये डोनाल्डच्या कॉमिक्सचा बोलबाला निर्माण झाला.
डोनाल्ड व्हिडीओमध्ये चमकू लागला. त्याच्याबरोबर मिकी, गुफी यांच्या रंजक कथांची टीव्ही मालिका तयार करण्यात आल्या. त्याला मिकी माऊस क्लब हाऊस संबोधण्यात आले. त्याचाच उपयोग करून ‘क्वॅक शॉट’सारखे व्हिडीओ गेम; तर ‘किंगडम हार्ट’सारख्या मालिकांनी मुले मनोरंजनाच्या सागरात डुंबू लागली.
डोनाल्डला दोन जुळ्या बहिणी. डोनाल्डचे मधले नाव, फॉन्टलरू. त्याचे मित्र मिकी माऊस आणि गुफी. कधी कधी ते भांडतात तरीही जीवाभावाचे मैतर. वैर नाही. डोनाल्डची एक सुप्त इच्छा असते. त्याला स्टार बनायचे असते. बिग्ज बनी व डॅफी ॲडक यांच्यातील प्रतिद्वंद्वी व्हायला त्याला आवडले असते.
दुसरे महायुद्ध संपल्यावर डोनाल्ड डकमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्याला लांबुडका केला गेला. निळ्या कोटऐवजी हवाईन रंगीत शर्ट, पायाची रुंदी वाढविली. जणू आधुनिक बदकच, पँट नसलेला. त्याची प्रेयसी डेझी हिने नवीन धाटणीचे कपडे परिधान केले. अगोदरचा गुलाबी ड्रेस गमावून ह्युई, ड्युई व लुई आता किशोरवयीन आहेत. त्यांचे कपडे, आवाज व व्यक्तिमत्त्वे बदलली.
युद्ध थांबले, काळ बदलला, परिस्थिती बदलली. युद्धाचा काळाकुट्ट अंधार जाऊन प्रखर अशा ज्ञानाच्या, सुबत्तेचा सूर्य उगवला. माणसांचे विचार, राहणीमान, आवडी-निवडी बदलू लागल्या. त्या सूर्यकिरणांनी डोनाल्डही बदलू लागला. हाणामारी, सूड, द्वेश, आक्रमकतेचे विषय असणारे चित्रपट सोडून शैक्षणिक सिनेमे तो करू लागला, ज्यामुळे समाजात ज्ञानाचा दिवा तेवत राहील.
उदा., डाेनाल्ड इन मॅथमॅजिक लॅड आणि हाऊ टू हॅव ॲक्सिडेंट ॲट वर्क अशाच विषयावरचे अनेक टेलिव्हिजन शो, ॲनिमेटेड लघुचित्रपटात त्याचे दर्शन होऊ लागले. दीडशेच्या वर चित्रपटांत त्याची रंजक, गमतीदार आणि धाडसी भूमिका प्रेक्षकांनी अनुभवली. त्यामधील अनेक चित्रपटांना ॲकेडमिक पारितोषके मिळाली. १९४३ साली नाझीच्या विरोधातील राजकीय विनोदी लघुचित्रपट ‘डेर फुहरेरस् फेस’मधील भूमिकेसाठी डोनाल्डला ॲकेडमी पारितोषकाने गौरविण्यात आले.
जगात जी सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रे निर्माण झाली, त्यात डोनाल्ड डकचा तिसरा नंबर लागतो. दुसरा नंबर लुनी ट्यून्स/मेरी मेलोडिज व पहिला नंबर अर्थातच मिकी माऊसचा. डिस्नेच्या थीम पार्कमध्ये प्रमुख भूमिकेत मिकी माऊसपेक्षा जास्त वेळा डोनाल्डचे दर्शन झाले. ॲनिमेजिक, मिकी माऊसरेव्ह्यू इत्यादी आकर्षक शोमध्ये त्याला पाहणे म्हणजे व्यंगचित्रांची आवड असणाऱ्यांसाठी ती एक प्रकारची मेजवानीच.
डोनाल्डचा स्वभाव धाडसी, लढवय्या, आक्रमक, आळशी, वाद घालणारा असला तरीही खूप प्रेमळ, रंजक, विनोदी, खोडकर असल्याने तो कोणाला आवडणार नाही...? एकमेव टेलिव्हिजन व विनोदी चित्रपटाचे व्यंगचित्रात्मक पात्र असूनही त्याला अमेरिकी सरकारी संरक्षाणात्मक संस्था, वायुदल, लष्कर, नौदल यांचा ‘मस्कॉट’ (शुभ चिन्ह) होण्याचा मान मिळाला.
अनेक विद्यापीठांनी त्याला ‘मस्कॉट’ म्हणून आपल्या छातीवर मिरवले. डोनाल्डच्या ५० व्या वाढदिवसाच्या समारंभात ऑरेगॉन विद्यापीठाने त्याला मानद माजी विद्यार्थ्यांच्या पंक्तीत बसविले. अनेक संस्था, कार्पोरेटस् यांचा ‘मस्कॉट’ होण्याचा मान जगभर त्यालाच मिळाला.
मिकी माऊस, प्लुटो, गुफी अशी एकापेक्षा इक सरस जगन्मान्य झालेली व्यंगचित्रे पात्रे असतानाही वॉल्ट डिस्ने कंपनीला धन-दौलत, मान-सन्मान, प्रसिद्धी, लौकिक सर्वांपेक्षा जास्त मिळवून देणारे पात्र म्हणजे डोनाल्ड डक. डिस्ने कंपनीची कोणतीही इच्छा-आकांक्षा त्याने अपूर्ण ठेवली नाही. जे-जे पाहिजे ते-ते डोनाल्ड डकने डिस्ने कंपनीच्या झोळीत टाकले आणि म्हणूनच डोनाल्डला डिस्ने कंपनीची ‘पवित्र गाय’ ही उपाधी देण्यात आली.
डोनाल्ड डकची महती सांगताना वॉल्ट डिस्ने एके ठिकाणी म्हणतात ‘एकच समाधान... या स्टुडिओमध्ये काम करताना आमच्या व्यंगचित्रात्मक कुटुंबामध्ये असलेले प्रेमाचे व रसरशीत नातेसंबंध... मिकी, प्लुटो, गुफी व इतर पात्रांबरोबर काम करताना धमाल वाटते, परंतु जसे मोठ्या कुटुंबामध्ये समस्या निर्माण करणारे एखादे असते, तसेच आमचे खोडकर मूल म्हणजे डोनाल्ड डक.’
सतत ९० वर्षे करोडो लोकांचे मनोरंजन आणि जीवनावश्यक संदेश देणाऱ्या, अगणित कलाकार निर्माण करणाऱ्या डोनाल्ड डकला सलाम!
Wairkarp@gmail.com
(लेखक प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.