कडू औषधांचा डोस

‘आम्ही तुमच्याकडं खूप आशेनं आलो होतो पण तुम्ही आम्हाला पॉझिटिव्ह असं काही सांगितलं नाही...’ अशा आशयाचा संवाद कधी कधी माझ्या समोर घडतो.
Medicine
Medicinesakal
Updated on

‘आम्ही तुमच्याकडं खूप आशेनं आलो होतो पण तुम्ही आम्हाला पॉझिटिव्ह असं काही सांगितलं नाही...’ अशा आशयाचा संवाद कधी कधी माझ्या समोर घडतो. काही प्रसंगात समोरच्या व्यक्ती हे बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावरून हा अर्थ स्पष्ट दिसतो. मनआरोग्याच्या क्षेत्रात रुग्णसेवा देता देता आता, चारावर चार म्हणजे चव्वेचाळीस वर्षे झाली. परंतु डॉक्टर-रुग्ण नात्याच्या भावनिक छटा रोज नव्यानं अनुभवायला मिळत असतात.

कोणत्याही व्यवसायामध्ये अनुभवानंतर ज्येष्ठता येऊ घालते. त्याबरोबर सल्ल्यामागं ‘तज्ज्ञ’तेचं वलय निर्माण होतं. या वलयाला शरण न जाता, आणि वास्तवाचं भान न सोडता सल्ला द्यायचा तर तो समोरच्या माणसाला तोकडा आणि कोरडा असा दोन्ही वाटू शकतो. अशावेळी व्यावसायिक म्हणूनच्या आणि व्यक्ती म्हणूनच्या मर्यादा लक्षात ठेवणं जरुरीचं.

उदाहरणार्थ, ‘व्यक्तिमत्त्व दोष’ अतिशय प्रखर असलेल्या व्यक्तीचे नातेवाईक, कुटुंबीय जेव्हा समोर येतात, तेव्हा त्यांच्याकडं आजवर केलेल्या उपचारप्रयत्नांची गाथा असते. त्यात म्हणावं तसं यश न मिळाल्यानं ते सल्ल्यासाठी आलेले असतात आणि या कादंबरीचा चरित्रनायक (अथवा नायिका) कधी जबरदस्तीनं आलेला असतो किंवा हजरच नसतो. आपला माणूस ‘सुधारावा’ असे अगदी मनापासून वाटले, तरी स्वभावदोषांमध्ये, कोणतेही उपचार ‘देण्याला’ अंगभूत मर्यादा असते, ते ‘घेणाऱ्याची’ भूमिका काय असणार ह्या वास्तवाची.

‘तुम्ही समुपदेशन करा... तुमचं ऐकेल तो,’ असं सांगून कधी आधी आईवडील मुलामुलींना घेऊन येतात. तेव्हा त्या मुलामुलीला सांगितलेलेच नसतं की आपण कुठं आणि कशासाठी जात आहोत.

स्वभावदोष आणि व्यसनाधीनता एकत्र आलं, तर कुटुंबाच्या दुःखाला पारावार राहत नाही. अशी व्यक्ती संपूर्ण कुटुंबाला वाकवत राहते. खेळवत राहते. वरवर उपचारांना प्रतिसाद देण्याचं आवरण घेऊन स्वतःची भावनिक सत्ता गाजवतच राहते. अशावेळी मानसोपचार थांबवून सर्व प्रकारच्या मदतीसाठी नियम-अटी-शर्ती लागू करणं भाग पडतं.

मदतीचा हात मागं घेणं ही कधीकधी योग्य मदतच असते. हे पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तक्रार राहतेच. ‘तुम्ही आम्हाला आमच्या मुलाला वाऱ्यावर सोडून द्यायला सांगताय,’’ असा आरोप तीस-चाळीस मिनिटे समजवल्यानंतरही शांतपणे अंगावर घ्यावा लागतो. आंधळ्या प्रेमातून नवीन बंधनं तयार होणार आणि प्रगतीची शक्यता कमी होणार हे सांगूनही कळत नाही.

आर्थिक अफरातफर किंवा गुन्हेगारी कृत्यं केलेल्या, असा व्यक्तिमत्त्वदोष असणाऱ्या मुलाच्या आईवडिलांना कधीकधी, ‘आता स्वतःचं संरक्षण करा. त्याचे आर्थिक व्यवहार अंगावर घेऊ नका,’ असा सल्ला दिला तर तो पचनी पडत नाही.

अशा वेळी मला स्पष्ट दिसत असलेलं सत्य त्या व्यक्तीसमोर मांडणं हे मी अधिक योग्य समजतो. ‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्...’ असं वचन आहे. सत्य जर अप्रिय असेल तरीही ते शक्य तितक्या स्पष्टपणानं सांगणं भागच असतं.

यासाठी कमी तीव्रतेचं एक उदाहरण घेऊ. आज असे अनेक मानसिक आजार आहेत जे योग्य औषध योजना झाली, तर नीटपणे कह्यात राहतात.

अगदी नॉर्मल जगणं सुरू असतं. बीपी, डाएबेटिस कंट्रोलमध्ये असतो गोळ्या खाऊन, तसे ‘एनझायटी डिप्रेशन’ (चिंता-नैराश्य) ह्यांचंही झालेले असते. 'आम्हाला गोळ्या सोडायच्या आहेत,' असे सांगणारा एक रुग्णगट असतो. पण त्यासाठी विचार, भावना, वर्तनामध्ये जो सातत्यपूर्ण, विकासक बदल करायचा असतो तो करायची तयारी नसते.

असे करण्यासाठी काय करायचं याची एक छापील ‘न-औषधचिठ्ठी’ म्हणजे non pharmacological prescription आज माझ्याकडं आहे. कोणता वर्कशॉप करा, कोणता सपोर्ट ग्रुप जॉइन करा, कोणती पुस्तके वाचा, कोणते व्हिडिओ पाहा, कोणता पॉडकास्ट ऐका अशी यादी त्या चिठ्ठीत असते. ह्या साऱ्याचा फायदा करून घेऊन औषधं बंद झालेली उदाहरणेही असतात. पण इतकं सगळं शिस्तीने करणार कोण? ‘ते मन आपुला स्वभावो सांडील काय?’ असं माउली म्हणतातच.

अशा वेळी, ‘पी हळद हो गोरी, असा ‘इन्स्टंट’ सोपा मार्ग उपलब्ध नाही हा सल्ला वाईटपणा घेऊन द्यावाच लागतो. वृद्धापकाळातील स्मृतिदोषांसारख्या प्रसंगामध्ये, संपूर्ण कुटुंब ताणामधून जात असतानाही, ज्येष्ठघरांचा पर्याय कुटुंबं लांबणीवर टाकतात. ते औषधाच्या आशेनं येतात. एका मर्यादेनंतर एकगती मेंदुदोष (unidirectional neurological loss) असलेल्या व्यक्तीला घरी ठेवून शुश्रूषा करणं खूप तापदायक होतं.

परंतु समाज काय म्हणेल आणि आपण आपल्या कर्तव्याला चुकत आहोत या दोन विचारांमुळं कुटुंबीय स्वतःची ओढाताण करूनही आला दिवस रेटत असतात. अशा प्रसंगांमध्ये त्यांना न पटणारा पण तरीही वास्तवसिद्ध पर्याय सांगणं हे अवघड काम करावं लागतं.

कधीकधी संस्थेमध्ये एकत्र काम करणाऱ्या सहकारी मनोविकासतज्ज्ञांना रोखठोक बोलणं शक्य होतंच असं नाही. अशावेळी मला कठीण, हळव्या विषयांवर त्या त्या कुटुंबासोबत संवाद साधावा लागतो. अनेक केमिकल व्यसनं असलेला एक रुग्ण मनोविकारतज्ज्ञांनी दिलेल्या गोळ्या मनमर्जीने घेऊन त्यातच ‘हाय’ मिळवत होता. आईवडिलांना वाटत होते की याची व्यसनं थांबली. वास्तवाचं रूप त्यांच्यासमोर मांडल्यावर ते हबकले. हेच सत्य तरुण सहकाऱ्याकडून ऐकायला ते तयार नव्हते. मी त्याला नंतर म्हणालो, 'यु बी द गुड कॉप'... मी करेन कठोर अधिकाऱ्याची भूमिका! म्हणजेच कधीकधी कनवाळू मानसतज्ज्ञाची भूमिका जपत असूनही ‘बॅड कॉप’चा कॅमिओ करावा लागतो.

अशी भूमिका ठामपणे घेण्यासाठी माझे दोन निकष असतात. पहिला असतो विज्ञानाचा. आजाराचं निदान काय, आजवरचा इतिहास काय, उपचारांना प्रतिसाद कोणता, भविष्यातील शक्यता कोणत्या आणि त्यातली कोणती शक्यता प्रत्यक्षात येणार त्याचं मला उमजलेलं गणित; शांत पण स्पष्ट शब्दात समोर ठेवणं. व्यक्ती म्हणून मी जर या परिस्थितीमध्ये असतो आणि माझी तितकीच ‘जवळची’ व्यक्ती ह्या जागी असती, तर मी कोणता पर्याय निवडला असता. हे माझं दुसरं तत्त्व असतं... त्यामुळंच माझ्या म्हणण्याला भक्कम भावनिक आधार मिळतो.

जवळजवळ पंधरा वर्षे झाली. मद्यपाशात अडकलेला एक रुग्ण प्रथमच आला होता. त्याला ‘त्याच्या’ पद्धतीनंच ट्रीटमेंट हवी होती. ‘मला भातुकलीमधल्या डॉक्टरचा खेळ नाही खेळता येत... ट्रीटमेंटचे नाटक नाही करता येत. सरळपणे वैद्यकीय मुद्द्यांवर चर्चा करायची तर कर... नाहीतर मी प्रिस्क्रिप्शन लिहिणार नाही.’ त्याला माझ्याकडून इतकी करडी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. तो चमकला. दूधखुळा अहंकार बाजूला ठेवून सहकार्यावर उतरला.

इतक्या वर्षांमध्ये तो व्यसनमुक्त तर आहेच पण ज्या आखाती देशात तो काम करतो तिथे मी गेलेलो असताना तो दोनदा तिथे फॉलोअपला आला. कोरोना महासाथीच्या काळातही त्याचा ऑनलाइन पाठपुरावा चुकला नाही. ‘त्या दिवशी तुम्ही मला तशी ‘बत्ती’ दिली नसती तर आज मी कुठे असतो?’ आताच्या ताज्या भेटीमध्ये तो म्हणाला. ‘बत्ती’ देणे हा वाक्प्रचार आमच्या संस्थेत रूढ झाला आहे आणि अशी अप्रिय जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता माझ्यावर येत असते.

या रुग्णमित्रानं ती बत्ती योग्य पद्धतीनं घेतली म्हणून तो बदलला. आपण प्रामाणिकपणानं सल्ला आणि मत दिलं, तरी त्याचा योग्य उपयोग केला जाईल की नाही यावर आपलं नियंत्रण नसतं.

‘काय कारण सांगून तुमच्याकडं आणू त्याला याचं मार्गदर्शन करा.’ असं आपल्या कुटुंबसदस्याबद्दल पालक अथवा सहचर विचारतात, तेव्हा ही मर्यादा लक्षात ठेवावी लागते. मनआरोग्य क्षेत्रातला अनुभव गाठीला असला तरी आपण जादूगार, किमयागार, नियंते आणि देवसदृश नाही याचं भान ठेवावं लागतं. भले त्यामुळे लोकप्रियतेचा टीआरपी खाली आला तरी चालेल.

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.