छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. मराठी माती, मातृभूमीचा ते अभिमान आहेत. आपली पूर्व जन्मीची पुण्याई म्हणून आपण शिवछत्रपती ज्या भूमीत वावरले त्यात जन्माला आलो.
आपण केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणून चालणार नाही. स्वप्नांमागे धावत असताना ती प्रत्यक्षात उतरविण्याची प्रेरणा स्वराज्य स्थापनेतून मिळते. नैतिकतेचे अधिष्ठान असलेले स्वराज्य शिवछत्रपतींनी निर्माण केले. त्या भूमीत आपला जन्म झाला, हे आपले भाग्य आहे. शिवछत्रपतींनी सांगितलेली तत्त्वे युवकांनी अंगीकारल्यास महाराज आजही आपल्यासोबत आहेत, याची प्रचिती येईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. मराठी माती, मातृभूमीचा ते अभिमान आहेत. आपली पूर्व जन्मीची पुण्याई म्हणून आपण शिवछत्रपती ज्या भूमीत वावरले त्यात जन्माला आलो. युवकांनी कायम भान ठेवावे; की शिवछत्रपतींबद्दल अभिमान जरूर असावा, परंतु अभिनिवेश कदापिही ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोक्यावर घेऊन मिरविणे वेगळे, मात्र ती कायमस्वरूपी डोक्यात भिनवून घेणे ही बाब भिन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जाज्वल्य आणि असीम चैतन्य. युवकांनी ही बाब प्राधान्याने लक्षात घेतली पाहिजे. शिवछत्रपतींचे कार्य केवळ काही प्रसंगपुरते मर्यादित नाही. म्हणजे रायरेश्वराची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानावरील छापा, पन्हाळ्याहून सुटका, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट या पुरतेच त्यांचे कार्य नव्हते. त्या पलीकडेही कार्यकर्तृत्व होते. शिवछत्रपती मर्त्य मानव म्हणून जन्माला आले असले, तरी कर्तृत्वाने देवत्वाला पोचता येते याचे अद्वितीय उदाहरण आहे.
शून्यातून उभे करण्याची प्रेरणा
आपण ज्या मातीत जन्म घेतला, तेथील मातेला, मातीला आणि मातृभूमीला अभिमान वाटावा असे अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा शिवछत्रतींनी दिली आहे. त्यांचे अष्टावधान कायम जागृत असायचे. शून्यातून स्वराज निर्माण करून त्यांनी अलौकिक अशी प्रेरणा उभी केली आहे. हा मोठा आदर्श युवकांसमोर ठेवला आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने आणि शहाजी महाराजसाहेबांच्या पाठिंब्याने वास्तवात आणून दाखविली. महाराजांचे ‘इदं न मम, राष्ट्राय स्वाहा’ असे तत्त्व होते. महाराजांच्या पूर्वी काही राजांनी शक कालगणना सुरू केली होती. ती स्वतःच्या नावाने केली होती. महाराजांनी मात्र कालगणना सुरू करताना शिवराज्याभिषेक शक असे त्याला नाव दिले. यावरून त्यांच्या द्रष्टेपणाची जाणीव होते. शक्ती, ताकद असावी परंतु त्याच्या वापर जुलूम करण्यासाठी नसावा, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. गुलामीवर रयतेने मिळविलेले राज्य म्हणून त्याला राज्याभिषेक शक असे जाणीवपूर्वक नाव दिले.
क्रांतिकारी निर्णय
शिवछत्रपतींनी भाषा व्यवहार कोश निर्माण करून क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यांनी राजमुद्रा संस्कृतमध्ये केली. यासाठी शहाजी महाराजसाहेबांनी प्रेरणा दिली. आपल्या देशाच्या भाषेत राजमुद्रा असावी हा आग्रह होता. शहाजी महाराजसाहेबांनी वयाच्या बाराव्या वर्षी मुलाच्या हातात ध्वज आणि राजमुद्रा देऊन स्वराज्याची प्रेरणा दिली. शहाजी महाराजसाहेबांच्या दूरदृष्टीची प्रचिती आपल्याला पुढे आलेली आहे. स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराजसाहेब तर शिवछत्रपती स्वराज्य संस्थापक आहेत. जिवाची, प्राणाची बाजी लावून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. राजमाता जिजाऊ आणि शहाजी महाराजसाहेबांनी पाहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.
अखंड प्रेरणास्रोत
काळाची पावले ओळखून शिवछत्रपतींनी कार्य केले. आपल्या सहकाऱ्यांना, मावळ्यांना प्रेरणा देत सांघिक भावना निर्माण केली. स्वतः आघाडीवर राहून ते प्रेरणा देत. बसनूर किंवा अन्य कोणतीही मोहीम असो, आपल्याला त्याची प्रचिती आपल्याला येते. शिवछत्रपतींनी कधीही कर्मकाडांचे स्तोम माजविले नाही. त्या काळात समुद्र पर्यटन निषिद्ध मानले जायचे. परंतु पोर्तुगीज, ब्रिटिश यांच्यावर वचक बसविण्यासाठी महाराजांनी आरमार उभारले. माणूस हा धर्मासाठी नाहीतर धर्म माणसासाठी आहे, याची शिकवण त्यांची प्रत्यक्ष आचरणातून दिली. त्यातूनच शुद्धीकरण केले गेले. अत्यंत चिकित्सक वृत्तीने रयतेचा विचार करून त्यांनी पावले उचलली. श्रद्धेच्या वापर हा रयतेला लढण्याची प्रेरणा देणारा असावा, असा त्यांचा कायम कटाक्ष होता. यातून अफजलखानाच्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी भवानी मातेचा दृष्टांत दिल्याचे सांगितले. श्रद्धा त्यांनी विधायक कार्याला जोडली. त्या काळात धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा मोठी होती. परंतु स्वराज्यात राजदंड हा महाराजांकडे होता. धर्मसत्ता लोककल्याण कार्याचा भाग असली तरी राजसत्तेला अधिष्ठान दिले.
सोशल इंजिनिअरिंग
शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचे सर्वांत प्रेरणादायी उदाहरण आहे. या मंडळात विविध ज्ञातींची वैशिष्ठ्ये, त्यांच्या गुणांचा स्वराज्याच्या विधायक कामात सहभाग करून घेतला. अठरा पगड जातींच्या रयतेला विधायक कार्यासाठी कर्तृत्व गाजविण्याची संधी दिली. आजच्या भाषेत सांगायचे आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याची प्रेरणा स्वराज्य निर्मितीतून मिळते. परस्त्रीला आईसमान मानणे, कोणत्याही मोहिमेवर असताना महिला, मुले, वयोवृद्ध यांना अपाय होणार नाही, याची सैन्याला दक्षता घेण्यास सांगण्यावरून शिवछत्रपतींचा मोठेपणा अधोरेखित होतो.
नैतिकतेचे अधिष्ठान
आपण स्वप्नांमागे धावत असतो, ती सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याकाळी स्वराज्यापेक्षा वैभवशाली राज्ये होती. तरीही आपली स्वराज्यापुढे मान झुकते. त्याचे मुख्य कारण म्हणजे नैतिकतेचे अधिष्ठान. शिवछत्रपतींनी नीतिमत्तेची कास न सोडण्याची प्रेरणा दिली. नैतिक अधिष्ठानातून त्यांचे मोठेपण सिद्ध होते. कपाळी चंद्रकोर लावली म्हणजे विचार आत्मसात केले असे होत नाही. महाराजांच्या तत्त्वांचा अष्टोपहर विचार, संचिताचा वापर केला पाहिजे. ज्या मातीला शिवछत्रपतींचे पाय लागले त्या मातीत आपण जन्माला आलो याचा विचार केला पाहिजे. आपल्या नसानसांत शिवछत्रपतींचा आदर्श बाळगला पाहिजे. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार केल्यास महाराज आजही आहेत, हे लक्षात येईल. व्यापार, उद्यमशीलता या सर्वांचा धांडोळा युवकांनी घेतला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.