कार्यप्रणाली होमिओपॅथीची

मी एक हौशी होमिओपॅथ आहे. गेली वीस-पंचवीस वर्षं स्वतःसह माझ्या कुटुबीयांवर आणि निवडक मित्रांवर मी होमिओपॅथीचे उपचार करत आलोय. ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी ठरते असा माझा अनुभव आहे.
homeopathy
homeopathysakal
Updated on

- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com

मी एक हौशी होमिओपॅथ आहे. गेली वीस-पंचवीस वर्षं स्वतःसह माझ्या कुटुबीयांवर आणि निवडक मित्रांवर मी होमिओपॅथीचे उपचार करत आलोय. ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी ठरते असा माझा अनुभव आहे. कोरोना महासाथीच्या काळात तर फारच. गेल्या आठ-नऊ महिन्यांत फ्लूची पूर्वलक्षणं जाणवू लागली की, मी या औषधांचा वापर केलाय आणि त्यानंतर एक-दोन दिवसांतच सगळी लक्षणं गायब झालीत. फ्लूला लागू पडणारी औषधं ॲलोपॅथीत जवळपास नाहीतच. होमिओपॅथीत मात्र त्यावर औषधं आहेत.

होमिओपॅथी या उपचारपद्धतीचा शोध हनिमान नावाच्या जर्मन डॉक्टरांनी १७९६ मध्ये लावला. ‘काट्यानं काटा काढावा’ या तत्त्वावर ही पद्धती आधारलेली आहे. होमिओपॅथीची औषधं स्वतः रोगनिवारण करत नाहीत, तर त्या त्या विशिष्ट रोगाविरुद्ध आपल्या शरीरातच असलेल्या रोगप्रतिकारक यंत्रणेला चालना देऊन रोग बरा करायला शरीराला मदत करतात. लक्षणांबरहुकूम औषधयोजना केली जाते.

गेल्या २२० वर्षांत होमिओपॅथीची उपचारपद्धती अधिकाधिक विकसित होत गेली आहे आणि तिचा विस्तारही झालेला आहे. त्यासंबंधी लक्षणानुरूप उपचारांचं भांडारच प्रकाशित झालेलं आहे. नक्की आकडा ज्ञात नसला तरी आज जगभरातील सुमारे ५० ते १०० कोटी माणसं होमिओपॅथीचा वापर करत आहेत. अशारीतीने तब्बल एकसप्तमांश मानवजात होमिओपॅथीचा अवलंब करते. होमिओपॅथिक औषधांचा बाजारातील हिस्सा ५५० कोटींचा आहे. येत्या चार-पाच वर्षांत तो सोळाशे कोटींच्या घरात जाईल असा अंदाज आहे.

तरीही ॲलोपॅथीचा वापर करणारे डॉक्टर होमिओपॅथीला छद्मवैद्यक किंवा भोंदूगिरी मानतात. होमिओपॅथीच्या औषधांना ते वैदू उपचारांच्याच पंक्तीला बसवतात. कारण ती कशी काय प्रभावी ठरतात याचं कोणतंच स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही. या सर्वांना एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. होमिओपॅथी पुरतीच कुचकामी असेल तर जगभरातील इतके सारे लोक का म्हणून तिचा वापर करत असतील?

रोश या सुप्रसिद्ध औषध उत्पादक कंपनीच्या आंतरराष्ट्रीय संशोधन विभागाचे माजी संचालक असलेल्या एका व्यक्तीने मला सांगितलं की, रोशने होमिओपॅथीवर मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं असून ती प्रभावी ठरते असा निष्कर्ष काढलेला आहे. यावर त्या व्यक्तीला मी विचारलं की, मग जगातील सर्वांत मोठी औषध उत्पादक कंपनी असलेली रोश या औषधांचा प्रचार आणि प्रसार का करत नाही? यावर ते म्हणाले की, असं केलं तर कितीतरी अधिक नफा मिळवून देणाऱ्या कंपनीच्या अलोपॅथिक औषधांना त्याचा मोठाच फटका बसेल, त्यामुळे हे निष्कर्ष दडपून टाकले गेलेत. प्रस्तुत लेखात ही औषधं कशी प्रभावी ठरत असावीत यासंबंधीचं काही संभाव्य अनुमान मी आपणापुढे ठेवू इच्छितो.

नासिका मार्ग

होमिओपॅथीची औषधं नाकातील घ्राणपिंडातून (olfactory bulb) थेट मेंदूत प्रवेश करतात. मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची जैविक प्रतिबंधक यंत्रणा असते. (Blood-brain-barrier : BBB) ही यंत्रणा बाहेरील कोणतंही द्रव्य मेंदूत जाऊ देत नाही. मेंदूचं संरक्षण करणे हे तिचं कार्य असतं.

तथापि इथेनॉल किंवा पाणी वापरून सौम्य केलेली होमिओपॅथिक औषधं मात्र ही यंत्रणा सहज भेदून घ्राणपिंडातून थेट मेंदूत शिरतात. सर्वसाधारणतः होमिओपॅथीची औषधं अगदी छोट्या छोट्या गोलाकार गोळ्यांच्या स्वरूपात दिली जातात. रुग्णाने या गोळ्या तोंडात ठेवून पूर्ण विरघळून जाईपर्यंत चोखायच्या असतात. अशा चोखण्यामुळे औषधाचा अगदी अल्प अंश घ्राणपिंडामार्गे मेंदूत शिरतो.

यामुळे मेंदूला चेतना मिळून त्या विशिष्ट रोगाचा सामना करणारी रसायनं शरीरात सोडणारी यंत्रणा मेंदूत कार्यरत होते, त्यामुळेच त्या विशिष्ट औषधी द्रवाचा जिभेवर फवारा मारणं हा होमिओपॅथीची औषधं देण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग ठरतो. त्यामुळे औषधाचे बाष्परूप कण घ्राणपिंडामार्गे त्वरित मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. तसंच कोणतंही अन्न खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर अर्धा तास उलटल्यानंतरच ही औषधं घ्यायची असतात. अन्नाच्या दरवळाचा परिणाम औषधाच्या गंधावर होऊ नये म्हणून ही दक्षता घ्यावी लागते.

ही औषधं नासिकामार्गे मेंदूत जाऊन कशा प्रकारे कार्य करतात याचा शोध निव्वळ योगायोगानेच लागला. काही शास्त्रज्ञ मेंदूवर आणि मेंदूतील गाठींवर उपचार शोधण्याचा प्रयत्न करत असताना नाकात औषध फवारून पहात होते. त्यांना असं आढळून आलं की, नाकातून अगदी थोड्या प्रमाणात केलेली औषध फवारणीसुद्धा अतिशय प्रभावी ठरत होती. अनेक अवांछित दुष्परिणाम घडवून शरीराचं प्रचंड नुकसान करणाऱ्या ‘ केमोथेरपी’ पेक्षा ही अशी फवारणी अधिक गुणकारी असल्याची प्रचिती या शास्त्रज्ञांना आली.

व्हॅगस मज्जातंतू

या शास्त्रज्ञांना नंतर असंही आढळलं की, औषध जितकं सौम्य करावं, तितकी त्याची परिणामकारकता वाढते. अधिक खोलात जाऊन त्यांनी असं अनुमान काढलं की, औषधाच्या सौम्यीकरणामुळे मेंदूची प्रतिसादशीलता अधिकच प्रखर होते. हे प्रतिसाद मग शरीरातील व्हॅगस मज्जातंतूंमार्फत रोगग्रस्त अवयवांकडे पोहचवले जातात आणि रोगनिवारणाला साहाय्य करतात. मला असं वाटतं की, हीच होमिओपॅथीची कार्यप्रणाली आहे.

व्हॅगस मज्जातंतू हा आपल्या शरीरातील मुख्य विद्युत मार्ग आहे. मेंदूतून येणारे सांकेतिक संदेश व्हॅगस मज्जातंतूंद्वारे शरीरातील प्रत्येक अवयवाकडे पोहचवले जाऊन आपलं शरीर निरामय राखलं जातं. होमिओपॅथीच्या औषधाने चेतना मिळालेला मेंदू या मज्जातंतूंद्वारेच योग्य स्थळी योग्य तो संदेश पोहचवतो. त्यामुळेच योग्य ते औषध प्रत्यक्ष जिथं हवं आहे तिथंच तयार होतं.

हे काहीसं थ्री-डी छपाईसारखंच आहे. या छपाईत इंटरनेटद्वारे टेम्प्लेटचा आकृतिबंध पाठवला जातो आणि मग थ्री-डी प्रिंटर त्याचा प्रत्यक्ष नमुना जागेवर बनवतो. तसंच होमिओपॅथी करतं. मला वाटतं, शरीराला बरं करणं, योग्य ती दुरुस्ती करणं आणि ते सुस्थितीत राखणं ही कामं खरंतर आपला मेंदूच करत असतो. म्हणतात ना : ‘मन निरोगी तर देह निरोगी.’

होमिओपॅथीच्या औषधांची गंमत अशी की, ती जितकी सौम्य करावीत, तितकी त्यांची कार्यक्षमता वाढते. हे कसं काय घडतं, यासंबंधीची परस्परविरोधी स्पष्टीकरणं दिली जातात. मला स्वतःला असं वाटतं की, औषधांच्या अधिकाधिक सौम्यतेमुळे बीबीसी (Blood Brain Barrier) अधिक सहजरीत्या भेदली जाते, परिणामी मेंदूवर त्यांचा अधिक तीव्र परिणाम होतो.

होमिओपॅथीच्या संदर्भातील एक वास्तव मात्र फारच विवादास्पद आहे. ते असं की, औषधं अतिसौम्य केली असता, त्या मिश्रणात मूळ औषधाचा एकही रेणू आढळत नसल्याचं उष्मागतिकी (थर्मोडायनॅमिक) गणनेनुसार आढळून येतं.

या निष्कर्षामुळेच होमिओपॅथीच्या कार्यपद्धतीबद्दल अत्यंत चित्रविचित्र सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यात १९९०च्या दशकाच्या पूर्वार्धात जॅक बेन्वेनिस्ट या फ्रेंच शास्त्रज्ञाने मांडलेल्या ‘पाण्याची स्मृती’ या सिद्धांताचाही समावेश होतो. त्याचं म्हणणं असं की, मूळ औषधाधारित अशी विशिष्ट स्मृती त्यात मिसळलेल्या पाण्याला राहते आणि त्या स्मृतीमुळेच होमिओपॅथिक औषधांद्वारे विशिष्ट आजार बरा होतो!

तथापि याहून अगदी सुटसुटीत स्पष्टीकरण शक्य आहे. ते असं - आपण हे समजून घेतलं पाहिजे की, होमिओपॅथिक औषधांच्या सूत्रबद्ध मिश्रणासारख्या अतिसौम्य मिश्रणात द्रावण आणि द्राव्य इतकं एकजिनसी बनतं की, द्रावणातून द्रवित पदार्थ वेगळा काढणं जवळपास अशक्य होऊन जातं. मला वाटतं, ही ‘एकजिनसी एकुणात’ मेंदूपर्यंत पोहोचते आणि औषधी गुणधर्मांना रोगानिवारणार्थ चेतना देते. शिवाय, अतिसौम्य केल्याने विद्रावक पदार्थाचे भौतिक, रासायनिक गुणधर्म बदलतात. याचंही रोगनिवारण प्रक्रियेला साहाय्य होत असेल.

उष्मागतिकी (थर्मोडायनॅमिक्स) हे सरासरीवर आधारित शास्त्र आहे. उष्मागतिकी गुणधर्मांच्या सर्व आलेखांचं स्वरूप घंटाकृती असतं. सध्या हवेचं तापमान ३०° सेल्सिअस आहे असं आपण म्हणतो ते कसं? हवेचे असंख्य रेणू मिळून आपली सरासरी ऊर्जा आपल्या तापमापकावर उत्सर्जित करतात. त्या सर्वांच्या एकत्रित परिणामस्वरूप हे तापमान दाखवलं जातं; परंतु यापैकी हवेचे थोडेफार रेणू अधिक ऊर्जेने भारलेले असतात आणि म्हणून अधिक उष्ण असतात.

तसंच, अन्य काही रेणूंमध्ये खूपच कमी ऊर्जा असते आणि म्हणून ते खूप थंड असतात. हे दोन्ही प्रकारचे रेणू घंटाकृतीच्या दोन्ही बाजूंना असतात, त्यांना बाह्य रेणू म्हणता येईल. त्यांचा आपल्याला दिसणाऱ्या तापमानावर फारसा परिणाम होत नाही, कारण त्यांची संख्या अगदीच कमी असते.

त्याचप्रमाणे होमिओपॅथिक औषधांच्या बाबतही आपण अतिसौम्य द्रावण वापरतो आणि मूळ द्रावणात असलेल्या रेणूंची संख्या आपण मोजत असतो, तेव्हा आपण सरासरीवर आधारित गणना करत असतो. मात्र, होमिओपॅथिक औषधांना गुणवत्ता लाभते ती या घंटाकृती आलेखातील दोन्ही बाजूंना असलेल्या रेणूंकडून. हे रेणू मेंदूपर्यंत पोहोचताच ते विशिष्ट संदेश पाठवण्यासाठी मेंदूला चेतना देतात आणि मग हे संदेश व्हॅगस मज्जातंतूंमार्गे शरीरभर पोहोचतात.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात व्हॅगस मज्जातंतू महत्त्वाची भूमिका बजावतात असंही शास्त्रज्ञांचं अनुमान आहे. अशा प्रकारे व्यक्तीचं आरोग्य चांगलं राखण्यासंदर्भात रासायनिक व इलेक्ट्रॉनिक अशा दोन्ही प्रकारची ‘व्हॅगस मज्जातंतू उत्तेजना’ (VNS) हा आज कळीचा शब्द बनला आहे.

वेदनाशमन तसंच दमा, चिंताजन्य विकार, हृदयविकार अशा अनेक व्याधींचं दमन करायला VNS साह्यभूत ठरतं अशी शास्त्रज्ञांची खात्री आहे. होमिओपॅथीची औषधं या VNS प्रक्रियेला रासायनिक साह्य करत असावीत असं माझं अनुमान आहे.

अनुवाद : अनंत घोटगाळकर

anant.ghotgalkar@gmail.comþ

(लेखक फलटण येथील ‘निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.