‘वेळ कुठं आहे मला?’ कामाच्या तगाद्यानं त्रासलेल्या कुठल्याही माणसाच्या तोंडून हेच एक पालुपद आजकाल सतत ऐकायला मिळतं. कुणालाच वेळ म्हणून नाही.
- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com
‘वेळ कुठं आहे मला?’ कामाच्या तगाद्यानं त्रासलेल्या कुठल्याही माणसाच्या तोंडून हेच एक पालुपद आजकाल सतत ऐकायला मिळतं. कुणालाच वेळ म्हणून नाही.
वेळ खरंच आक्रसली की काय? प्राकृतिकदृष्ट्या पाहिलं तर अनादी काळापासून, वेळ सतत आपल्या ठराविक वेगानंच धावत आहे. आक्रसलाच असेल तर वेळेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच आक्रसलाय. वेळ ही कल्पना समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेचा संकोच झालाय.
आपल्या मनातील असुरक्षितताच याला अंशतः कारणीभूत आहे. या असुरक्षिततेपोटी आपल्याला वाटतं की, अजून आपण काहीच प्राप्त केलेलं नाही. खूप काही करायचं राहूनच गेलंय. यातूनच मग आपल्याला वेळ कमी पडत असल्याची भावना दाटू लागते.
ही भावना आपल्या मनाला घोर लावते आणि आपण दुःखी होतो. त्या म्हणीसारखी जणू आपली अवस्था होते : ‘धाव धाव धावला; पण कुठंच नाही पावला.’ महामारी, युद्धं यांसारख्या दोलायमान करून सोडणाऱ्या आपत्तींनी आ वासलेल्या या काळात तर ही असुरक्षितता आणखीच वाढत चाललीय.
पण ही महामारी नसतानाही बहुतेक लोकांच्या दृष्टीनं वेळेचं व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आणि आव्हानात्मक जबाबदारी होतीच. आजच्या काळात निवडीला अधिकाधिक वाव मिळत असल्यामुळे तर ही समस्या अधिकच विकोपाला गेली आहे.
जितका निवडीला वाव अधिक तितकं योग्य निवड चुकण्याचं भय अधिक. महत्त्व कशाला द्यावं आणि कशाला देऊ नये याबाबतचे अग्रक्रम ठरवण्याचं शहाणपण अंगी नसल्यानं वेळेचं व्यवस्थापन अधिकाधिक ढिसाळ होऊ लागलं आहे.
आज अनेकजण विविध कामं एकाच वेळी पार पाडताना दिसतात. हा या असुरक्षिततेचाच एक दृश्य परिणाम आहे. आपलं ईप्सित साध्य होणार नाही, आपण मागं पडू या भीतीपोटी एकाच वेळी अनेक कामं करून त्यांना यश मिळवायचं असतं.
परिणामी ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था त्यांच्या पदरी येते. या असुरक्षिततेतून एक प्रकारचं रितेपण माणसाच्या वाट्याला येतं. अजून खूप काही मिळवता आलं असतं अशी रुखरुख त्याच्या मनाला सततच छळत राहते. आपल्याला खूप काळजी वाटते आणि घोर लागून राहतो. ‘पुरेसा वेळच मिळत नाही’ या आपल्या धारणेचीच ही व्यक्त रूपं असतात.
वेळेचं सुव्यवस्थापन कसं करावं?
प्रभावी आणि सामर्थ्यशाली असा आपला मेंदू समोर असलेल्या सर्व पर्यायांची योग्य पारख करण्याची शहाणीव आपल्याला देतो. त्यामुळे उपलब्ध वेळेचं योग्य व्यवस्थापन आपण करू शकतो आणि आपल्याला मनःशांती प्राप्त होते.
असा प्रभावी मेंदू विकसित करायचा तर त्यासाठी ‘संयम’ आवश्यक आहे. पतंजली ऋषींनी ‘संयम’ या कल्पनेची व्याख्या केली आहे. ते म्हणतात : ‘संयम म्हणजे एकाच विवक्षित विषयावरची एकाग्रता, चिंतन आणि ध्यान.’
सर्वच थोर विभूती आपल्या वेळेचं सुयोग्य व्यवस्थापन करत असतात. खरं तर मला असं वाटतं की, आपल्या वेळेचं व्यवस्थापन एखादी व्यक्ती किती परिणामकारकरीत्या करते यावरूनच तिचं मोठेपण समजतं. या थोर विभूतींना अत्यंत निग्रही मन लाभलेलं असतं.
कोणतंही काम करताना हे लोक त्या कामातच बुडून जातात. इतर काय काय होऊ शकलं असतं किंवा व्हायला हवं होतं याविषयी ते तिळमात्र फिकीर करत बसत नाहीत. फक्त हातातलं काम त्यांना दिसतं.
त्यामुळे काही वेळातच त्यांचं काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण होत जातं आणि कार्यपूर्तीचा एकेक टप्पा यशस्वीरीत्या गाठला गेलेला दिसतो. ,हे लोक कामाची सुयोग्य विभागणी करून कुशलतापूर्वक योग्य काम योग्य व्यक्तीकडे सोपवतात. त्यामुळे वेळेचं नीट व्यवस्थापन होतं.
उपलब्ध मनुष्यबळात कामाची यथायोग्य विभागणी करण्याचं कौशल्य हाच माणसाच्या थोरवीचा मापदंड आहे असं मला वाटतं; परंतु त्यासाठी असा योजक निःशंक असला पाहिजे.
असुरक्षिततेची भावना त्याच्या मनाला शिवता कामा नये. ज्यांच्यावर आपण काम सोपवत आहोत त्यांचं महत्त्व वाढून ते आपल्या वरचढ ठरतील असं भय त्या योजकाला मुळीच वाटता कामा नये.
आज जगात सर्वत्र आपल्याला सत्तेचं केंद्रीकरण करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. अतिवरिष्ठ नेत्यांच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेचं हे द्योतक आहे. ‘परमेश्वर आपल्याला देतो ते कार्यकर्ते आपण स्वीकारतो,’ असं महात्मा गांधीजी म्हणत.
ते त्यांच्यावर वेगवेगळी कामं सोपवत. हळूहळू ते आपलं काम शिकतील आणि स्वतःत सुधारणा घडवून आणतील असं गांधीजींना वाटे. जेव्हा अत्यंत प्रतिभाशाली असे सक्षम कार्यकर्ते त्यांना लाभत तेव्हा अत्यंत महत्त्वाची कामं ते मोकळेपणानं त्यांच्यावर सोपवत.
मात्र, अशी कामं सोपवताना अंतर्गत सुरक्षिततेचीही तितकीच आवश्यकता असते. काम सोपवलेली व्यक्ती आपलं काम नीट करत आहे की नाही, याची काळजी आपल्याला वाटत राहू नये म्हणून अशी अंतर्गत सुरक्षा हवीच. अन्यथा प्रत्यायोजन (कामं सोपवणं) या संकल्पनेचा मुख्य आधारच कोसळून पडेल.
वेळेचे यशस्वी व्यवस्थापन
गांधीजी आपल्या वेळेचा अत्यंत कौशल्यानं वापर करत. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीलाही स्वतःचं मूल्य आहे असं ते मानत. त्यामुळे हातातील कामावरच ते आपलं सर्व लक्ष व ऊर्जा केंद्रित करत. आपल्या चरख्यावर सूत कातायचं असो वा एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमेचा आरंभ करायचा असो, प्रत्येक काम त्यांच्या दृष्टीनं सारख्याच महत्त्वाचं असे.
प्रबळ इच्छाशक्ती असलेलं मन त्यांना लाभलं होतं. अविचल एकाग्रतेनं एका वेळी एकाच कामावर ते आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करत. गांधीजी आपल्या वेळेचं व्यवस्थापन कसं करत याविषयीचा एक किस्सा आहे. एकदा एका माणसाला त्यांनी आपल्या भेटीसाठी दोन मिनिटांची वेळ दिली होती.
त्याच्या समस्येची सोडवणूक बाजूलाच राहू दे; पण अवघ्या दोन मिनिटांत हा माणूस गांधीजींशी बोलणार तरी काय असा प्रश्न लोकांना पडला होता. त्यामुळे भेट संपून बाहेर आल्यावर भेटीतून काय निष्पन्न झालं असा प्रश्न त्याच्या मित्रांनी त्याला मोठ्या कुतूहलानं विचारला.
तो माणूस अत्यंत उत्साहानं उत्तरला की, त्या दोन मिनिटांत गांधीजींनी त्याच्या म्हणण्याकडे १५० टक्के लक्ष दिलं आणि भेटीअंती त्याच्या समस्येची नीट उकल झाल्याचं पूर्ण समाधान त्याला लाभलं!
त्याचप्रमाणे, आइन्स्टाईन हे तर वेळेचे ‘शंकराचार्य’ होते. वेळेच्या बाबतीत त्यांची कधीही धांदल उडत नसे किंवा आपला वेळ वाया जातोय अशी तक्रारही ते कधी करत नसत. एकदा एक ख्यातनाम युरोपीय शास्त्रज्ञ ट्रेननं आईन्स्टाईन यांना भेटायला आले.
त्यांना आणायला आइन्स्टाईन स्टेशनवर गेले होते. त्या दिवशी ट्रेन यायला खूप उशीर झाला. आल्या आल्या ते शास्त्रज्ञ, वाट पाहायला लावल्याबद्दल आईन्स्टाईन यांची पुनःपुन्हा मनःपूर्वक क्षमा मागू लागले.
आइन्स्टाइन शांतपणे त्यांना म्हणाले : ‘उशीर झाल्यानं काहीही बिघडलं नाही. उलट, सध्या हाती घेतलेल्या एका भौतिकशास्त्रीय समस्येवर चिंतन करण्याची संधी एवढा वेळ मला मिळाली.’
आता याची तुलना आपल्याकडच्या सुमार दर्जाच्या, धास्तावलेल्या नेत्यांशी करून पाहा. त्यांच्या गाड्यांचा ताफा सतत जीवघेण्या वेगानं निघालेला दिसतो.
जणू एकेक सेकंदसुद्धा त्यांच्या दृष्टीनं पृथ्वीमोलाचा असावा. त्यांना भेटायला येणाऱ्या माणसाला चुकून काही सेकंद जरी उशीर झाला तरी ते आकाश-पाताळ एक करतात.
त्यांच्या मनातील प्रचंड धास्ती, असुरक्षितताच यातून व्यक्त होत असते. आईन्स्टाईन यांनी वेळेचं सापेक्ष स्वरूप एकदा मोठ्या विनोदी ढंगानं दाखवून दिलं होतं : ‘एखाद्या सुंदर उद्यानात देखण्या मुलीच्या सहवासात कित्येक तास घालवले तरी ते आपल्याला केवळ काही मिनिटांसारखे वाटतात; पण तापल्या तव्यावर केवळ एकच मिनिट बसाल तर तासभर बसल्यासारखं वाटेल!’
आपल्या कामाचा आनंद आपण लुटत असतो तेव्हा वेळेचं भानच हरपून जातं. आपल्या कामातच आपण पूर्ण बुडून जातो. आपण सर्वांनीच हा अनुभव आयुष्यात केव्हा ना केव्हा घेतलेला असतो. ही सुखद भावना येते कुठून?
एकाग्रता आणि अंतर्यामीचा निर्धास्तपणा यातून ती आपल्याला लाभते; पण या गोष्टी आपल्या मुलांच्या अंगवळणी पडाव्यात अशी शिकवण का कोण जाणे, त्यांना आपण देत नाही.
अगदी लहानपणापासूनच मुलांवर आपण ‘हे निवड, ते निवड’ अशा असंख्य आकर्षणांचा आज मारा करत आहोत. यातून मुलांच्यात अवधान-अस्थिरता येऊ लागते. त्यांची एकाग्रता वाढण्यातील हा एक अडथळा ठरतो.
एकाग्र होण्याची क्षमता जसजशी वाढू लागते तसतसा जीवनाकडे पाहायचं एक विशिष्ट परिप्रेक्ष्य आपल्याला लाभतं; कारण, वाढत्या एकाग्रतेमुळे आपल्यासमोरील अनेक पर्यायांचं योग्य मूल्यमापन आपल्याला करता येतं.
यातून महत्त्वाच्या आणि बिनमहत्त्वाच्या बाबींतील फरक आपण नीट जाणू शकतो. त्यामुळे केवळ महत्त्वाच्या बाबींवरच आपलं सर्व लक्ष आपण केंद्रित करू शकतो.
क्षुल्लक बाबींसाठी वेळच जात नसल्यामुळे हाती घेतलेलं महत्त्वाचं काम कोणतीच घाई-गडबड न करता आपण आरामात पार पाडू शकतो. यातून आणखी एक फायदा होतो. ‘हे हवं, तेही हवं’ ची आपली हाव कमी होते आणि आपल्या जीवनाला एक प्रकारचं शाश्वत संतुलन प्राप्त होतं.
आणि म्हणून, समतोल वृत्तीचे सुजाण नागरिक घडवण्यासाठी, एकाग्रता हा गुण आपल्या मुलांच्या अंगवळणी पडावा आणि हाती घेतलेल्या कामावरच आपलं सर्व लक्ष त्यांना केंद्रित करता यावं यादृष्टीनं प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. हे आपण करू शकलो तर छान छान आणि मोठमोठी कामं करण्यासाठी आपल्या मुलांकडे वेळच वेळच असेल.
(अनुवाद : अनंत घोटगाळकर)
anant.ghotgalkar@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.