गारठलेली हवा आणि गोठणारं आरोग्य (डॉ. अविनाश भोंडवे)

dr avinash bhondwe
dr avinash bhondwe
Updated on

उष्णता "ताप'दायक असते. शरीराचं तापमान थोडं कमी झालं, तर कार्यक्षमता वाढते, उत्साह वाढतो. मात्र, एसीचा वापर करून खूप काळ अतिशीत वातावरणात राहणं मात्र शरीरासाठी हितकारक नसतं. खूप अतिशीत वातावरण ठेवल्यास त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. डोकेदुखीपासून त्वचाविषयक समस्यांपर्यंत अनेक विपरीत परिणाम होतात.

सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा I
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा II

कविवर्य बा. सी मर्ढेकर यांनी मुंबईच्या थंडी-गर्मीचे वर्णन करताना, जिवंत शरीराच्या आणि निसर्गातल्या अचेतन वस्तूंच्या नरम-गरम आणि गारेगार वातावरणाचं वर्णन या कवितेत केलं आहे. मानवी शरीराला वातावरणातल्या अतिगरम हवेत शीतल गारव्याची ओढ नेहमीच वाटत असते. उन्हाळ्याच्या गरम हवेत प्यायला गार सरबतं, शीतपेयं, थंड पाणी आणि खायला आईसक्रीमसारखी थंडगार खाद्यं यांची रेलचेल सर्वत्र होत राहते.

याच्याच जोडीला ग्रीष्मातल्या झळांपासून शरीराला सुखद गारवा देण्यासाठी आताशा पंखा पुरत नाही, तर हवा तेवढा थंडावा देणारा एअरकंडिशनर सर्वत्र त्याच्या रिमोट कंट्रोलच्या बटनासह सज्ज असतो. पूर्वी फक्त ऐन उन्हाळ्यात लागणारी ही वातानुकूलित व्यवस्था, काही वर्षांपूर्वी चार-सहा महिने लागत होती; पण वातावरणातल्या बदलांमुळं आता ती बाराही महिने दिवस-रात्र वापरली जाते. फक्त घरातल्या शयनागारात झोपतानाच नव्हे, तर सार्वजनिक आणि खासगी कार्यालयांमध्ये, चारचाकी वाहनांमध्ये, रस्त्यावरून धावणाऱ्या बस-टॅक्‍सीमध्ये, लोहमार्गावरून पळणाऱ्या रेल्वेमध्ये आणि आसमानात झेपावणाऱ्या विमानांमध्येदेखील एअर कंडिशनर (एसी) अनिवार्य ठरत आहेत.

घर आणि ऑफिसमध्ये तुमच्या एअर कंडिशनरचा रिमोट तुमच्या हातात असतो. त्यामुळं तुम्हाला सुखदायक वाटेल तेवढं तपमान वाढवा, नाहीतर कमी करा. पर्याय तुमच्या हातात असतो. मात्र, या एसीच्या तपमानासंदर्भात सरकार काही विचार करत आहे. लवकरच देशात विक्रीला येणाऱ्या एसीचं "सेटिंग' 24 अंश सेल्सिअस असावं, असं केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं ठरवलं आहे. त्याबाबत देशातल्या सर्व खासगी आणि सरकारी संस्थांना एक मार्गदर्शक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. एसीचं किमान तपमान 16 किंवा 18 नव्हे, तर 24 अंश ठेवण्यास त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. विजेचा सुयोग्य वापर केला जावा, या हेतूनं टाकलेल्या या पावलामुळं विजेच्या वापरात कपात होऊन ते वापरणाऱ्या जनतेचं आरोग्यही सांभाळलं जाईल, असं उर्जा मंत्रालयाचं ठाम मत आहे.

मानवी शरीराचं सर्वसामान्य तपमान 37 अंश सेल्सिअस असतं. मात्र, हॉटेल्स, कार्यालयं- विशेषतः आय. टी. आणि संगणकप्रधान कार्यालयांत एसीचं तापमान 16 ते 18 अंश ठेवलं जातं. हे तापमान गैरसोयीचं आणि आरोग्यासाठी धोकादायक असते, असं ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितलं. याबाबतीतल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गोष्टी थोड्या बाजूला ठेवून एअर कंडिशनरच्या तपमानाबाबत वैद्यकशास्त्रीय विचार करणं आवश्‍यक आहे.

उन्हाळ्यातली उष्णता
भारतात साधारणपणे उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढं झेपावतो. भारतातल्या अनेक भागांत- विशेषतः मध्य भारतात त्यापेक्षाही जास्त असतो. उन्हाळ्यातल्या या दाहक हवेमुळं शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळं सतत घाम येतो. त्याचवेळेस वातावरणातल्या उष्णतेनं शरीरातल्या पाण्याचं बाष्पीकरण होत राहतं आणि शरीरातल्या पाण्याचं; तसंच क्षारांचं प्रमाण कमी होत जातं. याचा परिणाम म्हणून कामातला उत्साह कमी होतो, एकाग्रता नष्ट होते आणि सतत मरगळल्यासारखं वाटतं. क्षार आणि पाणी आणखी कमी झाल्यावर पायांना गोळे येणं, अंग दुखणं, मळमळणं, चक्कर येणं, डोकं दुखणं असे त्रास जाणवू लागतात. पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालं, तर उष्माघाताचा झटका येऊन मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो आणि वेळप्रसंगी कोमामध्ये जाऊन मृत्युमुखी पडू शकतो.

हे उष्णतेचे परिणाम आपल्या घरातलं किंवा ऑफिसमधलं तपमान पाच ते दहा अंशांनी कमी केल्यास टाळता येतात. पंखा, झाडांची शीतल छाया यांचा याकरिता नक्की उपयोग होतो. मात्र, शरीराच्या तापमानास 37 अंशापेक्षा थोडं कमी राखलं, तर जास्त उत्साहवर्धक आणि तरतरीत वाटतं. त्याकरता एसी वापरण्याकडे लोकांचा कल वाढू लागला. उष्ण हवेच्या झळांनी आणि घामाघूम झाल्यामुळं झोप येत नाही; मात्र शीतल वाऱ्यांच्या झुळुकेनं निद्रादेवी प्रसन्न होते. सध्याच्या वाढत्या शहरीकरणानं जंगलं, झाडं आणि मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्यानं पूर्वी उन्हाळ्यात संध्याकाळी येणारे पश्‍चिमेचे गार वारे इतिहासजमा झाले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळं एसी उपकरणं विपुल प्रमाणात आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाली, त्यामुळं शांत झोपेसाठी पंखा किंवा कूलरपेक्षा एसी वापरण्याचा पर्याय वापरला जाऊ लागला.

थंड हवेत कार्यालयीन कामं शांत डोक्‍यानं आणि जलद होतात, कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढते, हे लक्षात आल्यावर सर्व स्तरांतल्या कार्यालयात एसी वापरणं हा अलिखित नियमच होऊन बसला. यामध्ये कार्यालयातील हवा जेवढी जास्त थंड तेवढी कार्यक्षमता आणि उत्पादकता जास्त वाढते असाही गैरसमज निर्माण झाला आणि कार्यालयीन हवेचं तपमान 16 ते 18 अंशापर्यंत खाली गेलं. संगणकाचं कार्य उष्णतेनं बिघडतं, त्यामुळं संगणकप्रधान कार्यालयांत एसी वापरणं आवश्‍यक मानलं जाऊ लागलं. आयटी क्षेत्रात संगणक, एसी आणि 16 अंशापेक्षाही कमी असा गारवा हे अत्यावश्‍यक घटक ठरले.

हितकारक गारवा ः बाह्य वातावरणाचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा म्हणजे 37 अंशांपेक्षा सातत्यानं जास्त असेल, तर अशा वेळी खोलीचं तापमान कमीत कमी 26 अंशापर्यंत राहिलं, तर ते आरोग्याला उत्तम असतं, असं अमेरिकन सरकारच्या ऊर्जा खात्याचं म्हणणं आहे. मात्र, भारतासारख्या देशात जिथं रणरणतं तप्त वाळवंट आहे, हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा आहेत आणि आर्द्रतेनं भरलेले लांबलचक समुद्रकिनारे आहेत, तिथं सरसकट तापमानाची फूटपट्टी लावणे अयोग्य ठरेल. कारण एसीचं किमान सुखकारक तापमान हे वातावरणातल्या तापमानाबरोबरच हवेच्या आर्द्रतेवरदेखील अवलंबून असतं.

अतिथंड वातानुकूलित हवेचे परिणाम
अतिशीत हवेच्या भलावणीनं ऊर्जेच्या नासाडीइतकेच शरीरावरही अनेक विपरीत परिणाम होतात.

  • - अवयवांच्या क्षमतेवर परिणाम ः आपल्या शरीराचं तपमान 37 अंश असतं. 24 अंशापेक्षा कमी अशा अतिशीतल हवेत शरीराचं बाह्य आणि अंतर्गत तापमान तितकंच कमी होतं. त्यामुळं रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि परिणामतः रक्तपुरवठा मंदावतो. हातापायांना, स्नायूंना आणि शरीरातल्या सर्वच अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होत नाही आणि त्यांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
  • - डोकेदुखी ः एसीचं तपमान खूप कमी असल्यास सर्दी होऊन नाकातून पाणी वाहू लागतं. त्याचबरोबर कवटीतल्या सायनसेसमध्ये स्राव निर्माण होऊन असह्य डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते.
  • - अंगदुखी आणि सांधेदुखी ः सतत एसीमध्ये बसल्यानं अवयवांचा रक्तपुरवठा कमी झाल्यानं अंगदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी निर्माण होतात. त्याचबरोबर स्नायू आखडून कंबर, खांदे, पाठ यांत चमक निर्माण होऊन अंग आखडणं, हात-पाय आखडणं अशा समस्या निर्माण होतात
  • - ताप ः दिवसभर एसीत राहून बाहेर एकदम जास्त तापमानात गेल्यानं शरीराचं तापमान नियंत्रण बिघडून ताप येण्याची शक्‍यता असते. बऱ्याचदा दुपारच्या वेळी एसीतून निघून बाहेरच्या गरम हवेत आल्यावर ताप येण्याची शक्‍यता वाढते.
  • - त्वचाविषयक समस्या ः वातानुकूलित यंत्रणेमुळं खोलीमधल्या हवेतील सर्व आर्द्रता शोषली जाते. सतत अतिथंड वातावरणात राहिल्यानं त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळं खाज सुटणं, पुरळ येणं, इसब वाढणं असे त्रास दिसू लागतात.
  • - लठ्ठपणा ः सातत्यानं एसीमध्ये बसल्यामुळं शरीरातल्या ऊर्जेचा वापर कमी होतो. त्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो.

श्वसनाचे विकार ः

  • - खोलीमधली वातानुकूलित यंत्रणा सुरू असताना खोलीची सर्व दारं, खिडक्‍या बंद ठेवल्या जातात. त्यामुळं ताजी हवा खोलीमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि खोलीमधील हवा खेळती राहत नाही. अशा बंद, कोंदट हवेमुळं क्वचित डोकेदुखी, श्वास गुदमरणं असे त्रास होऊ शकतात.
  • - अतिथंड हवेनं श्वासनलिकेतले स्राव वाढतात; तसंच श्वासनलिका आकुंचन पावते. यामधून दमा, खोकला, सीओपीडी असे विकार बळावतात.
  • - सातत्यानं ज्या ठिकाणी बंद खोल्या आणि एसी वापरले जातात, तिथं काही विशिष्ट प्रकारच्या बुरशीची (मोल्ड) वाढ होते. यामुळं सर्दी, खोकला, दमा, न्युमोनिया असे श्वसनाचे आजार निर्माण होतात आणि ज्यांना पूर्वीपासून असे आजार असतात, त्यांच्यात ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
  • - एअरकंडिशन्ड ऑफिसेस आणि घरांच्या दारं-खिडक्‍या बंद यांमुळं त्यात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर श्वसनाचा सर्दी, खोकला, न्युमोनिया, क्षयरोग, स्वाईन-फ्लू अशापैकी एखादा आजार असेल, तर तो बंद खोल्यांत लगेच पसरतो.

अंतर्गत तापमानाचा "ताप' ः
एसीच्या अतिशीत तपमानात दीर्घकाळ राहिल्यावर शरीराचं अंतर्गत तापमान 37 अंशाच्या खाली जाऊ शकतं. यामधून काही वेळा गंभीर अवस्था निर्माण होऊ शकतात.
- 36 अंश ः थोडी हुडहुडी भरते.
- 35 अंश ः कडाक्‍याची थंडी वाजून हातपाय बधीर होऊ लागतात. त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचित पावल्यानं त्वचा निळसर पडू लागते. हृदयाच्या स्नायूंचं रक्ताभिसरण कमी झाल्यानं छातीत धडधडू लागते.
- 33 अंश ः अंग थंड पडू लागतं. बोटं निळसर-काळसर पडू लागतात. विचारशक्ती बधीर होते. बुद्धीविभ्रम होऊ लागतात.
- 31 ते 28 अंश ः झोपाळल्यासारखं वाटू लागतं. बुद्धीविभ्रम वाढतो. श्वासाचा वेग मंदावतो. हृदयाचे ठोके कमी पडू लागतात.
- 32 अंश ः भास होऊ लागतात. व्यक्ती अर्धवट शुद्धीत जाते.
- 31 अंश ते 28 अंश ः कोमा किंवा पूर्ण बेशुद्धावस्था येते.
- 26 ते 24 अंशांपर्यंत शरीराचं तापमान उतरल्यास व्यक्ती जिवंत राहू शकत नाही.
अर्थात एक लक्षात घेतलं पाहिजे, की व्यावहारिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसाबाबत एसीमध्ये शरीर एवढ्या कमी तपमानापर्यंत जाण्याची अजिबात शक्‍यता नसते. मात्र, अतिशीत हवेत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक खूप काळ राहिले, तर त्यांच्यावर ही वेळ येऊ शकते.

थोडक्‍यात सांगायचं झालं, तर वातावरणातल्या उष्म्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा हे उत्तम सुखसाधन आहे. त्यामुळं चित्तवृत्ती उल्हसित राहते आणि कार्यशक्ती वाढते; पण तापमान खूप खाली जास्त काळ राहिलं, तर त्या गारठवणाऱ्या थंडीत आरोग्य आणि जीवन दोन्हींवर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.