- डॉ. अविनाश सुपे
परळ हळूहळू आरोग्याचे केंद्रस्थान झाले. केईएमशिवाय बाई जेरबाई वाडिया मुलांचे रुग्णालय, नवरोसजी वाडिया स्त्रियांचे रुग्णालय, टाटा रुग्णालय, हाफकिन संस्था, महात्मा गांधी रुग्णालय, पशु रुग्णालय या जुन्या रुग्णालयांशिवाय आता नवीन काही रुग्णालयांची भर पडली आहे. प्रथम परळ मुंबईबाहेर होते ते आता केंद्रस्थानी आहे. नवीन इमारतींची गर्दी होते आहे; पण हे करताना आपण जुन्या इमारतींचा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे.
सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात १९७४ मध्ये मी प्रवेश घेतला तेव्हा वांद्रे येथून एल्फिन्स्टन रोड म्हणजे आताचे प्रभादेवी येथे उतरत असे किंवा बसने परळ नाका येथे मधल्या रस्त्याने केईएमला येत असे.
लेक्चर गाठण्याच्या घाईने आणि संध्याकाळी गाडी पकडायची असल्याने या परिसरातील परळच्या वैभवाकडे कधी बघताच आले नव्हते. हळूहळू माझ्या संस्थांनी मला कलासक्त बनवले, दृष्टी दिली आणि या परिसराचे वैभव जाणवू लागले. या शहराचे आणि परळचे जागतिक ऐतिहासिक महत्त्व लक्षात आले.
१८७५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्डचा राज्याभिषेक झाला. त्यानिमित्ताने अल्बर्टच्या मोठ्या मुलाने मुंबईला यायचे ठरवले. त्याचा आठ महिन्यांचा आशिया भेटीचा कार्यक्रम होता. त्या वेळी त्याच्यासाठी एक रस्ता बनवला गेला, त्याचे नाव होते ‘किंग्ज वे.’ हा पहिला ब्रिटिश राजपुत्राचा रस्ता होता, जो गेट वे ऑफ इंडियावरून आला. त्याने तिथून येऊन परळ येथे पुण्याला जायची गाडी पकडली होती.
रस्ता परळपर्यंतच हवा होता तरी तो पुढे काही किलोमीटर बनवला. राजपुत्राची मिरवणूक पुढे जाऊन वळण्यासाठी तो आताच्या किंग्ज सर्कलपर्यंत वाढवला. काही वर्षांनंतर १९ व्या शतकात याला एल्फिन्स्टन स्टेशनवरून निघणारा व या रस्त्याला क्रॉस करणारा रस्ता निर्माण केला. ‘किंग्स वे’ला क्रॉस करणारा रस्ता ‘क्वीन्स वे’ म्हणजे आताचा आचार्य दोंदे मार्ग. आताचे हाफकिन हा पूर्वी गव्हर्नमेंट पॅलेस होता.
असे म्हणतात, की तिथे एक शंकराचे मंदिर होते. पोर्तुगिझांनी ते काढून तिथे चॅपेल बनवले. पुढे १९०५ मध्ये किंग जॉर्ज आला तेव्हा त्याला राहण्यासाठी तिथे पॅलेस बनवला. पुढे हाफकिन संस्थेला प्लेगच्या संशोधनासाठी तो पॅलेस देण्यात आला. मुंबईच्या इतिहासातील दोन मुख्य व्यक्ती म्हणजे आचार्य दोंदे ज्यांनी कामगारांसाठी काम केले, शाळा उभ्या केल्या.
दुसरी व्यक्ती म्हणजे शहीद बाबू गेनू. ब्रिटिश मालावरील बहिष्कारात त्यांनी एकट्याने लढा दिला. १२ डिसेंबर १९३० रोजी ब्रिटिश माल नेणाऱ्या ट्रकसमोर ते आडवे पडले. पूर्वी शालेय पुस्तकात त्यांचा धडा होता. परळच्या इतिहासात या दोघांच्या कार्याचा महत्त्वाचा प्रभाव आहे. म्हणूनच त्यांची आज इथे आठवण करणे आवश्यक आहे.
परळ हे नाव या भागाला का पडले, याच्या दोन आख्यायिका आहेत. एक म्हणजे ट्रूम्पेट फ्लॉवर्स (परळचे फूल)(धतुऱ्यासारखी फुलांची झाडे). इथे परळची झाडे खूप होती आणि दुसरी कथा म्हणजे इथे परळी वैजनाथ मंदिर होते. जिथे चॅपेल मोनास्ट्री बनवली तिथे, म्हणून परळ. असे दोन प्रवाह आहेत.
किंग्स वे व क्वीन्स वे यांचे जंक्शन होते ते म्हणजे परळ टीटी (ट्राम टर्मिनस). १८७४ मध्ये घोड्यांची ट्राम सुरू झाली. एकूण ९०० घोडे होते. ते परळ ते कुलाबा ट्राम नेत असत. पुढे त्या दादरपर्यंत नेण्यात आल्या. १९०७ मध्ये विद्युत ट्राम आली आणि १९६४ मध्ये ट्राम बंद झाली, पण दादर टीटी., परळ टीटी ही नावे वापरात आहेत.
परळमध्ये अजूनही जुन्या धर्तीची आवर्जून बघण्यासारखी मंदिरे आहेत. ज्या वेळी परळ क्वीन्स वे होता तेव्हा गोलंजी टेकडी होती. तिथे हा रास्ता संपायचा. तिथे आजही दोन लिंगांचे शंकराचे मंदिर आहे. एक जागतिक वारसा असलेली मूर्ती आहे. ही गोलंजी टेकडी म्हणजे लाव्हाचा दगड आहे. तो फोडून क्वीन्स वे शिवडीपर्यंत नेला. १९२५ मध्ये केईएम मुंबईबाहेर होते. तिथे एक तळे होते, त्याला परळ टॅंक म्हणत. टॅंकच्या बाजूला पॅलेस (आताची हाफकिन संस्था) होते. हे सर्व तलाव पुढे बुजवण्यात आले.
परळ हळूहळू आरोग्याचे केंद्रस्थान झाले. केईएम (१९२५) शिवाय बाई जेरबाई वाडिया मुलांचे रुग्णालय (१९२८) आणि नवरोसजी वाडिया स्त्रियांचे रुग्णालय (१९२६), टाटा रुग्णालय (१९४१), हाफकिन संस्था (१८९९), महात्मा गांधी रुग्णालय (१९६२), पशु रुग्णालय (१८८३) या जुन्या रुग्णालयांशिवाय आता नवीन काही रुग्णालयांची भर पडली आहे.
प्रथम परळ मुंबईबाहेर होते ते आता केंद्रस्थानी आहे. नवीन इमारतींची गर्दी होते आहे, पण हे करताना आपण जुन्या इमारतींचा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. मुंबईत अनेक तलाव होते. सिपी टॅंक, गोवालिया टॅंक, पोयबावडी, धोबीतलाव.
तानसा तलाव तयार केल्यानंतर त्याचे पाणी विकण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक तलाव बुजवले आणि मुंबईची हिरवळ कमी झाली. मुंबईच्या रस्त्यावर जाताना आजूबाजूच्या उपनगरांचा ऐतिहासिक वारसा उमजून तो जपला पाहिजे. परळसारख्या उपनगरात विविध कालावधीत बांधलेल्या वास्तूंचे स्वरूप वेगळे आहे व हे आर्किटेक्चर समजावून घेतले पाहिजे. चेंबूर व कुर्ला येथे दलदल होती.
चिंबोऱ्या (लॉबस्टर) जास्त म्हणून चेंबूर आणि कुर्ल्या (क्रॅब्स) जास्त म्हणून कुर्ला अशी या उपनगरांची नावे पडली. आपण लंडन आणि युरोपमधील अशा अनेक प्राचीन शहरांत पाहतो त्यांनी आधुनिकीकरण करताना त्यांचा ऐतिहासिक वारसा कल्पकतेने जपला आहे. आपणही नवे उभारताना या जुन्या ऐतिहासिक वारशाची जपणूक केली पाहिजे.
केईएम रुग्णालयाला ९० वर्षे पूर्ण झाली तेव्हा आम्ही खाकी टूर्सबरोबर परळचे दोन टूर्स आखले होते. त्या वेळी परळबद्दल खूप नवी माहिती मिळाली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही परळच्या चाळीमध्ये वास्तव्य होते. ही आम्हा सर्व परळवासीयांना अभिमानाची गोष्ट आहे. नवीन पिढ्यांनी आपल्या भागाचा इतिहास समजून घेतला तर आपण काय गमावत आहोत हे लक्षात येईल. हा वारसा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.