सर्वसामान्य रुग्णांसारखाच पोटदुखीच्या व्यथेने रुग्णालयात दाखल झालेला लाला. प्राथमिक तपासात त्याचे पोट जरा फुगलेलं वाटलं. पोटात गोळा असावा, असा अंदाज बांधला.
- डॉ. अविनाश सुपे
सर्वसामान्य रुग्णांसारखाच पोटदुखीच्या व्यथेने रुग्णालयात दाखल झालेला लाला. प्राथमिक तपासात त्याचे पोट जरा फुगलेलं वाटलं. पोटात गोळा असावा, असा अंदाज बांधला. त्याला रुग्णालयात दाखल करून, पुढील तपासण्या केल्या तेव्हा लक्षात आलं की, त्याच्या पोटात मृत गर्भ आहे! सर्वसामान्यांना विचित्र वाटणाऱ्या या दुर्मिळ घटनेच्या रहस्याबद्दल...
लालजी नावाचा सोळा वर्षांचा मुलगा. साधारण १९९५-९६ मध्ये तो आमच्याकडे पोटात दुखतंय म्हणून आला. आम्ही त्याला तपासलं. पोट थोडंसं फुगलं होतं. त्याच्या पोटामध्ये एक गोळा असल्याचं लक्षात आलं. २५ सेंटिमीटर बाय २० सेंटिमीटर एवढ्या आकाराचा. हाताला टणक लागत होता. त्याला रुग्णालयात दाखल करून घेतलं. बाकी त्याला काहीच त्रास म्हणजे उलट्या वगैरे होत नव्हत्या. अन्न अडकले नव्हते. आतड्याचा काही आजार नव्हता. लघवीचाही त्रास नव्हता. आमच्या मताप्रमाणे हा कुठलातरी एक ट्युमर म्हणजे अनैसर्गिक मासाची गाठ असावी, असा अंदाज होता. त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या करायला सुरुवात केली. सर्वसाधारण तपासण्यांमध्ये काही दोष सापडला नाही; परंतु सिटी स्कॅन केला त्यावेळी आम्हाला तिथे एक जाड आवरणाची मांसल पिशवी आहे. त्यात पायाचं लांब हाड, थोडासा चेहरा असल्याचे दिसले. हा काय प्रकार आहे, हे आम्हाला कळेना. हा एक प्रकारचा ट्युमर किंवा टेराटोमा म्हणजे स्नायुबंधांचा गोळा किंवा वृषण किंवा कोशातील पेशीजाल असेल, असे वाटले. अशा परिस्थितीत आम्ही त्याची शस्त्रक्रिया केली. तसे ते जिकिरीचे काम होते. तो पोटाच्या पाठीमागच्या भागात मोठ्या रक्तवाहिन्यांच्या जवळ होता. आमचे निदान - की तो एक मृत गर्भ आहे, याला फिटस इन फिटू गर्भस्थ शिशु असे म्हटले जाते. योजनाबद्ध शस्त्रक्रियेने आम्ही गोळा काढल्यावर लालजी त्यातून व्यवस्थित बाहेर पडला.
फिटस इन फिटू म्हणजे, गर्भधारणा होते त्यावेळी कधीकधी जुळी होतात. एका गर्भाचे दोन भाग झाले तर ती दोन जुळी मुले होतात. त्यात एक मुलगा-एक मुलगी किंवा दोन्ही मुले किंवा दोन मुली होतात; परंतु ज्यावेळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये काहीतरी अपघात होतो आणि एक मूल असतं ते दुसऱ्या मुलांमध्ये शोषून घेतले जाते. त्याचे काही अंश दुसऱ्याच्या पोटात राहतात, त्या वेळी त्याला फिटस इन फिटू असं म्हणतात. हा आजार काही सामान्य आजार नाही. त्या काळामध्ये आम्ही जेव्हा हा केस रिपोर्ट केला, तेव्हा जगभरात बोटावर मोजता येईल, इतक्याच केसेस होत्या. हे नावीन्यपूर्ण असल्याने त्याची बऱ्यापैकी चर्चा झाली. या ‘फिटस इन फिटू’मध्ये जो मेलेला गर्भ असतो तो तिथे पोटामध्ये अनेक काळ राहतो. तो गर्भ काही वर्षांनंतर तपासणीत दिसतो आणि लक्षात येतो.
शस्त्रक्रियेनंतर लालजी आजारातून बरा झाल्यानंतर त्याला बघायला लोक रुग्णालयाच्या कक्षात यायला लागले. आम्हाला विचारायला लागले की हा मुलगा आहे आणि त्याच्या पोटातून मूल कसं काय येऊ शकतं? हे कसं शक्य आहे? आम्ही त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगितले की, ही विकास समस्या म्हणजे जेव्हा गर्भाची वाढ होते त्यावेळी झालेला हा एक अपघात आहे. त्याच्यामध्ये धोका असा काही नाही. आजपर्यंत जगभर अशा केसेस साधारणपणे १०० तरी आढळल्या आहेत; पण त्या काळात अशा फार केसेस आढळल्या नसल्यामुळे त्यात नावीन्य होते. अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात, याची लोकांना माहिती असली पाहिजे. अशी काही विकृती लक्षात आली तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित निदान करून उपचार घेतल्यास काहीही त्रास होत नाही. लालजीही आतापर्यंतचे २५ वर्षांचे आयुष्य सुखाने जगत आहे. आजही तो त्याच्या प्रकृतीच्या तपासणीचा पाठपुरावा करायला आमच्याकडे रुग्णालयात येतो.
(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.