‘अल्झायमर’शी लढताना....

म्हातारपणाकडे वाटचाल करत असताना वेगवेगळ्या आजारांशी अनेक जण लढत असतात; परंतु अल्झायमर आजार झाल्यास त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असायला हवे.
alzheimer's disease
alzheimer's diseasesakal
Updated on
Summary

म्हातारपणाकडे वाटचाल करत असताना वेगवेगळ्या आजारांशी अनेक जण लढत असतात; परंतु अल्झायमर आजार झाल्यास त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असायला हवे.

- डॉ. अविनाश सुपे

म्हातारपणाकडे वाटचाल करत असताना वेगवेगळ्या आजारांशी अनेक जण लढत असतात; परंतु अल्झायमर आजार झाल्यास त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असायला हवे. आपले प्रियजन या रोगाचे शिकार झाले तर त्यांची काळजी घेण्याचे बळ आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व जे माझे कौटुंबिक मित्र आहेत. गेल्या तीन वर्षांत कोविड काळात संध्याकाळी ४ वाजता मला त्यांचा फोन यायला सुरुवात झाली. ते मला विचारायचे, ‘‘भूतानहून कधी परत आलात? भूतानला जाऊ नका, कारण तुमची पत्नी आणि मुलगी मुंबईत एकट्या आहेत. त्यांना भीती वाटते,’’ असे सांगून फोन ठेवायचे. पहिला फोन आला तेव्हा आश्चर्य वाटले. मी फक्त एवढेच सांगितले, की ‘‘मी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत आहे आणि भूतानला गेलो नाही.’’ परंतु नंतर हे जवळजवळ एक वर्षभर एक दिवसाआड घडत होते. मी शांतपणे आणि आदराने त्यांचे बोलणे ऐकत असे आणि जास्त काही बोलत नसे. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विचारले, की त्यांचे काही बिनसले आहे का? ते म्हणाले, ‘‘ठीक आहेत; परंतु अचानक काही मिनिटांसाठी असंबद्ध वागतात.’’ ही अल्झायमर रोगाची सुरुवात होती.

गेल्या दोन वर्षांत त्यांचे स्वास्थ्य बिघडले आहे. ते बऱ्याच गोष्टी विसरतात आणि त्यांना आधाराची आवश्यकता असते. त्यांनी बाहेर जाणे बंद केले आहे आणि कदाचित पुढील काही दिवसांत ते स्मृतिभ्रंश रोगाचा रुग्ण होतील.

अल्झायमर रुग्णाची लक्षात ठेवण्याची क्षमता, स्मरणशक्ती हिरावून घेतो; परंतु या रोगाबद्दल आपल्याला सर्वच गोष्टी ज्ञात नाहीत. अल्झायमर रोग हा वाढत जाणारा न्यूरोलॉजिक आजार आहे, ज्यामुळे मेंदू संकुचित होतो (अॅट्रोफी) आणि मेंदूच्या पेशी मरतात. अल्झायमर रोग हे डिमेंशियाचे सर्वांत सामान्य कारण आहे, ज्यामध्ये विचार, वर्तणूक आणि सामाजिक कौशल्यांमध्ये सतत घट होते.

स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. अमेरिकेत ६५ वर्षांहून अधिक वयाचे अंदाजे ५.८ दशलक्ष लोक अल्झायमर रोगाला बळी पडतात. त्यापैकी ८० टक्के लोक हे ७५ वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत. भारतातही सुमारे चार दशलक्ष व्यक्तींना डिमेंशिया आहे. डिमेंशिया असलेल्या जगभरातील अंदाजे ५० दशलक्षपैकी ६० ते ७० टक्के लोकांना अल्झायमर रोग असल्याचा अंदाज आहे. रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अलीकडील घटना किंवा संभाषणे विसरणे प्रामुख्याने सुरुवातीला दिसते. हळूहळू स्मरणशक्ती कमी होणे हे अल्झायमर रोगाचे प्रमुख लक्षण आहे. प्रथम, अल्झायमर रोग असलेल्या व्यक्तीस गोष्टी लक्षात ठेवण्यास आणि विचारांचे आयोजन करण्यात अडचण येत असल्याचे जाणवते. रोग जसजसा वाढत जातो तसतसे स्मरणशक्तीची कमतरता वाढते, इतर लक्षणे विकसित होतात आणि दररोजची कामे करण्याची क्षमता कमी होत जाते.

औषधे तात्पुरती सुधारणा करू शकतात किंवा लक्षणांची प्रगती, रोगाची वाढ कमी करू शकतात. अल्झायमर रोग बरा करणारा किंवा मेंदूतील रोगाची प्रक्रिया बदलणारा कोणताही उपचार नाही. रोगाच्या प्रगत अवस्थेत, मेंदूच्या कार्याच्या तीव्र नुकसानापासून गुंतागुंत, जसे डिहायड्रेशन, कुपोषण किंवा संक्रमणामुळे मृत्यू होतो. अल्झायमर असलेले लोक बहुतेकवेळी विधाने आणि प्रश्न पुन:पुन्हा करतात. संभाषणे, भेटी किंवा घटना विसरतात आणि नंतर त्या लक्षात ठेवू शकत नाहीत. वस्तू हरवणे, चुकीच्या ठिकाणी ठेवणे, ओळखीच्या ठिकाणाहून हरवून जाणे, शेवटी शेवटी कुटुंबातील सदस्यांची नावे आणि दैनंदिन वस्तूंची नावे विसरण्यासह विचार व्यक्त करण्यासाठी किंवा संभाषणात भाग घेण्यासाठी योग्य शब्द शोधण्यात अडचण येत असते.

अल्झायमरमुळे दैनंदिन परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. प्रगत अल्झायमर असलेले लोक बरेचदा कपडे घालणे आणि आंघोळ करणे यासारखी मूलभूत कार्ये कशी करावी हे विसरतात. अल्झायमर रोगामुळे नैराश्य, उदासीनता, सामाजिक माघार, मूड स्विंग्स, इतरांबद्दल अविश्वास, झोपेच्या सवयींमध्ये बदल, भटकंती आणि भ्रम यासारखे परिणाम होऊ शकतात.

अल्झायमर रोगाचे नेमके कारण अद्याप अज्ञात असल्याने या स्थितीपासून बचाव करण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही, परंतु निरोगी जीवनशैली आपला धोका कमी करण्यास मदत करू शकते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी अल्झायमर रोग आणि संवहनी स्मृतिभ्रंशच्या वाढत्या जोखमीशी जोडला गेला आहे. धूम्रपान आणि अल्कोहोल कमी करावे. निरोगी संतुलित आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा. मधुमेहावर नियंत्रण ठेवा आणि नियमित आरोग्य चाचण्यांद्वारे आपला रक्तदाब तपासला गेला आहे आणि नियंत्रित केला गेला आहे याची खात्री करून घेणे आवश्‍यक आहे.

मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे, वाचन, संगीत वाद्ये वाजवणे, आपल्या स्थानिक समुदायात स्वयंसेवा करणे, समूह खेळांमध्ये भाग घेणे आणि नवीन क्रियाकलाप किंवा छंदांचा प्रयत्न करणे यांसारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणे हे अल्झायमर टाळण्याचा उत्तम मार्ग आहेत. संगणक खेळ आणि सुडोकूसारख्या हस्तक्षेपांमुळे अल्पावधीतच संज्ञानात्मकता सुधारत असल्याचे दर्शवले गेले आहे, परंतु यामुळे स्मृतिभ्रंश टाळण्यास मदत होऊ शकते की नाही हे अद्याप संशोधनात दिसून आले नाही.

आजही या विकाराविषयी सर्वसामान्य जनतेला साधी माहितीही नाही, त्यामुळे वरील लक्षणे उपचार न करता म्हातारपण म्हणून सोडून दिली जातात किंवा वृद्धांना मारहाणही होते, पण लक्षणे आणि आधुनिक तपासण्या जसे की सिटी स्कॅन, पेट स्कॅन, एमआरआयद्वारे डॉक्टर्स निदान करून रोग वाढू नये म्हणून उपचार करू शकतात. उत्तम आहार-विहाराने मेंदूच्या पेशींची उतारवयात होणारी हानी रोखता येऊ शकते. नियमित प्राणायाम, योगासने व ध्यानधारणेने स्मरणशक्ती चांगली राहून तणावमुक्त राहण्यास मदत होऊ शकते.

म्हातारपणाकडे वाटचाल करत असताना आपल्या सर्वांनाच अल्झायमर आजार होण्याचा धोका आहे. त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार आहोत का, तसेच आपले प्रियजन या रोगाचे शिकार झाले तर त्यांची काळजी घेण्याचे बळ आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.