क्रांतिकारक विचारवंत

देशातील वंचित आणि बहुजन समाजाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आंबेडकरी विचारांची ओळख
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022 Revolutionary thinker
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022 Revolutionary thinkersakal
Updated on
Summary

देशातील वंचित आणि बहुजन समाजाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आंबेडकरी विचारांची ओळख झालेली आहे. दलित आणि डावे तसेच दलित आणि उजवे या दोन्ही आघाड्यांना आंबेडकरी विचारांची सामाजिक निकड भासू लागली आहे.

देशातील वंचित आणि बहुजन समाजाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आंबेडकरी विचारांची ओळख झालेली आहे. दलित आणि डावे तसेच दलित आणि उजवे या दोन्ही आघाड्यांना आंबेडकरी विचारांची सामाजिक निकड भासू लागली आहे. अलीकडचे देशातील सामाजिक आणि राजकीय सामाजिक वर्तुळ ‘आंबेडकर’ या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काळ त्यांच्या विचार आणि कार्याने जितका प्रभावित झालेला होता, त्याहीपेक्षा अधिक आजचा काळ होताना दिसतो आहे. देशातील डाव्या आणि उजव्या पक्षांना राजकारण करताना ‘आंबेडकर’ या नावाची गरज अपरिहार्य वाटू लागली आहे. याचे कारण हजारो वर्षे दडपलेल्या समूहांना आत्मभान आले आहे. तळातले सामाजिक स्तर जागे होत आहेत आणि मानवाधिकाराचा स्वर अधिक तीव्र होत आहे. राष्ट्रीय जीवन बदलण्याची ही चाहूल आहे.

साहित्याची सुलभ उपलब्धता

बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आजवर दलित चळवळ आणि दलित लेखकांनी हिरिरीने मांडला. त्याचा परिणाम म्हणून समाजामध्ये अनेक संघटना निर्माण झाल्या आणि आंबेडकरी विचारावरील लेखन वाढले. आंबेडकरी विचारांची सामाजिक आणि राजकीय गरज लक्षात घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे प्रकाशन केले. त्यांच्या साहित्याचे भाषांतर करून पुस्तके प्रकाशित केली. शासकीय प्रयत्नामुळे बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोठ्या

प्रमाणात उपलब्ध होऊ शकली. याही कारणांमुळे आंबेडकरी विचारांचा प्रसार झपाट्याने झाला. देशभरातील विद्यापीठांमध्ये आंबेडकरी अध्यासनाची स्थापना झाली. त्यामुळे विद्यापीठीय वर्तुळात आंबेडकरी विचारांच्या अभ्यासाची मांडणी होऊ लागली. देश-विदेशात विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रमात दलित साहित्याचा समावेश करण्यात आला. विद्यापीठीय अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात आंबेडकरी विचारांचा प्रभाव जाणवला. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्रांनी विविध चर्चासत्रे आयोजित केली. या सगळ्यांचा एकूण परिणाम नवीन पिढ्यांवर झाला. उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांना सामाजिक न्यायाची गरज कळू लागली. इथूनच सामाजिक मन बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली.

सामाजिक न्यायाचे महत्त्व

आंबेडकरी विचारांमुळे अभावग्रस्त समाज झपाटून जागा होतो आणि प्रगती करून घेतो, हे चित्र समाजासमोर आले. त्यामुळे समाजातील अनेक स्तर आंबेडकरी विचारांना आत्मसात करू लागले. सामाजिक विकास करून घ्यायचा असल्यास सामाजिक न्याय महत्त्वाचा आहे. सामाजिक न्यायाचे महत्त्व आणि निकड कळाल्यामुळेच विविध सामाजिक वर्गांतून आरक्षणाची मागणी होऊ लागली. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाची चळवळ असो किंवा मराठा आरक्षणाची चळवळ, या चळवळींच्या मुळाशी आंबेडकरी विचारधारेने मांडलेली सामाजिक न्यायाची संकल्पना आहे. सामाजिक विकासाचा आधुनिक विचार म्हणून बाबासाहेबांच्या विचार आणि कार्याला मान्यता मिळाली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा लावल्या आहेत. केवळ दलित आणि वंचितांचा विचार म्हणून बाबासाहेबांच्या विचार आणि कार्याकडे पाहता

येणार नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य दलितांच्या मुक्तीइतकेच हिंदू समाजात सुधारणा झाल्या पाहिजेत, यासाठीही व्यतीत झाले आहे. आजच्या आधुनिक हिंदू समाजाकडे पाहताना त्यांच्या योगदानाची आठवण होते. हिंदू कोड बिलाने आधुनिक हिंदू समाजाची पायाभरणी केली. हिंदू समाज सुधारल्याशिवाय दलितांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, म्हणून बाबासाहेबांनी हिंदू समाज आणि धर्मशास्त्रांवर कडाडून टीका केली. आजचा प्रगत हिंदू समाज घडवण्यामध्ये बाबासाहेबांच्या विचार आणि कार्याचे योगदान नाकारता येणार नाही.

भारतीय लोकशाहीविषयी बाबासाहेबांनी मूलभूत विचार मांडले आहेत. इतक्‍या भिन्न आणि विविधतेने नटलेल्या देशात लोकशाहीचा जो अभूतपूर्व विकास झाला आहे, त्याचे श्रेय भारतीय संविधानाला द्यावे लागेल. भारतीय संविधानामुळे धर्म, पंथ आणि संप्रदायांमध्ये विभागलेला समाज लोकशाहीप्रधान बनू शकला. विश्‍वयुद्धाच्या खाईत लोटले जात असतानाही आपला देश स्थैर्य आणि विकासाच्या वाटेने जातो आहे. आधुनिक भारतीय मन घडवण्यामध्ये विज्ञान, कायदा आणि ज्ञानाचा जितका वाटा आहे, तितकाच आंबेडकरी आणि गांधीवादी विचारांचा वाटा आहे. मानवता आणि मानव अधिकारांचे महत्त्व विशद करणारी विचारधारा म्हणून आंबेडकरी विचारांकडे पाहावे लागेल.

समाजजीवन बदलले

आंबेडकरी विचारांमुळे भारतीय समाजजीवन झपाट्याने बदलले. स्त्री, कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळींना आंबेडकरी विचारांची कास धरावी लागली. शिक्षण आणि चळवळ ही समाज बदलणारी साधने आहेत. शिक्षणात आणि चळवळीत तरुणांचा सहभाग असतो. या तरुण मनांना साद घालण्याचे काम आंबेडकरी विचाराने केले आहे. कम्युनिस्ट असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, दोघांनाही आंबेडकरी विचारांचा विचार करावा लागतोय. सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष, त्यांना आंबेडकरांच्या विचारांचा आधार घ्यावाच लागतो. आंबेडकरी विचारांची समकालीन अपरिहार्यता लक्षात घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व अधोरेखित झाल्यावाचून राहत नाही. आंबेडकरी विचारांचा होणारा विस्तार आणि विविध शोषितांच्या चळवळीने सामाजिक न्यायाचा घेतलेला आधार पाहिला, की एक भारतीय महान विचार म्हणून आंबेडकरी विचाराचा उल्लेख करावा लागणार आहे.

महत्त्व आंबेडकरी विचारांचे

देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जास्त विद्यापीठे आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात दलित समाज पसरला असल्याने देशभर आंबेडकरी विचारांचे उपयोजन होत आहे. देशभर आणि देशाबाहेरही बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारलेले दिसतील. ही आंबेडकरी विचारांची समकालीन गरज लक्षात घेतली तर भविष्यात हा विचार आणखी शास्त्रशुद्धपणे मांडण्याची गरज आंबेडकरी विचारवंतांवर येते. साहित्य, संगीत, सिनेमा, राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि चळवळ या सर्वच क्षेत्रांत आंबेडकरी विचारांचा उदय झालेला आहे. हे चित्र खूप आश्‍वासक वाटते. एक राज्य किंवा एक जात इतकी या विचारांची मर्यादा असू शकत नाही. आंबेडकरी समाजाने खूप मोठी किंमत चुकवून हा विचार शिरोधार्य मानला. आंबेडकरी चळवळीने आणि दलित साहित्याने आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार केला. त्यामुळेच हा विचार सर्वदूर पोहचू शकला आहे.

आंबेडकरी समाज आणि आंबेडकर अनुयायी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील निस्सीम प्रेम अनोखे आहे, ही या विचारांची अभूतपूर्व ताकद म्हणावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य उत्तरोत्तर वाढत आणि विकसित होत आहे. आजच्या तरुण पिढीला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेतल्याशिवाय आधुनिक भारताची सामाजिक जडणघडण कळणार नाही. जातीय अभिनिवेश दूर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांना समजावून घ्यावे लागेल. आंबेडकरांचे विचार समजून घेणे म्हणजे लोकशाही समजून घेणे होय. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता समजून घेणे म्हणजेच आंबेडकरी विचार आणि कार्य समजून घेणे होय. आपल्या लोकशाही समाजाची आणि सार्वभौम राष्ट्राची पेरणी करणारा क्रांतिकारक विचारवंत म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्याकडे पाहावे लागेल.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्वच विचारप्रवाहांना समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या क्रांतिकारी विचारवंताची मते समजून घेणे एकप्रकारे लोकशाही समजून घेण्यासारखे आहे. शिक्षण आणि चळवळ ही समाज बदलणारी साधने असून, त्यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय असतो. तरुण मनाला साद घालण्याचे काम आंबेडकरी विचारांनी केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त या महामानवाचे हे स्मरण....

- डॉ. शरणकुमार लिंबाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()