हरलेली लढाई जिंकली!

life
lifeesakal
Updated on

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

आजही तो प्रसंग आठवला, की अंगावर अक्षरशः शहारे येतात. विदर्भातून आलेली वैशाली आणि तिला उष्माघातामुळे भरलेला १०८ पर्यंतचा ताप माझ्यासह डॉक्टरांची भंबेरी उडवून देणारा होता. आता पेशंट हाती लागत नाही, असे आम्हाला वाटू लागले होते. संपूर्ण टीम तिला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. आपल्यामध्ये सकारात्मकता असेल तर कुठल्याही प्रसंगामध्ये ती आपणास खरोखर खूपच कामी येते, याची अनुभूती दिवशी आली आणि आम्ही वैशालीला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.

गोष्ट आहे, १९९८ च्या उन्हाळ्यातील. ९८ चा उन्हाळा हा तुलनेने खूपच जास्त गरम होता. एप्रिलमध्येच तापमापकाच्या पाऱ्याने ४३ चा आकडा ओलांडला होता आणि तोही आपल्या सुखद आल्हाददायक टेम्परेचरसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये ही परिस्थिती तर त्या वेळी विदर्भाची काय अवस्था असेल, याचा विचार करा. त्या वेळी अकोला, चंद्रपूर, नागपूर अशा ठिकाणी तापमापकाचा पारा सरासरी ४७ डिग्रीच्या आसपास रेंगाळत होता. एकंदरीत तापमापकाने गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील रेकॉर्ड तोडले होते.

life
गौराई माझी अनमोल

मला आठवतो, तो एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा होता. एके दिवशी सकाळी सकाळी नऊ-सव्वानऊच्या दरम्यान माझे फॅमिली पेशंट असलेले श्री. देशमुख ओपीडीमध्ये आले आणि मला त्यांच्या शेजारी असलेला पेशंट बघायला येण्याचा आग्रह करू लागले, जे की माझे नेहमीचे पेशंट नव्हते. सकाळी नुकतीच कुठे कामाला सुरवातच झाली होती आता कुठे तीन-चार पेशंट बघून झाले होते. बाहेर गर्दी तुडुंब होती आणि अशा वेळी श्री. देशमुख मला खूपच आग्रह करीत होते, ‘‘डॉक्टर साहेब, प्लीज चला, डॉक्टर साहेब, प्लीज चला.’’ मी चिडलो. देशमुखांना विचारले, त्यांचे नेहमीचे डॉक्टर कोण आहेत? देशमुखांनी त्यांचे नाव सांगितले आणि मी अजूनच जास्त देशमुखांवर चिडलो. त्यांना सांगितले, ‘‘अरे, माझे फॅमिली पेशंट नाहीत. माझा त्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. का मला गर्दीच्या वेळी त्रास देत आहात?’’ परंतु देशमुखांचे माझे पारिवारिक संबंध अत्यंत जुने असल्याने त्या हक्कापोटी ते मला आग्रह करीत होते आणि यातली दुसरी बाजू अशीही होती की त्यांचा व त्यांच्या परिवाराचा माझ्यावर खूपच जास्त दृढविश्वास होता. यामुळेच शेजारच्या अडचणीच्या प्रसंगी ते मला आग्रह करीत होते. शेवटी साडेनऊच्या सुमाराला कसातरी वेळ काढून देशमुखांबरोबर पाच मिनिटांकरिता गेलो. तसे घर जवळच होते. पाच मिनिटांतच पेशंटपर्यंत पोचलो. एक तरुण स्त्री वय वर्षे फक्त २१. ती तिच्या भावजयीच्या डिलिव्हरीकरिता मदतीला म्हणून आदल्या दिवशीच अकोला (विदर्भ) येथून आलेली होती.

तिच्या भावजयीचे दिवस भरत आलेले होते. त्या बाळंतपण नाशिकलाच करणार होत्या आणि मूळचे राहणारे विदर्भातील असल्याने येथे त्यांचे जवळचे म्हणावे असे कोणीही नातेवाईक नव्हते आणि म्हणून ही वैशाली खास मदतीला म्हणून आलेली होती. तिचेही लग्न मोजून चार महिन्यांआधी झाले होते. तीही या कुटुंबात नवीनच होती. वयाचा विचार करता तिला एकंदरीत सगळ्याच गोष्टींचा अनुभवही कमीच होता; परंतु एक सासुरवाडीतील कर्तव्याचा भाग म्हणून ती आली होती. कारण असेही कोणी त्यांच्या कुटुंबात एवढे लांब येण्यासारखे नव्हते आणि म्हणून तिचा नंबर लागलेला होता. येतानाच तिला ताप आला होता. तिचा भाऊही तिला आल्या आल्या त्याच्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेला होता. त्यांनी मलेरियावरची ट्रीटमेंट चालू सुरू केली होती. मी वैशालीला तपासायला सुरवात केली. तिला सकाळपासून एक उलटी झालेली होती. हे सोडले तर बाकी तिला सध्यातरी इतर कुठलीही तक्रार नव्हती. आम्ही डॉक्टर मंडळीही खरे थर्मामीटरने ताप मोजायला पाहिजे तर आम्हालाही चुकीची सवय लागलेली असते. पेशंटला हात लावून तापाचा अंदाज घेण्याची सवय लागलेली असते, पण त्या दिवशी अगदी थर्मामीटरने वैशालीचा ताप एकदा सोडून दोनदा बघितला. तो फक्त ९७.२ होता. तिची नाडीही व्यवस्थित होती. फक्त थोडा व्हॉल्यूम कमी लागत होता. तिचा रक्तदाबही व्यवस्थित होता. ऑस्कल्टेशनमध्ये तिच्या हृदयाचे ठोकेदेखील अगदी व्यवस्थित होते. एकंदरीत फार काही दिसत नव्हते आणि जेव्हा मलेरियाची औषधे घेतली जातात त्या वेळी रुग्णास उलटी होणे काहीही विशेष नसते; परंतु अंतर्मन म्हणजेच ज्याला आपण इंग्रजीमध्ये ‘सिक्स्थ सेन्स’ असे म्हणू शकतो तर असा हा सेन्स मनामध्ये बजावीत होता, की हे सगळे नॉर्मल दिसत असले तरीही यामध्ये काहीतरी वेगळेच सीरिअस आहे. ही मनातील धोक्याची घंटा पुनःपुन्हा वाजत होती म्हणून सर्व पॅरामीटर्स मी पुन्हा एकदा बघितलेत आणि कुठेच काही सापडायला तयार नव्हते. वैशालीदेखील मला पुनःपुन्हा सांगत होती, ‘‘डॉक्टर साहेब, मला फार काही झालेले नाही. मी व्यवस्थित आहे. हे लोक उगाच चिंता करीत आहेत.’’ मी सगळा सांगोपांग विचार करून शेवटी ट्रीटमेंट ठरविली आणि त्याप्रमाणे उलटीवरील सर्वांत बेसिक ट्रीटमेंट ती म्हणजे इंट्रा मस्क्युलर इंजेक्शन द्यायचे ठरविले. इंजेक्शन द्यायचे तर ठरविले परंतु तरीही माझे मन अस्वस्थच होते. त्यामधून मला सारखे सिग्नल्स मिळत होते, की नाही अजून काहीतरी वेगळे आहे, अजून काहीतरी वेगळे आहे; परंतु एक्झामिन करताना मात्र काहीही हाती लागत नव्हते. अशी एकंदरीत माझी अवघडच परिस्थिती झालेली होती; परंतु सकाळची ओपीडीची वेळ. ओपीडीमध्ये असलेली गर्दी या सर्व गोष्टी माझ्यावरती इंजेक्शन देऊन ट्रीटमेंट सुरू करून ओपीडीमध्ये परत पोचण्यासाठी प्रेशर वाढवीत होत्या आणि मी या प्रेशरला बळी पडत इंजेक्शन इंट्रा मस्क्युलर दिले; परंतु तरीही माझे मन मानत नसल्याने मी देशमुखांना विनंती केली, की आपण वैशालीला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब भरती करा. देशमुखांच्या चेहऱ्यावर प्रचंड अविश्वासयुक्त राग, संताप दिसत होता.

life
अनंताचे फूल...

त्या दिवसापर्यंतचा त्यांच्या माझ्या संबंधांचा विचार केला तर तो अगदीच खरा होता. त्यात काहीही आश्चर्य नव्हते, कारण इतर डॉक्टरांनी हॉस्पिटलला ॲडमिट होण्याकरिता पाठविलेले अनेक पेशंट्स त्यांनी माझ्याकडे आणून ओपीडी लेव्हललाच बरे केलेले होते आणि हा प्रकार दहा-बारा वर्षांपासून अव्याहतपणे घडत आलेला होता आणि या केसचा विचार केला तर प्रथमदर्शनी अत्यंत किरकोळ अशी केस दिसत होती. त्यामुळे त्यांच्या आश्चर्ययुक्त संतापाचे मला फार काही विशेष वाटत नव्हते; परंतु मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो. देशमुखांना सांगितले, की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना बाकी काहीच बोलू नका, फक्त मी सांगतो तेवढे करा. देशमुखांकडे मी असे बोलल्याने काहीच पर्याय उरला नव्हता. त्यांना परत एकदा सांगितले. आपल्याकडे वेळ अगदी थोडा आहे. ताबडतोब रिक्षा बोलवा. त्या काळी आजच्यासारखी रुग्णवाहिकेची उपलब्धता नव्हती म्हणून मी देशमुखांना रिक्षा आणण्यासाठी पिटाळले आणि मोजून तीन ते चार मिनिटांच्या आत देशमुख रिक्षा घेऊन आले आणि मी विनाविलंब वैशालीला हॉस्पिटलमध्ये पाठविले. रिक्षाला मार्गस्थ करूनच मी ओपीडीमध्ये परतलो.

आल्या आल्या पहिले हॉस्पिटलला फोन लावला. त्या काळी मोबाईल वगैरे अशा काही सोयी उपलब्ध नव्हत्या. फक्त लँडलाइन फोन आणि तेही फार कमी लोकांकडे होते. मी हॉस्पिटलला फोन लावल्यावर फोनवर एक ज्युनिअर बालरोगतज्ज्ञ भेटले. त्यांना फक्त ऑर्डर केली, की एक वैशाली नावाची पेशंट पाठविली आहे, तिला काय झाले आहे हे नक्की मलाही सांगता येणार नाही परंतु वैशालीला ताबडतोब फिजिशियनच्या अंडर आयसीयूमध्ये ॲडमिट करा. एवढे बोलून मी फोन ठेवला आणि माझ्या ओपीडीमध्ये व्यस्त झालो. त्या दिवशी गर्दी जरा जास्तच होती. त्यामध्ये या इमर्जन्सी व्हिजिटमुळे अर्धा तास गेला होता. त्यामुळे मी कामात बुडून गेलो आणि अक्षरशः हेदेखील विसरून गेलो, की मी वैशालीला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी पाठविले आहे. सकाळची ओपीडी. सर्व कामकाज आवरून जेवायला येण्यासाठी अडीच वाजून गेले होते. अडीच वाजता जेवता जेवता मला वैशालीची आठवण झाली. जेवण आटोपून मी तडक हॉस्पिटलला पोचलो आणि बघतो तर काय तेथे काय काय महाभारत-रामायण घडून गेले होते.

झाले असे होते, की पेशंट आल्या आल्या त्या बालरोगतज्ज्ञांनी अटेंड केला होता आणि देशमुखांसारखाच आश्चर्याचा धक्का त्या बालरोगतज्ज्ञांना बसलेला होता, कारण अशा प्रकारे की ज्यांना फार काही त्रास नाही अशा रुग्णांना आयसीयू तर सोडा साध्या वॉर्डमध्येसुद्धा आम्ही असे रुग्ण कधीही ॲडमिट करत नसू आणि आजही करत नाहीत. आल्या आल्या या बालरोगतज्ज्ञांनी पेशंट बघितल्यानंतर त्यांनाही त्या पेशंटमध्ये काही विशेष गंभीर असे आढळले नव्हते आणि माझी ऑर्डर तर डायरेक्ट आयसीयूमध्ये ॲडमिट करण्याची होती. त्यामुळे त्यांनाही आश्चर्याचा जोरदार धक्का बसलेला होता; परंतु देशमुखांप्रमाणेच त्यांचाही माझ्यावर विश्वास असल्यानेच त्यांनी वैशालीला आयसीयूमध्ये ॲडमिट करून घेतले होते. ॲडमिट करून ते बाहेर निघतच होते तेवढ्यात त्यांना फिजिशियन भेटले. त्यांनी त्यांना अगदीच कॅज्युअली सांगितले, ‘‘अरे यार! वो डॉक्टर ओस्तवाल सर ने एक पेशंट भेजा है और उसे आप के अंडर लेके डायरेक्ट आयसीयू में ॲडमिट करने के लिए बोला है। मुझे तो कुछ समझ में नहीं आया की आयसीयू में क्यू लेना है। लेकिन डॉक्टर ओस्तवाल सर ने बोला है इसलिये मैने आप के अंडर पेशंट को आयसीयू में ॲडमिट कर लिया है। आप जा के प्लीज देख लीजिये।’’ ‘ओके, मैं देखता हूँ’ असे म्हणून फिजिशियन ताबडतोब आयसीयूमध्ये पोचले. सुदैवाने वैशालीला आयसीयूमध्ये एक नंबर बेडवर घेतले होते. फिजिशियन आयसीयूमध्ये प्रवेश केल्या केल्या एक नंबर बेडवरतीच पोचले होते. फिजिशियन वैशालीची हिस्टरीच घेत होते, तेवढ्यात वैशाली कोलॅप्स झाली होती. अत्यंत गंभीर अशी तब्येत वैशालीची झाली होती. वैशालीची नाडी लागेनाशी झाली होती. तिचा ब्लडप्रेशरही मोजता येत नव्हता. एकंदरीत अत्यंत गंभीर अशी तिची प्रकृती झाली होती. फिजिशियन ताबडतोब ॲक्टिव्हिशनमध्ये आले. त्यांनी सर्व प्रकारच्या इमर्जन्सी मॅनेजमेंट्स सुरू केल्या. लाइफ सेव्हिंग म्हणजेच जीव वाचविण्यासाठी सर्व प्रकारच्या ज्या काही अत्यावश्यक प्रोसिजर असतात त्या सर्व सुरू केल्या गेल्या आणि वैशालीचे ज्या वेळी टेम्परेचर घेतले गेले त्या वेळी सर्वांना प्रचंड धक्का बसला. आपणा सगळ्यांना नेहमीची टेम्परेचर घ्यायची पद्धत माहीत असते. थर्मामीटरद्वारा आपण बगलेमध्ये थर्मामीटर ठेवून टेम्परेचर बघत असतो; परंतु ही पद्धत शंभर टक्के अचूक नाही तर आपल्याला अगदी अचूक टेम्परेचर हवे असेल तर आपणास थर्मामीटर गुद्‌द्वारामध्ये ठेवायला लागते. येथील टेम्परेचर म्हणजे आपल्या शरीराचे अचूक तापमान. तर या पद्धतीने जेव्हा वैशालीचे टेम्परेचर बघितले गेले तेव्हा सर्वांनाच प्रचंड धक्का बसला. कारणही तसेच होते. थर्मामीटरचा पारा १०८ वर जाऊन अडकला होता. कारण थर्मामीटरमध्ये १०८ हा आकडा शेवट असतो. त्या पुढील टेम्परेचर थर्मामीटरही दाखवत नसते आणि वैशालीचे टेम्परेचर १०८ वरती लॉक झालेले दाखवत होते; परंतु मानवी शरीराला १०५ च्या पुढे गेलेले टेम्परेचर हे फार घातक असते. यामध्ये अगदी मृत्यूचा धोकादेखील संभवतो आणि मग येथे वैशालीचे आजाराचे निदान झालेले होते. वैशालीला जबरदस्त उष्माघात म्हणजेच सन स्ट्रोक बसलेला होता. आमच्या फिजिशियननी त्या वेळी चक्क जवळच्या रसवंतीमधून २० किलो बर्फ आणले होते आणि संपूर्ण अंगावर ते ठेवले होते. आता खरी अडचण आली होती ज्या वेळी पेशंट अशा गंभीर अवस्थेत असतो त्याची नाडी लागत नसते. त्या वेळी पेशंटला सलाइन लावण्यासाठी व्हेन (नीला) काही केल्या सापडत नसतात आणि तीही जणू एक अग्निपरीक्षाच असते. होय, कित्येक वेळा या व्हेन्स न सापडल्याने वेळेमध्ये हायड्रेशन न करता आल्याने रुग्णांचा मृत्यूदेखील संभव असतो. तीच परीक्षा येथे फिजिशियन आणि हॉस्पिटलचा स्टाफ देत होता. निदान याबाबतीत तरी वैशालीच्या नशिबाने साथ दिली. तिच्या दोन्ही हातांच्या व्हेन्स आमच्या सीनिअर अत्यंत एक्स्पर्ट अशा स्टाफने मिळविल्या होत्या आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेल्या अशा सलाइनच्या बाटल्या सुरू केल्या होत्या. चक्क पेशंटच्या दोन्ही बाजूस स्टुलावर उभे राहून सिस्टर्स अक्षरशः सलाइनची बाटली दाबून दाबून सलाइन देत होत्या आणि या सलाइन्ससुद्धा फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेल्या होत्या. त्याबरोबरीने पेशंटच्या नाकातून एक नळी टाकून जठरामध्ये बर्फाचे पाणी सोडत होते. याबरोबरच जीवरक्षक औषधेदेखील शिरेवाटे देण्यात येत होती, असे शक्य असतील ते सर्व प्रयत्न फिजिशियन आणि हॉस्पिटलची टीम करीत होती.

life
दुनियादारी : प्रेमाचं चित्र, थोडं विचित्र

तुम्हाला यावरून कल्पना येईल, की फिजिशियन जे वैशालीजवळ सकाळी साधारणतः पावणेदहाच्या सुमाराला आले होते ते पेशंटजवळ दुपारच्या तीनपर्यंत तेथेच काहीही न खाता-पिता उभे होते. तीच परिस्थिती हॉस्पिटलचा जो स्टाफ तिथे सेवा देत होता त्यांचीदेखील होती. ही जवळपास हरलेली लढाई आमच्या फिजिशियन व त्यांच्या टीमने जिंकली. तीनच्या सुमारास तिने थोडेसे डोळे उघडले. पुढच्या थोड्या वेळात ती शुद्धीवरदेखील आली. स्त्रियांच्या नैसर्गिक लज्जेनुसार वैशालीची पहिली रिॲक्शन होती, ‘‘मेल्यांनो, लाजा नाही वाटत!’’ कारण वैशालीच्या संपूर्ण अंगावर बर्फ टाकलेले असल्याने कपडे बाजूला होते, म्हणून वैशालीची ही प्रतिक्रिया आली होती. एवढ्या गंभीर अवस्थेतदेखील फिजिशियन आणि त्यांच्या टीमच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुलले. एका बाजूला तिच्या नैसर्गिक रिॲक्शनला हसू होते, तर दुसरीकडे एवढ्या गंभीर प्रसंगातून वैशाली सुखरूप वाचल्याचा आनंद होता. यातला फक्त शेवटचा दहा मिनिटांचा एपिसोड माझ्यासमोरच घडला होता आणि म्हणूनच हॉस्पिटलला पोचल्यानंतर मला जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढे महाभारत-रामायण घडून गेले होते; परंतु यात फार मोठे समाधान होते, की वैशालीचा जीव मोठ्या महत्प्रयासाने का होईना वाचला होता, जणू काही हा एक चमत्कारच होता.

आजही हा सर्व प्रसंग आठवला, की अंगावर अक्षरशः काटे येतात. वैशाली वाचलीच कशी, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. त्या दिवशी माझ्यातील सकारात्मकतेने सिक्स्थ सेन्स जागृत झाला होता. आपल्यामध्ये जर खऱ्या अर्थाने सकारात्मकता असेल तर कुठल्याही प्रसंगामध्ये ती आपणास खरोखर खूपच कामी येते. याच सकारात्मकतेने वैशालीचा जीव वाचला होता. अशा अनेक वेगवेगळ्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असतात. गरज आहे ती आपल्या सकारात्मकतेची. जिथे सकारात्मकता तिथे नक्कीच चांगला मार्ग उपलब्ध होत असतो.

(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()