मानससूत्र : मोहाचा नको ‘ॲप’पाश

एखादं नातं जुळवणं आणि नंतर ते टिकवून ठेवणं हे आजच्या तरुण पिढीला दिवसेंदिवस कठीण जात आहे. कारणं अनेक आहेत.
dating app
dating appsakal
Updated on

- डाॅ. जयश्री फडणवीस

कोरोनाच्या साथीनं अनेक तरुण-तरुणींना ‘डेटिंग ॲप्स’कडे वळवलं. तेव्हाचं एकटेपण; तसंच घराबाहेर पाऊलही टाकता येणार नाही अशी परिस्थिती, यामुळे मित्र-मैत्रीण निवडण्यासाठी; तसंच आयुष्याचा जोडीदारही शोधण्यासाठी अनेकांना हा उत्तम पर्याय वाटला. सध्या नुसतेच पुरुष नव्हे, तर ६५ टक्के महिलाही ‘डेटिंग ॲप्स’ वापरत आहेत. गरज कुठे मैत्रीची, तर कुठे जोडीदाराची.

एखादं नातं जुळवणं आणि नंतर ते टिकवून ठेवणं हे आजच्या तरुण पिढीला दिवसेंदिवस कठीण जात आहे. कारणं अनेक आहेत. उदाहरणार्थ, स्त्री-पुरुषांना अर्थार्जनाची समान संधी, त्यासाठीचे दिवसरात्र- कष्ट; तसंच व्यग्रता. एकमेकांना नीट समजून घ्यायलाही वेळ नाही.

छोट्या-छोट्या कारणांवरून मतभेद आणि नंतर ‘ब्रेकअप’! त्यातून सावरत नाही, तोच नवीन जोडीदाराचा शोध, त्याकरिता पुन्हा एकदा ‘डेटिंग ॲप’वर स्वतःला रजिस्टर करणं, प्रोफाइल अपलोड करणं, असं चित्र सर्वदूर दिसू लागलं आहे.

जगातली पहिली डेटिंग वेबसाइट ‘मॅच डॉट कॉम’ची निर्मिती १९९५ मध्ये झाली; पण त्यापूर्वी इसवीसन १९५९ पासूनच ‘डेटिंग ॲप्स’च्या पूर्वजांची पाळंमुळं रुजू लागली होती. सन १९६४ मध्ये जॉन बेल यांनी संगणकावर व्यावसायिक ‘मॅच मेकिंग’ कंपनी सुरू केली, तर १९८२ मध्ये जेम्स जुरगन यांनी ‘Travel companion Exchange’ ही कोणत्याही प्रवासाकरिता साथीदार शोधून देण्यासाठी संगणकावर आधारित सेवा सुरू केली, तर १९९७ मध्ये अनुप मित्तल यांनी भारतात ‘शादी डॉट कॉम’ ही वधू-वर संशोधन वेबसाईट सुरू केली.

आता तर असंख्य वेबसाईट्स; तसंच ‘डेटिंग ॲप्स’ जोडीदारांच्या निवडीकरिता उपलब्ध आहेत. हळूहळू ‘मुलगी बघायला जाणं’ ही पारंपरिक पद्धत पूर्णपणे बंद होईल. या ‘डेटिंग ॲप्स’चे काही फायदे आहेत, तर बरेच तोटे आहेत. अनेक प्रकारचे धोकेही यात दडलेले आहेत. म्हणूनच संबंधित ॲप नक्की कसं चालतं, हे नीट समजून घ्यायला हवं आणि मगच त्यावर स्वतःचा फोटो व प्रोफाइल टाकायला हवं.

संभाव्य धोके आणि खबरदारी

संशोधन करा - एखादे डेटिंग ॲप वापरताना कोणतीही ‘डेट’ निश्चित करण्यापूर्वी; तसंच त्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती शोधून काढा. ॲपवरील सर्वच माहितीवर आंधळेपणे विश्वास ठेवू नका. तुम्हाला पाठवलेला फोटोदेखील खरा आहे का, हेही नीट तपासून बघा.

व्हिडिओ कॉल

ॲप वापरताना त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल कोणत्याही इंटरनेट डिव्हाइसवरून केला; तसंच अगदी काही वेळेपुरता जरी एखादा फोटो अपलोड केला, तरी एक लक्षात ठेवा, की स्क्रीनशॉट लगेच काढता येतो. अशा वेळी आपण काय आणि कसं बोलतो त्याची काळजी घेतली पाहिजे; तसंच योग्य पेहरावही केला पाहिजे.

प्रत्यक्ष भेट

प्रत्यक्ष भेटायला जाताना स्वतःच्या गाडीनं अथवा रिक्षा किंवा टॅक्सीनं जा. ‘लिफ्ट’चं आमिष दाखवून अपहरण केल्याची उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. सुरवातीच्या काही भेटींमध्ये स्वतःची अथवा कुटुंबाची खूप माहिती देऊ नका.

इतरांना सांगून ठेवा

तुम्ही ‘डेट’ला जाताय हे घरच्यांना अथवा मित्र-मैत्रिणींना सांगून ठेवा, भेटायला जाणार त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती फोटोसकट देऊन ठेवा. कुठं आणि कसं, कोणत्या मार्गानं जाणार याची कल्पना देऊन ठेवा.

भेटीची जागा

गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी भेटा. ती जागा तुमच्याही परिचयाची असावी. गावाबाहेर, दूर, निर्जनस्थळी जाणं संपूर्णपणे टाळायला हवं. कारण आपण एका नुकत्याच परिचय झालेल्या व्यक्तीला भेटणार आहोत. पहिल्याच भेटीत स्वतःची; तसंच कुटुंबीयांची खूप वैयक्तिक आणि गोपनीय माहिती देणं टाळा. आत्मसंरक्षणासाठी कायम सतर्क राहा.

फसव्या ‘डेटिंग ॲप्स’पासून आणि त्याबाबतच्या धोक्यांपासून सावध राहा. स्वतःला सांभाळा. योग्य; तसंच सुरक्षित ॲप्सची आणि व्यक्तींची निवड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.