चीन कोरोनाग्रस्तच का?

जगाच्या तुलनेत कोविडचे कडक निर्बंध लावूनसुद्धा चीन आजही कोरोनाशी लढण्यासाठी हतबल झालेला दिसतो आहे. यामागे तीन मुख्य कारणे आहेत.
Chin
ChinSakal
Updated on
Summary

जगाच्या तुलनेत कोविडचे कडक निर्बंध लावूनसुद्धा चीन आजही कोरोनाशी लढण्यासाठी हतबल झालेला दिसतो आहे. यामागे तीन मुख्य कारणे आहेत.

जगाच्या तुलनेत कोविडचे कडक निर्बंध लावूनसुद्धा चीन आजही कोरोनाशी लढण्यासाठी हतबल झालेला दिसतो आहे. यामागे तीन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे चीनचे फसलेले लसीकरण, दुसरे म्हणजे कोविड आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक वेळी फक्त लॉकडाऊनसारखा पर्याय स्वीकारणे आणि ‘झिरो कोविड पॉलिसी’चा आग्रह चीनच्या अंगलट आलेला दिसतो आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये पहिला कोविड रुग्ण रिपोर्ट करून दोन वर्षांहून अधिक काळ गेल्यानंतरसुद्धा चीन अजूनही कोविड संकटात अडकलेला आहे. याउलट इतर जग मात्र सध्या कोविडच्या संकटातून निर्धास्त झाले आहे. सध्या चीनमध्ये सुमारे ४०० दशलक्ष (४० कोटी) लोक कोणत्या ना कोणत्या लॉकडाऊनमध्ये राहत आहेत, असे मानले जाते. चीनच्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असणाऱ्या शांघाय शहराला गेल्या महिनाभरापासून अर्धांगवायू झाला आहे, तेथील अनेक रहिवासी घाईघाईने उभारलेल्या धातूच्या कुंपणाने अडकले आहेत. राजधानी बीजिंग आता अशीच परिस्थिती टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. बाहेरच्या जगाला चीनमधील अधिकृत माहिती समजत नसली तरी चीनमधील काही भागांमध्ये आणीबाणीसदृश्य परिस्थिती आहे, हे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या व्हिडीओवरून दिसून येत आहे. कोविडचे उगमस्थान असलेल्या चीनमधून बघता बघता दोन-तीन महिन्यांत संपूर्ण जगाला विळखा बसला, इतर जगाच्या तुलनेत कोविडचे कडक निर्बंध लावूनसुद्धा चीन आजही कोविड हाताळण्यास अयशस्वी ठरताना दिसून येत आहे, यामागे तीन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे चीनचे फसलेले लसीकरण, दुसरे म्हणजे कोविड आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक वेळी फक्त लॉकडाऊनसारखा पर्याय स्वीकारणे आणि झिरो कोविड पॉलिसीसारखी योजना राबवणे.

फसलेले लसीकरण : चीनमधून विकसित झालेली लस ही खूपच जुन्या प्लॅटफॉर्मवर आधारित होती. या तंत्रज्ञानाचा दोष म्हणजे लशीचे अनेक डोस द्यावे लागतात. याउलट युरोप-अमेरिकेने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित लशी विकसित केल्या होत्या, त्यामुळे दोन किंवा तीन डोस कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार करण्यास सक्षम दिसून आले. सारखे सारखे लसीकरण करावे लागत असल्यामुळे चीनमधील लोकांमध्ये लसीकरणाविरुद्ध जनमत तयार झाले आणि यामध्ये वृद्ध लोकांचा अधिक समावेश आहे. चीनमधील ८० आणि त्याहून अधिक वयाच्या केवळ निम्म्या लोकांना त्यांचे पहिले लसीकरण मिळाले आहे. ६० ते ६९ वयोगटातील ६० टक्क्यांपेक्षा कमी लोकांचे दोन डोसचे लसीकरण झालेले आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, चीनला आता एका पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. एकतर मोठ्या प्रमाणावर वृद्ध लोकांचे मृत्यू आणि दबून गेलेल्या आरोग्य सेवा, ज्याचा परिणाम दीर्घकाळपर्यंत लॉकडाऊन वेगाने वाढणारा सामाजिक उद्रेक आणि आर्थिक खर्च.

प्रत्येक वेळी कडक लॉकडाऊन लावणे : जानेवारी २०२० पासूनच चीनमध्ये कोविडच्या साथीला रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावणे हाच पर्याय स्वीकारला. कोविडला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा तात्पुरता मार्ग असायला हवा आणि वेगाने लसीकरण हाच उत्तम पर्याय आहे, असे जगातील अनेक शास्त्रज्ञ सुरुवातीपासून सांगत होते. याकडे चीनने दुर्लक्ष केले. प्रत्येक वेळी कडक लॉकडाऊन लावल्यामुळे लोकांमध्ये खूपच अस्वस्थता आहे. त्या अस्वस्थतेचा उद्रेक होताना दिसून येत आहे आणि यावेळी लोक लॉकडाऊनचे नियम न पाळता रस्त्यावर येत आहेत. यामुळे पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे आणि वृद्धांचे मृत्यू अधिक होत आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा चीनला कोविडशी लढण्याची पद्धत बदलण्याचे आवाहन केले आहे.

झिरो कोविड पॉलिसी : चीनमध्ये एकसुद्धा कोविडचा रुग्ण सापडायला नको, अशी झिरो कोविड पॉलिसी गेल्या अनेक महिन्यांपासून राबवली जात आहे. याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत असून, जगातील अनेक देशांत राहणाऱ्या चीनच्या नागरिकांनाही चीनमध्ये प्रवास करताना याचा आर्थिक त्रास होत आहे. जगातील हजारो शास्त्रज्ञांनी या पॉलिसीचा उपयोग होणार नाही, असे अनेक वेळा ठणकावून सांगितले आहे. तरीसुद्धा चीनचे राष्ट्राध्यक्ष यावर ठाम आहेत. याच झिरो कोविड पॉलिसीमुळे अलीकडच्या काही महिन्यांत अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये तंत्रज्ञानाची हब असलेली शेन्झेन आणि शांघाय शहरे आहेत. ही दोन शहरे उत्पादन, व्यापार आणि आर्थिक केंद्र आहेत. लॉकडाऊनमुळे कारखाने आणि बंदरे दीर्घकाळ बंद आहेत. त्यांचा विदेशी कंपन्यांमधील कामावरही परिणाम झाला आहे आणि यामुळेच चीनची अर्थव्यवस्था २०२२ च्या ५.५ टक्के लक्ष्याच्या तुलनेत गेल्या वर्षभरात केवळ ३.९ टक्के झाली आहे. चीनमध्ये तरुण लोकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. विशेषतः मालमत्ता बाजार कमकुवत होत आहे. चीनच्या झिरो कोविड पॉलिसी आणि कडक लॉकडाऊनचा परिणाम उर्वरित जगातील व्यवसाय आणि ग्राहकांवरदेखील होत आहे, जे वस्तूंच्या पुरवठ्यासाठी चीनवर अवलंबून आहेत. झेंगझोऊमधील फॉक्सकॉन प्लांटमध्ये लॉकडाऊनमुळे आयफोनच्या उत्पादनावर परिणाम झाला, ज्यामुळे जगभरातील टंचाईची भीती निर्माण झाली. कर्मचाऱ्यांना नेहमी कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे, छोट्या किंवा मोठ्या कारखान्यांत वसतिगृह सुविधा नसलेल्या कठीण ठिकाणी कामगार राहू शकत नाहीत आणि यामुळेच त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. उत्पादन समस्या, प्रवासी निर्बंधांमुळे मालाची वाहतूक करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे चीनमधील पुरवठा साखळी विस्कळित होत आहे. ज्याचा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होतो आहे.

जसजसे लोकांचे सामाजिक आणि आर्थिक खर्च वाढत आहेत, तसतसे चिनी अधिकाऱ्यांना महामारीच्या पूर्वीच्या तुलनेत अधिक असंतोष आणि ऑनलाईन टीकेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शांघायमध्ये, काही रहिवासी त्यांच्या सहनशीलतेच्या अत्युच्य पातळीवर पोहोचले आहेत, ज्यामुळे रस्त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांशी वाद होताना दिसून येत आहेत. याचबरोबर कोविडच्या चाचण्या घेण्यास किंवा केंद्रीकृत विलगीकरण सुविधांमध्ये जाण्यास नकार दिला जात आहे. येणाऱ्या काही आठवड्यांत चीनमधील परिस्थिती जैसे थे राहण्याची शक्यता असून, यामध्ये मोठा फरक लगेचच पडणार नाही, यावर साध्यातरी चीन सरकार आणि यंत्रणा हतबल झालेली दिसून येत आहे.

(लेखक ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.