जगात एकीकडे कोरोनाची परिस्थिती निवळत असताना चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरियासह युरोपातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
जगात एकीकडे कोरोनाची परिस्थिती निवळत असताना चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरियासह युरोपातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या संसर्गवाढीमागे नेमके काय कारण आहे, त्याचा भारतासह इतर देशांवर कितपत परिणाम होईल, याबाबत...
चीन आणि हाँगकाँगमध्ये ९० टक्के प्रौढ लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाल्याचा यंत्रणेचा दावा आहे; मात्र चीनमध्ये देण्यात आलेली लस आणि तिची परिणामकारकता सुरुवातीपासूनच वादात सापडली होती. याउलट दक्षिण कोरियामध्ये मार्च २०२१ पासूनच लसीकरणाला अल्प प्रतिसाद होता. इतर देशांप्रमाणे येथील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले नाही. ऑक्टोबरपर्यंत केवळ ५० टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण झाले. ओमिक्रॉन हा लस न घेतलेल्या लोकांना जीवघेणा ठरू शकतो, हे माहिती असूनसुद्धा या देशांमध्ये तिसऱ्या तसेच बूस्टर डोसबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. चीन आणि कोरियामध्ये लस न घेतलेल्या किंवा केवळ एकच डोस घेतलेल्या वृद्धांना सर्वाधिक संसर्ग होताना दिसत आहे.
कोरियामधील ९५ टक्के मृत्यू हे लस न घेतलेल्या आणि वृद्ध लोकांचे आहेत. मूळ ओमिक्रॉनमध्ये बदल होऊन त्याचा B.A.2 हा नवा व्हेरियंट तयार होऊन तो चीन, कोरिया, हाँगकाँग किंवा व्हिएतमानममधील रुग्णवाढीला कारणीभूत असल्याचा दावा तेथील सरकारी यंत्रणांनी केला आहे. हा नवा व्हेरियंट मूळ व्हेरियंटपेक्षा सहापट अधिक वेगाने लोकांना संसर्गित करत असल्याचे चित्र आहे.
भारतासह इतर देशांवर काय परिणाम?
चीन, हाँगकाँग, द. कोरियातील वाढत्या संसर्गाचा फटका इतर देशांतील आरोग्यव्यवस्थेला न बसता अर्थव्यवस्थेला बसेल असा अंदाज आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे चीन आणि कोरिया हे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे मुख्य केंद्र आहेत. जागतिक ६० टक्के इलेक्ट्रॉनिक उपकरणे या देशातून येतात. त्यात मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यांचा समावेश होतो. लॉकडाऊनमुळे चीनच्या दक्षिणेकडील इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यांचे कामकाज ठप्प पडल्याने विविध उपकरणे महाग होण्याची शक्यता आहे. चीन, कोरियासह हाँगकाँग हे देश जहाजबांधणी आणि जलवाहतूक व्यवसायात अग्रेसर आहेत. कोरोनामुळे जगातील अनेक बंदरांवरील कामकाजावरही परिणाम झाला आहे. जहाजांचा प्रतीक्षा कालावधी १२ तासांनी वाढला आहे. केवळ चीनच नव्हे, तर युरोपमध्येही संसर्ग वाढलल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवर पुन्हा एकदा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताची नुकतीच सुरळीत झालेली युरोपीयन प्रवासी वाहतुकीवर पुन्हा परिणाम होऊ शकतो.
भारतामध्ये पुन्हा कोरोना येईल का?
सध्यातरी भारतात पुन्हा कोरोनाचा संसर्ग येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे भारतात ओमिक्रॉनची तिसरी लाट येऊन गेली आहे. तसेच जवळपास ७० टक्के नागरिकांचा पहिला, तर ५८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. बहुतांश भारतीयांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याने लसीकरण आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती असे दुहेरी कवच मिळाले आहे. सध्या चीन, कोरिया, युरोपात कोरोनाचा जो उद्रेक झाला आहे, तो ओमिक्रॉनचाच उपप्रकार आहे. त्यामुळे भारतात सध्यातरी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता फार कमी आहे.
भारतात काय उपाययोजना करता येतील?
लसीकरणाचा वेग पुन्हा वाढवणे महत्त्वाचे आहे.
दोन डोसमधील अंतर कमी करून अधिकाधिक लोकसंख्येला दोन्ही डोस देणे.
वयोवृद्ध, सहव्याधीग्रस्त आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा डोस देण्याचा वेग वाढवणे.
सध्या संसर्ग वाढलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर
आरटी-पीसीआर चाचणी करावी आणि किमान सात दिवसांचे गृहविलगीकरण सक्तीचे करावे.
(लेखक ऑक्सफर्ड विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.