भांडणांचे रंग

परिस्थितीमुळे त्रासलेली ‘बकी’ रात्री उशिरा एखाद्या इमारतीसमोर रस्त्यावर उभी राहून शिव्यांचा भडिमार करत असे.
Dispute
DisputeSakal
Updated on

परिस्थितीमुळे त्रासलेली ‘बकी’ रात्री उशिरा एखाद्या इमारतीसमोर रस्त्यावर उभी राहून शिव्यांचा भडिमार करत असे. ज्या घरी बकी काम करत असे, त्या घरमालकांनी पैसे दिले नाही किंवा त्रास दिला, तर त्या घरातील पुरुषांचाही ती उद्धार करत असे. सध्याच्या परिस्थितीत निराधार आरोप, संदर्भहीन टीका, खालच्या पातळीवरील शेरेबाजी करणारे लोक असेच ‘बकीच्या अवतारा’त शिरलेले दिसतात!

मी राहात होते त्या कॉलनी व आसपाचे शेजारी यातील वाद कधी भांडणांचे स्वरूप घेतील, याचा पत्ता लागत नसे. बसमधून परत येताना मुला-मुलींची मारामारी, त्यांच्या आयांना जाब विचारण्यापर्यंत येऊन पोचायचे. त्यातील काही उदाहरणे प्रातिनिधिक म्हणता येतील. या भांडणाची लहानपणी थोडी भीती वाटायची. काही वेळा मनोरंजनही होत असे.

कॉलनी चारमजली इमारतीची होती. घराघरात केर काढला जात असे. कचराकुंडी होती; तरीही दोन इमारतींच्या मधल्या रस्त्यावर कचरा टाकला जायचा. अंड्यांची टरफले, रात्रीचा उरलेला भात प्लास्टिकच्या पिशवीतून फेकला जायचा.

काही वेळा भिकारी व रस्त्यावरचे फिरते कुष्ठरोगी हे अन्न उचलून नेत असत. एखादवेळी दोन इमारतीच्या काटकोनातील चौकात या वस्तू पडत. एखाद्या वेळी त्या वाटसरूच्या पायावर, डोक्यावर पडत असत. मग भांडणे होत. परिणामी लहानपणीच ‘भ’वरून शिव्या माहिती झाल्या.

एक कामवाली बाई सकाळीच काही कारणाने शिव्या देत असे; पण ती रात्रीची भांडी घासण्यासही विविध घरात जात असे. विंदा करंदीकरांची कविता आहे, एका ‘बकी’ वरची, तशा वर्णनात हुबेहूब बसेल अशीच ती होती.

परिस्थितीमुळे बकी त्रासलेली, रागावलेली असे. ती गरीब होती, एकटी संसाराचा गाडा ओढत होती. एका मुलीची जबाबदारीही तिच्यावर होती. कष्टलेली, दमलेली बकी काही वेळा रात्री उशिरा दहा-साडेदहाला एखाद्या इमारतीच्या समोर रस्त्यावर उभी राहून कंबरेवर हात ठेवून शिव्यांचा भडिमार करत असे. हा प्रकार नीरव शांततेत अर्धा-पाऊण तास चाले.

ज्या घरी बकी काम करत असे, त्या घरमालकांनी पैसे दिले नाही किंवा तिला काम करताना त्रास दिला, तर त्या घरातील पुरुषांचाही ती उद्धार करत असे. कोणी तावातावाने एकतर्फी भांडण सुरू केले, की आम्ही घरात ‘त्या माणसाच्या अंगात बकी शिरली आहे’ असे म्हणतो! सध्याच्या परिस्थितीत निराधार आरोप, संदर्भहीन टीका, खालच्या पातळीवरील शेरेबाजी करणारे लोक असेच ‘बकी’च्या अवतारात शिरलेले दिसतात!

याखेरीज शेजारच्यांची भांडणेही आता मजेशीर वाटतात. त्या वेळी आमच्या एक खालच्या मजल्यावरील बाई अत्यंत चिडून आमच्या घरी आल्या. घरातून कोणीतरी छोट्या बालकाने कागदाचे कपटे वरून टाकले होते. ते त्यांच्या डोक्यावर पडले होते. बालकाच्या आईने त्यांची दिलगिरी व्यक्त केली; पण खुल्या गॅलरीत जाळी लावणे व कोणत्याही परिस्थितीत वरील मजल्यावरून चीजवस्तू न फेकणे हे नियम हळूहळू वसाहतीत जारी करण्यात आले व वसाहतीचे स्वरूपही बदलत गेले.

कॉलनीतील अशा वादांना अजून एक किनार होती. ती म्हणजे एकत्र कुटुंबे राहत असल्याने भाऊ-भाऊ वा भाऊ-बहिणी अशा लोकांची भांडणे वा मारहाणही उघड्या खिडक्यातून दिसत असत. घरांना पूर्ण पडदे लावायची पद्धत आजही ठराविक ठिकाणीच दिसते. मग लोक स्वतःच्या घरातील लाईट बंद करून इतरांची भांडणे पाहत असत!

आमच्या घरात दोन-तीन वर्षे सर्व मोठ्या लोकांना ब्रिज या पत्त्यांच्या डावाची फार आवड होती. त्यात ब्रिजमधील विविध नियम वा चुकीच्या पानांवरून प्रचंड मतभेद होत, तर काहींचे रक्तदाब वाढत होते. काही वेळा परस्परांसोबत काम करणाऱ्यांची भांडणे जुंपायची! काही वेळा तर आरडाओरडा ऐकून रस्त्यावरची माणसे भांडण पाहायला, ऐकायला थांबत असत.

शेजारी व आसपासच्या लोकांत एक व्यक्तिमत्त्व होते, त्यांचे टोपण नाव होते जमदग्नी. ते लेखक व संशोधक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची पत्नी साधी व गृहिणी होत्या. जमदग्नींच्या स्वभावामुळे की काय, पण त्या वहिनी फार कमी बोलत. कोकणातील स्त्रियांप्रमाणे ओचा बांधलेली नऊवारी साडी आणि अत्यंत मृदू, हसतमुख स्वभाव असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. शेजार-पाजारच्या मुला-मुलींत बॉलवरून, लगोरी खेळण्यावरून मुला-मुलांत भांडणे होत.

मग बायका-बायका जमून खेळ पाहता-पाहता मस्करीवरून कुस्करीवर येत. अशा वेळी श्री. जमदग्नी महिलांच्या वादात बाह्या सावरून उडी घेत! माझ्या बायकोस भांडण येत नाही, जे काही असेल ते माझ्याशी बोल! अशा राणा भीमदेवी थाटात ते महिलांच्या भांडणात बोलण्यासाठी सरसावत असत. त्यामुळे सर्वच महिला हसू लागायच्या, ‘तुझा नवरा इलो गे!’ म्हणून सौ. जमदग्नींना चिडवत.

त्याही खजील होत; पण श्री. जमदग्नींना त्याची पर्वा नव्हती. आताही समाजकारणात, राजकारणात काही महाभाग असे वागतात. फार थोड्या व्यक्ती पत्नीचे स्वातंत्र्य व आवडनिवड मान्य करतात; पण काही व्यक्ती अशा प्रकारे बायकांच्या लढाईत उडी घेऊन बायकोची कड घेऊन उभे राहतात, तेव्हा मी व माझी बहीण ‘जमदग्नी आले!’ असा कोडवर्ड वापरतो!

आम्ही लहानपणी बहुभाषिक - विविध सांस्कृतिक प्रवाहांच्या संमिश्र वातावरणात लहानाच्या मोठ्या झालो. बकी, जमदग्नीपासून ते गोरेगावच्या सीबा कॉलनीत गुजराती, केरळी, मद्रासी, बंगाली, ख्रिश्चन, मराठी सारस्वत अशा अनेक परिवारांशी मिळूनमिसळून राहिलो. मी व जेहलम मराठी शाळेत शिकलो; पण इतर परिवारही अगदी वैशिष्ट्यपूर्ण चौकोनी चेहऱ्याची कुटुंबे होती.

बहुतेक परदेशात नोकऱ्या करून मुलामुलींसह भारतात परतल्याने पाश्चात्त्य शिष्टाचार व इंग्रजीत प्रवीण होते. आम्ही हळुहळू त्यांच्यात मिळूनमिसळून जायचो. खूपशा नवीन गोष्टी, वागण्याच्या पद्धती कळत होत्या. १९६६ ते १९७० या चार वर्षांत गोरेगावात फुलांप्रमाणे आमचे किशोरवय सुगंधी झाले; तरीही ‘आहे मनोहर तरी, गमते उदास’ अशी जाणीव हुंकार होत गेली.

‘मार्मिक’ नुकताच सुरू झाला होता. शाळेच्या दप्तरातून आम्ही मार्मिकचा अंक आणून वाचू लागलो. मनात शिवसेनेचा अंकुर तेथेच बालवयात पेरला गेला होता!

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.