फिरूनी नवी जन्मेन मी?

व्यसनाधीनतेबरोबरच हुंडा, समाजातला दुजाभाव किंवा मुलगा न होणं अशा कारणांनी छळ होणाऱ्या विवाहितांची संख्या कमी नाही.
Married Women Torture
Married Women TortureSakal
Updated on

व्यसनाधीनतेबरोबरच हुंडा, समाजातला दुजाभाव किंवा मुलगा न होणं अशा कारणांनी छळ होणाऱ्या विवाहितांची संख्या कमी नाही. विश्वासाने ज्याच्याबरोबर आयुष्य काढण्याचा विचार केला त्याच माणसांनी घात केला, अशी अनेक उदाहरणं दिसतात. आम्ही महिला अत्याचारविरोधी मोहीम पुण्यात सुरू केली तेव्हा लक्षात आलं, की फक्त वैचारिक प्रबोधन पुरेसं नाही. मग आम्ही आमच्या कार्यपतीत बदल केला...

भारतीय समाजात विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः कुठल्याही लग्नात ‘काय गं, तुला तुझा नवरा कसा पाहिजे’ असा प्रश्न छोट्या-छोट्या मुलींनाही विचारला जातो. अनेक प्रकारचे साहित्य, कविता, नाटक, मालिका आणि चित्रपटांत नववधूची अनेक स्वप्नं आपल्याला रंगवलेली दिसून येतात. ‘नववधू प्रिया मी बावरते’सारखी गीतंही अगदी अजरामर झालेली आहेत.

अशा प्रकारे नवीन लग्न झाल्यावर येणारं नवं वर्ष, त्यातील सण आणि त्यातील उत्सव याचाही आज फार मोठा इव्हेंट झालेला आपल्याला दिसून येतो. पण असं जरी असलं तरी इतिहासाच्या काळात म्हटलं तर दडून गेलेल्या; पण प्रत्यक्षात त्यामधील वेदना आणि प्रश्न आजही जिवंत असल्याची खात्री वाटावी अशा अनेक घटना माझ्या आठवणीत आहेत.

त्यातीलच एक घटना मला आठवते, ती म्हणजे शैलाची कहाणी. पुणे किंवा मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव इत्यादींसारख्या शहरांमध्ये बहुतेक ठिकाणी समाजाचे काही कप्पे तयार झालेले असतात. उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांचा चाळकरी संस्कृतीचा, झोपडीवासीयांचा आणि सरकारी कॉलनीचा अशा विविध प्रकारच्या समाजांचे घटक वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहत असतात.

कुठे कोणत्या स्वरूपाचा गुन्हा घडलेला दिसू शकतो याबद्दलचेही समाजाचे ठोकताळे ठरलेले असतात. त्या काळात आणि आजही काही प्रमाणात गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी व्यसनाधीन झालेले पुरुष आणि त्यातून कुटुंबात होणारे वाद, असं चित्र नित्यनेमाचं मानलं जातं; परंतु व्यसनाधीनतेबरोबरच हुंडा, समाजातला दुजाभाव किंवा मुलगा न होणं अशा कारणांनी छळ होणाऱ्या स्त्रियांची संख्यासुद्धा कमी नाही.

शैलापासून सुरू झालेल्या गोष्टींमध्ये श्रद्धा, सरस्वती इत्यादींच्या केसचाही समावेश करता येईल. विश्वासाने ज्याच्याबरोबर आयुष्य काढण्याचा विचार केला त्याच माणसांनी तुमचा घात केला... अशी अनेक उदाहरणं दिसतात.

शैलाच्या कुटुंबाचं पुण्यामध्ये सेनापती बापट मार्गावर घर होतं. तिचं माहेर पंढरपूरचं होतं. इंजिनिअर असलेल्या मुलाशी तिचं लग्न झालं आणि त्यानंतर अर्थातच माहेरच्या सगळ्या मंडळींना वाटत होतं, की आता त्यांचा सुखी संसार सुरू झाला. अगदी आनंदी आनंद वाटावा अशी राजा-राणीची जोडी राहत असेल... परंतु, प्रत्यक्षात तसं घडायचं नव्हतं. अचानक एक दिवस शेजाऱ्यांना वरील मजल्यावर असणाऱ्या घरातून धूर येताना दिसू लागला.

आग लागली अशा शक्यतेने शेजारी धावत बघायला गेले तर शैला तिथे जळालेल्या अवस्थेत पडली होती. काही वेळातच ती मृत्युमुखी पडली. समाजातल्या पांढरपेशा समाजात एखादी सून अशा पद्धतीने जळून जाते आणि तेसुद्धा पुण्याच्या उच्चभ्रू भागात. खूपच अस्वस्थ करणारी घटना होती. सर्वत्र गोंधळ माजला. त्या वेळी मला आठवतं, की आमच्याकडे शैलाच्या माहेरची मंडळी भेटायला आली होती.

त्यांनी सांगितलं, की आम्हाला शैलाचा मृत्यू संशयास्पद वाटतो. आत्महत्या असण्याचा प्रश्नच नाही. तिची सासू तिला मारत होती. शिवीगाळ करायची, छळायची आणि त्याचबरोबर तिचा छळही सुरू होता. तिला गर्भवती राहण्यावरूनही कुटुंबामध्ये काहीतरी वादविवाद चालले होते. लग्नानंतर वर्ष-दीड वर्षात शैलाच्या सासरच्या मंडळींच्या वागण्याचा विचित्र नमुना तिच्या माहेरच्यांच्या लक्षात यायला लागलेला होता.

शैला सुशिक्षित मुलगी होती. बी. ए.पर्यंत शिकलेली होती. तिच्यासारख्या सुशिक्षित मुलीचा असा जळून मृत्यू झाला आणि सगळं पुणे शहर हादरून गेलं. अशा घटना आजदेखील घडतात. त्या मानाने जळालेल्या घटना शहरांमध्ये मध्यमवर्गामध्ये कमी झालेल्या दिसतात; परंतु त्या वेळेला अनेक ठिकाणी संशयास्पद मृत्यू म्हणता येईल, अशा घटना घडताना दिसत होत्या.

आम्ही शैलाच्या मृत्यूच्या निमित्ताने महिला अत्याचारविरोधी मोहीम पुण्यात सुरू केली. आम्हाला अनपेक्षित विरोध वेगवेगळ्या भागांमधून होण्यास सुरुवात झाली. तो विरोध असा होता, की जोपर्यंत समाजाच्या इतर घटकांच्या हिंसाचाराबद्दल आम्ही बोलत होतो, काम करत होतो आणि त्या महिलांना मदत करत होतो तोपर्यंत सगळेच आमचं कौतुक करत होते.

तुम्ही किती चांगलं काम करताय, असं म्हणणारा समाजच नंतर आम्हाला थेट काही प्रश्न विचारू लागला. तुम्ही एखाद्या समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहात ते चांगले आहे. ती त्या समाजाची आवश्यकताच आहे. मात्र, तुम्ही आमच्या समाजाबद्दल कसं काय सुधारणा करणार? आधीच आम्ही एवढे पुरोगामी आहोत. अशा वेळी आम्ही सुनांना चांगलेच वागवतो.

एखाद्या घटनेमध्ये एक मृत्यू झाला म्हणजे आमच्या सगळ्या समाजाची बदनामी होत नाही का? मला ते अनाकलनीय होतं! मला पटतच नव्हतं, की समाजातल्या एका व्यक्तीने असं कृत्य केलं म्हणजे संपूर्ण जातीची बदनामी होते. आम्ही त्यावर अगदी ठाम भूमिका घेतली, की जात, धर्म, उच्च, श्रीमंत आणि गरिबाच्या पलीकडे कौटुंबिक हिंसाचाराचा विषय आहे. त्यानंतर काही काळ केस कोर्टात चालली.

त्यांच्यासाठी अतिशय चांगले सरकारी वकील मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. सरकारी वकील मिळाले. दुर्दैवाने नवऱ्याची बाजू अतिशय प्रथितयश म्हणता येईल अशा प्रकारच्या एका उच्चविद्याविभूषित वकिलांनी घेतली. त्याबद्दलही अनेक प्रतिक्रिया सुरू होत्या. पुण्यातील वकिलांमध्येही गट दिसले.

आजही ज्या जिल्ह्यांत आणि गावांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडतात त्या पीडित महिलेच्या बाजूने मोठ्या प्रमाणात समाज उभा राहायला लागलेला आहे. पण दुसरीकडे असेही काही वकील असतात की ते जाणीवपूर्वक आरोपींची बाजू घेतात. त्यांचं म्हणणं असतं, की आरोपींचा तो अधिकार आहे. कायदेशीरदृष्ट्या ते योग्य आहे; परंतु दबाव आणला जातो.

माझ्या एक निदर्शनास आलं, की मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या चारित्र्याबद्दल काही बोललं जातं किंवा त्यावर आरोप करायचे असतात तेव्हा त्याची इंग्लिशमधली प्रत आरोपीच्या वकिलांकडून पोचवली जाते. त्याचे मराठीत भाषांतर करून नागरिकांमध्ये काही प्रश्न उभे झालेले आहेत, अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. जामिनाच्या वेळी त्या पुरवल्या जातात.

म्हणून मग मी असा विचार केला, की ‘तापलेला तवा असतो त्याच वेळी घाव घालायला हवा.’ मग आम्ही आमच्या कार्यपद्धतीत असा बदल केला, की केवळ वैचारिक प्रबोधन पुरेसं नाही. महिला अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा पीडितेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने कुठले पर्याय आहेत.

मग त्यात तक्रार व्यवस्थित नोंदवून घेणं, त्यानंतर चार्जशीट दाखल होत असताना सर्व आरोपींचा त्यात समावेश होणं, त्यासाठी चांगल्या प्रकारे साक्षीपुरावा समोर येणं, त्याचं जतन होणं, त्याचबरोबर साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार न्यायालयात त्यांनी उभं राहणं इत्यादींचा पाठपुरावा करायला लागलो. इतकंच नव्हे; तर आपल्या तपास अधिकाऱ्यांमध्ये सातत्य राहणं व न्यायालयात त्याचं प्रतिबिंब पडणं अशा सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक पायरीवर स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेने असं ठरवलं की सर्व घटनांपर्यंत पोहोचणं आम्हाला शक्य नव्हतं. काही घटनांमध्ये तरी यश प्राप्त केलंच पाहिजे. तसं केलं तरच पीडित महिला आणि सर्वसामान्यांचे खचलेले नीतिधैर्य वाढेल. परिणामी स्त्रियांचे धाडस अजून वाढून त्या तक्रार करण्यासाठी म्हणून उद्युक्त होतील.

अलीकडच्या काळात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पोलिसांच्या मदतीने १६ कारणं शोधली, की कशामुळे अशा प्रकरणांत अपयश येतं? त्या प्रत्येक कारणावर उपाययोजना कशी करायची याच्यावरही पोलिसांनी काम केलं. आजकालच्या परिस्थितीत असं घडत असलं तरी त्या वेळेला हुंडाबळीची घटना किंवा अशा संशयित मृत्यूची घटना सिद्ध करणं फार अवघड होतं.

त्याचं कारण आत्महत्यांना प्रवृत्त करणाऱ्याबाबत असलेल्या ‘३०४ ब’ कलमात बदल झालेला नव्हता. दुसरं महत्त्वाचं, जे कलम आलं ते म्हणजे लग्नानंतर सात वर्षांच्या आत स्त्रीचा मृत्यू झाला तर तो संशयास्पद मानून त्याचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जाईल. ‘४९८ अ’ व ‘३०४ ब’चे अशा प्रकारचे कायदे बदल १९९१ च्या सुमाराला झाले.

त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं, की हुंडाबळीच्या आणि आत्महत्येच्या घटकांमध्ये संपूर्णपणे सासरची मंडळी निर्दोष सुटत होती त्यांच्यावर कायद्यात बंधन आलं. त्याचा अजून एक वेगळा परिणाम झाला की, आपण शोकांतिका म्हणू शकतो; पण अनेकदा वयोवृद्ध सासू-सासऱ्यांचा संबंधित घटनेशी संबंध असो किंवा नसो त्यांची नावंही गोवली जायला लागली.

त्यामुळे एकदा तुरुंगात भेट दिल्यावर लक्षात आलं, की खूप वृद्ध महिला तिथे शिक्षा भोगत होत्या. जी महिला सोन्याच्या मागे हात धुऊन लागली होती ती आपल्याला कारागृहामध्ये अत्यंत केविलवाण्या अवस्थेत दिसली; परंतु हा सगळा नंतरचा पश्चात्ताप आहे की आपल्या न्याययंत्रणेमधील काही प्रश्न आहेत, हे मात्र तपासून बघणं शक्य होत नाही.

जिवंत असताना स्त्रीला योग्य तो न्याय मिळाला तर त्यांची शैलासारखी परिस्थिती होणार नाही, असं आजही जाणीवपूर्वक वाटतं. चित्रपटांत बळी जाणारी सून ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ असं म्हणते. ‘पुढचा जन्म नाही, तर याच जन्मात न्याय’ अशी घोषणा आम्ही दिली. ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ एवढंच पुरेसे नाही. ‘दिल्या घरी सुरक्षित राहा. छळ झाला तर तुम्ही-आम्ही आहोतच’ असं पालकांना समजवायला लागलो.

सासरच्यांना नवीन सून मिळेल, जावयाला नवी बायको मिळेल; पण आपल्या मुलीवर नांदायची सक्ती करून तुम्ही ती गमावलीत तर पुन्हा मिळणार नाही, असं आमचं सांगणं होतं. ते पालकांना पटायला लागलं. मुलीला आहे त्याच परिस्थितीत समजावण्याची जबरदस्ती न करता तिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि निर्भय वैवाहिक जीवन असावं आणि ते घडवायलाच हवं. ते शक्य नसल्यास तिला पर्यायी जगण्याचा अधिकार आहे आणि त्यावर जनजागृतीची गरज आजही जाणवते.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.