समानतेच्या पाऊलवाटा....

उदगीरमध्ये वैद्यकीय सेवा करताना स्त्रियांचे आजार, बाईला मारहाणीपर्यंतच्या मुद्यांच्या माध्यमाने समाजाच्या वास्तवाची जाणीव व्हायला लागली.
Doctor Service
Doctor ServiceSakal
Updated on

उदगीरमध्ये वैद्यकीय सेवा करताना स्त्रियांचे आजार, बाईला मारहाणीपर्यंतच्या मुद्यांच्या माध्यमाने समाजाच्या वास्तवाची जाणीव व्हायला लागली. युवक क्रांती दलाचे काम करत असतानाच स्त्रियांच्या प्रश्नावर शब्द आणि कृतीमध्ये किती अंतर आहे, हे कळले. स्त्रियांच्या प्रश्नावर अधिक सजगतेने, प्रखरपणाने, आक्रमकपणाने काम केलं पाहिजे, याबद्दल माझ्या मनामध्ये जाणीव होत गेली. स्त्रियांच्या समानतेकडच्या प्रवासाची बीजं माझ्या मनामध्ये रोवली गेली.

उदगीर हा लातूर जिल्ह्याचा भाग होता. उदगीर आणि धाराशिव, उदगीर आणि नांदेड अशा प्रकारच्या आसपासच्या जिल्ह्यातील नातेगोत्याचे, बाजारपेठेचे संबंध होते. उदगीरपलीकडे बिदरपासून कर्नाटक राज्य सुरू होते. त्यामुळे बिदरमधला कानडी भाषेचा प्रभावसुद्धा होता. जसजशी मी उदगीरमध्ये रुळत गेले आणि काही दिवसांतच आम्हाला म्हणजे मला आणि आनंदला तिथल्या भाषेतली वैशिष्ट्ये वेगळ्या प्रकारची वाटू लागली.

ती पूर्वी ऐकलेली होती; परंतु ‘काय को’, ‘चल बे’ असा हैदराबादी भाषेचा खूप पगडा होता. ‘ते रे को क्या करने का है’, मटणमध्ये जो रस्सा असतो ती ‘तऽररी'', जी मुले काम करत नाहीत त्याला ‘ब्याकार’, ‘गैरी’, ‘नळ दुखतात’ म्हणजे पोट दुखतंय असे अनेक शब्द प्रचलित होते.

भाषा व शब्दांबरोबर काही खाद्यपदार्थांची वैशिष्ट्य मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात दिसून येतात. कोणताही सणवार असला की पुरणपोळी ठरलेली असते. दर काही वर्षांनी जो अधिक महिना येतो, त्याला मराठवाड्यात ‘धोंड्यांचा महिना’ म्हणतात. त्यामुळे प्रत्येक घराघरांमध्ये पुरण हे शिजलेले असते.

आम्ही ज्या घरात राहत होतो ते अण्णा निटुरे यांचे चार-पाच खोल्यांचे मोठे घर होते. आम्ही जुने घर बदलून या नव्या प्रशस्त घरात राहायला आलो होतो. शेजारी मालक निटुरे आणि अर्ध्या बाजूचा बंगला आमच्याकडे अशी घराची विभागणी होती. मागच्या बाजूचा नळ आणि पुढचे अंगण हे दोघांना जवळपास सारखे होते.

पायऱ्यांच्या पलीकडे जे आहे, ते अंगण फारसे नव्हते; पण थोडीफार जागा होती. पाण्याची खूप टंचाई उदगीरला होती. त्यामुळे सकाळी पाच-साडेपाचला घराच्या मागच्या बाजूला जे नळ होते तिथे बायका रात्रीच घागरी लावून ठेवत असत. पहिला पाण्याचा थेंब ऐकू आला की, आमच्या घरी असणारी रझियाची आई ‘रझिया उठ बे’ अशी आवाज द्यायची.

आईचा आवाज येताच रझिया ‘उठ गई अम्मी’ म्हणायची. ती मुलगी धावत धावत येऊन सकाळीच पाणी भरायची. खूप हुशार आणि तरतरीत होती ती! ती मदरशात शिकत असे. आजही मराठवाड्यात हंडेच्या हंडे भरून घरातील पिपात पाणी भरून ठेवतात.

उदगीरची संपूर्ण रचना जशी छोट्या गावांमध्ये अनेक ठिकाणी असते, तशीच जातनिहाय विभागली गेलेली होती. माझ्या प्रॅक्टिसमध्येसुद्धा रुग्ण येत असत, त्यांच्यात मुस्लिम समाजाच्या महिला होत्या, तशाच लिंगायत, कोमटी, मराठा अशा सर्व समाजाच्या महिला येत. त्याचबरोबर रेड्डी एक जात होती. त्यांच्या त्यांच्या कुटुंबामध्ये जे प्रश्न होते तसतसे मी त्यातले आरोग्यविषयक प्रश्न पाहत गेले. मला त्या सगळ्या सामाजिक जीवनाशी नाते कसे जोडले आहे, हे कळत गेले.

मी व्हिजीटला जात असे; परंतु तू डॉक्टर असल्यामुळे घरी व्हिजीटला जाऊ नकोस, असे मला अनेक जण सांगायचे. मी काही फारसे त्यांच्याकडे लक्ष न देता जात असे. एकदा रात्री मला व्हिजीटला लोक बोलवायला आले. आनंद नेमका बाहेर गेलेला होता. काय करावे, असा विचार करत होते. कलावती समोरच डॉ. मुंगीकारांकडे मदतीला येत असे. त्यांच्याकडे काही वेळेला राहिलेलीही असे. मी तिला हाक मारली. ती ‘येते’ म्हणाली.

आम्ही दोघी त्यांनी आणलेल्या एका सायकल रिक्षाने अगदी खेड्यात नाही म्हणता येत; परंतु उदगीरला लागून असलेल्या निर्जन वस्तीमध्ये आम्हाला घेऊन गेले. लाईट नव्हती. वस्तीतील छोटी घरं होती. एका घरात बॅटरीने पाहिलं, तेव्हा एक बाई रडताना दिसली. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. मी त्यांना म्हटलं हॉस्पिटलला नेलेलं बरं पडेल; परंतु ते अगदी अल्पशिक्षित, घाबरलेले लोक होते. त्या बाईला नवऱ्याने मारहाण केली होती. नवराही प्रचंड घाबरला होता.

तिच्या डोक्याला लाकडाने मारले होते. तिची कवटी फुटलेली किंवा चीर पडली आहे का, याचा अंदाज घेतला. मी त्यांना सांगितले की, आता नाही तर सकाळी लवकरात लवकर हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करणे आवश्यक आहे. तिला तसेच जखमी अवस्थेत सोडणे योग्य नव्हते. इथे माझे शल्य शालाक्य व प्रसंगावधान कामी आले.

जखमेवरचे केस कापून मी तिला स्थानिक ॲनेस्थिया दिला. दोन टाके घातले. रक्त जायचे ताबडतोब थांबले. टीटीचे इंजेक्शन दिले, वेदनाशामक गोळ्या दिल्या. सकाळी तिला हॉस्पिटला घेऊन या, शक्य असल्यास पोलिसांत जा, असे सांगून आम्ही निघालो.

आमचे सगळे शेजारी म्हणायला लागले की, कशाला तुम्ही रात्रीच्या वेळेला गेल्या? याच्यापुढे रात्रीच्या वेळेला जाऊ नका. मला मात्र तो सर्व विस्मरणजनक अनुभव वाटला होता. दुसऱ्या दिवशीच ते पेशंट आले. त्यावेळेला ते नवरा-बायकोही काहीच झालं नाही, अशा थाटात आले होते. तिला डॉ. गुडसूरकर यांच्या सर्जिकल हॉस्पिटलला पाठवले. त्यांनी परत तपासून घेतलं.

तपासण्या केल्या आणि फार काही गंभीर जखमी नाही, अशा पद्धतीचे त्यांनी निदान केले. नंतर ती पेशंट बरी झाली. त्यांच्या वस्तीतील लोक मुलांना घेऊन माझ्याकडे येत असत. एक मुद्दा लक्षात आला की, असे कौटुंबिक हिंसाचाराचे जे विषय असतात, ते पोलिसांसमोर किती जातात, हा प्रश्‍न आजसुद्धा पडतो.

पोलिसांसमोर गेल्यावरसुद्धा काय मार्ग काढायचा, तोही शेवटी त्या कुटुंबाच्याच हातामध्ये असतो. विशेषतः स्त्रीला अशा परिस्थितीमध्ये एक समझोता करणे भाग पडते, याचासुद्धा एक अत्यंत दारुण आणि ज्वलंत अनुभव मिळाला.

उदगीरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनामध्ये हळदी-कुंकवाला फार महत्त्व होतं. प्रत्येक गल्लीचे हळदी-कुंकू वेगळे असायचे. त्यामध्ये आमच्या आणि तुमच्या असा फरक असायचा. म्हणजे त्या-त्या जातीतल्या बायकांना बोलवायचे असे असायचे.

जे प्रतिष्ठित मानले जाणारे लोक असतात, म्हणजे आता आम्ही डॉक्टर असल्यामुळे प्रतिष्ठित. डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, सरकारी अधिकारी असतील आणि अशा घरातल्या लोकांच्या पत्नींना सर्वत्र आमंत्रण असायचे. सुरुवातीला मला तर प्रश्न पडला की, मी फारशी मंगळसूत्र घालत नव्हते. कधीतरी घातलं तर घालायचे आणि अशा वेळेला हळदी-कुंकवाला जाणे कितपत योग्य, हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता.

मी विचार केला की, त्यानिमित्ताने भेटी होतील आणि आपण यांच्यामध्ये मिसळायला काय हरकत आहे. तिथली एक मैत्रीण आमच्यासारखीच पुरोगामी विचारांची होती. ती म्हणाली, मी हळदी-कुंकवाला जाणार नाही व ती जात नसे. मी मात्र जायला लागले. प्रत्येक गल्लीमध्ये मला लोकांनी प्रेम दिलं. डॉक्टर बाई असून हळदी-कुंकवाला आलात, त्याचे त्यांना प्रचंड अप्रुप होते.

आजकालच्या काळात ते एक लोकसंपर्काचेसुद्धा माध्यम झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या घराघरांमध्ये त्यांच्या ज्या गप्पा चालत होत्या, त्यामधून मला आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव व्हायला लागली. बाईला मासिक पाळी येणे लपवण्यासारखे नाही; पण त्याचे प्रदर्शन होता कामा नये, याची जाणीव त्या वेळी नव्हती.

बऱ्याच घरामध्ये एखादी बाई लांब कोपऱ्यात बसलेली असायची. तेव्हा ओळखून घ्यायचे की घरातल्या सुनेची मासिक पाळी आलेली आहे. ती बसल्या बसल्या करायची कामे करत आहे आणि त्याच्यावर पाणी टाकून ते करून घेत आहे.

मुस्लिम समाजातील बहुपत्निकत्व फार ढळढळीतपणाने माझ्यासमोर आलं. त्याचबरोबर स्त्रियांचे आजार, बाईला मारहाणीपर्यंतच्या मुद्द्यांच्या माध्यमाने समाजाच्या वास्तवाची जाणीव व्हायला लागली. युवक क्रांती दलाचे काम करत असतानाच स्त्रियांच्या प्रश्नावर शब्द आणि कृतीमध्ये किती अंतर आहे, हे कळले.

स्त्रियांच्या प्रश्नावर अधिक सजगतेने, अधिक जोरदारपणाने, अधिक प्रखरपणाने, अधिक आक्रमकपणाने काम केलं पाहिजे, याबद्दलचा माझ्या मनामध्ये हळूहळू निर्णय होत गेला. एका अर्थाने आरोग्यातून आणि महिलांवर होणाऱ्या हिंसाचारातून स्त्रियांच्या समानतेकडच्या प्रवासाची बीजं माझ्या मनामध्ये रोवली गेली होती.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.