वैद्यकीय शिक्षणानंतर चांगले प्रशिक्षण पोदार इस्पितळात मिळाले. वर्ष-दीड वर्ष झाल्यावर मी खासगी कामाचा अनुभव घ्यावा, म्हणून एका दवाखान्यात मदतनीस डॉक्टर म्हणूनही काम केले. या काळातच माझा विवाह आनंद करंदीकरशी झाला. आम्ही दोघांनीही ग्रामीण महाराष्ट्रातील अनुभव घ्यायचे ठरवले.
मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर हे समाजवादी चळवळीचे केंद्र होते. तेथे मी दवाखाना सुरू केला व आनंद नोकरी सोडून उदगीरला युक्रांदचा पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून रुजू झाला. माझा वरळी ते उदगीर प्रवास असा सुरू झाला!
सरकारी रुग्णालयांतील काम किती अवघड आहे, हे आपण आजही पाहत आहोत. निधीची कमतरता, प्रशिक्षित मनुष्यबळाची तोकडी संख्या, रुग्णांचा दुप्पट-तिप्पट रेटा या सर्वांतूनही डॉक्टर्स, सिस्टर्स, तसेच पॅरा मेडिकल स्टाफ त्यातही चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असतात. याचे मला चांगले प्रशिक्षण पोदार इस्पितळात मिळाले.
वर्ष-दीड वर्ष झाल्यावर मी खाजगी कामाचा अनुभव घ्यावा, असा विचार करत होते. त्यावेळी वरळीच्या बीडीडी चाळीतील एका ज्येष्ठ डॅाक्टरांच्या दवाखान्यात मदतनीस डॉक्टरचे काम करशील का, अशी मला विचारणा झाली. मी जाऊन त्या डॉ. राव (टोपण नाव) यांचा दवाखाना पाहिला.
गिरणगावातील कामगार वर्ग, मनपाचे सफाई कामगार, घरकामगार महिला, कोळी समाजातील महिला यांची प्रचंड गर्दी तिथे असे. सकाळी ९.३० ते २ व संध्याकाळी ६ ते ९-९.३० त्यांची दवाखान्याची वेळ होती. टीबी, जुनाट खोकला, दमा, पक्षाघात अशा रुग्णांची गर्दी. शंभर-दीडशे रुग्ण सकाळी व संध्याकाळी असत.
डॉ. राव यांनी महिना-दीड महिना माझे काम पाहिले व मला नेहमीचे पेशंट सोपवायला सुरुवात केली. मी प्राथमिक तपासणी केल्यावर इतर बारीक लक्षणेही ते समजून घेत. प्रत्येक रुग्णाचा आडनावानुसार क्रमांक टाकून केसपेपर असे. मोठमोठ्या आजारांवरील ठरलेली औषधे मी विचारून लिहायची, तसेच पेशंटला औषधांबद्दल शंका असेल तर त्यांना समजवायचे काम ते करत.
औषध बदलले तर दोन औषधांतील फरक ते परत समजावत. आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक औषध दोन्हीचा ते उपयोग करत. टीबीची औषधे संपली की रुग्ण मग सारखे येत नसत. कामगार वस्तीतील हे टीबीचे रुग्ण पाहून अस्वस्थ वाटायचे. सरकारी मोफत इस्पितळापेक्षा खाजगी डॉक्टर आपल्याला ओळखून मग औषध देतात, हे रुग्णांना आवडत असे. दवाबाजारातील घाऊक औषधांच्या दुकानात ते व कंपाऊंडर जात तेव्हा मलाही या म्हणायचे. या आठ-नऊ महिन्यांत माझा आत्मविश्वास वाढला.
एकदा तर डॉ. राव त्यांच्या गावी जाणार होते. तेव्हा त्यांच्याऐवजी त्यांनी बदली डॉक्टर बोलवायचे ठरवले. ज्या डॉक्टर येणार होत्या, त्यांचे नाव कळले तर ती माझी क्लासमेटच निघाली. मग डॉ. राव म्हणाले की, तुम्हीच काम करा. संध्याकाळी एक त्यांचे डॉक्टर मित्र मला काही अडचण नाही ना, विचारून जात. १५ दिवसांनी डॅाक्टर परत आल्यावरही त्यांचे रुग्ण टिकून राहिले.
या काळात मी युक्रांदचे काम फक्त सुटीत करत असे. विशेष म्हणजे या काळात माझा विवाह ठरला होता. आनंद करंदीकर या आयआयटीत इंजिनिअर व कलकत्ता येथून पीजीडीएम ही एमबीएप्रमाणे पदवी घेतलेल्या तरुणाशी माझी युक्रांदमध्ये ओळख झाली. सुविख्यात कवीश्रेष्ठ विंदा करंदीकर व सुमाताई करंदीकर यांचा आनंद हा मोठा मुलगा होता. आनंद एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होता.
आम्हा दोघांची मैत्री झाली व लवकरच त्याचे प्रेमात रूपांतर झाले. विवाह कधी करावा, यापेक्षा आनंदला तर लग्न संस्थेबद्दलच आक्षेप होते; परंतु मला काही ते पटत नव्हते. परिणामी गोऱ्हे, करंदीकर हीच कुटुंबे व मोजके युक्रांदीय यांच्या उपस्थितीत आम्ही नोंदणी पद्घतीने विवाहबद्ध झालो. २५-३० जणांना फक्त आईस्क्रीम व फक्त ३५ जणांना जेवण असा आमचा लग्न सोहळा होता. देवाण-घेवाण, याद्या वगैरे काही नव्हत्या, याचा मला फार अभिमान आजही वाटतो. आम्ही काळाच्या फार पुढे होतो!
माझ्या मेडिकल व्यवसायावर लग्नाचा मोठा परिणाम झाला. लवकरात लवकर युक्रांदचा पूर्ण वेळ कार्यकर्ता व्हायला आनंदची नोकरीचा राजीनामा द्यायची इच्छा होती. एक-दोन वर्षांत माझे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा दोन्हीकडच्या आई-बाबांना बरे वाटले. माझे शिक्षण अर्धवटच राहते की काय, अशी काळजी माझे सासरे विंदा करंदीकर यांना वाटत असे.
आनंदने नोकरीचा राजीनामा देणे म्हणजे मला घर चालवायला लागेल व त्यासाठी दवाखाना व्यवस्थित चालवणे गरजेचे होते. मी त्या दृष्टीने अनुभव घेत होते; परंतु मी त्याचवेळी आनंदला स्पष्ट केले होते की, मी आयुष्यभर नोकरी करून माझे राजकीय, सामाजिक काम सोडून द्यायचे योग्य वाटत नाही. काही वर्षे तुझे काम कसे होतेय पाहू; पण काही वर्षांनी मलाही काम करायचे आहे, तर तुही संसारासाठी नियमित पैसे मिळवायला हवेत.
या सर्व विचारांती आम्ही ग्रामीण महाराष्ट्रातील अनुभव घ्यायचा ठरवला. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर हे समाजवादी चळवळीचे केंद्र होते. तेथे मी दवाखाना चालवायचा निर्णय घेतला व आनंद नोकरी सोडून उदगीरला युक्रांदचा पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून रुजू झाला. माझा वरळी ते उदगीर प्रवास असा सुरू झाला!
neeilsmgorhe@gmail.com
(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.