महिला क्रांतीच्या वाटेवर...

पुण्याला आम्ही मुक्काम हलवल्यावर मराठवाड्यात ऋणानुबंध संपूर्ण संपले होते, असं नाही. उदगीरला सातत्याने आम्ही यावे असं म्हणणारे खूप लोक होते.
Womens
WomensSakal
Updated on

पुण्याला आम्ही मुक्काम हलवल्यावर मराठवाड्यात ऋणानुबंध संपूर्ण संपले होते, असं नाही. उदगीरला सातत्याने आम्ही यावे असं म्हणणारे खूप लोक होते. त्या वेळेस बीड तसेच लातूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, परभणी अशा भागातील कार्यकर्तेसुा संपर्कात होते. पुण्यामध्ये आल्यावरही मी मनाने मराठवाड्याशी जोडलेले असतानाच हडपसरमधील आरोग्यविषयक कामातून स्त्री मुक्ती चळवळीच्या कामासंदर्भात एक महामार्ग मला सापडला, त्याची गोष्ट...

दोन ते तीन महिने मी घरातच थांबले व स्थिरस्थावर होत होते. त्यानंतर पुण्यामधल्या विविध सामाजिक संघटनांशी संवाद वाढायला लागला. विविध प्रकारचे चार-पाच फोरम होते, त्यांच्याशी मी जोडली जाऊ लागली. कष्टकऱ्यांच्या चळवळीचे काम करणारे नेते डॉ. बाबा आढाव यांची विषमता निर्मूलन समिती, कष्टाची भाकर तसेच विविध हमालांच्या संघटना या माध्यमातून ते काम करत होते.

डॉ. बाबा आढाव यांच्याबरोबर डॉ. अनिल अवचट, डॉ. सुनंदा अवचट आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये काम करणारा कार्यकर्त्यांचा मोठा संच होता. याखेरीज युक्रांदचे अरुण लिमये, डॉ. कुमार सप्तर्षी हे समाजवादी चळवळीचे नेतेही पुण्यातच होते. राष्ट्र सेवा दलाचे अस्तित्वसुद्धा बऱ्यापैकी मोठं होतं. याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय, साहित्यिक, सांस्कृतिक, पत्रकारिता यांच्याबरोबर स्त्रियांच्या चळवळीसुद्धा होत्या.

स्त्रियांच्या चळवळीतील महिला संघटनांची मिळून एक एकत्र अशी ‘स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती’ म्हणून कार्यरत होती. आजही त्या समितीचं अस्तित्व आहे. त्याखेरीज उजव्या विचारांच्या म्हणता येतील अशा संघटना आणि त्यांचंसुद्धा बऱ्यापैकी कार्य होतं. त्यांच्याशी खूप संवाद जरी नसला तरी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि इतर क्षेत्रातले विशिष्ट शिक्षण क्षेत्रातले जे मान्यवर होते, त्या अनेकांशी आमचा परिचय होता.

काहीजण ओळखत होते, काहीजण भेटत होते. याचबरोबर आंबेडकरी चळवळीचं मोठं नेटवर्क होतं. दलित पॅंथरही पुण्यात खूप सक्रिय होती. पॅंथरचं काम करणारे कार्यकर्तेही चांगले परिचित होते. त्यांच्या आमच्यासोबत बऱ्याच व्यासपीठावर भेटीगाठी चालू होत्या.

या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मी आले आणि ताबडतोब युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते भेटायला लागले, बोलायला लागले. यावेळेला अजित सरदार, वसुधा सरदार, प्रेमा गोरे, अंजली कुलकर्णी, अनिल गायकवाड, अश्विनी मार्कंड आणि श्री. मार्कंड, तिलोत्तमा देशपांडे असे मोजकेच असले तरी त्या सर्व कार्यकर्त्यांना मी ओळखत होते. त्यांनी मला त्या बैठकांना बोलावणं किंवा कार्यक्रमाची रूपरेषा सांगणं सुरू केलं.

हे करत असताना माझी प्रचंड दोलायमान अवस्था तयार झाली की, नक्की आपण आता परत कामाची सुरुवात करायची झाली तर कशी करायची? आपण सामाजिक, राजकीय संघटनेत काम करायचं की महिलांच्या प्रश्नांवरती कामाला सुरुवात करायची? वाचन कायम चालूच होते; परंतु फेमिनिस्ट मुव्हमेंटच्या ज्या अनेक लेखिका आहेत, त्यांची पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली.

त्याच्यामध्ये केट मिलेट, बेटी फ्रिडन, बीना अग्रवाल, वीणा मुजुमदार, नीरा देसाई, मैत्रियी कृष्णराज, डॉ. देवकी जैन यांच्यासारख्या आधुनिक स्त्री अभ्यासक होत्या. त्याचप्रमाणे तवलीन सिंग, मधु किश्वर, ऊर्वशी बुटालिया अशा पत्रकारितेतून काम करत वेगळ्या प्रकारचं लिखाण करणाऱ्यांच्या लिखाणाबाबत गंभीर अकॅडमिक चर्चा आमची सुरू झाली. वाचनही सुरू झालं.

त्याखेरीज सोशालिस्ट, मार्क्सवादी किंवा समाजाच्या विविध प्रवाहांमध्ये स्त्रियांचे काय काम आहे, याबद्दलच्या वेगळ्याच कामाची मला ओळख झाली. ते काम मी जवळजवळ १९८०-८१ पासून ते १९८५ पर्यंत करत होते, भारत अर्थ विद्या वर्धिनीचे संचालक म्हणून डॉ. वि. म. दांडेकर हे काम करत होते. ही अशी संस्था होती आणि संशोधन काम करताना त्यांनी प्रकल्पही घेतला होता.

त्यात शैला कोनलाडे, डॉ. विद्युत भागवत आणि अन्य काही त्यांच्या अभ्यासक सहभागी होत्या. त्यांनी मला खूप प्रेमाने त्या कामांमध्ये निमंत्रित केलं. सामाजिक कार्यकर्ती म्हणून समाविष्ट केले. शिबारार्थी म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेतून महिलांची माहिती मागवून मग त्यांना निवडलेले होते. दर महिन्यात ४० महिलांची तीन दिवसांची अशी निवासी शिबिरं असत.

महिला संघटन कसं करता येईल, महिला संघटना कशासाठी? या विषयावर बोलायला मला निमंत्रण येत असे. महिलांच्या अनुभवकथनातून जिल्हावार महिलांची मानसिकता व प्रश्नांचे वेगळेपण माझ्या लक्षात आले.

एक मोठी घटना त्या काळामध्ये गाजली ते म्हणजे मथुरा बलात्कार प्रकरण. घटना अशी होती की, नागपूरच्या वडसा देसाईगंज या भागामध्ये एक आदिवासी महिला पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेली. प्रत्यक्षात तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्यावरती बलात्कार केला होता. ही केस कोर्टात उभी राहिली आणि कोर्टात उभे राहिल्यावर मात्र नंतर काही पुराव्यांअभावी आरोपींना शिक्षा तर झाली नाही. आरोपींना निर्दोष सोडून देण्यात आले. उलटपक्षी महिलेबद्दलच वेगळी चर्चा सुरू झाली.

भारतभर स्त्रियांचे मोठे आंदोलन उभे राहिले. पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्येसुद्धा १९८० च्या सुमाराला मोठी ‘स्त्री अत्याचार विरोधी परिषद’ झाली. त्यात मी एका चर्चेमध्ये उपस्थित होते. मी दोन वर्षांच्या अंतरानंतर पहिल्यांदा स्त्री चळवळीतील महिला कार्यकर्त्यांना भेटले. मुंबईमध्ये माझ्या ओळखीच्या सर्व जणी होत्या. त्यात छाया दातार, पुष्पा भावे, सुधा वर्दे, सुधा कुलकर्णी, नीरा आडारकर, मीना देवल, नंदिता गांधी, नंदिता शहा, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, सुजाता खांडेकर आदींसोबत मुंबईच्या चळवळीत होते.

पुण्यात आल्यावर मात्र पुण्यातल्या कार्यकर्त्यांशी माझा परिचय झाला. सगळे परत भेटल्यावर मला वाटायला लागलं की क्रांतिकारी महिला संघटना किंवा एक सामाजिक संघटना सुरू करायला हवी.

मी तोपर्यंत उदगीरच्या दवाखान्याचे सगळं सामान हलवून पुण्यामध्ये आणलेलं होतं. पुण्यामध्ये हडपसरच्या जवळ दवाखान्यासाठी जागा मिळाली. विशेष म्हणजे त्या काळामध्येसुद्धा असे विश्वास टाकणारे लोक होते, तसा विश्वास पात्र ठरवणारेही मान्यवर होते. त्याच्यामध्ये मणिभाई देसाई यांनी माझे वडील डॉ. दिवाकर गोऱ्हे यांना असं सुचवलं की, ‘नीलमला तीनपैकी एक जागा दवाखान्यासाठी चालू शकेल. त्यात एक जागा हडपसर असेल.

दुसरी उरळी कांचन जवळपास आणि तिसरी जागा हडपसर गावभागातच असल्याने तिथेही काम करता येईल. हडपसरमध्ये तिला कधी कुठला त्रास होणार नाही, हडपसर हे अतिशय एक सहकार्य देणारं गाव आहे,’’ असं त्यांनी सांगितलं.

हडपसरला एक आणि तिथेच पलीकडे सातववाडी हा ग्रामीण भाग आहे, तिथे एक असे दोन भाग दवाखान्यासाठी निवडले. सातववाडी या ठिकाणी छोट्या-छोट्या चाळीमध्ये राहणारे परिवहन, महापालिकेमध्ये काम करणारे असे विविध कर्मचारी होते.

सातववाडीला व हडपसरला मी दवाखाने सुरू केले व त्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांशी बोलायला लागले. तसे हळूहळू लक्षात आले की, यांना आरोग्यातून हिंसाचाराचा प्रश्न जाणवतो आहे. हिंसाचाराच्या प्रश्नांमधून मदत करणाऱ्या महिला मंडळाच्या पलीकडे नवमार्गाने समाजात विधायक किंवा संघर्षाचे काम करणाऱ्या संघटनांची गरज आहे.

स्त्रिया पेशंट म्हणून येऊ लागल्या, त्या सांगायला लागल्या की आम्हाला घराबाहेर पडण्यासाठी एखादे व्यासपीठ पाहिजे आहे. तीच परिवर्तनाची ठिणगी पडली, असं मी म्हणू शकेन. मला एक प्रचिती झाली की, आपण एक महिलांचे संघटन सुरू केलं पाहिजे. माझ्यासोबत ज्या महिला आल्या, त्यांनी तिला क्रांतिकारी महिला संघटना नाव दिलं.

त्यामधूनच कालांतराने उभं राहिलं त्या संस्थेचं नाव आहे ‘स्त्री आधार केंद्र’. या हडपसरमधील आरोग्यविषयक कामातून स्त्री मुक्ती चळवळीच्या कामासंदर्भात एक महामार्ग मला सापडला.

(लेखिका महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा पुण्यातील ‘स्त्री आधार केंद्रा’च्या मानद अध्यक्ष आहेत.)

neeilmagorhe@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.