पुण्यात असताना सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीने मी समृद्ध झाले. कामाची दिशा ठरवताना प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या चळवळीशी जोडून घेणे योग्य राहील, या मतापर्यंत आले. आज इतकी वर्षे झाली, तरी महिलांविषयक समाज सुधारणा, सामाजिक न्यायाबद्दलच्या प्रबोधनाच्या भूमिकेतून मी काम करत आहे. अनेक चढ-उतार झाले, अनेक स्थित्यंतरे झाली; परंतु राजकीय पक्षाच्या भूमिकेपेक्षा ज्या सामाजिक प्रश्नांवर मी काम करत होते, त्यातला सलगतेचा धागा तुटू दिला नाही. प्रबोधनाच्या वटवृक्षाचा आधार मिळाला...
पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, असे अनौपचारिकरीत्या म्हणायला काहीच हरकत नाही. हडपसरला जेव्हा मी माझ्या दवाखान्यांना सुरुवात केली, त्यावेळेला तिथली परिस्थिती अर्धशहरी आणि अर्ध ग्रामीण अशी होती. हडपसर हे पुणे शहरातील प्रवेश केंद्र आणि त्याचबरोबर भाजी मंडईसाठीही प्रख्यात होते.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्या जशा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत जायच्या, तशाच हडपसरच्या मंडईची भाजी जवळपासच्या ३०-४० गावांमधून यायची आणि अनेक ठिकाणी जाणारे व्यापारी तिथूनसुद्धा भाज्यांचे वितरण करायचे. याखेरीज हडपसरमध्ये बहुजन समाजाबरोबरच माळी तसेच इतर मागास समाजाचे मोठे प्रभुत्व होते. औद्योगिक वसाहतदेखील हडपसरच्या जवळ होती. त्या काळामध्ये साने गुरुजी हॉस्पिटल डॉ. दादा गुजर यांनी उभे केले होते. आजही ते कार्यरत आहे. समाजवादी संघटनांच्या शाळा होत्या, त्यात राष्ट्र सेवा दलाच्या शाखांचेही काम चालत होते.
हडपसरमध्ये पूर्वी महात्मा जोतिराव फुले यांनीसुद्धा काम केलेले होते, असे अनेक जुन्या लोकांनी सांगितले. त्यामुळे पुण्याजवळची जी वेगाने बदलणारी गावे होती, त्याच्यामध्ये हडपसरचा समावेश होता. पुणे शहराकडे हळूहळू आपण जसे वळू तसे कॅम्प भागांमध्ये बहुजन, बहुभाषिक आणि बहुधार्मिक लोक अशा प्रकारचे वास्तव्य दिसत होते. पुणे शहराच्या मॉडेल कॉलनी या तशा उच्च मध्यमवर्गीय कॉलनीकडून माझा प्रवास रोज हडपसरपर्यंत होत होता.
पुण्याची रचना चक्राकार आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरे अंतर जसे मुंबईत सरळ रेषेमध्ये कापता येते, तसे पुण्यात होत नाही. लांबलचक जाण्यापेक्षा गल्लीबोळ आणि आतमधले छोटेछोटे रस्ते माहिती असतील तर कमी वेळामध्ये जाता येते. पुण्यात साहित्य-संगीत तसेच विविध कलांचे कलाकार होते, तसे शास्त्रज्ञसुद्धा होते आणि आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाव केले असे विचारवंत आणि संशोधक मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामुळे पुणे शहरांमधली एक अतिशय उच्च स्वरूपाची चर्चा करण्याची प्रवृत्ती संपूर्ण शहरामध्ये होती.
मला स्वतःला साहित्य क्षेत्रामध्ये किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या तीन अंकासह माणूस साप्ताहिक, इतर साहित्य क्षेत्रातील ललित स्वरूपातील येणारे माहेर, मोहिनीसारखे दिवाळी अंक आवडायचे. साहित्यविषयक लिखाण आणि चर्चा विचारविनिमयाचे केंद्र असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईमध्ये आहे, तसे पुण्यातसुद्धा आहे.
त्याखेरीज मा. प. मंगुडकर तसेच मोहन धारिया, शोभना रानडे, डॉ. असगर अली इंजिनियर, निर्मला पुरंदरे, विद्या बाळ, डॉ. बाबा आढाव, सय्यद भाई असे अनेक क्षेत्रातील लोक तिथे सामाजिक आणि विधायक काम करत होते. या सगळ्यामध्ये सुरुवातीला मला सगळ्यांशी ओळख करून देणे, प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणे, काही ठिकाणी माझे नाव सुचवणे हे काम करण्यामध्ये बऱ्याच जणांचा हातभार लागला.
त्यातून माझ्या हे लक्षात आले की, पुणे शहर हे साधारणपणे विविध प्रकारच्या प्रवाहामध्ये विभाजित झालेले आहे. त्यातला पहिला प्रवाह मार्क्सवादी, समाजवादी आणि पुरोगामी संघटनांचा होता. त्यात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्सवादी अशा विचारांचे लोक होते.
लाल निशाण, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, उजवे कम्युनिस्ट, दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी तसेच बाबा आढावांच्या कष्टाची भाकर, श्रमिकांच्या संघटना असा एक मोठा समूह होता, ज्याला आपण बिगरभाजप म्हणू अशा त्या सामाजिक संघटना होत्या.
दुसरा जो प्रवाह होता तो पूर्णपणे निरपेक्ष म्हणता येईल किंवा थोडेसे उजवीकडे झुकलेले, परंतु कुठल्याही प्रकाराने अमुक एका विचारप्रवाहाचा आमच्यावर शिक्का नाही किंवा आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा भाग नाही, असे म्हणणारे बरेचसे विचारवंत होते. ते जाणीवपूर्वक अलिप्त भूमिका घेत असत. ज्यांच्यामध्ये त्या काळामध्ये पु. ल. देशपांडे किंवा साहित्य क्षेत्रातील थोर माणसे त्याचा भाग होता.
त्या काळामध्ये ‘सकाळ’ने नागरी संघटना सुरू करून नंतर निवडणुकीत उमेदवार उभे करूनसुद्धा एक वेगळे काम केले होते. त्या काळी ना. भि. परुळेकर, डॉ. मुणगेकर अशा स्वरूपाचे लोक ‘सकाळ’च्या प्रभावामुळे जसे काम करत होते, तसे निळूभाऊ लिमये, नरूभाऊ लिमये असे अनेक लोक त्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात.
पुणे शहरात फुले, आंबेडकर, मार्क्सवादी विचार प्रवाह आणि त्यात महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने होत्या. दुसरा समूह होता तो साहित्य क्षेत्र आणि याचबरोबर थोडासा उजवीकडे झुकलेला; परंतु थेट तत्कालीन जनता पक्ष किंवा आर.एस.एस.शी संबंधित नसणारे लोक होते. याशिवाय एक ग्रुप होता तो सामाजिक, साहित्यिक एक व्यापक भूमिका घेण्याबरोबरच पक्षनिरपेक्ष काम करणारा गट होता.
या सगळ्यांच्या पैकी परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून एक नंबरच्या वर्तुळामध्ये मी होते; परंतु असे मला जाणवायला लागले की थोडी व्यापक भूमिका घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर मार्क्स-फुले-आंबेडकर जातीयवाद आणि वर्गवाद या सगळ्या विषयाचा विचार करत असताना जातीयतेच्या विरोधात किंवा जातीप्रथेच्या विरोधात आपण अधिक काम करणे गरजेचे आहे, असे जाणवायला लागले.
त्यामुळे जेव्हा एक राजकीय ध्रुवीकरण नव्हे, तर राजकीय तीन टोकांपैकी त्यातल्या त्यात मला आंबेडकरी चळवळीची जी भूमिका आहे, ती अधिक जवळची वाटायला लागली. त्यामधूनच मी स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या कामाचे जे स्वरूप होते ते सर्वच स्त्रियांना समावेश करून घेण्याचे जाणीवपूर्वक करायला लागले. मधूनच बैठक आणि कार्यक्रमांमधून फार मोठ्या प्रमाणात दलित चळवळीतून मला निमंत्रण येऊ लागली.
आमच्याही वस्तीमध्ये तुम्ही संघटना करा, असा आग्रह होऊ लागला. भटक्या - विमुक्तांच्या संघटनांकडूनही मला संपर्क व्हायला लागला. फार वेगाने क्रांतिकारी महिला संघटनेचे नाव आणि जाळं अगदी पुणे शहरापासून एका बाजूला बारामतीपर्यंत, दुसरीकडे सोलापूरपर्यंत, तिसरीकडे नगरपर्यंत, चौथीकडे नाशिकपर्यंत अशा प्रकारे अगदी वर्ष-दोन वर्षांमध्येच आम्हाला ठिकठिकाणी लोक संपर्क करायला लागले.
एक चांगल्या प्रकारचे जागृतीचे जाळे पुणे शहरात उभारताना मला खूप हुरूप वाटायला लागला. हे सगळं काम करत असताना उदगीरएवढी प्रॅक्टिस मी करू शकत नव्हते, कारण अंतर जास्त होते; तरीसुद्धा आपली कामाची जी दिशा आहे ती दिशा कुठल्या व्यापक चळवळीशी जोडून घ्यायचे असेल, तर प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या चळवळीशी जोडून घेणे योग्य राहील, या मतापर्यंत मी आले.
आज इतकी वर्षे झाली, तरी महिलांविषयक समाज सुधारणा, सामाजिक न्यायाबद्दलच्या प्रबोधनाच्या भूमिकेतून मी काम करत आहे. अनेक चढ-उतार झाले, अनेक स्थित्यंतरे झाली; परंतु राजकीय पक्षाच्या भूमिकेपेक्षा ज्या सामाजिक प्रश्नांवर मी काम करत होते, त्यातला सलगतेचा धागा तुटू दिला नाही. प्रबोधनाच्या वटवृक्षाचा आधार मिळाला. कामाची मुळं आणि सुरपारंब्या याचे एकत्र मिळून जे एक सामाजिक आणि वैयक्तिक भावविश्व तयार झाले, त्यातूनच माझा मार्ग मला हळूहळू सापडत गेला.
(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)
neeilamgorhe@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.