जाज्वल्य देशभक्तीचे प्रतीक : वीर सावरकर

Savarkar
Savarkaresakal
Updated on

वीर सावरकरांचे नाव भारतीय इतिहासात त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीमुळे अजरामर झाले आहे.

शिवबाचे शौर्य व ज्ञानेशाची प्रतिभा त्यांचे ठायी एकवटल्याने त्यांच्या देशभक्तीचे आविष्करण अधिकच प्रखरतेने होते. त्यांचा सन्मान फुटकळ उपाध्यांनी न करता, त्यांची पुण्यतिथी ‘देशभक्ती दिनः एक दिन देश के लिए’ म्हणून साजरी करीत करावा असे मला वाटते. सावरकरांच्या तेजोमय जीवनाकडे पक्षपात विरहित दृष्टिक्षेप टाकला तर कोणीही माझ्या या भूमिकेशी सहमत होईल.

स्वातंत्र्याचा पहिला हुंकार

सावरकर म.गांधींपेक्षा १४ वर्षांनी लहान होते. पण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या आधी कैकवर्षे उतरले होते. क्राँग्रेस, गांधी, नेहरु इतकेच कशाला त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या ही आधी त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रकट उच्चार केलेला होता. नुसती मागणी करुन, अर्ज विनंत्यांनी स्वातंत्र्य मिळत नसते. हे तथ्य उमगल्याने, त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांची फौजच्या फौज उभी केली होती. हु. मदनलाल ढिंग्रा, हु. अनंत कान्हेरे, हु. सरदार भगतसिंग, हु. विष्णु गणेश पिंगळे, लाला हरदयाळ, निरंजन पाल, सेनापती बापट, व्ही व्ही एस अय्यर, भाई परमानंद, रासबिहारी बोस, कॉम्रेड डांगे, मानवेंद्रनाथ रॉय इतकेच कशाला देशगौरव सुभाषचंद्र बोस इ. नी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यापासूनच क्रांतिकार्याची प्रेरणा व मार्गदर्शन घेतले होते.

Savarkar
सावरकरांच्या वेदनेचा हुंकार : ने मजसी ने

स्वातंत्र्याचा पहिला अधिकारी

सशस्त्र क्रांतिकार्यावर अतूट श्रद्धा असणाऱ्या सावरकरांनी जोसेफ माझिनी व १८५७ चे स्वातंत्र्यसमर लिहून भारतीय स्वातंत्र्यलढयामागे तात्विक अधिष्ठान उभे केले. जे क्वचितच् अन्य कोणत्याही सशस्त्र क्रांतिकारकाने केलेले आपल्याला दिसेल. भारतीय स्वातंत्र्यासाठीचा पहिल्या महायुद्धातील प्रयत्न फसल्यावर निराश न होता दुसऱ्या महायुद्धाची संधी साधण्याचे सावरकरांनी ठरविले. वयाच्या ५५ व्या वर्षी ‘लेखण्या मोडा बंदुका उचला’ चा संदेश देत त्यांनी ब्रिटिशांनी आरंभिलेल्या सैन्यभरतीला पाठींबा दिला. भारतीय तरुणांना ते सांगत फिरु लागले, ‘एक पिस्तुल जवळ सापडले म्हणून आम्हाला अंदमानला धाडणारे इंग्रज स्वतः होऊन तुम्हाला बंदुका देतेय, बंदुका चालविण्याचे प्रशिक्षण देतेय, सोबत वेतन ही देतंय, त्याचा लाभ उठवा. सैन्यात शिरा, बंदुका शिकून घ्या. एकदा शिकलात कि मग बंदुकांची तोंडे कोठे फिरवायची बघता येई्ल.’ त्यांच्या या उपदेशाने लाखो युवक सैन्यात शिरले. अन् घडले ही तसेच! आझाद हिंद सैन्याशी या सैनिकांची गाठ पडताच त्यांनी युद्ध करायला स्पष्ट नकार दिला. सुमारे चाळीस सहस्र प्रशिक्षित सैन्य एकट्या सिंगापूरला रासबिहारींच्या आझाद हिंद सेनेला जाऊन मिळाले. या घटनेचे साक्षीदार असलेले जपानी लेखक ओहसावा लिहितात, ‘आश्चर्य घडले! चाळीस हजार सैन्य रक्ताचा एक थेंब न सांडता आझाद हिंद सेनेला येऊन मिळाले. श्री. सावरकरांची दुसऱ्या महायुद्धातील सैनिकीकरणाची योजना आकार घेऊ लागली.’

यावर नकळतपणे शिक्कामोर्तब करताना ब्रिटिश पंतप्रधान अटली एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले, ‘आम्ही भारताला स्वातंत्र्य देत आहोत कारण ०१. भारतातील सेना आता इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेली नाही. ०२. भारतात इंग्रजी सेना पाठवून ताबा ठेवणे परवडण्यासारखे राहिलेले नाही.‘

सावरकरांशिवाय आंबेडकर वगळता एकाही नेत्याला सैन्यभरतीचे महत्व समजले नव्हते. सावरकर वगळता कोणीही सैन्य भरतीला सक्रिय पाठिंबा दिलेला नव्हता, उलट सावरकरांनाच रिक्रूटवीर म्हणत लांछन लावण्याचे काम केले होते. हे ध्यानात घेतले तर वरील दोन्ही बाबी भारतीय स्वातंत्र्याचे श्रेय निर्विवादपणे सावरकरांकडेच जाते हेच दाखवितात.

देशासाठी हिंदुराष्ट्रवाद

सावरकर व्यक्तिशः अज्ञेयवादी होते, एका दृष्टिने पाहता नास्तिक होते. ते प्रखर बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ होते. कोणत्याही धर्म, धर्मग्रंथावर त्यांची श्रद्धा नव्हती. तुमचा धर्मग्रंथ जितका जूना तितके तुम्ही मागास ही त्यांची स्पष्ट विचारसरणी होती. धर्माच्या प्रथा परंपरापासून ते दूर होते. त्यांनी कोणत्याही धर्मग्रंथावर भाष्य लिहिले नाही. पण अंदमानात असताना मुस्लिम धर्माचा अभ्यास केल्यावर ते देशहितासाठी हिंदुत्ववादी बनले. त्यांचा हिंदुत्ववाद धर्मावर नसून भौगोलिक सीमेवर आधारीत राजकिय स्वरुपाचा आहे. भारतातील वैदिक, शीख, जैनादि सर्व संप्रदाय इतकेच कशाला नास्तिकांनाही सामाविष्ट करुन घेण्याइतका तो व्यापक आहे.

सावरकर हिंदुत्वावादाला दुसरी क्रांती म्हणतात. त्यांच्या या क्रांतीचे उत्तराधिकारी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार, पाचलेगांवकर महाराज, लाला हरदयाळ, रासबिहारी बोस, भाई परमानंदासारखे कैक क्रांतिकारक होते.

सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार कोणाला मान्य नसतील, मतभेद असतील पण सावरकरांच्या हेतुविषयी मतभेद असण्याचे कारण नाही. किमान हे तरी ध्यानात धरावे की तेल्या तांबोळ्याचे पुढारी टिळक लोकमान्य होतात, हरिजनांचे पुढारी गांधी महात्मा होतात, महार व दलितांचे पुढारी आंबेडकर विश्वरत्न ठरतात मग उपरोक्त साऱ्यांचा व या साऱ्यांत न येणाऱ्यांचाही एकत्रित विचार करणारे सावरकर जातीयवादी, संकुचित कसे ठरतील?

esakal

सावरकर जन्मजात देशभक्त होते

इंग्रजांचा राग यावा असे कोणतेही व्यक्तीगत कारण घडलेले नसताना, चाफेकरांच्या बलिदानाने प्रेरित होऊन वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी सावरकरांनी देश स्वातंत्र्याची शपथ घेतली व ती जन्मभर पाळली. ‘माझा मित्र म्हटला कि स्वदेशाभिमानात रंगलेला, स्वदेशी वापरणारा हे ठरलेलेच असे’ ही सावरकरांची वाक्ये त्यांची जन्मजात देशभक्तीच दाखवतात. लाला हरदयाळ, व्ही व्ही एस अय्यर यांचे चरित्रकार लिहितात, ‘उनमें क्या जादू थी पता नहीं । उनसें (सावरकरसे) हाथ मिलातें ही वें (हरदयाळ व अय्यर) सशस्त्र क्रांतिकारी बन गयें।’ आचार्य अत्रे गौरवाने म्हणतात, ‘गांधी, नेहरु परिस्थिती व कारणाने देशभक्त झाले होते. सावरकरांचे तसे नव्हते ते जन्मजात देशभक्त होते.’

देशासाठी सर्वस्व समर्पण

१९०९ साली सावरकर लंडनला असताना त्यांना येसूवहिनींचे पत्र मिळाले. त्यात त्यांच्या मोठ्या भावाला जन्मठेप व लहान्या भावाला तुरुंगवास झाल्याच्या वार्ता होत्या. त्या वाचल्यावर विचलित न होता सावरकर वहिनींना काव्यमय पत्र लिहितात -

आशीर्वाद पत्र पावले ।

जे लिहिले ते ध्यानी आले ।

मानस प्रमुदित झाले ।

धन्यता वाटली उदंड ।।

मोठ्या भावाला जन्मठेप झाली, लहान्याला तुरुंगात टाकले, पत्नी, वहिनी, मुले रस्त्यावर यायची वेळ आली अशा कोणाचेही मन सुन्नं करणाऱ्या वार्ता सावरकरांना आनंददायक वाटतात. मातृभूमीसाठी करावा लागणारा त्याग त्यांना त्याग वाटतच नाही, इतकेच कशाला मातृभूमीसाठी मृत्यू स्विकारायलाही त्यांचे मन सिद्ध होते. म्हणूनच स्वतंत्रतेच्या स्तोत्रात ते गातात-

तुजसाठी मरण ते जनन| तुजविण जनन ते मरण ||

सावरकरांना दोन जन्मठेपेची पन्नास वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा इंग्रज सरकारने ठोठावली. त्यांचे घरदार जप्त करण्यात आले, घरात चुलीवर शिजत असलेली खिचडी पातेल्यासह जप्त करण्यात आली, सावरकरांचा चष्मासुद्धा जप्त करण्यात आला. हे कमी की काय म्हणून त्यांची बी. ए. ची पदवी सुद्धा काढून घेण्यात आली. तरीही अंदमान बेटाला पाहिल्यावर सावरकरांच्या मनात पहिला विचार आला येथे भारताचे आरमार-सैनिकी तळ उभारले तर भारताच्या सीमा अधिक सुरक्षित बनतील. पन्नास वर्षाच्या जन्मठेपीची आठवण त्यांना झाली नाही. नव्हे- नव्हे त्यांना ती जन्मठेप, जन्मठेप वाटतच नव्हती तर भारताचे पारतंत्र्य हीच मोठी जन्मठेप आहे असे त्यांना वाटत होते.

Savarkar
सून मी सावरकरांची

अच्छे दिन की आस नही ।

सध्या ‘अच्छे दिन’ चा ढोल वाजवला जातोय पण सावरकरांना चांगल्या दिवसाची अपेक्षाच नव्हती. आपल्या आत्मचरित्रात ते लिहितात, ‘आम्ही मनाशी एकच खूणगाठ बाळगली होती कि, आपण चांगला दिवस पहायला जन्मलो नाही. या देशाचे स्वातंत्र्य पहायला जन्मलो नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरायला जन्मलो आहोत.’

आपल्या एका भाषणात ते म्हणतात, ‘आम्ही अक्षरशः सुळाला जाऊन मिठ्या मारल्या पण मेलो नाही. शंभर लढाया मारुन शिवाजीराजे अखेर गुडघी रोगाने वारले. नशीब आपले आपले!’ पण देशासाठी मरण्याची ही इच्छा विवेकशून्य व खुळचट नव्हती. तर छत्रपती शिवरायांप्रमाणे कावेबाज होती. शत्रूला ठकवून, भुलवून, गाठून मारणारी होती, मरता मरता आपल्या वाटचा एक इंग्रज घेऊन मरणारी होती.

देश म्हणजे परमेश्वर !

सावरकरांना स्वतंत्रता देवी मोक्ष मुक्ती वाटत होती तर देश देवासमान वाटत होता. हु. मदनलाल धिंग्राला अंतिम निवेदन सावरकरांनी लिहून दिलेले होते त्यात ते म्हणतात, ‘मेरी मान्यता हैं के मेरे देश का अपमान भगवान का अपमान हैं।’ त्यांचे हे वक्तव्य युरोपात विशेषतः इंग्लंड, आयर्लंड, जर्मनी व अमेरिकेतील वृत्तपत्रांत खूपच गाजले. बहुतेक वृत्तपत्रांनी त्याची स्तुती केली. ब्रिटिश साम्राज्याचा कैवारी असलेल्या चर्चिलला सुद्धा हे वक्तव्य देशभक्तीबाबतचे सर्वोत्कृष्ट वक्तव्य आहे असे गौरवोद्गार काढल्यावाचून राहवले नाही.

माझा भारत मला मिळाला ! सर्व काही मिळाले !

आपल्या शेवटच्या प्रकट व्याख्यानात सावरकर म्हणाले होते, ‘मला कुणी विचारलं तर मी म्हणतो, मला जहांगिर नको, माझं जप्तं केलेले घर नको, भारतरत्न नको. मी पूर्ण समाधानात आहे. दैवाने म्हणा की दैत्याने म्हणा मला माझा तीनचतुर्थांश हिंदुस्थान परत मिळवून दिला त्यात सारं काही आले.’ त्यामुळेच अवधुत उपनिषदातील

धन्योऽहम् धन्योऽहम् कर्तव्यमे न विद्यते किचिंत् ।

धन्योऽहम् धन्योऽहम् प्राप्तव्यं सर्वमद्य संपदः ।

अर्थात् 'मला कर्तव्य काही उरले नाही. मी धन्य आहे, मला सर्व काही मिळाले मी धन्य आहे.' चा उद्घोष करीत, मृत्युला साद घालीत २६ फेब्रुवारी १९६६ ला त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपविली.

esakal

स्वातंत्र्योत्तर उपेक्षा अन् द्वेषच

ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वंकष प्रयत्न केले होते, सहकुटुंब त्याग केला होता. त्या देशाने स्वतंत्र होताच त्यांना गांधी हत्येच्या कटात गोवले. सावरकरांची स्पष्ट धारणा होती, ‘देश पारतंत्र्यात असताना शस्त्र व स्वतंत्र असताना शांततापूर्ण कायदा याचाच अवलंब करायला हवा. स्वजनाची हत्या त्यांच्या तत्वात बसतच नव्हती.’ एकप्रकारे ही बाब मान्य करीत, न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यावरसुद्धा तत्कालीन पंतप्रधान वा संबंधितांनी दिलगिरीचा शब्दही उच्चारला नाही. उलट पाकिस्तानचा अध्यक्ष भारतात आल्यावर सावरकर मुक्त असतील तर दंगली होतील. असे पोकळ अन् फोलकट कारण देत वयाच्या सत्तराव्या वर्षी या देशभक्ताला कारागृहात डांबले, व देशशत्रूवर लादाव्या तशा अटी शर्ती लादून त्यांची सुटका केली. ऐऱ्यागैऱ्यांना स्वातंत्र्यसेनानी म्हणून मालमत्ता वाटताना, सन्मानपत्रांची व सन्मान वेतनाची खैरात वाटताना या अनेक क्रांतिकारकांच्या नेत्याला, स्वातंत्र्यवीराला खड्यासारखे बाजूस सारले. पण श्वास-उच्छवासात देशभक्ती असणाऱ्या या महान देशभक्ताने एवढे घडूनही देशावर प्रेमच केले. देशाचे हितच सर्वोपरि मानले.

मरणोत्तर ही द्वेषच

मरणांतानि वैराणी । असे वचन असताना सावरकरांच्या मृत्युपरांत ही भारतीय शासनाने त्यांची अवहेलनाच केली. संसदेत सावरकरांना श्रद्धांजली अर्पण करायला सुद्धा नकार दिला. कारण काय तर सावरकर कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते. मग कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या म. गांधीना कोणत्या न्यायाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती? हा द्वेष अतिशय निम्न स्तरावरचा होता यात शंकाच नाही.

हे कमी की काय म्हणून सावरकरांच्या मरणोपरांत नेमलेल्या कपूर आयोगाने आपल्या मर्यादेबाहेर जात गांधी हत्येत सावरकरांचा हात असल्याची अत्यंत धादांत, असत्य व निराधार तळटीप मारत सावरकर द्वेषाची परिसीमा गाठली. सावरकर द्वेषात मग्न असलेल्यांचा प्रश्न असतो, सावरकरांनी या देशासाठी काय केले?

सावरकरांनी प्रतिज्ञा घेतली देशासाठी, अभिनव भारताचा घाट घातला देशासाठी, लेख लिहिला देशासाठी, कविता लिहिली देशासाठी, कथाकादंबरी लिहिली देशासाठी, भाषण केले देशासाठी, घरदाराचा होम केला देशासाठी, अंदमान भोगले देशासाठी, दयापत्रे पाठविली देशासाठी, श्वास घेतला देशासाठी उच्छवास घेतला देशासाठी. सुजन हो! सावरकरांनी या देशासाठी काय केले? हा प्रश्नच नाही होऊ शकत. या देशाने सावरकरांसाठी काय केले हा प्रश्न मात्रं हमखास विचारला जाऊ शकतो.

त्यामुळेच असेल कदाचित सशस्त्र क्रांतिकारी बचनेश त्रिपाठी सावरकरांना राष्ट्रोपरि मानतात, तर आचार्य अत्र्यांना ते खरेखुरे महात्मा वाटतात, बाळशास्त्री हरदासांना सावरकर व्यास वाल्मिकीच्या बिरुदावळीतील वाटतात. कोणीतरी बहुधा मनोरंजनलाल गुहा यांनी म्हटले ते खरेच आहे ‘सावरकरांना भारतरत्न देऊच नका; उलट जो या देशासाठी सर्वोच्च त्याग करेल त्यालाच वीर सावरकर उपाधि द्या.’

esakal

सावरकरांना भारतरत्न नकोच !

स्वा. सावरकरांना भारतरत्न द्यावे असे विचार वारंवार मांडले जातात. पण मला व्यक्तीश; वाटते सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देऊ नये अन् दिला तरी त्यांच्या वारसांनी स्वीकारु नये. त्यामागे अनेक कारणे आहेत. एकतर सावरकर केंव्हाच त्या पुरस्कारापलिकडे गेलेत. याशिवाय प्रश्न हा ही आहे की त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला तर त्यांच्या सैन्यमय जीवनाचे काय?

सावरकरांचे जीवनकार्य पाहिले तर सर्वप्रथम दृष्टित येते, त्यांची सशस्त्र क्रांतीवरील अढळ श्रद्धा, सैनिकी शक्तीवरील विश्वास! अन् हो त्यांची मासेेर्लिसची त्रिखंडात गाजलेली उडी, त्यांनी केलेले सैनिकीकरण! त्यांच्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराने या देशाला पुरविलेले हजारो स्वातंत्र्य सैनिक. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी सावरकर या सेनापतिने दिलेला हा सारा अपूर्व व अभूतपूर्व सैनिकी लढा! मग सावरकरांना पुरस्कार द्यायचाच तर परमवीर चक्र वा महावीर चक्रच योग्य ठरेल.

पण केवळ परमवीर चक्र वा महावीर चक्र दिले तर त्यांनी केलेले लोक जागरण, ओजस्वी व प्रबोधनात्मक लिखाण, हिंदू संघटन, अस्पृश्यता निवारण, समाजसुधारणा, भाषाशुद्धी, लिपिसुधारणा आंदोलन इ. त्या पुरस्कारात कसे काय समाविष्ट करणार? मग त्यासाठी पुन्हा सर्वोच्च नागरी पुरस्काराकडे वळावे लागणार. थोडक्यात परमवीर चक्र व भारतरत्न या दोहोंचे मिश्रण असलेला कोणता तरी नवा पुरस्कार त्यांना द्यावा लागणार?

मला वाटते त्यापेक्षा आपण त्यांच्या त्यागमय जीवनाला साजेसा पुरस्कार त्यांना दिला तर?...त्यांचा आत्मार्पण दिन देशभक्ती दिन म्हणून साजरा केला तर फारच उत्तम ठरेल.

Savarkar
अनादी मी,अनंत मी !

देशभक्ती दिनः एक दिवस देशासाठी

पुन्हा एकदा विधान करतो, सावरकरांना सरकारने भारतरत्नादि कोणताही पुरस्कार देऊन त्यांची अवहेलना करु नये. तर सावरकरांना आवडेल त्यांच्या प्रतिमेला साजेल असे काहीतरी भरीव काम करावे जेणे करुन हा देश बलशाली होऊ शकेल. त्यासाठी सावरकरांची पुण्यतिथी संपूर्ण देशाने देशभक्ती दिनः एक दिन देश के लिए म्हणून साजरी करावी. या दिवशी सुटी देऊ नये, भाषणादि फोलकट कार्यक्रम ठेऊ नये तर प्रत्येकाने आपापले कामधंदे, नोकरी, दुकानदारी, व्यवसाय-व्यापार, हमाली, मजूरी, डॉक्टरी, शिक्षकी इ कामे नेहमीप्रमाणे करावी. मात्र त्यातून मिळणारे केवळ त्या दिवसाचे उत्पन्न, त्या दिवसाचा नफा राष्ट्राला अर्पण करावा. सावरकर सतत सांगत कोणताही देश महासत्ता म्हणून मिरवितो तो केवळ शस्त्र व सैन्यबळावर, आपल्याकडे शस्त्रे हवीत अत्याधुनिक, केवळ अणुबॉम्बच नव्हे तर जगाला न सापडलेला हायड्रोजन बॉम्ब ऑक्क्सिजन बॉम्बने सुसज्ज व ते भारताने सर्वात आधी करावे.

त्यामुळे जन मेहनतीतून जमा होणाऱ्या या धनराशीचा उपयोग, सैन्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्र खरेदी, निर्मिती वा नागरिक व विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण यासाठीच करावा.

सावरकरांच्या पुण्यतिथीचा आग्रह एवढ्याच साठी की जन्माने सारे समान असतात. जीवनाने त्यांचे कर्तव्य कळते, महानता जाणवते व मृत्युने ती शाश्वत होते. सावरकरांनी जीवनभर देशावर प्रेम केले, कर्तव्य म्हणून केले आणि आत्मार्पणाने आपल्या देशभक्तीला चिरस्थायी करुन ठेवले. त्यामुळेच मी पुण्यतिथीचा आग्रही आहे. आजच्या अधिकाराच्या गलबल्यात कर्तव्याची जाणीव देणारा सावरकरच देशाला बलाढ्य राष्ट्राचे स्थान मिळवून देईल यात शंकाच नाही.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक व 'दशग्रंथी सावरकर'ने सन्मानित आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.