कविता माझी छिन्नमुंडा!

सावरकरांची आत्मनिष्ठ कविता कधी कधी त्याच तीव्र पिडेचा प्रतिध्वनी उमटवत जाते.
Savarkar
Savarkaresakal
Updated on

'सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठीतील पुरुषसूक्त होय’, असे प्रतिपादन विख्यात नाटककार विद्याधर गोखले यांनी केले होते. पुरुषसूक्त म्हणजे समाजात पराक्रमाची, पौरुषाची धारणा करणारे साहित्य होय. उत्तुंग त्याग हा पराक्रमाचा अंतरंग असतो, तर तीव्र पिडा त्याचा मूळ गाभा असतो. सावरकरांची आत्मनिष्ठ कविता कधी कधी त्याच तीव्र पिडेचा प्रतिध्वनी उमटवत जाते. मात्र त्या त्यागास कर्तव्याचा अंगरखा सावरकर घालीत असल्याने ती पिडा व्यथा न राहता यज्ञीय समिधा बनून जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सावरकरांची मूर्ति दुजी ती! ही विख्यात कविता होय.

सन १९१० मध्ये पॅरिस वरून लंडनला परतताना लंडन स्टेशनवरच स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सावरकरांना अटक केली. त्या वेळी तेथील वातावरण अत्यंत थंडीचे होते. कारागृहाच्या भिंती दगडाच्या होत्या, पुरेसे कपडे, अंथरूण, पांघरूणही नव्हते. त्यातच एकाहून एक घडलेल्या घटनांनी मनसुद्धा गारठून गेले होते. त्या वेळी शरीर व मनाला ऊब मिळावी म्हणून आलेल्या विचारांना दिलेले काव्यरूप म्हणजे ही कविता होय. सावरकर शीघ्रकवी होते. त्यांची कविता तत्काळ जन्मे. पण ही एकमात्र कविता त्यास अपवाद म्हणावी. हिची विचारसूत्रे लंडनच्या कारागारात होती, तर प्रसव अंदमानच्या काळकोठडीत होता. हिच्या एकूण ४१० ओळींपैकी १६९ ओळी मूर्ति दुजी ती या कवितेच्या स्वरूपावर, तर उर्वरित २४१ वीर बंदा बैरागीवर आहेत अर्थात त्याचा शेवट आत्मपरच आहे. त्यामुळे श्रीबंदावीर या शीर्षकाखाली त्या दिलेल्या असल्या तरीपण एकत्रच जोडलेल्या आहेत. यातील पहिल्या १६९ ओळींतील मोजक्यांचा वेध आपण घेणार आहोत.

Savarkar
दोष ना कुणाचा...

कविता सावरकरांची सहचरी आहे. त्यामुळे मार्सेलिसला उडी फसल्यावर असो की काळकोठडीत खितपत पडताना असो. ती तत्परतेने त्यांच्याकडे येते. थंडीने मन, शरीर गारठून जाताना त्यांना ऊब द्यायला ती धावतपळत आली. आजवर ती वीरवृत्तीचा संचार करायला येई; पण आज प्रसंग बिकट होता. फास किंवा जन्मठेप यापैकीच एखादा पर्याय मिळणार होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे नटूनथटून आलेली कविता कवीला नकोय. म्हणून तो तिला म्हणतो,

आजि अहह इच्छितसे रूप देखण्या
ते दुजेंचि तव ! तव ती मूर्ति दुजीची !


‘कविते! आजवर मी तुझ्या मधूर, सुमंगल मूर्ती खूप पाहिल्यात. पण आज ती भयंकर, घोर मूर्ती मला दाखव. कारण एखाद्या वध्य हिंस्र पशुला जसे पिंजऱ्यात कोंडावे तसेच मला या पिंजऱ्यात कोंडले आहे.’

सावरकरांचा पहिलाच कारावास होता म्हणून असे शब्द त्यांनी वापरले असावे, असे वाटत नाही. यामागील कारण म्हणजे हु मदनलालने केलेल्या कर्झन वायलीच्या मृत्यूमागे सावरकर आहेत. याविषयी इंग्रजी जनतेची खात्री झाली होती. त्यामुळे सावरकरांना लंडनमध्ये जागा मिळत नव्हती. लंडनवासी लोक सावरकर अन् त्यांच्या गटाला एखाद्या वध्य हिंस्र पशुला रोखून पाहावे तसे पाहत होते. ज्याप्रमाणे वीणा कितीही सुंदर असली तरी रणांगणात लढून जय मिळवून देऊ शकत नाही. त्याप्रमाणे हा कवीहृदय सावरकर कारागारी टिकणार नाही, असे इंग्रजांना वाटत होते. आपल्या शत्रूचे हे मनोगत पूर्ण होऊ नये म्हणून सावरकर कवितेला निक्षून सांगतात, की ‘तुझे सुख लोलूप तोंड मला दाखवू नकोस.’ जणू काही कवी कवितेशी सरळ संभाषण करतोय. त्याला सांगायचे आहे, की तुरुंगात येणारा सुखलोलूप विचार, शिक्षेचे सुख भोगू देणार नाही. शिक्षेचे सुख हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. आज दुःखजन्य वाटत असलेली शिक्षा, मानव्यासाठी भोगली लक्षात येताच ती सुखकर होते. तेथे सुखाचे विचारच दुःखद ठरतात.

कवीला ठाऊक आहे, की कविता नीज भक्ताला त्यागित नाही. मग येणारच असेल तर तिची दुसरी मूर्ती त्याला हवीय. या दोन मूर्तींचे वर्णन करताना तो गातो,
एक मूर्ति ती नाचत हृदयमंचकी

रसिकमनाची वीणा घेऊनी करी
तंतुतंतुतुनि कुशल स्पर्श पुलकिता
प्रेमाची वीज थरारूनि देत जे;
भावनासि मोहन घालूनि ती करी
लोण्याहुनि कोमलशा कोमला अशा
की जाव्यां चांदण्या मध्येहि वितळूनी !

रसिका ! काय मधूर, मोहक, मुलायम नि अलगद स्पर्श करणारे शब्द आहेत हे ! जणू काही कालिदासच मराठीत अवतरला. प्रेमाच्या सुकोमल भावनांना मोहन घालायला लोण्याहून कोमल काय सापडणार बरे? पण त्याला खूप नाजूकतेने जपावे लागते. कारण मृदू मधूर चांदण्यात ही ते वितळून जाते. सावरकरांचे हे शब्द प्रेमाच्या तरल भावनेची प्रतिमा हुबेहूब उठवून जातात. हे वाचले असते तर कालिदास ही सावरकरांचा दिवाना झाला असता अन् जेव्हा त्याला कळाले असते, की अर्ध शतकाची जन्मठेप भोगताना तिशीतील निरागस कैद्याने हे निष्काम वृत्तीने रचले आहे तेव्हा स्वतःला ‘मंद कवी यश: प्रार्थी’ म्हणत नम्रपणे प्रणाम करून तो बाजूला सरला असता अन् सावरकरांना दिसणारी कवितेची ती दुसरी भयंकर, उग्र, भयानक तरीही भद्रकारी मूर्ति तो ही पाहू लागता.

आणि दुजी ती मूर्ति प्रखर जी तुझी
कविते घेऊनि शिरे वाण सतीचें
अहह ! हास्य करित प्रज्वलित चिताग्नी !

Savarkar
जातीअंताचा लढा संपला नाही अजून...

सावरकरांना ही दूजी मूर्ती आपलीशी वाटते. कारण ती सतीचे वाण घेऊन प्रज्वलित चिताग्नीत समाधानाने चढते. सतीला केवळ कर्तव्यच ठाऊक असतात; अधिकाराची जाणीव नसते. सावरकर साहित्य बारकाईने वाचले तर कर्तव्य हाच मंत्र दिसेल, अधिकार कुठेच गवसणार नाही. टिळकांना जो जन्मसिद्ध अधिकार वाटतो तोच सावरकरांना मोक्ष, मुक्तीचे रूप वाटतो, परब्रह्म वाटतो. जेथे अधिकाराची नाही तर निस्सीम भक्तीची, कोणत्याही अपेक्षेशिवाय, केवळ त्यागाचीच कर्तव्य भावना असते. तीच सावरकर ठळकपणे व्यक्तवितात. सतीला जिवंत असताना चिताग्नीत चढायला आवडते. स्वतःच्या डोळ्यांनी स्वत:ची चिता पाहण्याचे भाग्य तिला लाभते. ही भावना सतीशिवाय एखादा हुतात्माच करू इच्छितो. तीच सावरकर करतात.

या दोन्ही मूर्ती आपल्याच आहेत का? या कवितेला पडलेल्या प्रश्नावर ते मधूर मुरली वाजविणाऱ्या कृष्णाने दंष्ट्रा कराल रूप धरीत युद्ध प्रवण करणारी गीता ही सांगितली होती. हे तिच्या ध्यानात आणून देतात अन् हजारो वर्षांनी प्रकट होणारे रणवेताळ चंडीचे रूप घेऊन येण्याची विनंती तिला करतात.
तिचे हे उग्र रुप आज कर्तव्य म्हणून गरजेचे आहे कारण ‘आज सारे उलटे झाले’. वयाच्या पंचविशीतच सावरकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते म्हणून उदयास आले होते. सावरकरांचे शिष्यत्व पत्करायला त्यांचे मोठे भाऊ बाबाराव अग्रेसर होते. ज्यांनी त्यांना लंडनला शिकण्यास शिष्यवृत्ती दिली ते बॅरिस्टर राणा अन् श्यामजी कृष्णवर्मा सावरकरांचे प्रतिज्ञाबद्ध शिष्य झाले होते. लाला हरदयाळ, अय्यर, बापट, वीरेंद्रनाथ अशा धुरंधर युवकांनी ‘सावरकर सूर्य तर आम्ही त्यांचे उपग्रह होतो’ म्हणत आपले नेतृत्व त्यांच्या हाती सोपवले होते. प्रो हिंडमनसारखे वरिष्ठ राजकारणी अन् डेव्हिड गार्नेट, गाय डी आल्फ्रेडसारखे तडफदार इंग्रज युवक सावरकरांवर फिदा झाले होते. लंडनमध्ये सावरकरांना दुखायला लागले तर लंडनमधील डॉक्टर सावरकरांच्या निवासी येऊन आपल्या दवाखान्यात भरती करण्यासाठी स्वतः घेऊन जात होते. थोडक्यात, सावरकर जणू काही राजकुमाराच्या भूमिकेत वावरत असताना ही तुरुंगवासाची वेळ येऊन ठेपली होती हा भाव ‘आज सारे उलटे झाले’ या पंक्तीतून सावरकर उलगडतात.

‘जेव्हा आमुचा धनी अर्थात ईश्वर मला सांगू लागला, ‘तुझी सुटी संपलीये आता युद्धाचे पडघम वाजताहेत. लवकर चल आता, तुला एक क्षणही सुख लाभणार नाही’, आणि पहातो तर काय लोखंडी जबडा वासून मला चिरायला माझे कर्तव्य उभे राहिलेले आहे.’ खरेतर सावरकर कोणत्याही सुखोपभोगात गुंतलेले नाहीत; पण जे लढण्याचे स्वातंत्र्य ते आजवर उपभोगत होते. तेच हिरावून कारावासरुपी कर्तव्य त्यांच्यापुढे उभे ठाकले होते. ते कसे भयंकर आहे, याचे वर्णन करताना ते लिहितात-

दगडाहुनि निर्दय हें हृदय तयाचें
वेषही न बर्बरता झाकी अशी ही
त्याच्या अजि नंगी तरवार तनूची !

त्यांचे हृदय निर्दय आहे, त्यांनी वेष असा धारण केलाय की त्यांची बर्बरता चटकन दिसावी. जणू काही नागव्या शरीराच्या राक्षसी हातात नागवी तरवार असावी. पण याविषयी सावरकरांची तक्रार नाही. कारण त्यांनी ही नंगे कर्तव्य हाती घेतले आहे. येथे नंगे कर्तव्य म्हणजे ब्रिटिश मुक्त भारताची कल्पना ही कोणी करत नव्हते त्या वेळी इंग्रजांना हाकलून देण्याची त्यांनी केलेली प्रकट वल्गना होय. त्यामुळे त्यांना छळाची तमा नाही, मृत्यूचे भय नाही, काळजी फक्त हीच आहे, की हे सारे सहन करताना दुःखाचा हुंकार ही बाहेर पडू नये. भारतीचा पुत्र वेदना सहन करू शकला नाही, असे शत्रूला वाटू नये हा भाव अधिक स्पष्टपणे व्यक्तविताना कवी लिहितो,
आज्ञा मज दे ! पाठीवरती लादुनी
पर्वतसम दुर्धर सद्गर्वभार हा
सामान्यपणे माणसाचा कल हा आपले दुःख, यातना जगाला दाखवायचा असतो. येथे त्यालाच बंदी आहे कारण आपल्या यातना दाखविल्याने देशशत्रूला सुख तर देशबंधूंना दुःख होणारे आहे. ते कवीला मान्य नसल्याने कवी सद्गर्वभार असे संबोधतो. कवीची ही भावना कवितेच्या चंडमूर्तिशिवाय कोणीही पूर्ण करू शकणार नाही. म्हणून तो तिला बजावतो-

छेड सूर कर्कश, जो भिववि भैरवा !
सूर ललित ना ! रुणझुण ताल तोल ना !

Savarkar
सोनेरी स्वप्नं : स्वामी तिन्ही जगाचा ‘देखाव्याविना’ भिकारी!

खरेतर कविता कविला आज्ञा देत असते. पण इथे तर कविच कवितेला आज्ञा देतो. कारण हा कवी कवितेपेक्षा कर्तव्याला अधिक वश झाला. तो सांगतो मृत्यूला भिवविणारे कर्कश सूर झेडीत तू ये. याचे कारण मृत्यू त्याच्या कर्तव्याच्या आड उभा राहिलाय. त्याला सुमधूर गीतगोविंदाचे सूर नकोत तर अबलांत ही प्रबलतेच्या ऊर्मिवर-ऊर्मी निर्माण करणारे रणभेरीचे सूर हवेत. प्रबलतेच्या उर्मी म्हणजे सहजतेने, नैसिर्गिकतेने तयार होणारे सामर्थ्य होय. या प्रबलतेच्या ऊर्मी तयार झाल्यानेच ‘पन्नास वर्षे इंग्रजी सत्ता टिकली’ तर सारखे उत्तर देऊ शकणारी मानसिकता त्यांच्यात उत्पन्न होऊ शकली.

ही प्रमत्त चंडधरा मूर्ती कशी दिसते? हे वर्णिताना वैनायक प्रतिभा सांगते, ‘त्या चंडीकेचे कुरळ, मृदुल केस क्रोधाने राठ राठ झाले. तिच्या केसांच्या बुचड्यातून चवताळलेल्या सर्पांचे पेव फुटताहेत. ते अंगाखांद्यावर विकराळ फुत्कार करताहेत. केसांच्या बुचड्यातून फार तर जुवाच निघायच्या पण सावरकरांना दिसणाऱ्या या कवितेच्या प्रमत्त चंडीकारुपातून फुत्कार करणारे सर्पच्या सर्प दिसतात. यात कवी केशकलाप शब्द न वापरता बुचडा हा विद्रुपता दर्शक शब्द वापरतो अन् त्यावर अंगाखांद्यावर फुत्कार करणारे सर्प दाखवत भयंकरत्वाचा आरोप करताना आपली मानसिकता शत्रूसमोर कशी असावी तेच दाखवतो. विद्रुपता नि विकराळता दोन्ही साऱ्यांना दूर ठेवणारे असते तेच कविला त्या वेळी उपयोगी वाटते. पण तरीही काहीतरी सुटले की काय वाटून तो तिला सांगतो-

हे कविते, तू छिन्नमुंडा बनून ये -
एकया नीज हस्तेचि छाटुनि स्वयें
खङ्गाने आपलेच मुंड फल तसें,
अन्या नीज हस्तीं घे; आणि अहो जी
रक्ताची धार उडे वरि उफाळुनी
लाल लाल चिकट विकट त्या गळ्यातुनी
धार तीच घट घट त्या क्रुध्द मुखें पी

रसिका ! किती भयाण वर्णन आहे हे ! कवितेला या रूपात केवळ विनायकानेच पाहिले असेल. आपलेच मस्तक आपल्याच एका हातांने छाटून दुसऱ्या हातात ते धरलेले आहे. मस्तकविहीन कंठातून उंचबळणारा रक्तस्राव आपला आपणच पितेय । केवळ विलक्षण अद्‍भुत अशी तांत्रिकांची चंडिका; सावरकरांसाठी कविता बनून आली. खरेतर हे विनायकाचेच रूप होते; देशस्वातंत्र्यासाठी कुटुंबरुपी शिरकमळ सावरकरांनी उच्छेदून टाकले होते आणि त्यातून वाहणारे पीडारुपी दुःख स्वतःच घटघट पिले होते. त्यात ज्यांच्यासाठी आपण हे सारे करतो त्यांच्या अवहलेनेने, उपेक्षेने तिला चिकट विकट स्वरूप प्राप्त झाले होते. हे जाणतेपणाने करीत असल्यानेच ते त्या सद्कर्तव्यरुपी रुंडधरा, छिन्नमुंडा कवितेला वारंवार प्रणाम करून आश्वासितात, की

जें वेताळीय, काळभैरवीय जें,
मारक जें, दुःसह जें, कठीण कटुकटू
तेंचि आज आरोग्यद बलद हो तया !

Savarkar
आत्मयज्ञाचे सूतोवाचः सांत्वन !

होय, जे वेताळीय, काळभैरवीय म्हणजे अत्यंत मारक, सहन करण्यास अशक्य, तिखटासारखे अंगार करणारे, तेच आज आरोग्यद आहे. मथितार्थ असा, देशपारतंत्र्यात असताना देशशत्रूंना मायबाप सरकार म्हणत, त्यांनी खैरातीत वाटलेल्या पदव्या मिरवीत जगणे देशाच्या स्वत्वाला घातक असते. उलट देशासाठी नाही नाही ते दुःख उपभोगत कष्टत कष्टत, तीळ तीळ तुटत मरणे, मरता मरता लढणे देशाच्या स्वत्वाला बळ देणारे ठरते. वासुदेव बळवंताचे निर्वासित होऊन मरणे, चापेकरांत अदम्य बळ पेरते झाले. चापेकरांचे अलौकिक हौतात्म्य विनायकासाठी आरोग्यदायी बळ ठरले. तसेच आपले ही व्हावे, ही इच्छा व्यक्त करीत विनायकाची कविता थांबते. विनायकाने मागितलेले वरदान छिन्नमुंडा देवतेने दिले म्हणूनच शतकानंतरही सावरकर देशभक्तांची स्फूर्ती बनून उरले.
रसिका ! छिन्नमुंडा कवितेचे हे रूप तू मनात साठवून ठेव. अरे ! माय मराठीत दिसलेले कवितेचे हे अद्‍भुत रूप प्रत्यक्ष देववाणी संस्कृतलाही लाभलेले नाही ! ज्ञानेशाने माय मराठीला अमृतातेही पैंजा जिंकणारी अमृता बनविली तर विनायकाने तिला विषातेहि पचविणारी भैरवी बनविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.