दु. आ. तिवारींना तत्कालीन भारताची अवश अवस्था पाहवत नव्हती. त्याचबरोबर त्यांच्या मनःश्चक्षुपुढून पुरातन भारताची तेजस्वी गाथा हटता हटत नव्हती. त्याचेच प्रतिबिंब कवीच्या ‘एक काळ ऐसा होता’ या विख्यात कवितेत पडलेले दिसते. प्रस्तुत कविता ३५ कडव्यांची असून, चार भागांत विभागली आहे.
पहिल्या भागात प्राचीन भारताचे श्रेष्ठत्व वर्णिताना कवी सांगतो, ‘जग बाल्यावस्थेत होते तेव्हा भारत वेदांत घोष करीत होता, जगाला अक्षरओळखही नव्हती, तेव्हा येथे शास्त्रे रचली जात होती, जग उघडे होते तेव्हा भारत उन्नतीला भिडत होता. ज्ञानवंत, मतिमंत, धन नि विद्या दोहोंनी संपन्न असे लोक येथेच राहत होते. हे केवळ आठवताच रोमांच उठावे असा तो काळ होता.’ ते लोक नुसतेच विद्वान नि धनवान नव्हते, तर अत्यंत श्रेष्ठ चारित्र्य धारण करणारे होते. हे सांगताना कवी गातो-
एक वेळ गेले शब्द काय ते पुन्हां फिरवावे।
प्राणांतिक येवो काळ सत्य ते करून दावावे।
‘एकदा शब्द गेले की प्राणांतिक काळ आला तरी ते पूर्ण करणारे सत्य नि स्वत्वाचे प्रत्यक्ष पुतळे येथे नांदत होते.’ असे सांगत शूर, तापसी नि निग्रह वृत्ती काय असते, याचे उदाहरणच अनुक्रमे अर्जुन, दुर्वास नि भीष्माच्या उर्जस्वल जीवनात दिसून येते. हे सांगता सांगता कर्तव्याच्या पूर्तीसाठीच हे गुण वापरले जात, हेही कवी आवर्जून सांगतो. याशिवाय कुणी आश्रित, शरण आला, तर भारतीय काळाला ही न घाबरता त्याचे रक्षक होतात. कारण देहरूपी चंदन घासून इतरांना सुखविणे, हा त्यांचा धर्मच होता. ही नोंद करायला कवी विसरत नाही. जन्मजात लोकतंत्र त्यांच्यात कसे भिनले आहे, याचा दाखला देताना कवी सांगतो -
परधर्माचे ना व्देष्टे निजधर्माचे अभिमानी|
ना गुलाम करितिल कोणा, राखतील अपुले पाणी|
अपहार न ठावा ज्यांना व्यवहार नीतिचे ज्ञानी |
‘स्वधर्माचा अभिमान राखून परधर्माचा द्वेष न करणारे, सामर्थ्य असूनही कोणाला गुलाम न करणारे, असे तेच लोक असू शकतात जे सत्शील व स्वातंत्र्याचे भोक्ते आहेत. अशा आर्यश्रेष्ठांना प्रसवणारा एक काळ होता. त्यामुळेच या देशात सोन्याचा धूर निघत होता, रत्नांच्या खाणी होत्या, अमृताचा वर्षाव करणारा पाऊस होता. भारताचे वर्णन करताना परकीय भारतीयांची महती या प्रकारे गात होते. असा एक काळ होता.’
कवितेच्या दुसऱ्या भागात मधला हजारो वर्षांचा कालखंड सोडून कवी सरळ १६०० व्या शतकात पोचतो अन् सांगतो, ‘जणू काही रायगडाने बिनतारांचे संदेश सोडावे अन् त्या संदेशाबर हुकूम इतर गडांनी जोमाने झुंजावे. गोळ्यांच्या पर्जन्याने रणमैदाने अशी भिजवून टाकावी की,
शौर्याचा पाहुनी थाट तोंडात घालुनी बोट
फिरवावी रिपुनें पाठ व्हावी भुई थोडी पळता
एक काळ ऐसा होता
शत्रूला विस्मयचकीत होऊन पळायला लावणाऱ्या मावळ्यांचा नेतापण तसाच महापराक्रमी होता. त्याचे वर्णन करताना कवीच्या वाणीला आगळेच तेज चढते
गिरी कुहरांतुनि उफळोनी वनराज केसरी यावा
कीं ज्वालामुखी भडकोनी आगीचा लोळ उठावा
कडकडुनी जलधरमाला वीजेचा गोल तुटावा
‘शिवबाची स्वारी उठली भृकुटी कोणावर चढली?
कोणाची घटिका भरली’ ऐसी चाले जनवार्ता
एक काळ ऐसा होता
‘डोंगर-दऱ्यातून उफळून वनराज येतोय किंवा ज्वालामुखी भडकून आगीचा लोळ उठतोय किंवा वीज कडकडून येतेय, असा भास शिवरायाची स्वारी पाहून शत्रूंना व्हायचा. कोणावर त्याची वक्र दृष्टी पडलीय, कोणाचा काळ आलाय, अशा चर्चा लोकात रंगायच्या. असा हा राजा दिल्लीच्या दाढीवाल्या बादशहाला नि गोव्याच्या टोपीवाल्या पोर्तुगीजाला ही मान्य झाला होता. त्याचे ते शूर सैनिक औरंगपूराचे रूप बेरंग करत दुसऱ्या क्षणी सुरतेवर धडकत, विजयाचा टिळक त्यांच्या भाळी सदोदीत चमकत होता. दिल्लीच्या मशहूर दिल्लेरखानाने पुरंदराला वेढा घातला, मिर्झाराजा जयसिंहासारख्या पराक्रमी सेनानीने कोंढाणा कोंडून धरला, तरी ते वीर मावळे उत्साहाने लढत होते. शीर तुटून पडले, तर त्यांचे धड लढत होते. अशा स्पृहणीय देशभक्तीचा तो काळ होता. जन्मभूमीसाठी मृत्यूच्या दारी जाणाऱ्या, कुळकीर्तीसाठी काळाशी वैर घेणाऱ्या अन् देशबांधवांसाठी शेषावर स्वारी करणाऱ्या शूरांचा तो काळ होता. समशेर, भालेपट्टे कौशल्याने कसे फिरवावेत, भरधाव वेगाने धावणाऱ्या घोड्यावर मांड जमवून कसे बसावे, घोड्यावरून जाता जाता चपळाईने शत्रूचा कंठ कसा छेदावा, हेच तत्कालीन युवकांचे शिक्षण होते. हे सांगताना कवी त्वेषाने लिहितो-
हे शिक्षण नवतरुणांचे देशभक्त या पदवीचे
ना बी ए एलएलबीचे उपयोग काय पण आता
एक काळ ऐसा होता
युवकांच्या या शिक्षणामागे युवतींचा अस्सिम त्याग नि सतीसाध्वीचे तपस्या नसती तर? हे सारे शिक्षण शुष्क शूरतेचे निदर्शक ठरले असते. त्यांच्या त्याग-तपस्यांमुळेच याला मांगल्याचे निधान लाभले. याची जाणीव असल्यानेच कवी गातो-
शिवरायासाठी अपुले सौभाग्यही मळवायाला
एकुलता एकच पुत्र तोही पण गमवायाला
तत्त्पर ज्या होति सुखाने धन्य! धन्य! साध्वी विदुला
अपुले फुटले जरि भाळ सुखी राहो शिवभूपाल
सुखी राहो देश चिरकाळ ध्यास हाच युवती चित्ता
एक काळ ऐसा होता
जर आपले सौभाग्य अन् एकुलता एक पुत्र गमवायला, त्या सतीसाध्वी सिद्ध होत असतील, तर त्यामागे तत्कालीन विपरीत परिस्थिती जशी दिसते. तशीच शिवरायच त्यावर मात करू शकतो ही जनमनात असलेली उत्कट श्रद्धासुद्धा दिसते. त्यामुळेच महाराष्ट्र भूमी भाग्याची सृष्टी झाली होती. तिच्यावर वाकडी दृष्टी टाकण्याची कोणाची छाती होत नव्हती. शिवरायांचा डंका चहुदिशेस वाजत होता. हे सारे आठवून कवी म्हणतो-
घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास
भिजवावी त्याची पाने सोडावा दीर्घच्छ्वास
जीर्ण दुर्ग ते पाहोनी व्हावे हो चित्ती उदास
आठवून त्या त्या गोष्टी लक्षून आजची सृष्टी
अंतरात व्हावे कष्टी येती वच सहजी वदता
एक काळ ऐसा होता
कवीची हळहळ कोणत्याही भाष्याविना कळावी इतक्या या ओळी ठळक आहेत. खरंतर या कडव्यापाशी कवितेचा दुसराच भाग संपतो. यानंतर मराठ्यांचा भारतविजयी इतिहास आरंभ होतो. पायी धावणारे अर्धनग्न मराठे हत्तीच्या अंबारीत बसून वाजतगाजत दिल्ली जिंकून येताना दिसतात. पण त्याआधीच कवी भैरवीचे कडवे गाताना दिसतो. याचे कारण शिवरायांचा उर्ज्वस्वल इतिहास हेच परतंत्र भारताचे भविष्य आहे. याची कवीला असलेली जाण हेच होय.
तिसऱ्या भागाच्या आरंभीच कवी विचारतो, ‘राघोबा कोठे आहे ? बहुधा महाराष्ट्रापासून दूर अहमदाबादच्या वेशीला! नाही नाही; तो तर थेट राजस्थानात अजमेरला पोहोचलाय. पण हे कळण्याआधीच वार्ता आली की तो सुदूर मुलतानाला जाऊन भिडलाय. पुण्याचा हा सेनापती लाहोराचा अधिपती होऊन बसलाय.’ शिवरायाच्या समयी दोन तीन जिल्ह्यापावेतो असलेली ही स्वराज्याची गंगोत्री, पेशव्यांच्या काळी थेट लाहोर पावेतो पोहोचली. हेच गौरवमिश्रित कौतुकाचे उद्गार पहिल्या कडव्यातून झळकताना दिसतात. तेच कौतुक विस्तारताना कवी सांगतो, ‘कृष्णाकाठचे घोडे अटकेपार पोहोचले, सह्याद्रीचे रणशूर हिमालयाला जाऊन भिडले, हस्तिानापूराची लक्ष्मी ढालेवर अर्थात उघड्यावर वाजत गाजत घेऊन आले. पण त्यांना अडवायची कोणाचीच छाती झाली नाही. तिकडे तो म्हैसूरचा वाघ म्हणविणारा टिपू सुलतान सावनेर जिंकून धारवाडात तळ ठोकून बसला. पण शिकारी पटवर्धन येताच तो गडबडा लोळू लागला. हैद्राबादचे वीर आपले स्वत्व राखायला झटताहेत, पण सदाशिवराव भाऊच्या तरवारीचे पाणी चाखून पळतात.
हैद्राबादचे वीर राखाया पाणी झटती
भाऊच्या समशेरीचे चाखोनी पाणी पळती
राहिल कोठचे पाणी पाण्याने तोंडे सुकती !
येथे कवी साधत असलेला ‘पाणी’ शब्दावरचा श्लेष, केवळ आल्हादकच नाही, तर अभिमानाने ऊर भरायला लावणाराच आहे. या साऱ्या यशाचे श्रेय जातिभेद विसरून एकजीव झालेल्या महाराष्ट्राचे आहे, याची जाण कवीला आहे. तितक्यात त्याला संगीन खोचून चालणाऱ्या गारद्याची फौज दिसते, त्यासोबतच ग्वाल्हेरी पगडी तोलत चालणारे सरदार दिसतात, भव्य माळवी रिसाले दिसतात अन् पांढऱ्या शुभ्र हत्तीवर सजून बसलेले पेशवे दिसतात. त्यांना पाहताच देवांचा राजा इंद्रच प्रत्यक्ष अवतरला की काय? असे वाटू लागते या यशाचा गौरव करताना कवी गातो-
गड दुर्ग न ऐसा उरला बोचला न ज्याला भाला
ऐसा न कोणता प्रांत जो पुण्यपुरीस न भजला
भूपती न ऐसा कोणी श्रीमंतास न जो लवला
ज्या दिशेस मुख फिरवावे तेजाचे किरण पडावे
डोळे हे दिपुनी जावे वैभव रवि होता चढता
एक काळ ऐसा होता
भारतातील प्रत्येक प्रांत मराठ्यांनी परशत्रूच्या तावडीतून पराक्रमाने जिंकून घेतला होता. ज्या दिशेस पेशवे मुख फिरवित ते ते प्रांत जिंकले जात. शत्रूंना भीती वाटावी असे शिंदे, होळकर, फडके, पटवर्धन असे एकाहून एक रणधीर सरदार महाराष्ट्राकडे होते. पण त्या मूर्ती आता गेल्यात याचे दुःख कवीला होते. रामेश्वर ते काशीपावेतो सर्व हिंदूजनांना आधार देणारी ती ‘हर हर’ची गर्जना विरून गेली. ती गर्जना पुन्हा ऐकायला येईल काय? या आशेने सूर्य रोज उगवतो अन् गिरीशिखरावरुन, रणतीर्थावरून भटकत भटकत भारताची परवश स्थिती पाहात निराशेने मावळतो, असे कवीला वाटते.
कवितेच्या चौथ्या भागाच्या आरंभीच कवी आष्टी नि कोरेगावच्या युद्धानंतर घरोघरी खुंटीवर टांगलेल्या पगड्यांचा, फुटलेल्या ढालीचा नि वाकलेल्या तलवारीचा उल्लेख करतो. ओढवलेल्या पारंतत्र्यरूपी दुर्दैवाचे वर्णन शूर हळहळत करत होते. कविला पारतंत्र्यशय्येवर झोपलेला भारत दिसतो. त्याच्या आखडलेल्या नाड्या दिसतात अन् त्याला मुक्त करण्यासाठी मीरतेला उठलेला बार, कानपूरला झडलेली फैर नि दिल्लीला माजलेले वैर दिसते. त्यांच्या नेत्यांचे वर्णन करताना तो-
जाहले नानासाहेब साहेबां तैं काळ
केले तात्या टोप्यांनी टोपीवाल्यांचे हाल
झाशीची लक्ष्मी अबला प्रबलांशी करी कल्लोळ
या तीनही वीरांचे रसभरीत वर्णन करत असतानाही, त्यांच्यात निर्माण होऊ न शकलेली एकसूत्रता अधोरेखित करत ‘दीप होय मोठा विझता’ अर्थात, विझताना दिवा मोठा होऊन विझतो तसेच हे घडले. अशी व्यथा व्यक्त करत तो १८५७ च्या समराला विसावा देतो.
इंग्रजी सुधारणेच्या काली जनमानसाला पडलेली भुरळ त्याला डाचत नाही, तर तीमागे असलेले अंधानुकरण त्याला बोचू लागते. देवधर्म झूठ मानून इंग्रजांना देव मानणारी गुलामगिरीची वृत्ती त्याला सहन होत नाही. परक्या संस्कृतीची स्तुती करत वंद्य ऋषिंना नि साधुजनांना हिणविणारी गुलामीची मानसिकता ‘पोशाखीही परवशता’ पर्यत पोहोचल्याने त्याला चीड आणते. स्वजनांची, स्वसंस्कृतीची स्तुती, ती विषयी वाटणारी आपुलकी नैसर्गिक असते. पण स्वसंस्कृतीला निष्कारण धिक्कारत परक्यांच्या संस्कृतीला भजणे, मानवी मनाची हीनताच दर्शवते. तीच कवीला डाचते. त्यामुळे सात्त्विक संतापाने तो बोलतो-
इंग्रजी शिकोनी थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे
एखादी पदवी मिळता विव्दान म्हणुन मिरवावे
वाणीचे तांडव करता परशब्द मध्ये घालावे
खरेच कवीला वाटणारी व्यथा आजही दिसत नाही का? आमच्या रोजच्या बोलण्यात किती परकीय शब्द येतात. जणू काही त्या शब्दांना मातृभाषेत शब्दच नाहीत. आज स्वतंत्र भारतात, स्वराज्याने भूषित महाराष्ट्रात मराठी शाळा किती शिल्लक राहील्यात? कवीची ही व्यथा सुजाण मराठी जनांची आजची कथा आहे, असेच म्हणावे लागेल.
इंग्रजी इतिहासकारांनी नि विद्ववानांनी भारतीय इतिहासाच्या नि साहित्याच्या कुचाळक्या केल्या. येथील पुराणपुरुषांची नि इतिहासपुरुषांची अवहेलना केली. रामायण महाभारत, राम-कृष्ण यांचे वाभाडे काढले. भारताला संस्कृती नाही, असे म्हणणाऱ्या मिस् मेयोपासून तर ही संस्कृती रसातळाला जावी, अशी योजना करणाऱ्या मैकोलेपर्यंत अनेक जण यात होते. यातील एक म्हणजे विल्यम्स जो कालिदासाला कवी मानत नाही, तर मानिएर कालिदासाला कृत्रिम कवी संबोधत असल्याचा दाखला देत, कवी त्यांची मत्सरग्रस्त वक्तव्ये आम्ही मूळ ग्रंथ न पाहता मानतो याचे शल्य दाखवतो. याच श्रेणीत पुढे तो म्हणतो
'शिवभूप लुटारु होता' ढोलके अम्ही बडवावे
'अगदीच निरक्षर होता' तुणेतुणे अम्ही ताणावे
‘विश्वासघातकी होता’ सुरांत सूर मिसळावे
राज्याला मुकलो जैसे बुध्दीला मुकलो तैसे
सांगितले कोणी जैसे मानावे तैसे चित्ता
एक काळ ऐसा होता
इंग्रजांनी त्याकाळी छत्रपती शिवराय ‘राजे’ नसून लुटारू होते, निरक्षर होते, त्यांनी अफजलखानला दगाबाजीने मारले म्हणून विश्वासघातकी होते, इ बदनामीची राळ उठविली होती. त्या विषारी प्रचाराला भारताचा पहिला पंतप्रधानही बळी पडला होता. पण कवी शिवरायाचे महत्त्व ओळखून आहे म्हणून त्याला वाटते राज्याला मुकणे, एकवेळ समजू शकते पण बुध्दीला मुकणे म्हणजे आपखुषीने गुलामगिरी स्वीकारणे. ती सुजाण देशभक्तांना अत्यंत वेदनादायी ठरते, तीच कवी मांडतो. पण कवितेच्या शेवटी त्याला विष्णुशास्त्र्यांची देशभक्तीचा टणत्कार करणारी लेखणी दिसते अन् निश्चयात उभे असलेले लोकमान्य टिळक दिसतात. त्यामुळे राष्ट्रीय व्यथेचे उच्चारण करत हळहळणारी ही कविता थोडासा दिलासा देऊन विसावते.
तिवारींच्या काव्यात केवळ आवाज असतो, खोली नसते म्हणणाऱ्यांना ही कविता चांगलीच चपराक देऊन जाते. नीट पाहिले तर या कवितेत ऊर्जस्वल इतिहासाचे अवगाहन आहे, शत्रू निर्दालनाचे नि विजयी इतिहासाचे आचमन आहे, आत्मविस्मृत समाजमनाचे अवलोकन आहे, अन् त्यावर मात करण्याचे आवाहन ही आहे. त्यामुळेच ही कविता राष्ट्रीय व्यथेची शुष्क हळहळ न राहता राष्ट्रीय अस्मितेचा हुंकार ही बनली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.