ओढ ‘जन्मभूमी’ची!

homeland
homelandesakal
Updated on

जन्मभूमीची ओढ प्रत्येकास असतेच. जर पोटासाठी भटकत तिच्यापासून दूर जावे लागले तर ती अधिकच तीव्रतेने वाटू लागते. कविवर्य वासुदेवशास्त्री खरे यांच्या जन्मभूमीविषयक काव्यातून ती अधिकच तीव्रतेने व्यक्त होताना दिसते. कवितेच्या अगदी आरंभी ः

पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन।

मी राजाच्या सदनि अथवा घोर रानी शिरेन।

नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव।

राहे चित्तीं प्रिय मम परी जन्मभूमी सदैव।।

अशी सलामीच कवीने दिली आहे. पोटासाठी माणसाला आपले गाव सोडून दूर कोठेतरी जावे लागते. तेथे त्याला एकतर सुखासीन वा कष्टमय अवस्थेत राहावे लागते किंवा तेथे थोर लोकांच्या ओळखी होतात. एकतर सन्मानित वा उपेक्षित अवस्थेत तो राहतो. कशा जरी अवस्थेत तो राहत असला तरी त्याच्या मनात कोठेतरी जन्मभूमीची ओढ असतेच.

आताशात तर नोकरी-व्यवसायासाठी माणसाला गावापासून दूर राहावे लागते. त्यातही गत अशी, की पूर्वज कोकणातील, जन्म विदर्भातील, वडिलांच्या नोकरीमुळे कधी नागपुरात, तर कधी लातुरात अन् शिक्षणासाठी जिथे जागा मिळेल तिथे व नोकरीसाठी थेट विदेशात. मन तर लहानपणापासून अमेरिकेच्या वाऱ्या करण्यात गुंतलेले. त्यामुळे दुर्दैवाने जन्मभूमीशी नाळ जुळतच नाही. अशा जन्मभूमी नसलेल्यांचे दुर्दैव त्यांनाच ठावे. ज्यांना ती असते त्यांना ती केव्हा ना केव्हा तरी आठवतेच. सुखापेक्षा दुःखात जास्तच आठवते. त्यातही जर ती आपण राहतो त्या स्थळापेक्षा अधिक रमणीय असेल तर मग विचारायलाच नको. मग चिंतेत, दुःखात वा सुखातही वाटते तिच्याकडे धावत पळत जावे.

homeland
स्वातंत्र्य दिनाला मुलींसाठी PM मोदींची मोठी घोषणा!

वैभवाने नटलेला युरोप पाहून सावरकरांना भरतभूमीचा तारा प्रियकर वाटतो, तर सोन्याने नटलेली लंका जिंकूनसुद्धा श्रीरामांना अयोध्या स्वर्गादपि गरीयसी वाटते. हीच भावना व्यक्त करताना कवी गातो :

पाहें नेत्रें बहुविध असे संपदेचे पसारे।

नाना सौख्यें अनुभविति हे येथले लोक सारे।।

येथें राहूं परि नच शिवें वासना ही मनातें।

याज्जीवही प्रियतम अशी तूंच होशील मातें।।

बघा, कवीची उत्कट भावना बघा. साऱ्या संपदा असताना त्याला त्याची मायभूच प्यारी वाटते. आपण पाहत नाही का? नोकरी कामानिमित्त आपल्या गावात राहणारे काही जण निवृत्तीनंतर आपल्या गावी राहायला जाण्याचा मनोदय बोलून दाखवीत असतात. तोच भाव कवीने अचूक पकडला असे वाटते. हे गात असतानाच त्याला त्याचे बालपण आठवते. बालपणातील ती जन्मभूमी आठवते. आपण तिच्याच मांडीवर खेळत मोठे झालो अन् मोठे होऊन येथे आलो. याचा विषाद त्याला विशेष वाटत नाही कारण त्याला हे ठाऊक आहे पाखरे मोठी झाली की उडून दूर निघून जातात हा नियम आहे. पण जेथे तो राहतो तेथील लोक त्याच्या जन्मभूमीला निर्धन, निःसत्त्व म्हणतात याचेच वैषम्य त्याला जास्त वाटते. सात्त्विक विषादाने उसळून तो सांगतो,

लक्ष्मीस देइ जननाप्रत वारिराशी।

सेवार्थ तो सतत सिद्ध तुझ्या पदाशी।

कवीची जन्मभूमी कोकणात समुद्राच्या काठावर वसलेली आहे. जरी ती निर्धन वाटत असली तरी ते खरे नाही असे कवीला वाटते. तो म्हणतो, ज्याने प्रत्यक्ष लक्ष्मीला जन्म दिला तो सागर जिचे पाय धुतो ती माझी जन्मभूमी निर्धन कशी असेल? तो सागरकिनारा, ते अढळ सौंदर्य त्याच्या मनश्‍चक्षूंपुढे तरळते व तो तिचे वर्णन करू लागतो.

homeland
श्री सत्यनारायण कथेचे आरोग्यदायी, सांस्कृतिक महत्त्व

लाटा आपटतां उठे ध्वनि शिरे तो ज्यांचिया कंदरी।

ऐसे पर्वत दुर्ग शोभति अति प्राचीन ज्यांच्या शिरी।।

‘धो धो’ शब्द करीत त्यांतुन झरे खाली कसे धांवती!।

पाणी तेच पिऊन बाग उठती शोभा तयातें किती!।।

आंबे पोफळि साग नारळि तटी दाटे तरुंचे बन।

झोके घेति सुरम्य चंचळ जळीं छाया तयांच्या घन।।

आकाशी जणु कीं विजा तळपती मासे जळी त्यापरी।

खाड्या त्या जन्मभूमि नयनीं पाहिन केव्हां तरी!।।

रसिका, या ओळी मी मुद्दाम­च जशातशा दिल्या. या वाचताना तुला काही वाटते का? क्षणभर डोळे मिटून या ओळी अनुभवून बघ. अंगावर रोमांच उभे राहतील. किती सुंदर वर्णन आहे हे! धो धोचा घोष करीत धावणारा धबधबा; कल्पनाच किती मनोहर! कवी झऱ्याला कोसळणारा नाही म्हणत, कोसळण्यात पडण्याचा भाव आहे धावण्यात तो नाही. शिखरापासून सागरापावेतो त्या झऱ्यासोबतच आपण धावत येतो असे वाटायला लागते. ते पाणी पिऊन फुलणाऱ्या बागांची शोभा किती! असे म्हणून कवी थांबतो. अप्रतिम, अद्‌भुत अशा कोणत्याही शब्दात तिला गोवीत नाही, वाचकांसाठी ते विशेषण मोकळे सोडतो. बरे ज्या सागराशी झरा पोचतो त्याची तुलना सरळ आकाशाशी करीत तो मोकळा होतो. म्हणजे वरून येणारा झरा खाली न कोसळता जणू आकाशाशीच भिडतो असे वाटायला लागते. कवीने जन्मभूमीचे वर्णन करताना योजलेल्या या ओळी मराठीतील अत्युत्तमातील आहेत अशी अनेकांची साक्ष आहे.

https://dai.ly/x83f6ul

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.