लैंगिक समस्येवर बिनधास्त बोला!

आपल्या लैंगिक समस्येबद्दल पुरुष कधीच खुलेपणाने बोलत नाहीत. सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्यापेक्षा उपचार न करण्यावरच त्यांचा भर असतो. त्यांच्यासाठी ‘अँड्रॉलॉजी’ वैद्यकीय शाखा वरदान ठरू शकते.
लैंगिक समस्येवर बिनधास्त बोला!
Updated on

- डॉ. प्रियांक कोठारी

आपल्या लैंगिक समस्येबद्दल पुरुष कधीच खुलेपणाने बोलत नाहीत. सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्यापेक्षा उपचार न करण्यावरच त्यांचा भर असतो. त्यांच्यासाठी ‘अँड्रॉलॉजी’ वैद्यकीय शाखा वरदान ठरू शकते.

भारतात पुरुषांमधील लैंगिक समस्यांची प्रकरणे विशेषतः शहरात आणि हल्लीच्या काळात ग्रामीण भागातही वाढत आहेत. पुरुषांमधील लैंगिक समस्या आगामी काळात आरोग्य क्षेत्रात महामारीचे स्वरूप घेण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे जोडप्यांमध्ये नपुंसकता हे घटस्फोटाचे मोठे कारण ठरत असल्याचे मुंबईत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

लैंगिक समस्यांबाबत जनजागृती वाढत आहे; पण अजूनही बहुसंख्य जणांना त्याबद्दल अतिशय कमी माहिती आहे. लैंगिक क्रिया आणि त्यासंबंधीचे आजार अशा गोष्टींवर चर्चा करणे आजही निषिद्ध मानले जाते. पुरुषही त्याबाबत बोलणे टाळतात. अशा मानसिकतेमुळे व समाजाच्या दबावामुळे कुठल्याही विशेषज्ञाची मदत ते घेत नाहीत. पुरुषांच्या लैंगिक समस्या आणि वंध्यत्वाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्यासाठी असलेली ‘अँड्रॉलॉजी’ नावाची वैद्यकीय शाखा त्यांच्यासाठी वरदान ठरू शकते.

ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे ‘अँड्रॉलॉजिकल’ समस्या सामान्य झाल्या आहेत. आधुनिक शहरीकरण आणि पर्यावरणीय प्रदूषण यांचा तो परिणाम आहे. अँड्रॉलॉजी ओपीडीत दर महिन्याला किमान दीडशे रुग्ण येतात. पुरुषांमध्ये जसजशी जागृती होत आहे, तसतशी संख्या वाढत चालली आहे. अनेक पुरुष आपल्या लैंगिक समस्या घेऊन येत आहेत. दिवसेंदिवस शुक्राणूंची संख्या घटण्याचे प्रकार वाढत आहेत.

शुक्राणूंची ढासळती गुणवत्ता पुरुषांमधील वंध्यत्वाचे कारण ठरत आहे. अंडकोषाच्या वरील भागातील नसांवर सूज आल्यामुळे तयार होणाऱ्या शुक्राणूंच्या असमान संख्येवर औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करून उपचार केले जाऊ शकतात. उपचारानंतर सुधारणा होण्याची शक्यता व्यक्तिपरत्वे बदलते; पण सुधारणा झाली, तर नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे. शिरांवरील अडथळ्यांसाठी ‘मायक्रोस्कोपिक सर्जरी’ केल्यानंतर खूप चांगले परिणाम घडून आल्याची उदाहरणे आहेत.

हल्ली पुरुषांमध्ये ‘अझूस्पर्मिया’चे (वीर्यामध्ये शुक्राणूंचे शून्य प्रमाण) प्रकार वाढत आहे. शुक्राणू वाहून नेण्यासाठी नळ्यांचा (ट्युब) अभाव असणे किंवा अडथळ्यांमुळे असे घडत आहे. नळ्या पुरेशा असतील, तर असा अडथळा मायक्रोस्कोपिक सर्जरी करून दूर केला जाऊ शकतो. जर अडथळा खूप मोठा असेल, तर थेट नळीतून किंवा वृषणातून शुक्राणू उचलले जातात आणि ‘आयव्हीएफ’साठी (टेस्ट ट्यूब बेबी) वापरले जातात. गायनॉकॉलिजिस्टच्या मदतीने भ्रूण तयार करण्यासाठी शुक्राणू आणि बिजाचा संयोग घडवून आणला जातो. इनक्युबेटरमध्ये ते भ्रूण वाढवले जाते आणि ते सदृढ असल्यास गर्भाशयात रोपण केले जाते.

काही रुग्णांना शून्य शुक्राणूची समस्या असते. अशा काही रुग्णांमध्ये वृषणात तयार होणारे शुक्राणू स्खलनाच्या वेळी कमी मात्रेत बाहेर फेकले जाण्याची समस्या असते. अशा वेळी नीडलच्या सहाय्याने किंवा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून वृषण उघडून त्यातून शुक्राणू काढले जातात. अशा प्रकारे शुक्राणू सापडले, तर त्यांचा वापर टेस्ट ट्यूब बेबीसाठी केला जातो. अनेकदा गर्भधारणा होण्यासाठी थोडेसे किंवा एक शुक्राणूही पुरेसा असतो. अशी समस्या असलेल्या रुग्णांसाठी नवतंत्रज्ञान एक वरदान ठरत आहे.

सर्वसामान्यपणे आढळणारी लैंगिक समस्या म्हणजे शीघ्रपतन. त्यात पुरुष आपल्या स्खलनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. शीघ्रपतनामुळे त्याची जोडीदार असमाधानी राहते. अनेकदा संकोच वाटत असल्यामुळे पुरुष अशा समस्येविषयी बोलत नाहीत. शीघ्रपतनावर ‘बिहेव्हियरल थेरपी’द्वारे (व्यायाम) उपचार केला जातो आणि गरजेनुसार किंवा रोज औषधोपचार केले जातात. नव्या उपचार पद्धतीमध्ये लिंगाच्या टोकावर स्प्रे लावला जातो.

त्यामुळे लिंगाची संवेदनशीलता कमी होते आणि स्खलनाचा वेळ वाढतो. कधी कधी मानसिक कारणांमुळे किंवा लिंगाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे ताठरता न येण्याची समस्याही उद्‍भवते. नपुंसकत्वामुळे वैवाहिक आयुष्यात बेबनाव होतोच; पण नात्यामध्ये वैफल्यही येते. मानसिक नपुंसकत्वावर समुपदेशन आणि अँटीएंग्झायटी औषधांच्या सहाय्याने उपचार केले जातात. ताठरतेसाठीही काही औषधे दिली जातात. एकदा आत्मविश्वास आला की जोडप्यांना औषधाचीही गरज भासत नाही.

मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल विकार, लठ्ठपणा, जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, वजन घटणे इत्यादीमुळे लिंगाला होणारा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. औषधोपचाराने त्यात सुधारणा होऊ शकते. अनेक आजार असणाऱ्या व्यक्तीला इंट्रापेनिल इंजेक्शन दिले जाते. जसे की मधुमेहासाठी इन्सुलीन. ज्यांना याचा फायदा होत नाही त्यांना शस्त्रक्रियेचा (पेनाईल इम्प्लांट्स) पर्याय आहे.

अशा प्रक्रियेत लिंगाच्या दोन ट्यूब्जमध्ये सिलिकॉन इम्प्लान्ट ठेवली जाते, जेणेकरून संभोगाच्या दरम्यान लिंगाला ताठरता येते. ‘कन्सिलमेंट’मध्ये लिंग वर किंवा खाली वाकवले जाते. ‘प्रोस्थेसिस’ रोपणामध्ये लैंगिक क्रिया पुन्हा कार्यान्वित केली जाते. त्यात एक टक्के रुग्णांना संसर्ग होण्याची भीती आहे.

‘इंडियन (शाह) पेनाईल प्रोस्थेसिस’ उपचारावरील खर्चासाठी एक उत्तम पर्याय आहे. आयात केलेले रोपण जे अधिक खर्चिक आहेत तेही उपलब्ध आहे. ताठरतेमध्ये खूपच समस्या असणाऱ्या रुग्णामध्ये रोपणामुळे चांगली सुधारणा घडून येते. लिंग वक्रतेची (पेनाईल कर्वेचर) समस्यासुद्धा आता सर्वसामान्य झाली आहे. त्यामुळे संभोगात अडथळे येत असल्याने पुरुषांमध्ये चिंता वाढते. त्यावर औषधोपचार, व्हॅक्यूम थेरपी आणि स्ट्रेच थेरपीचा पर्याय आहे. अत्यंत गंभीर प्रकरणात शस्त्रक्रिया केली जाते.

पुरुषांमधील लैंगिक समस्या अधिक सर्वसामान्य झाल्यामुळे अँड्रॉलॉजीला उज्ज्वल भविष्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीनवर आधारित वीर्य विश्लेषण हे तंत्रज्ञानही पुढे येत आहे. जगभरात अँड्रॉलॉजीची नवीन युनिट्स तयार होत आहेत आणि त्यांना चांगल्या संसाधनांची गरज आहे. शुक्राणू काढणे आणि संरक्षित करण्यासाठी प्रगत प्रजनन तंत्र उपलब्ध आहे. टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान महाग असले, तरी ते प्रगत होत आहे. पुरुष आणि जोडप्यांना अशा समस्यांविषयी जागृत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत, म्हणजे कुठे ते उपचार घेतील. रुग्णांना सेवा देण्यासाठीचे आमचे हे पहिले पाऊल असेल.

drpdrkothari@gmail.com

(लेखक नायर रुग्णालयातील युरोलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत. अँड्रॉलॉजी ओपीडीची जबाबदारी त्यांच्यावर आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.