देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय गाठू शकतं. जागतिक पातळीवर भारत याबाबतीत "राजदूत' ठरू शकतो...
"ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी'त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी नुकतेच के. आर. नारायणन स्मृतिव्याख्यान दिलं. त्या व्याख्यानाचा हा संपादित गोषवारा.
भारताचे माजी राष्ट्रपती के. आर.नारायणन यांनी शिक्षणतज्ज्ञ, मुत्सद्दी म्हणूनही ठसा उमटवला. "राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळे'ला त्यांनी 1982 मध्ये भेट दिली. त्यावेळी "जलशक्ती' या पाणी शोषणाऱ्या पॉलिमरचं प्रात्यक्षिक त्यांना दाखवण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळाली. भारतातल्या दुष्काळप्रवण प्रदेशातल्या शेतीसाठी जलशक्तीचा कसा वापर होईल, हा त्यांचा प्रश्न आजही मनात रेंगाळतोय. नारायणन यांच्याशी यानंतर विज्ञान आणि सर्जनशीलता या विषयांवर अनेकदा चर्चा करण्याची संधी मला मिळाली. या व्याख्यानाच्या निमित्तानं सहज मागं वळून पाहताना त्यांच्या आणि माझ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींमधलं साधर्म्य मला जाणवलं. नारायणन यांच्याप्रमाणेच मलाही प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करावा लागला. केरळमधल्या एका छोट्या खेड्यात त्यांचं बालपण गेलं, तर माझं गोव्यातल्या लहानशा गावात. नगरपालिकेच्या शाळेत मी अनवाणी जात असे. नारायणन रोज शाळा गाठण्यासाठी 15 किलोमीटर चालत जात. दोघंही "टाटा'चे शिष्यवृत्तीधारक. त्यानिमित्तानं परदेशात जाऊन ऐन तारुण्यातच देशासाठी काहीतरी करण्याच्या ऊर्मीनं मायदेशी परतलो. थोडक्यात सांगायचं तर परिघावरच्या व्यक्तीदेखील आपल्याकडच्या लोकशाही व्यवस्थेत कशा रीतीनं सामावून घेतल्या जातात. एवढेच नव्हे तर, सक्षम होऊन भरीव योगदान देऊ शकतात, याचीच ही उदाहरणं आहेत.
टाटा समूहाच्या शिष्यवृत्तीतून कॉर्पोरेट विश्वस्तांची भूमिकाच जाणवते. आज ही संकल्पना "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी'च्या (सीएसआर) रूपात आपल्याकडं आहे. टाटांनी नैतिक जबाबदारीतून सीएसआरची आखणी केली. भारत सरकारनं कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या निव्वळ उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम "सीएसआर' म्हणून खर्चण्याचा कायदा नुकताच केला आहे. त्याला मी "सीएसआर 1.0' म्हणतो. कंपन्यांना अतिरिक्त उत्पन्नातला हिस्सा स्वेच्छेनं किंवा कायद्यानुसार समाजाला द्यावा लागतो. चांगलं काही घडवणं आणि इतरांनाही मदत करणं, असं त्यांचं स्वरूप. एखाद्यानं पुष्कळ संपत्ती जमवल्यावर इतरांसाठी सेवाभावी संस्था उभारणं असा याचा अर्थ होतो.
आताच्या काळात मी "सीएसआर 2.0' ही संकल्पना मांडू इच्छितो. "सीएसआर 1.0'ला पूरक असणाऱ्या या संकल्पनेतून लक्षावधी लोकांच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो. ही संकल्पना अशी ः चांगल्या कृतीतून जास्तीत जास्त लोकांचं भलं करणं. देशात विषमतेचं आव्हान तीव्र आहे. त्यातून सामाजिक सौहार्द बिघडतं. मात्र, "सीएसआर 2.0'च्या माध्यमातून आपण संधीची समानता आणू शकतो. त्यासाठी आपल्या उद्योगांची कार्यपद्धती बदलली पाहिजे. धोरणप्रक्रियाही त्याला अनुरूप असायला हवी.
"उद्दिष्टलक्ष्यी सर्जनशीलता' (ऍश्युअर्ड इनोव्हेशन) समजून घेण्यासाठी आपण काही प्रमुख आव्हानात्मक प्रश्नांचा विचार करूया.
- प्रति जीबी अवघ्या सहा रुपयांमध्ये (दहा सेंट) 4 जी इंटरनेट सेवा आणि सर्व व्हॉइस कॉल्स.
- स्तनाच्या कर्करोगनिदानाची उच्च दर्जाची, सहज सोपी चाचणी 70 रुपयांमध्ये.
- अवघ्या पाच रुपयांमध्ये तत्काळ रिपोर्ट देणारे पोर्टेबल ईसीजी आणि डोळेतपासणीच्या पारंपरिक मशिनपेक्षा तिप्पट स्वस्त मशिन.
- डेंगूचं निदान पहिल्याच दिवशी करणारी चाचणी.
खरंतर, या सर्व गोष्टी भारतानं साध्य केल्या आहेत, केवळ तांत्रिकच नव्हे, तर तंत्रबाह्य सर्जनशीलतेतून.
डिजिटल क्रांतीतला कल्याणकारी आशय
भारतानं मोबाईल क्षेत्रात मोठीच क्रांती घडवली. देशात 1995 ते 2014 या 20 वर्षांत 90 कोटी ग्राहकांची भर पडली. अर्थात, या दमदार कामगिरीनंतरही "डिजिटल-दरी' निर्माण झाली. अनेकांना कॉलिंग परवडत नसे. आज मात्र आमूलाग्र बदल दिसतो. "रिलायन्स जिओ'मुळं लाखो भारतीय विनामूल्य व्हॉइस कॉलिंगचा आणि 4 जी इंटरनेटचा स्वस्तात आनंद लुटत आहेत. जिओचं 2 जी आणि 3 जी कुठलीही पार्श्वभूमी नसलेलं 4 जी एलटीई नेटवर्क संरचनेच्या दृष्टीनं जगातलं एकमेव ठरावं. या नेटवर्कमुळं जिओला विनामूल्य व्हॉइस कॉल्स देतानाच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवणंही शक्य झालं. जिओची इतरही उत्पादनं बिझनेस मॉडेल, सेवा सर्जनशीलतेच्या व्याख्येत बसण्यासारखीच. "जिओ'च्या आधार-क्रमांकावर आधारित केवायसी पद्धतीमुळं सिमकार्ड अवघ्या पाच मिनिटांत सुरू होतं. पारंपरिक टॉवरपेक्षा तिपटीनं कमी ऊर्जा लागणारे दहा हजार टॉवर आणि अडीच लाख किलोमीटरच्या फायबर ऑप्टिक केबल्सच्या जोरावर जिओनं साम्राज्य उभं केलं. जिओचे "फीचर फोन'ही नावीन्यपूर्ण आहेत. जिओच्या जोरावर भारतानं जागतिक मोबाईल इंटरनेट वापरात अवघ्या एका वर्षांत 155 वरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.
बड्या कंपनीला हे जमले;पण छोट्या उद्योजकांचं, स्टार्टअपचं काय, असा प्रश्न कुणी विचारेल. पण तेही सर्जनशीलतेची ही वाट चोखाळत आहेत. माझ्या आईच्या नावे असलेल्या "अंजली माशेलकर इनक्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड'चे विजेते हीच गोष्ट सिद्ध करतात. "उत्कृष्ट सर्जनशील उत्पादने परवडण्याजोगी नसतात', या गृहितकाला या पुरस्कारार्थींनी छेद दिला.
भारतात स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत असून 20 कोटी महिला जीवनदान ठरणाऱ्या वार्षिक तपासणीकडं दुर्लक्ष करतात. मिहीर शाह या नव-उद्योजकाच्या "युई लाईफसायन्सेस'नं स्तनचाचणीसाठी "आयब्रेस्ट एक्झाम' नावाचं साधं, अचूक, किफायतशीर उपकरण बनवलं आहे. त्यांनी ते प्रतिचाचणी केवळ 65 रुपयांत उपलब्ध करून दिलं, हे विशेष. त्यामुळं, देशाच्या अगदी दुर्गम भागातल्या महिलांची चाचणी होऊ शकते. जगात 50 कोटी महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
हे एकमेव उदाहरण नाही. भारतात 2020 पर्यंत हृदयविकारानं सर्वाधिक मृत्यू होण्याच्या अंदाज असल्यानं हृदयचाचणीसाठीही अशाच स्वस्त, अचूक उपकरणाची गरज होती. राहुल रस्तोगीनं काडीपेटीच्या आकाराचे ईसीजी मशिन तयार करून भारतीयांचं हृदयच जिंकलं आहे. "संकेत' नावाच्या 12 शिसे असणाऱ्या या चिमुकल्या ईसीजी मशिनमधून अवघ्या पाच रुपयांत ईसीजी काढला जातो. स्मार्टफोनवर ईसीजीचा आलेख पाहता येतो. तो डॉक्टरांना ई-मेल, ब्लूटूथद्वारे तत्काळ पाठवता येतो. महागड्या ईसीजी मशिनला हा आश्वासक पर्याय ठरेल. डोळेतपासणीच्या "3 नेत्र' या उपकरणानंही नवी दृष्टी विकसित केली आहे. नेत्ररुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या भारतासारख्या देशासाठी हे उपकरण वरदानच. डोळ्यांच्या पाच आजारांची पूर्वतपासणी त्यामुळं सहजसोपी, किफायतशीर बनली आहे. डॉ. नवीन खन्ना यांनी विकसित केलेली डेंगूचं काही मिनिटांत निदान करणारी "डेंगू डे 1' ही चाचणीही अशीच. ती डेंगूच्या प्राथमिक आणि दुय्यम विषाणूंतला फरक, तसंच विषाणूचं डासांमधलं अस्तित्वही ओळखते. प्रतिव्यक्ती 130 रुपयांपर्यंत शुल्क असणाऱ्या या चाचणीनं भारतातली 80 टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. डेंगूसाठी संवेदनशील असणाऱ्या आपल्या देशासाठी ही चाचणी उपयुक्त ठरेल, तसेच इतर देशांवरचं अवलंबित्वही संपेल.
खरंतर नावीन्यपूर्णता हा मागणी आणि पुरवठा यातला अर्थपूर्ण संवाद असतो. पुरवठ्याबरोबरच मागणीसाठीही आक्रमक पुढाकार घ्यावा लागतो. सार्वजनिक खरेदी हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सरकार छोट्या नावीन्यपूर्ण संस्थांचा पहिला ग्राहक आणि वापरकर्ता ठरू शकतं. त्यामुळं, संस्थांचा निधीचा सुरवातीचा प्रश्न सुटेल, तसेच त्यांना जागतिक बाजारपेठेशी सामना करण्यासाठी उत्पादनामध्ये सुयोग्य बदलही घडवून आणता येतील. सरकार अप्रत्यक्षरीत्या बदलत्या बाजारपेठीय रचनेच्या दृष्टीनं नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी नियम ठरवू शकतं. सुयोग्य नियमनातून अशा उत्पादनांना मागणी निर्माण करणे सरकारला शक्य आहे.या प्रयत्नांतून बाजारपेठ खुली होईल.
खासगी क्षेत्राचीही समाजासाठी काही चांगलं करण्याची इच्छा असते. मात्र, सार्वजनिक धोरणाअभावी त्यांची गती कुंठते. दारिद्य्र आणि निरक्षरता यांचं दुष्टचक्र आपल्याला ठाऊक आहेच. अनेक वर्षांच्या राष्ट्रीय साक्षरता मोहिमेनंतर आजही भारतात 30 कोटी नागरिक निरक्षर आहेत. "एफसी कोहली' या "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'मधल्या कंपनीनं साक्षरतेसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कॉम्प्युटर-बेस्ड् फंक्शनल लिटरसी (सीबीएफएल) नावाच्या या उपक्रमात निरक्षर व्यक्तीला अवघ्या 40 तासांत वृत्तपत्र वाचायला शिकवलं जातं. शब्दांपेक्षा अक्षरावर भर देणारा हा उपक्रमही पारंपरिक पद्धतीपेक्षा बराच किफायतशीर आहे. या उपक्रमांतर्गत हैदराबादजवळील मेडक गावातल्या महिला दहा आठवड्यांतच तेलगू वृत्तपत्र वाचायला शिकल्या. या वेगामुळं भारतातले सर्व निरक्षर पाच ते सात वर्षांतच साक्षर होतील. योग्य धोरण तसंच माहिती तंत्रज्ञान आणि साक्षरता विभागाच्या भागीदारीच्या अभावानं या उपक्रमानं पुरेशी गती पकडलेली नाही. मात्र, सार्वजनिक धोरणाचं विरोधाभास दर्शविणारं उदाहरणही आहे. "प्रधानमंत्री जनधन योजने'त भारतात एकाच आठवड्यात एक कोटी 80 लाख 96 हजार 130 बॅंक खाती उघडण्याच्या विक्रमाची नोंद "गिनीज बुक'मध्ये झालीय. सर्व आर्थिक सेवांसाठी ती पायाभूत असतील. आपल्याला जन धन, आधार आणि मोबाईलनं आर्थिक समावेशनाच्या पुढच्या पायरीवर पोचवलं आहे. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आता तंत्रज्ञानाच्या लाटेमुळं अक्षरश: कवेत आल्या आहेत. दर्जेदार नावीन्यपूर्ण उत्पादनं आणि परवडण्याजोग्या किमती यामुळं समाजात समानतेची बीजं रुजवता येतील. उद्दिष्टलक्ष्यी सर्जनशील उद्योगांचं वैशिष्ट्य म्हणजे ते नवे ग्राहक तयार करतात. पूर्णपणे नवा विचार त्यामागं असतो. पारंपरिक चौकटीला आव्हान दिलेलं असतं. अन्य विद्याशाखांतील ज्ञानाचाही त्यात उपयोग केलेला असतो.
उद्दिष्टलक्ष्यी सर्जनशीलतेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे आजच्या काळात आवश्यक असलेलं सामाजिक सौहार्द त्यातून निर्माण होऊ शकतं. आर्थिक विषमता असली तरी नवं तंत्रज्ञान यानिमित्तानं सर्वांच्याच आवाक्यात येणार असल्यानं विषमतेची तीव्रता नक्कीच कमी होईल.
नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान गरिबांना परवडेल, यावर विश्वास हवाच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गरीब लोक उच्च तंत्रज्ञान आत्मसात करून वापरू शकतात, यावरही विश्वास हवा. ग्राहकाचं पूर्ण समाधान करता यायला हवं. कंपन्यांच्या "संशोधन आणि विकास विभागांनी'ही मनोवृत्तीत बदल करत, साध्या पण उपयुक्त दर्जेदार उत्पादनांची कास धरावी. त्यासाठी सध्याच्या बाजारपेठेच्या पैसाकेंद्रित दृष्टिकोनाऐवजी ग्राहककेंद्रित दृष्टिकोनही स्वीकारावा लागेल. अर्थात, इतर कशाहीपेक्षा आनंद, आरोग्य, शांतता या मूलभूत मानवी गरजांवरचा ठाम विश्वास अधिक महत्त्वाचा आहे. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्रं "चांगल्यातून अधिक चांगल्याकडं' हे उदात्त ध्येय गाठू शकतात. जगासाठी नेहमीच शांतता आणि सदिच्छेचा राजदूत असलेला आपला देश भविष्यात जागतिक पातळीवर सर्वांसाठी उपयुक्त असणाऱ्या "उद्दिष्टलक्ष्यी सर्जनशीलते'चाही राजदूत (ऍम्बॅसेडर) ठरेल. अशा सर्जनशीलतेतून काही मूठभरांचं नव्हे, तर सर्वांचंच कल्याण साधता येईल.
(अनुवाद: मयूर जितकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.