आमच्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी निसर्गाचं रहस्य समजण्यासाठी आणि मनुष्य व निसर्ग यांच्या संबंधांतील गुंता सोडविण्यासाठी जे अविरत प्रयत्न केले, त्याला वेद साक्षी आहेत.
- डॉ. राजेंद्रसिंह saptrang@esakal.com
आमच्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी निसर्गाचं रहस्य समजण्यासाठी आणि मनुष्य व निसर्ग यांच्या संबंधांतील गुंता सोडविण्यासाठी जे अविरत प्रयत्न केले, त्याला वेद साक्षी आहेत. वेदांचं अंतिम अंग, ज्यांना आरण्यक अथवा उपनिषद म्हटलं जातं, ते आरण्यक अथवा वनलेख ब्राह्मणांच्या परिशिष्टांसमान होतं. ती सामान्यपणे वेदांची शृंखला होती. त्यातही यज्ञ करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. उदाहरणासाठी मुंडकोपनिषदात बघा,
‘तपसा चीयते ब्रह्मा ततोडन्नमभिजायते |
अन्नात्प्राणो मन सत्यं लोकाः कर्मसु चामृतम् ||८||
(मुंडक प्रथम भाग)
चिंतनाने ब्रह्माचा विस्तार होतो, त्याच्यापासून अन्नधान्याचं उत्पादन होतं, अन्नापासून जीवन, जीवनापासून मन, मनापासून यथार्थ (पंचभूत), त्यापासून संस्कार आणि संस्कारापासून कर्मकांड, कर्मकाडांपासून अमरत्व प्राप्त होतं.
बृहदारण्यकोपनिषद ब्रह्मांडाच्या विषयात म्हणतं की, आप ऐवदमग्न आसुरता आप सत्यसृजंत सत्य ब्रहावहा प्रजापति देवास्ते देवाः सत्य वायासेस...
ब्रह्मांडात सुरुवातीला पाणीच पाणी होतं, त्या पाण्यातून सर्वांची निर्मिती झाली. ब्रह्मच सर्व आहे. ब्रह्माने प्रजापतीची सृष्टी निर्माण केली आणि प्रजापतीने देवतांची. या देवतांनी सर्वांचं चिंतन सुरू केलं.
यालाच तैत्तरीय उपनिषदात अशाप्रकारे सांगितलं गेलं आहे.
तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः ।
आकाशाद्वायुः । वायोराग्निः अग्नेरापः। अद्भ्यः
पृथिवी पृथिव्या औषधयः औषधीभ्योङ्न्नम्। अन्नात्पुरुषः।
आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली. त्याच्यापासून निसर्ग आणि आत्म्यापासून मनुष्य निर्माण झाला. त्याच्या उत्पत्तीनंतर जीवित राखणारा मूर्त ब्रह्मा म्हणजे वायुमंडळ आहे. ही बाब बृहदारण्यक उपनिषदाच्या (२-३-१) मध्ये म्हटली आहे. याच उपनिषदात हेही म्हटलं आहे की, ब्रह्म निसगपिक्षा वेगळा नाही, तो स्वतः निसर्ग म्हणजे ब्रह्मांडच आहे. उपनिषद काळानंतर ब्राह्मणकाळात कर्मकांड ज्या स्वरूपात आपल्या परमोच्च उत्कर्षावर पोहोचलं, त्यात ज्ञानाचा आणि संवेदनांचा ऱ्हास झाला. निसर्गाविषयीचीही समज कमी होत गेली. या कारणांमुळे क्रौर्य, हिंसाचार, पीडा, दुःख, वेदना वाढत गेल्या.
सिंधू खोऱ्यातील प्राचीन संस्कृती हळूहळू विकसित होत निसर्गाच्या नियमानुसार समाप्त झाली. त्यासोबत आणि त्यानंतर वैदिक संस्कृतीचा प्रभाव वेदांतकाळ आणि मग ब्राह्मणकाळातून मार्गक्रमण करता करता इथे क्रौर्याने मूळ धरलं. हिंसा, दुःख, पीडा या सर्व निसर्गविरोधी शक्ती उभ्या राहू लागल्या. निसर्गविरोधकांमध्ये ‘सत्ते’साठी संघर्ष, हिंसाचार वाढला आणि सर्वत्र हाहाकार माजला.
आजपासून सुमारे २ हजार ६०० वर्षांपूर्वी भगवान बुद्धांसारखे शांतीचा संदेश देणारे अवतार जन्माला आले आणि त्यांनी चौफेर अहिंसेचा संदेश दिला. याच काळात भगवान महावीरांचा जन्म झाला आणि त्यांनी ‘अहिंसा परमो धर्मा’ला परमोच्च शिखरावर पोहोचविलं.
डोंगर, माती, वृक्ष, रोपटी हे देवांप्रमाणे जीव आहेत. त्यांच्यासोबत आमचा व्यवहार हा आम्ही आमच्या शरीराशी करतो तसाच व्हायला हवा. कारण त्यातही आमच्या शरीराप्रमाणे जीवनाचं चलनवलन होत असतं, असं भगवान महावीरांनी ‘अयारो’ नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे. ‘अयारो’ हे पुस्तक मानवाला निसर्गाशी व्यवहार करायला शिकवतं. आज तर हे पुस्तक व्यवहारात आणणं पर्यावरणप्रेमींसाठीही अवघड ठरलं आहे. पण, जैन धर्माच्या उत्कर्षाच्या काळात हे पुस्तक लोकांसाठी आचारसंहिता ठरलं असेल.
मात्र, इतर धर्मांप्रमाणे जैन धर्मही काही काळानंतर विविध संप्रदायांमध्ये विभागला गेला. त्यानंतर इथे सांख्यदर्शनाचा प्रभाव वाढला. या काळात निसर्ग अविनाशी, अनादी आणि अनंत मानला गेला. अनेकानेक रूपांच्या या जगाचा क्रमिक विकास निसर्ग अथवा प्रधानामुळे झाला आहे, जो बोधहीन आणि संवेदनाहीन आहे, अविकसित आणि अरूप आहे, असं सांख्याने शिकवलं. त्याची उत्पत्ती पंचवीस सिद्धांत अथवा तत्त्वांच्या क्रिया-प्रक्रियेतून झाल्याचं सांख्याने मानलं आहे. गाय दूध देते, दुधापासून लोणी तयार होतं, तेवढीच ही उत्स्फूर्त क्रिया आहे, असं सांख्याने मानलं आहे.
वैशेषिक दर्शनात कणाद ऋषींनी अणूंपासून विश्वाचा विकास झाल्याची कल्पना मांडली. त्यांनी भौतिक तत्त्वांना ‘क्रियामाणवत् समवायि कारण-मिति द्रव्यलक्षणम’ पृथ्वी, आप (जल), तेजस (अग्नी), वायू (हवा, आकाश), ईश्वर, काळ (वेळ), दिक् (आकाश), आत्मन् (आत्मा) आणि मनस (मस्तक) या द्रव्यांमध्ये वाटून पाहिलं. ही नऊ द्रव्यं मिळूनच सर्व काही निर्माण करतात, असं ते म्हणाले. अणू मृत्यूही नाही आणि निष्क्रिय व स्थितप्रज्ञही नाही. अणू स्वतःच आपल्या गुणांच्या आधारे कार्यान्वित होतो. कणाद ऋषींनी प्रथमच आत्म्याला अन्य पदार्थांसमान एक पदार्थ मानलं आहे, ज्यात चेतनेचं अस्तित्व मानलं आहे. इथूनच निसर्गाप्रती आस्थेचा प्रारंभ झाला.
कौटिल्याच्या काळात न्याय लोकप्रिय तत्त्वज्ञान होतं. त्याच्यानुसार विश्वाची रचना करणारं तत्त्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश शाश्वत आणि यथार्थ आहेत, त्यासाठी या विश्वाची उत्पत्ती समजविण्यासाठी कुठल्या ईश्वराची (अलौकिक नैसर्गिक शक्तीची धारणा) आवश्यकता नाही. वैशेषिक तसंच न्याय दर्शन, दोघांनीही सुरुवातीला तर पदार्थांचा कुठलाही स्पष्ट स्वीकार केला नाही, नंतर त्यातही निसर्गाची (सृष्टी) निर्माती ब्रह्माच्या (ईश्वर) सत्तेला स्वीकारलं होतं.
योगातही निसर्गाच्या सत्तेप्रती आस्था होती. याच प्रकारे मीमांसा दर्शन मूलभूत स्वरूपात अनिश्वरवादाच्या पार्श्वभूमीवर पोहोचलं होतं; पण वेदांची अक्षुण्णता आणि चिरंतर उच्चारित ध्वनींच्या पूर्ण पवित्रतेचा सिद्धांत कर्मकांड आणि यज्ञावरील अंधविश्वासासोबत मीमांसा प्रणालीचा संपूर्ण आदी आणि अंत बनला होता.
सर्वसामान्यपणे सारंच भारतीय तत्त्वज्ञान निसर्गाच्या सत्तेवर विश्वास ठेवत होतं. लोकायत तत्त्वज्ञानाच्या विषयात म्हणणं अवघड आहे. प्राचीन भारतीय आस्था सृष्टीला (निसर्गाची सत्ता) स्वीकारून त्याला आपल्या चिंतनाद्वारे बळ देत राहिली, असंच शेवटी म्हणता येईल. इथलं तत्त्वज्ञान भौतिकवाद आणि आशीर्वादाचं मिश्रण ठरलं आहे. पण, भौतिकवाद तत्त्वज्ञानासारखा लोकायत इथे टिकू शकला नाही. उच्च आदर्शामुळे येथील मनुष्य मर्यादित, संयमी जीवन जगून, उच्चशक्तींना प्राप्त करून परमानंदाची कल्पना करीत राहिला आणि परमानंदाला प्राप्तही करू शकला.
महाराष्ट्र हे भरपूर पाणी असलेलं समृद्ध राज्य होतं. येथील पिकांचं चक्र पर्जन्यचक्राशी जोडलं गेलं नाही. कृषी उद्योग, विशेषतः साखर उद्योगाला चालना देण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करणाऱ्या उसाच्या पिकाला प्रोत्साहन मिळालं. उसाने महाराष्ट्राच्या भूमीला पाणीहीन केलं. गंगा-यमुनेच्या क्षेत्रात होणाऱ्या उसाच्या पिकामुळे तेथील भूजल भांडाराच्या पुनर्भरणासाठी हातभार लागतो, असं इथे उसाच्या पिकामुळे होत नाही. इथे एकीकडे उसाच्या पिकासाठी पाणी खर्चिलं जातं, तर दुसरीकडे साखर उद्योगामुळेही मोठं प्रदूषण होतं. जमिनीवरील पाणी, जमिनीच्या किंचित खालून वाहणारं पाणी, भूजल आणि खूप खोलवरचं पाणी उद्योगांमुळे प्रदूषित होऊ लागलं. परिणामी महाराष्ट्रात परिस्थितीचं तंत्र बिघडलं. हवामान बदलाचा सर्वाधिक दुष्प्रभाव पर्जन्यचक्रावर पडला. पर्जन्यचक्र बदललं; पण येथील पिकांचं चक्र बदललं नाही, त्यामुळे हवामान बदलाचा मार आणखीच वाढत गेला.
विद्यमान सिंचन व्यवस्था कंत्राटदारांच्या हाती आहे आणि ठेकेदार हे कधीच निसर्ग अथवा वसुंधरेच्या हिताचा विचार करीत नाहीत. ते केवळ आपल्या कंपनीच्या फायद्याचा विचार करतात. ते शुभ विचार करीत नाहीत, असं मी विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त अधिवेशनात महाराष्ट्र सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला. शुभचा दुसरा अर्थ म्हणजे सर्वांच्या भल्यासाठी होणारं पुण्यकर्म. पुण्य कर्माने पर्यावरणात सुधारणा होते. मानसिक पर्यावरण आणि निसर्गाचं पर्यावरण सुधारण्यासाठी भारतात नेहमीच संयुक्त पुण्यकर्म होत आलं. सारे जेव्हा लाभाच्याच कर्माला जुंपून घेतात, तेव्हा शुभकर्मं विरून जातात. आम्हाला फायद्यापेक्षा शुभकर्माची काळजी घ्यावी लागेल.
महाराष्ट्रात जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा येतोय. या योजनेला ठेकेदारांपासून वाचवून सामूहिक प्रयत्नांद्वारे जलसंवर्धनाचं काम करावं लागेल. हे काम सामूहिक विकेंद्रित जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून केलं तर महाराष्ट्राची भूमी पुन्हा जलमय बनेल. शेतामधील मातीत ओलावा वाढताच हिरवळ जन्माला येईल. हिरवळ वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडसारख्या विषारी वायूंना शोधून त्यांचं प्राणवायूमध्ये रूपांतर करते. वातावरणात विषारी वायूंच्या जागी प्राणवायू वाढताच पर्यावरणात आपोआप सुधारणा होते. पर्यावरण सुधारण्यासाठी भूमीवर हिरवळीत वाढ होणं आवश्यक आहे आणि हिरवळ केवळ मातीत ओलावा वाढल्यानेच निर्माण होऊ शकते. जेव्हा मातीत ओलावा अथवा आर्द्रता नसते, तेव्हा हिरवळ नष्ट होते.
जलयुक्त शिवार हे मातीत ओलावा निर्माण करणारं काम आहे, हे काम महाराष्ट्राने प्राधान्याने करायला हवं. पहिल्या टप्प्यातील पहिल्या वर्षात या योजनेत खूप चांगलं काम झालं, त्यामानाने नंतर अपेक्षेपेक्षा कमी काम झालं आहे. आम्हाला अधिक निर्धाराने, प्रामाणिकपणे आणि प्रतिबद्धतेने जास्त काम करायला हवं. महाराष्ट्र सरकारने हे काम संकल्पबद्धतेने केलं तर पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला टँकरमुक्त आणि टंचाईमुक्त करून महाराष्ट्राला जलसमृद्ध राज्य घोषित करता येईल. ज्याप्रकारे आम्ही प्रतिकूल काळात वाईट लोकांना धडा शिकविण्यासाठी राखीव पोलिस आणि राखीव सैन्यदल ठेवतो, त्याचप्रमाणे सर्वत्र जल बँका तयार करणं आणि सज्ज ठेवण्याची गरज आहे.
किमान पाच वर्षांचा दुष्काळ विचारात घेऊन भूजल भंडार आणि जमिनीवरील पाण्याचे साठे निर्माण करायला पाहिजेत. अशा जलसाठ्यांच्या निर्मितीमुळे आपल्यापाशी पाणी उपलब्ध आहे आणि पाण्यासाठी आपल्याला कधी त्रस्त व्हावं लागणार नाही, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भासह महाराष्ट्रातील कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या थांबतील.
आमचं मानसिक पर्यावरण बिघडल्यामुळे आत्महत्या होतात. जेव्हा आमचं मन निराशेत बुडत जातं, आशा संपुष्टात येतात, तेव्हा आम्ही आत्महत्या करू लागतो. जोपर्यंत नीर, नारी, नदी यांच्यापासून आमच्या आशांना जन्म मिळत राहील, तोपर्यंत आम्ही कधीही आत्महत्या करणार नाही. जेव्हा आमच्या आशेचे स्रोत कोरडे पडतात आणि निराशा प्रबळ होत जाते, तेच आमच्या पर्यावरणाचं सर्वांत भयानक संकट ठरतं. त्या संकटावर मात करण्यासाठी एकजूट होऊन नीर, नारी आणि नदीचा सन्मान वाढवायला हवा. त्यामुळे आमच्या आशांचे दीप प्रज्वलित होतील, आमच्यावरून कर्जाच्या निराशेचे ढग हटतील आणि आम्ही नव्या आशेने पाणी व पर्यावरणाच्या संकटावर तोडगा काढून नवा मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्र, भारत आणि जग निर्माण करण्यात गढून जाऊ!
(लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जल-पर्यावरणतज्ज्ञ असून मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.