आजकाल कोरोनरी अँजियोप्लास्टी हा शब्द आपण खूप वेळा वाचतो आणि ऐकतो. त्यासंबंधी बरेच समज आणि गैरसमज आहेत. ही अँजिओप्लास्टी काय आहे ते आपण समजावून घेऊयात.
- डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ
कोरोनरी अँजियोप्लास्टी, ज्याला ‘परक्युटॅनियस कोरोनरी इंटरव्हेन्शन’देखील म्हटले जाते, ही एक हृदय व रक्तवाहिन्या उघडण्यासाठी वापरली जाणारी उपचारपद्धती आहे. अँजिओप्लास्टीमध्ये एक लहान बलून कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये टाकून तो फुगविला जातो आणि रक्तवाहिनीचे रुंदीकरण केले जाते. या प्रक्रियेनंतर कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये एक छोटी वायरच्या जातीपासून बनविलेली नळी घातली जाते. या नळीलाच ‘स्टेंट’ असे म्हणतात. ही नळी प्रसरण पावलेली रक्तवाहिनी परत आकुंचन पावू देत नाही. ज्याप्रमाणे भिंत बांधताना सांगाडा म्हणून स्टीलच्या सळ्या घालतात त्याप्रमाणे, स्टेंट हे रक्तवाहिनीचा सांगाडा म्हणून बसवितात. हे स्टेंट कालांतराने त्या रक्तवाहिनीच्या भाग बनून जातात. स्टेंट काढून घेण्याची आवश्यकता नसते, ते तिथे कायमस्वरूपी राहतात. काही स्टेंट्सवर एक औषधाचा लेप असतो- जो त्या रक्तवाहिनीमध्ये परत ब्लॉकेजेस निर्माण करण्यास प्रतिबंध करतो (रिस्टेनोसिस). काही स्टेंट्सना हे विलेपण नसते- त्याला ‘बेअर मेटल स्टेंट’ असे म्हणतात. ‘बेअर मेटल स्टेंट’चा परत ब्लॉकेज होण्याचा दर जास्त असतो- त्यामुळे बहुतांशी वेळा ‘ड्रग एल्यूटिंग स्टेंट’चाच वापर केला जातो. ‘ड्रग स्टेंट’ आणि ‘बेअर मेटल स्टेंट’ यांच्या किमतीमध्ये पूर्वी खूप तफावत होती; परंतु आता त्यामध्ये खूप फरक नसल्यामुळे ड्रग स्टेंट बसविण्याकडे कल असतो.
अँजिओप्लास्टीची तयारी कशी कराल?
अँजियोप्लास्टीपूर्वी आपल्याला खाणेपिणेविषयक सूचना देण्यात येतील. सहसा, आपल्या प्रक्रियेपूर्वी ३ ते ६ तास तोंडावाटे काही घेण्यास प्रतिबंध करण्यात येईल. आपण मधुमेहाची वगळता सर्व औषधे घेऊ शकता, तशा सूचना आपल्या डॉक्टरांद्वारे आपल्याला देण्यात येतील. केवळ थोड्या प्रमाणात पाण्याने मंजूर औषधे घ्या. प्रक्रियेपूर्वी आपण आधीच रुग्णालयात राहिल्यास आपली तयारी वेगळी असू शकते. आपल्यास प्रथम छातीचा एक्स-रे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि रक्त चाचण्यांसह काही नियमित चाचण्या करून घेण्याची शक्यता असते. अँजिओप्लास्टीसाठी सहसा रात्रीच्या वेळी रुग्णालयात मुक्काम करावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी अथवा ४८ तासानंतर आपल्याला घरी सोडण्याची शक्यता असते. अँजिओप्लास्टीमध्ये रुग्णाला नेमके काय होते आणि काय जाणविते, अँजिओप्लास्टीमध्ये काही धोके असतात का, अँजिओप्लास्टी प्रक्रियेनंतर काय करावे आदी गोष्टींबाबत माहिती घेऊ पुढच्या लेखामध्ये.
कोरोनरी अँजिओप्लास्टी का केली जाते?
जर आपल्याला खूप प्रमाणामध्ये अंजायना म्हणजेच छातीत दुखणे होत असेल आणि ते डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनीदेखील कमी होत नसेल, तर अँजिओप्लास्टीचा उपयोग करून अंजायनापासून मुक्तता करता येते.
स्ट्रेस टेस्टमध्ये दोष आढळलयास आणि अँजियोग्राफीमध्ये तीव्र स्वरूपाचा अडथळा असल्यास अँजिओप्लास्टीचा उपयोग होऊ शकतो.
ज्या वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका येतो, तेव्हा त्वरेने प्रायमरी अँजिओप्लास्टी करून बंद पडलेली रक्तवाहिनी उघडता येते.
अँजिओप्लास्टी प्रत्येकासाठी नसते. जर आपल्या हृदयाच्या डाव्या बाजूला रक्त आणणारी मुख्य धमनी (लेफ्ट मेन) अरुंद असेल, किंवा आपल्याकडे खूप प्रमाणात रोगग्रस्त रक्तवाहिन्या असतील, तर कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया अँजिओप्लास्टीपेक्षा एक चांगला पर्याय असू शकतो. कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रियेमध्ये, रक्तवाहिनीच्या पुढे दुसरी रक्तवाहिनी शिवून तो ब्लॉक बायपास केला जातो.
आपल्याला मधुमेह आणि एकाधिक अडथळे असल्यास, आपले डॉक्टर कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया सुचवू शकतात. अँजिओप्लास्टीविरुद्ध बायपास शस्त्रक्रियेचा निर्णय हा रुग्णाची अवस्था आणि अधिक बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.