सार्वकालिक आदर्श

छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा अनेक प्रकारे सांगता येण्यासारखा आहे. ‘छत्रपती’ हा शब्दसुद्धा त्याचा एक मार्ग होऊ शकतो.
chhatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharajsakal
Updated on
Summary

छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा अनेक प्रकारे सांगता येण्यासारखा आहे. ‘छत्रपती’ हा शब्दसुद्धा त्याचा एक मार्ग होऊ शकतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, विचार, मोठेपण सार्वकालिक आदर्श आहे. शिवरायांची धोरणे व कृती आजच्या काळातही प्रस्तुतच नव्हे, तर आदर्शभूत ठरतात. खरेतर परंपरेत ज्याला ‘राजर्षी’ म्हटले जाते, अशा राजाला साजेसे महाराजांचे चरित्र आणि चारित्र्य होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा अनेक प्रकारे सांगता येण्यासारखा आहे. ‘छत्रपती’ हा शब्दसुद्धा त्याचा एक मार्ग होऊ शकतो. प्राचीन भारतीय परंपरेमध्ये ज्याला राज्याभिषेकपूर्वक सिंहासनावर बसवून राजा म्हणून घोषित करण्यात येते, त्याच्या डोक्‍यावर राजसत्तेचे प्रतीक म्हणून छत्र धरण्यात येते म्हणून तो छत्रपती.

वायव्य दिशेने भारतात प्रविष्ट झालेल्या आक्रमकांनी आपला अंमल सर्व देशभर स्थापित केल्यानंतर अशा प्रकारचा छत्रपती निर्माण होणे स्थगित झाले. जे कोणी स्थानिक पातळीवरील सत्ताधारी असतील, ते या परकीय सत्ताधीशांच्या मेहेरबानीने त्यांचे मंडलिक म्हणून वावरायचे.

शिवरायांनी ही काही शतकांची कोंडी फोडली. इसवी सन १६७४ मध्ये त्यांनी समंत्रक राज्यारोहण केले व ते छत्रपती झाले. ही बातमी मोगल बादशहा औरंगजेब याला समजली, तेव्हा त्याने हाय तोबा केल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. या घटनेचे गांभीर्य त्याला बरोबर कळले होते. राजकीय औपचारिकता व शिष्टाचार यांचा विचार केला, तर शिवाजी महाराज आता औरंगजेबाच्या बरोबरीने झाले होते. छत्रपती झाले होते.

योगायोग असेल किंवा नियोजनबद्ध संकल्प असेल, महाराजांची पावले या रोखाने बालपणापासूनच पडत गेली. त्यांच्या पिताश्रींनी - शहाजीराजांनी त्यांच्यासाठी काही एक सरंजाम देऊन मुद्रा किंवा शिक्काही करून दिला. त्यात त्यांची ही मुद्रा म्हणजे सत्ता प्रजेच्या हितासाठी, कल्याणासाठी, भल्यासाठी असल्याचा उल्लेख होता. विशेष म्हणजे समकालीन जहागीरदार, वतनदारांचे शिक्के तत्कालीन राज्यकर्त्यांच्या पर्शियन भाषेत कोरलेले असत. महाराजांची मुद्रा मात्र संस्कृत भाषेत विलसत होती.

भाषिक अस्मितेचा प्रत्यय

या भाषिक मुद्द्याला फार महत्त्व आहे. भाषा ही समूहाच्या निजात्मतेची, ओळखीची मुख्य खूण म्हणावी लागते. शिवरायांची ही मुद्रा या ओळखीची द्योतक आहे. ती एक प्रकारची प्रत्यभिज्ञा आहे. ‘प्रत्यभिज्ञा’ म्हणजे (स्वतःला) पुन्हा ओळखणे. दुष्यंत शकुंतलेच्या कथेवर आधारलेल्या कालिदासाच्या नाटकाचे नाव ‘अभिज्ञान शाकुंतल’ आहे. ऋषींच्या शापामुळे शकुंतलेची विस्मृती झालेल्या दुष्यंत राजाला त्यानेच शकुंतलेला दिलेली; पण शकुंतलेने हरवलेली अंगठी सापडते व त्यामुळे त्याला शकुंतलेची ओळख पटते. ‘अभिज्ञान शाकुंतला’चे खरे नाव ‘प्रत्याभिज्ञान शाकुंतल’ असे असते, तर ते अधिक अर्थपूर्ण झाले असते.

शिवरायांच्या या राजमुद्रेने नेमके हेच म्हणजे ‘प्रत्याभिज्ञे’चे काम साधले. आपण कोण आहोत, आपली परंपरा काय आहे याची स्मृती जागवणारी ही मुद्रा होती. एकदा ही स्मृती जागृत झाली म्हणजे आजची आपली अवस्था काय आहे, ती कशामुळे झाली या विचाराच्या चक्राला आपोआपच गती मिळते आणि त्यानंतर आपली पूर्वस्थिती परत प्राप्त करून घेण्याची ऊर्मी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. ही ऊर्मी प्रबळ असेल तर त्यासाठी उपायही सापडतात.

शिवरायांच्या बाबतीत हेच घडले. त्यांचा राज्याभिषेक म्हणजे बालपणीच सुरू झालेल्या या प्रक्रियेची परिसमाप्ती होय. छत्रपती होण्यामुळे त्यांना जी अधिकृतता प्राप्त झाली, तिचा उपयोग करून त्यांनी असा एक महत्त्वाचा निर्णय घेतला, की ज्याचा संबंध भाषिक अस्मितेशी होता. काही शतकांपासून येथील राजभाषा म्हणजे कारभाराची व दरबाराची भाषा फारशी होती. या भाषेचा प्रत्यय पाहायचा असेल, तर संत एकनाथांनी केलेली स्थानिक प्रशासनाची रूपके (उदा. अर्जदारच) पाहावी. शासनाचे सर्व प्रकारचे आदेश, पत्रापत्री फारशीतून किंवा फारशीप्रचुर मराठीतून चाले. परकीय भाषा हे परकीय सत्तेचे मर्मस्थान होय. शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हणमंते यांजकडून राज्यव्यवहार कोश करवून घेतला. या कोशात प्रशासनाशी निगडित असलेल्या फारशी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्दांची योजना करण्यात आलेली आहे. स्वराज्यामधील यानंतरचा कारभार याच शब्दांनी होईल, असा संदेश त्यातून गेला व राज्यकारभाराचे मराठीकरण झाले.

महाराजांच्या या कृतीकडे गंभीरपणाने पाहायची आवश्‍यकता आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशातील प्रांतिक राज्यांची पुनर्रचना भाषावार म्हणजे भाषेच्या सूत्राच्या अनुरोधाने होईल असे धोरण ठरले होते. तथापि, काही कारणांमुळे हेच सूत्र लावून मराठी भाषा बोलणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याबाबत केंद्र टाळाटाळ करू लागले. साहजिकच मराठी जनतेला चळवळीचा मार्ग चोखाळावा लागला. संयुक्त महाराष्ट्राचे मोठे आंदोलन उभे राहिले. या चळवळीची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज हीच होती. या आंदोलनाला यश येऊन १ मे १९६० या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या एका भाषणात असे उद्‌गार काढले होते, की महाराष्ट्र राज्याच्या सिंहासनावर मराठी माणूस बसला आहे यापेक्षा मराठी भाषा बसली आहे असेच चित्र ते पाहतात.

आजच्या काळातही प्रस्तुत, आदर्शवत

शिवरायांची धोरणे व कृती आजच्या काळातही प्रस्तुतच नव्हे, तर आदर्शभूत ठरतात. मराठी भाषेचाच मुद्दा घ्या. यशवंतराव काहीही म्हणाले असोत, यात महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती समाधानकारक आहे असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. ती सुधारण्यासाठी छत्रपतींचाच धडा गिरवायची गरज आहे. भाषेचे महत्त्व सत्तेवरून ठरते. सत्तेचे लौकिक आणि अलौकिक असे प्रकार आहेत. लौकिक सत्तेत राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता निर्णायक ठरतात. सर्वच प्रशासकीय कारभार मराठीतून व्हावा असा आग्रह धरता येतो आणि शासनही तशी कृती करू शकते; पण तेवढे पुरेसे नाही. अर्थाचा संबंध जगण्याशी असतो. मराठी माणूस जोपर्यंत पुरेसा कृतिशील होत नाही, आपल्या कर्माच्या कक्षेचा विस्तार करीत नाही व विस्तारीत क्षेत्रात मराठीचा उपयोग करीत नाही तोपर्यंत मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. महाराजांच्या हाती राजकीय सत्ता नसती आणि ती राबविण्यासाठी कर्तबगार माणसे नसती तर राज्यव्यवहार कोशाला कोणी विचारलेही नसते. रिकामटेकड्या लोकांनी केलेला पांडित्याचा एक खेळ एवढेच त्याचे स्वरूप राहिले असते; पण महाराजांनी सत्ता स्थापन केली. तिचा दक्षिणेत विस्तार केला. महाराजांच्या पश्‍चात अठराव्या शतकात मराठ्यांनी उत्तरेत आपले हातपाय पसरले.

दिल्लीचे तख्त जणू चालवायला घेतले. कटक ते अटक हा काही फक्त यमक जुळवण्याचा प्रकार नसून वास्तव होते. कार्यक्षेत्राचा विस्तार झाल्यामुळे भाषेचे क्षेत्र आणि समृद्धी यांच्यातही वाढ झाली. कलकत्ता येथील इंग्रजांच्या विल्यम फोर्ट कॉलेजात प्रशासकीय प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या इंग्रजी तरुणांना मराठी भाषेचा अभ्यास करायला लागायचा तो काही उगाच नव्हे. आजही याच प्रकारे आपल्या कुरूक्षेत्राचा विस्तार करायची गरज आहे आणि कुरूक्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र आर्थिक होत आहे.

पाश्चात्त्य कारभारी सत्तांना आव्हान

महाराजांनी मराठ्यांच्या भाषिक अस्मितेचा विचार केला याचा वेगळा अर्थ काढून त्यांना स्थानिकतेमध्ये बंदिस्त करायचे कारण नाही. किनाऱ्यालगतच्या समुद्रावर हक्क सांगून पाश्‍चात्त्य कारभारी सत्तांना आव्हान देणारा हा पहिला भारतीय राज्यकर्ता होता. आज चीनने दक्षिण समुद्रावर हक्क सांगता-सांगता कृत्रिम बेटे तयार करायचा प्रयोग चालवला आहे हा संदर्भ येथे पुरेसा ठरावा.

विविध क्षेत्रांमध्ये गती

शिवरायांची राजनीती रामचंद्रपंत अमात्यांच्या नावे असलेल्या ‘आज्ञापत्र’ या रचनेतून प्रगट झाली आहे. त्यावरून महाराजांना कृषी, अर्थ, उत्पादन, व्यापार, युद्ध, परराष्ट्र व्यवहार इत्यादी नानाविध क्षेत्रामध्ये किती गती होती हे समजून यावे.

महाराजांचे महत्त्व जागतिक पातळीवर स्पष्ट करण्याऐवजी त्यांच्या नावाचा आधार घेऊन स्थानिक राजकारण करण्यातच आपण धन्यता मानली. खरे तर परंपरेत ज्याला ‘राजर्षी’ म्हटले जाते अशा राजाला साजेसे महाराजांचे चरित्र आणि चारित्र्य होते. प्राचीन चिनी परंपरेतही ‘Sage King’ची कल्पना आहे. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोही तत्त्वज्ञ राजाची चर्चा करतो. रामदासांनी शिवगौरव करताना ‘श्रीमंत योगी’, ‘शिवकल्याण राजा’ अशा शब्दांचा वापर केला आहे. तो हेतूगर्भ व अर्थपूर्ण आहे. अगदी अलीकडे राम गणेश गडकरी यांनी राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो असे म्हटले आहे ते शिवरायांना समोर ठेवूनच.

(लेखक ज्येष्ठ इतिहाससंशोधक व विचारवंत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.