अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे ऐतिहासिक गाव, जिल्ह्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर आणि ‘ हॉस्पिटल हब’ म्हणून ओळखलं जातं.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे ऐतिहासिक गाव, जिल्ह्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर आणि ‘ हॉस्पिटल हब’ म्हणून ओळखलं जातं. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेर हे विद्यमान महाराष्ट्रात सर्वपरिचित आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंत विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणारी अनेक मान्यवर मंडळी, ही संगमनेरची ओळख.
प्रवराकाठच्या संगमनेरचा हा परिसर दंडकारण्याशी नातं सांगणारा आहे. इ.स.पूर्व २०० वर्षं प्रवरेच्या काठी मानवी वस्ती होती. जोर्वे या गावी उत्खननात इ.स.पूर्व १५०० ते इ.स.पूर्व ५०० या काळातील मानवी वस्तीचे पुरावे मिळाले आहेत. म्हाळुंगी, म्हानुटी, यशोधरा आणि नाटकी या चार लहान-मोठ्या नद्यांच्या संगमावरती वसलेलं ‘संगमिका’ म्हणजे आजचं संगमनेर. नदी यशोधरा म्हणजे प्रवरा ! या नद्यांमुळे आपसूकच गावाभोवती एक नैसर्गिक खंदकच तयार झाला. चारही बाजूला असलेल्या वेशी, जुनी बाजारपेठ, पूर्वीच्या अनेक टेकड्यांमुळे असलेला उंच-सखल भाग, पेशवाईतल्या प्रख्यात विठ्ठल सुंदर परशुरामींच्या वाड्यासह अंभोरकरवाडा, संतवाडा आणि तालुक्यातील काही वाडे, समाजनिहाय प्रार्थनास्थळं हे संगमनेरचं ऐतिहासिक वैभव !
निजामशाही, शिवशाही, पेशवाई आणि स्वातंत्र्यलढ्यातही अग्रणी गाव. मुघल बादशहा जहांगीरने शहाजहाँ आणि मुमताज यांना औरंगजेब आणि दाराशुकोह यांच्यासह इथं गढीत कैदेत ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांनी इथल्याच पेमगिरी किल्ल्यावरून फार मोठ्या प्रदेशाचा कारभार पाहिला होता. गडापासून काही अंतरावर सुमारे अडीच एकर क्षेत्रात पसरलेला महाकाय वटवृक्ष हेही या भागाचं एक वैशिष्ट्य.
१६७९ मध्ये मुघल सरदार रणमस्तखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये संगमनेरात तीन दिवस लढाई झाली. या दरम्यान विश्रांतीसाठी २२ नोव्हेंबरला महाराज पट्टा किल्ल्यावर राहिले होते म्हणून त्याला ‘विश्रामगड’ या नावानेही ओळखलं जातं. संगमनेरच्या भोवती नद्या असल्या तरी १८७२, १८९६, १९३६ ते १९७२ मध्ये या भागात प्रचंड दुष्काळ पडल्याच्या नोंदीही आहेत. पण, साहित्य-कलांच्या क्षेत्रात इथं कायम समृद्धी आहे.
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
असा खणखणीत फटका लिहिणारे उत्तर पेशवाईतील ख्यातनाम कवी अनंत फंदी (घोलप) मूळचे संगमनेरचेच. मलिक फंदी नावाचा एक फकीर यांचा जिवलग स्नेही. म्हणून लोक त्यांना अनंत फंदी म्हणूनच ओळखू लागले. त्याकाळी त्यांचा तमाशा खूप प्रसिद्ध होता, ते कीर्तनंही करत असत.
पराक्रमी सरदार त्र्यंबकजी डेंगळे (निमगाव जाळी), भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव हे संगमनेरचेच. स्वातंत्र्यलढ्यातील योगदानापासून ते वृक्षारोपणातील गाजलेलं ‘दंडकारण्य अभियान’ लोकचळवळीच्या स्वरूपात राबवणारे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, त्यांचे चिरंजीव बाळासाहेब थोरात, पानोडीचे सरदार थोरात, जवळेकडलगचे कॉ. दत्त देशमुख, पुरोगामी विचारांचे के. बी. देशमुख, धांदरफळचे बी. जे. खताळ-पाटील, भास्करराव दुर्वे नाना, ओंकारनाथ मालपाणी, डॉ. सुधीर तांबे, बाळासाहेब पाटील, डॉ. कृष्णराव जानू, १८७३ मध्ये संगमनेरला पहिला दवाखाना सुरू झाला तिथले चिकणी येथील शाहीर विठ्ठल उमप, तमाशासम्राज्ञी पावला हिवरगावकर, गुलाबबाई संगमनेरकर, रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर या सर्वांचा संगमनेरशी जुना ऋणानुबंध. लष्करातील नोकरीनंतर शेतीत मोलाचे प्रयोग करणारे वीरगावचे संभाजीराजे थोरात, कवी नरहर संगमनेरकर, दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेऊन व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणारे नामदेवराव जाधव, कारगिल युद्धात सहभागी लक्ष्मण ढोले, १८८१ मध्ये सर्कस सुरू करणारे वडगाव पान इथले यशवंतराव मोरे हे मान्यवरही इथलेच. संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संतोष खेडलेकर यांच्या ‘गोष्ट एका गावाची’ या संदर्भ ग्रंथातून हा इतिहास उलगडतो.
१८५७ च्या स्वातंत्र्य समरात आदिवासी क्रांतिकारकांसह भागोजी नाईक आणि सहकाऱ्यांनी केलेले उठाव, श्री रामकृष्णदास महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेला जंगल सत्याग्रह, १९३३ चा नागपूरचा झेंडा सत्याग्रह यांत संगमनेरकरांचा मोलाचा सहभाग होता. १९३१ मध्ये पेटिट विद्यालयाच्या छतावर कडक पोलिस बंदोबस्त असतानाही मध्यरात्री गनिमी काव्याने जाऊन तिरंगा फडकविण्याचं शौर्य दाखवणाऱ्या लक्ष्मण अनंत देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढे पुण्यातील विश्रामबागवाड्यातील ब्रिटिशांची कराची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला आणि तुरुंगवास भोगला.
१९१७ मध्ये लोकमान्य टिळकांची नगरपालिकेच्या पटांगणात रात्री ११.३० पर्यंत सभा झाली. १९२० मध्ये महात्मा गांधी सभेसाठी संगमनेरला आले होते, त्या वेळी त्यांनी टिळक स्वराज्य फंडासाठी चार हजार रु. जमा केले. १५ फेब्रुवारी १९३७ रोजी पंडित नेहरूंनी संगमनेरला उपासनीवाड्यासमोर जाहीर सभा घेतली. १९४६ मध्ये साने गुरुजींच्या उपस्थितीत इथं युवक परिषद घेण्यात आली.
प्रवरा-म्हाळुंगीच्या संगमामुळे इथं दोन गावं झाली आहेत. १८३४ मध्ये इथं पहिली मराठी शाळा सुरू झाली. त्या वेळी १४०० घरं आणि ९ हजार लोकसंख्या होती. १८६७ मध्ये सुरू झालेली नेटिव्ह जनरल लायब्ररी रघुनाथ करवा यांच्या नावाने ओळखली जाऊ लागली. १८९६ ला अँग्लो ऊर्दू हायस्कूलची स्थापना झाली, तर न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पत्रामुळे दिनशा पेटिट यांच्या देणगीतून १८९७ ला पेटिट हायस्कूल सुरू झालं. ज्ञानमाता विद्यालय (१८४८) आणि १९६० ला शिक्षण प्रसारक संस्था सुरू झाली, त्यातून संगमनेर महाविद्यालय सुरू झालं. हिम्मतलालजी शहा, देवकिसनजी सारडा, ओंकारनाथ मालपाणी यांच्या योगदानातून प्रख्यात झालेल्या या संस्थेने प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. अलिम वकील, प्रा. विमल लेले अशी नामवंत मंडळी महाराष्ट्राला दिली. प्राचार्य मधुसूदन कौंडिण्य यांच्याशिवाय संगमनेरचा उल्लेख अपूर्ण राहील. भाऊसाहेब थोरात यांनी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेची केलेली उभारणी, अमृतवाहिनी या नावे आज सहकार-शिक्षण-उद्योग क्षेत्रात झालेली कामगिरी, मालपाणी परिवाराने शिक्षण, उद्योग क्षेत्रात घेतलेली झेप आणि या परिसराच्या विकासासाठी आता मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांचं योगदान ही संगमनेरची अलीकडची ओळख आहे.
इ.स. १८६० मध्ये स्थापन झालेली नगरपालिका आणि इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यविषयक संस्था आणि उपक्रमांमुळे आता या शहराने स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलं आहे. प्रवरेच्या काठावरील देखण्या घाटांसह, ११ परगण्यांचं मुख्यालय म्हणून पेशवाईतलं हे शहर गायछाप जर्दा, तीन-तीन हजार कापडमाग, तेलापासून ते तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या व्यापारासह दूध, साखर, टोमॅटो आदी अनेक कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये विकासाभिमुख वेगवान प्रगती करणारं शहर म्हणून आता सर्वपरिचित आहे.
(सदराचे लेखक पत्रकार असून शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.