प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेल्या ‘तो मी नव्हेच’ या प्रख्यात नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र निपाणीतल्याच एका व्यक्तिरेखेवरून बेतल्याचं सांगितलं जातं.
रोज सकाळी सात वाजले की, आकाशवाणीच्या देशभरातील सर्व केंद्रांवरून ‘इयम् आकाशवाणी, संप्रती वार्ता: श्रूयन्ताम् प्रवाचक:...’ हे शब्द कानावर पडले की, आठवण होते ती कोल्हापूरजवळ (सध्याच्या कर्नाटकात) असलेल्या निपाणी येथील पंडित माधव गणेश जोशी यांची ! त्यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर १९७४ पासून आकाशवाणीवरून या बातम्या सुरू झाल्या.
प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेल्या ‘तो मी नव्हेच’ या प्रख्यात नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र निपाणीतल्याच एका व्यक्तिरेखेवरून बेतल्याचं सांगितलं जातं. सर्वांत महत्वाचं म्हणजे पद्मभूषण देवचंदजी शहा आणि माजी आमदार सुभाष जोशी यांच्याशिवाय निपाणी आणि परिसराची ओळख अपूर्ण राहील.
मधुकरी मागून पंडितजींनी इचलकरंजीच्या लक्ष्मणशास्त्री मुरगूडकरांच्या पाठशाळेत १९३२ ते ४२ या दरम्यान संस्कृत काव्य, अलंकार, व्याकरणाचा अभ्यास केला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी निपाणीत किराणा दुकान सुरू केलं. पण ध्यास होता संस्कृतच्या प्रसाराचा! रद्दीत त्यांना एकदा ‘पाणिनीय अष्टाध्यायी’ची हस्तलिखित पत मिळाली आणि ती अमूल्य चीज घेऊन त्यांनी कलकत्त्याच्या बेंगाल संस्कृत असोसिएशनची काव्यतीर्थ आणि व्याकरणतीर्थ पदवी मिळवली. पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेची आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची साहित्य विशारद पदवी प्राप्त केली. संस्कृत प्रसारक मंडळामार्फत त्यांनी स्वखर्चातून निपाणीत पाणिनीय व्याकरण पाठशाळा चालवली. १९७२ मध्ये दिल्लीतील विश्व संस्कृत संमेलनात ‘संस्कृत शिक्षण सुलभ कसे करता येईल?’ यासंबंधी त्यांचं भाषण झालं.
उज्जैन, पॉण्डिचरी, वाई येथील प्राज्ञपाठशाळा तसंच प्रख्यात डेक्कन कॉलेजमधील अभ्यासकही त्यांचं मार्गदर्शन घेत. पाणिनीय व्याकरणासंबंधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हिंदी-इंग्रजीत अनुवाद झाला, सप्तश्लोकी आणि अग्निमिळेची सूत्रंही त्यांनी पुस्तकबद्ध केली. १९८२ पासून अखेरपर्यंत आळंदी इथे किसन महाराज साखरे यांच्यासमवेत इंद्रायणीकाठी साधकाश्रमात राहून त्यांनी संस्कृत साधना आणि मार्गदर्शन केलं.
पुणे-बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरहून तासाभराच्याच अंतरावर वसलेलं निपाणी हे महाराष्ट्र- कर्नाटक- कोकण- गोव्याला जोडणारी एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. विशेषतः तंबाखू उत्पादनामध्ये संपूर्ण देशभरातील अग्रेसर भाग म्हणून या परिसराची ओळख आहे. इ.स. १८९० च्या आसपास ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे नगदी पैसे देणारं पीक म्हणून तंबाखूची लागवड या भागात सुरू झाली. चिक्कोडी, गोकाक आणि सध्याच्या निपाणी तालुक्यात कर्नाटकातील ८० टक्के तंबाखू पिकवला जात असे. तंबाखूच्या बाजारपेठेतील देवचंद शहा हे एक फार मोठं प्रतिष्ठित नाव. त्यांचं मूळ गाव निपाणीजवळचं अक्कोळ. सीमाभागात आणि विशेषतः आदमपूर परिसरातील बाळूमामा हेही मूळचे अक्कोळचेच. धनगर बांधवांसह विविध जाती-धर्मांतील श्रद्धास्थान म्हणून बाळूमामांची (१८९२-१९६६) ख्याती आहे. सध्या दूरचित्रवाहिनीवर त्यांच्यावरील मालिका लोकप्रिय झाली आहे.
निपाणी आणि परिसरात तंबाखूचं पीक अमाप होत असे. तंबाखूपासून विड्या तयार करण्याचे अनेक कारखाने या भागात होते. या व्यवसायात प्रामुख्याने १५ ते २० हजार महिला काम करत असत. पण त्यांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असत. निपाणी-चिक्कोडी परिसरात पूर्वी सुमारे साठ हजार एकर जमिनीत तंबाखू पिकवला जात असे, त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक शेतकरी अल्पभूधारक होते. शेतकऱ्यांची पिळवणूक, विडी कामगारांचं शोषण आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीविरुद्ध १४ मार्च १९८१ रोजी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि निपाणीचे माजी आमदार - समाजवादी कार्यकर्ते प्रा. सुभाष जोशी यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. २५ एप्रिलपर्यंत चाललेल्या या आंदोलनातील शेतकऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केली, गोळीबार केला. त्यात काहींना प्राण गमवावे लागले, तर शेकडो शेतकरी जायबंदी झाले. मात्र, हा व्यवसाय आता फक्त २० टक्के राहिला असून, तंबाखूऐवजी उसाची लागवड झाल्याचं अण्णासाहेब तारळे यांचं म्हणणं. माजी आमदार सुभाष जोशी यांनी कामगार, शेतमजूर, वंचितांसाठी कार्य करतानाच देवदासींच्या प्रश्नांसाठीही मोठं योगदान दिलं.
खरंतर निपाणीत पूर्वीपासून बहुसंख्य लोक मराठी भाषक होते आणि आहेत. मात्र तंबाखू आंदोलनात बहुसंख्य शेतकरी हे कानडी भाषक होते. या आंदोलनामुळे निपाणीची एक वेगळी ओळख नोंदवली गेली. तसंच माजी आमदार गोविंदराव मानवी, डॉ. अच्युत माने, मुंबईतील निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश वालिशेट्टी हेही इथलेच.
देवचंद शहा यांचे मराठी भाषकांशी, विशेषतः ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मराठी नेत्यांशी जवळचे संबंध होते. निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषकांसाठी उच्चशिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी १९६० मध्ये अर्जुननगर इथे जनता शिक्षण मंडळामार्फत देवचंद महाविद्यालयाची स्थापना केली. सुमारे ४५ एकरांतील हे महाविद्यालय मराठी भाषकांसाठी वरदान ठरलं असून, ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. केंद्र सरकारने पुढे देवचंदजींचा पद्मभूषण किताबाने गौरव केला होता.
निपाणीतील भुईकोट किल्ला आणि त्यातील निपाणकरांचा वाडा हे या परिसराचं एक भूषण आहे. हिज हायनेस श्रीमंत सिधोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या काळात शिरगुप्पीपासून बांधण्यात आलेली जलवाहिनी हे १९ व्या शतकातील प्रगत पाणीपुरवठा व्यवस्थेचं वैशिष्ट्य मानलं जातं. निपाणकरांच्या देवपूजेतील स्फटिकाचं शिवलिंग, ऐतिहासिक शस्त्रास्त्रं आणि गेंड्याच्या कातडीची ढाल पाहण्याजोगी आहे. इथला बेंदूर ( बैलपोळा) सण लक्षणीय असतो.
प्रख्यात अभिनेत्री सुलोचना या मूळच्या निपाणीजवळच्या खडकलाट गावच्या, तर पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे हे एकसंबा गावचे. ममदापूर गाव, हालसिद्धनाथाची भाकणूक सांगणारे अप्पाची वाडी देवस्थान, सेनापती संताजी घोरपडे यांचं गाव सेनापती कापशी, घोडेश्वर, हिटणी, मलिकवाड, पट्टणकुडी ही या भागातली महत्त्वाची गावं.
याशिवाय पिठाची गिरणी चालवतानाच साहित्यनिर्मिती करणारे कथा-कादंबरीकार महादेव मोरे यांचंही वास्तव्य निपाणीतच. गेल्या चार दशकांत १५ कथासंग्रह आणि १८ कादंबऱ्या लिहिणाऱ्या मोरेंना महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असलं, तरी मराठी साहित्याच्या क्षेत्रात ते उपेक्षित राहिले आहेत.
व्यंकटेश मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि राम मंदिर ही निपाणीतली प्रमुख श्रद्धास्थानं. अन्यधर्मीयांचीही स्थळं आहेतच. विशेषतः तवंदी घाटाच्या अलीकडे स्तवनिधी इथे जैन बांधवांचं धर्मस्थळ आहे. ३ एप्रिल १८९९ रोजी इथेच दक्षिण महाराष्ट्र जैन सभेची स्थापना झाली. कोल्हापूर संस्थानचे भूतपूर्व पंतप्रधान दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांचं या संस्थेच्या वाटचालीत मोठं योगदान आहे.
निपाणीतील व्यंकटेश मंदिर आणि मंगल कार्यालय ही एक सामाजिक-सांस्कृतिक वास्तू आहे. सोलापूरकर कुटुंबीयांनी इथे सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाला किमान सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक परंपरा आहे. व्याख्यानं, कीर्तनं, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम इथे अखंडपणे सुरू आहेत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, दशपुत्रे शास्त्री, नाशिकचे वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर, कांचीपीठाचे शंकराचार्य हे सोलापूरकरांच्या वास्तूत येऊन गेले आहेत. त्यापैकी काहींची व्याख्यानंही झाली आहेत. निपाणीतील संगीत नाटकांच्या निमित्ताने बालगंधर्व आणि अन्य कलाकार व्यंकटेश मंदिर वास्तूमध्ये महिनाभर राहायला होते. या परिसराच्या स्थानिक इतिहासाबाबत संशोधन व्हायला हवं.
(सदराचे लेखक पत्रकार असून शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.