वैभवशाली इतिहासाचा वारसा...

कल्याण शहराचं नाव डोळ्यांसमोर आलं की, आठवते ती प्राचीन काळापासून समृद्ध असलेली बाजारपेठ आणि शिवकाळातील सांगितली जाणारी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा.
Anandibai Joshi and Durgadi Fort
Anandibai Joshi and Durgadi Fortsakal
Updated on
Summary

कल्याण शहराचं नाव डोळ्यांसमोर आलं की, आठवते ती प्राचीन काळापासून समृद्ध असलेली बाजारपेठ आणि शिवकाळातील सांगितली जाणारी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा.

कल्याण शहराचं नाव डोळ्यांसमोर आलं की, आठवते ती प्राचीन काळापासून समृद्ध असलेली बाजारपेठ आणि शिवकाळातील सांगितली जाणारी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा. आज कल्याण हे मुंबई-ठाण्याजवळचं महापालिका असलेलं एक महानगर म्हणून ओळखलं जातं.

सातवाहनांच्या काळापासूनचा, म्हणजे सुमारे इ.स. पूर्व २२० ते २४० पासूनचा या शहराला एक वैभवशाली इतिहास आहे. प्राचीन शिलालेखांत आणि अन्य जुन्या नोंदींमध्ये कलियान, कालियान असा त्याचा उल्लेख आहे. उल्हास नदीच्या खोलगट पात्राच्या वरच्या बाजूस असलेलं आणि एक उत्तम बंदर असल्याने हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रसिद्ध केंद्र होतं.

पेरिप्ल्स आणि टॉलेमीसारख्यांच्या प्रवासवर्णनांत ही वर्णनं आहेत. सातवाहनकाळात हे बंदर पैठण, नगर, नाशिक, जुन्नर या बाजारपेठांशी जोडलेलं होतं. जुन्नरशी तर संबंध इतके जवळचे, की जुन्नरच्या एका पेठेचं नावही कल्याण पेठ असंच आहे. मौल्यवान दगडांचे दागिने, कपडे, हस्तिदंती वस्तूंसह तूप, चंदन, लाख अशा भारतीय मालाची पाश्चिमात्य देशांत इथून निर्यात होत असे; तर चांदीची भांडी, सौंदर्य प्रसाधनं आदी वस्तू आयात होत होत्या.

येथील कोळी लोकांची वसाहत सर्वांत प्राचीन असून, कल्याणची व्यापारी संघटना आणि उत्पादक संस्थांचे उल्लेख कान्हेरी आणि जुन्नर इथल्या शिलालेखांत आढळतात. जहाज बांधणीचं केंद्र म्हणूनही कल्याणची ओळख आहे. ह्यूएन त्संगच्या प्रवासवर्णनात तर इ.स. ६४० चा कल्याणचा उल्लेख राजधानी असा आहे. इथं अरबांच्या स्वाऱ्या होऊ लागल्यानंतर ७ ते १३ व्या शतकात मग ठाणे बंदराची भरभराट झाली. पुन्हा १४ व्या शतकात मुसलमानी सत्तेने कल्याण ताब्यात घेतलं. औरंगजेबाची स्वारी आपल्याला लुटणार या भीतीने कल्याणमधील खजिना विजापूरला पाठवण्याचा आदेश आदिलशहाने आपल्या सुभेदारास दिला होता; पण ही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांना समजली.

महाराजांचे सेनापती आबाजी सोनदेव यांनी तत्पूर्वीच ऑक्टोबर १६५६ मध्ये कल्याणवर छापा टाकून हा खजिना स्वराज्यासाठी लुटल्याच्या नोंदी आहेत. स्वतः महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराकडे लक्ष देऊन कल्याणमध्ये १६ गलबतं बांधण्याचं काम सुरू केलं होतं. सुरतेवरची दुसरी स्वारीही इथूनच केली गेली. पुढे मुघलांच्या ताब्यात गेलेलं कल्याण पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे दिवाण रामचंद्र महादेव जोशी चासकर यांनी १७१९ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतलं आणि पुढली शंभर वर्षं ते मराठ्यांच्या ताब्यात होतं. दरम्यानच्या काळातील एका ब्रिटिश ठाणेदाराने कल्याणबाबत लिहिलेली ५७ पानी डायरीदेखील उपलब्ध आहे. कल्याणच्या प्रख्यात सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शताब्दी ग्रंथात या महत्त्वपूर्ण नोंदी आहेत.

ब्रिटिशकाळात मुंबईपाठोपाठ १८५४ मध्ये रेल्वे कल्याणपर्यंत पोचल्याने या शहराचं महत्त्व आणखी वाढलं, पुणे-नगरची अनेक घराणी इथं येऊन स्थायिक झाली. १८५५ मध्ये नगरपालिकेची, तर १८७८ मध्ये सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. कल्याण नगरपालिकेच्या एका सदस्याने इंग्लंडच्या पार्लमेंटशी सतत पत्रव्यवहार करून नगरपालिकेला स्थानिक नगराध्यक्ष मिळावा या मागणीला अनुकूलता मिळवली. याच दरम्यान शिळाप्रेसवर छपाई करणारा लक्ष्मी-व्यंकटेश छापखानाही इथं सुरू करण्यात आला.

लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा प्रभाव साऱ्या देशभर होताच, त्यामुळे भारताचार्य चिंतामणराव वैद्य, प्रभाकरनाना ओक, लखूनाना फडके यांच्यासह अनेक टिळकभक्तांनी पुण्याप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यासाठी सर्व जाती-जमातींच्या बांधवांची एक बैठक १८९५ मध्ये प्रख्यात सुभेदार वाड्यात बोलावली. श्रीमंत रामजी महादेव बिवलकर यांचा हा वाडा, १७६९ मध्ये बांधलेला. वाड्यासमोर उभं राहून पाचशे स्वार सलामी देत इतका तो प्रशस्त होता. अंबारीसह हत्ती आत येईल असा भव्य दिंडीदरवाजा होता. सार्वजनिक गणेशोत्सव, इंग्रजी शाळा, दसऱ्यासह अनेक सण-समारंभ, व्याख्यानं, कुस्त्यांच्या दंगली, चित्रपट व नाटकं, अनेक अधिवेशनं, परिषदा या वाड्यात झाल्या. वाड्याचे तत्कालीन मालक बापूसाहेब सुभेदार यांचा वरील समाजोपयोगी कार्यास वाडा देऊन मदत केल्याबद्दल १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. खुद्द लो. टिळक १९०६ मध्ये इथं भाषणासाठी येऊन गेले होते. १९१९ पासून जॉली सोशल क्लबमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला.

या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कल्याणकरांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत मोठी कामगिरी बजावली आहे. महापराक्रमी, दिग्विजयी पहिल्या बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाईसाहेब या इथल्याच. त्याअर्थाने पेशवे हे कल्याणचे जावई. त्यांना विवाहाच्या वेळी देण्यात आलेला अष्टकोनी संगमरवरी चौरंग आजही जपून ठेवण्यात आला आहे. पेशवेकाळात अनेक दिग्गज घराणी कल्याणमध्ये स्थायिक झाली. सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी दीडशे-दोनशे वाडे इथं होते. काळच्या ओघात ते लुप्त झाले. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या इथल्याच. याशिवाय शंकरराव झुंजारराव, गणपतराव फडके, विधानसभेतील विरोधी पक्षनेते शे.का.प.चे कृष्णराव धुळप, माजी राज्यपाल प्रा. राम कापसे, इतिहास संशोधक स. म. दिवेकर, समीक्षक माधव आचवल, गोवा मुक्ती संग्रामातील माधवराव काणे, प्रख्यात शिल्पकार भाऊसाहेब साठे, आर्किटेक्ट मुकुंद सोनपाटकी, प्रसिद्ध अभिनेत्री नूतन, लक्ष्मीबाई टिळक, कॉ. गोदावरी परुळेकर, जुन्या काळातील अभिनेत्री लक्ष्मीछाया, सध्या गाजणारी अभिनेत्री आदिती सारंगधर या सर्वांचा कल्याणशी निकटचा संबंध असल्याचे अभ्यासक श्रीनिवास साठे आवर्जून सांगतात.

मॅजिक लॅंटन हा जो करमणुकीचा (चित्रपट प्रदर्शन) खेळ आहे, तो इथल्या पटवर्धन बंधूंनी १८८५ च्या दरम्यान लोकप्रिय केला होता. पाचशे स्लाइड्स‌ तयार करून कंदिलाच्या प्रकाशात त्या पडद्यावर दाखवायच्या आणि त्याचवेळी त्याला पेटी-तबल्यासह प्रत्यक्ष संगीताची साथ द्यायची, अशा प्रचंड कष्टाने लोकप्रिय केलेल्या या खेळाचा उल्लेख प्रबोधनकारांनी मराठीत ‘शांबरिक खरोलिका’ असा केला होता. कलकत्ता इथं त्याकाळी झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पटवर्धन बंधूंना निमंत्रित करण्यात आलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाभवानीची स्थापना केली असा प्रख्यात दुर्गाडी किल्ला, इतर अनेक मंदिरं, वाडे, तलाव, मलंगगड, प्रख्यात सुभेदार वाडा, १६४३ मधील काळी मशीद, ऐतिहासिक नेतिवलीची टेकडी, अनेक शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक संस्थांसह ‘कल्याण’करांनी आपली प्राचीन श्रीमंती आजही टिकवून ठेवली आहे. अनेक विदेशी पर्यटकांनी आणि अभ्यासकांनी नोंदवल्याप्रमाणे शेकडो वर्षांत इथं अनेक राजवटी आल्या, पण ‘कल्याण’चं नाव तेच कायम राहिलं. फार मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कल्याणचा स्थानिक इतिहास आणि वर्तमानातील महत्त्व अभ्यासकांनी नव्या पिढीसमोर संशोधन करून आणण्याची गरज आहे.

(सदराचे लेखक पत्रकार असून शिक्षणक्षेत्रातल्या घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()