‘देवा म्हाराज्या... सुकृताचो देव तू म्हाराज्या, आज ह्या तुझ्या येलीचा फळ, तेच्यार आज मोटो परसंग इल्लो असा, तेचा आज तू निवारण कर, पाट केल्लो फुडो कर,
‘देवा म्हाराज्या... सुकृताचो देव तू म्हाराज्या, आज ह्या तुझ्या येलीचा फळ, तेच्यार आज मोटो परसंग इल्लो असा, तेचा आज तू निवारण कर, पाट केल्लो फुडो कर, झाल्लेल्या चूक-अपराधांची माफी करून आज तुका सांगणा दिला कसा....’ अशा शब्दांतील अनुनासिक गाऱ्हाणं ऐकू आलं किंवा
ठेव झिला घराची आठव रे
पाच तरी रुपाये पाठव रे ।।धृ।।
अशी वि. कृ. नेरुरकरांची कविता वाचली की, हमखास डोळ्यांसमोर उभा राहतो तो ऐन तळकोकणातील मालवणचा प्रांत आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला! जणू अरबी समुद्राच्या कुशीत विसावल्यासारखा हा सारा परिसर.
पंधराव्या शतकात हा लहानसा प्रांत आदिलशहीत सामील झाला. मात्र, गोव्यातल्या पोर्तुगिजांचा त्रास वाढला. इ.स. १५५५ मध्ये तर मालवण तालुक्यातील आचरे आणि कर्लीची खाडी इथल्या युद्धात पोर्तुगिजांनी आदिलशहाचा पराभव केला.
त्याच्यासह सिद्दीवर आणि सर्व परकीय शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातील कुरटे बेटावर जलदुर्ग वसवण्याचं ठरवलं. या किल्ल्याचं काम तीन वर्षांत म्हणजे १६६७ ला पूर्ण झालं. जमिनीपासून ३० फूट उंचीची आणि १२ फूट जाडीची दोन मैल लांबीची भक्कम तटबंदी असलेला हा भक्कम जलदुर्ग! पाचशे पाथरवट, दोनशे लोहार यांसह सुमारे तीन हजार लोक या किल्ल्याच्या उभारणीसाठी राबत होते. शिशं ओतून त्यात पायाचे दगड बसवण्यात आले आणि किल्ल्याच्या बांधकामासाठी ४ हजार मण लोखंड वापरण्यात आलं आहे. इथल्या तटबंदीवरील दोन लहानशा घुमटांखाली चुनखडीच्या फरशीवर उमटलेले महाराजांच्या हाताचे पंजे आणि पायाचे ठसे, शिवछत्रपतींचं एकमेव मंदिर आणि तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला पाहिलाच पाहिजे असा आहे. महाराजांनी सध्याच्या बंदरानजीक जिथं या किल्ल्याच्या बांधकामासाठी भूमिपूजन केलं, त्याला ‘ मोरयाचा दगड’ म्हणतात. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १९६५ मध्ये लिहिलेली ‘सिंधुदुर्गाची सून’ ही कथा आवर्जून वाचावी अशी आहे.
बंदरावरून किल्ल्याकडे जाण्यापूर्वी ब्रिटिशकालीन स्मृतिस्तंभ पहायला मिळतो. ‘FROM THIS TOWN ७५ MEN WENT TO THE GREAT WAR १९१४-१९१९ OF THESE SOME GAVE UP THEIR LIVES’ असा त्यावरील मजकूर आहे.
ब्रिटिशकाळापासून व्यापारी पेठ असलेल्या मालवणवर आजूबाजूची ४०-५० गावं अवलंबून असत. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीमुळे इतिहासात, तर तारकर्ली-देवबागच्या किनाऱ्यामुळे वर्तमानात मालवणचं महत्त्व वाढलं. १९१८ मध्ये मालवण नगर परिषदेची स्थापना झाली, तर १९५० पासून एस.टी. बससेवा. त्याच सुमारास गावात वीज आली.
१९३४-३६ च्या दरम्यान मालवणचा धक्का बांधण्यात आला. सुमारे १२०० ते १५०० प्रवासी घेऊन जाणारी ३-४ मजली उंचीची जहाजं मुंबई ते मालवण अशी सर्वांत स्वस्त आणि जलद सेवा देत असत. चौगुले स्टीमशिपसह अनेक कंपन्यांची ही प्रवासी सेवा १९७३ पर्यंत सुरू होती. ‘रोहिणी’ जहाज खडकावर आपटून झालेली दुर्घटना, पुढे डांबरी रस्त्यांची झालेली कामं आणि वाहनांची संख्या, कोकण रेल्वे झाल्याने ही बोटसेवा बंद पडली. आता तर मालवणपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर चिपी विमानतळ सुरू झाला आहे.
जीवनाच्या हरएक क्षेत्रात कोकणी मुलखातल्या माणसांनी मोठं योगदान दिलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राच्यविद्या पंडित, पुण्यातील भांडारकर संस्थेचे सर डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केलेले डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये, माजी मंत्री, मुंबईचे माजी महापौर स. का. पाटील, ख्यातनाम नाटककार, खासदार- पद्मभूषण मामा वरेरकर, डॉ. श्री. शां. आजगावकर, डॉ. पंढरीनाथ प्रभू, दानशूर शां. कृ. पंतवालावलकर, प्रा. परशुराम बर्वे, उद्योगपती काशिनाथ भगत (घुमडे), पुण्यातील किशोर पंपचे संस्थापक भाऊसाहेब देसाई, न्या. पी. एस. मालवणकर आणि न्या. म. द. कांबळी, विंग कमांडर विनायक सावंत (आंगणेवाडी), कॅप्टन मोहन सामंत, प्रख्यात कवी-गीतकार गंगाधर महाम्बरे, स्वातंत्र्य आंदोलनात प्रचंड हालअपेष्टा सोसलेले माजी आमदार शंकरराव गवाणकर, अभिनेते दिग्दर्शक कमलाकर सारंग (आचरा), यांच्यासह प्रख्यात ज्योतिषी होरारत्न वसंत लाडोबा म्हापणकर आणि ‘कालनिर्णय’चे जयंतराव साळगावकर हेही मालवणचेच. सर्वप्रथम कोकण रेल्वेचा आराखडा तयार करणारे आणि मालवणीमध्ये गीता लिहिणारे अ. ब. वालावलकरही याच भागातले.
कुडाळी-मालवणचे व्याकरण लिहिणारे आ. रा. देसाई, डॉ. मि. ग. नाईक, गुं. फ. आजगावकर यांच्यासह आ. ना. पेडणेकर, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, डॉ. वसंत सावंत, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, महेश केळुस्कर यांनी मालवणी लोकभाषेला आपल्या साहित्यातून एका वेगळ्याच उंचीवर नेलं. तर ‘वस्त्रहरण’ सादर करून मच्छिंद्र कांबळी यांनी तिचा गोडवा सर्वदूर नेला. मालवणी बोलीत लिहिणारे पहिले मालवणी कवी आणि सावंतवाडी संस्थानचे एज्युकेशनल इन्स्पेक्टर वि. कृ. नेरुरकर यांचं स्मरण ठेवून गेली काही वर्षं या भागात मालवणी संमेलन साजरं होत आहे हे विशेष. ‘विचारशील’, ‘तरुण मित्र’ यांसह खांडाळेकर यांचं ‘जनयुग’ साप्ताहिक ही मालवणची विशेष ओळख. साहित्यिक अंगाने भविष्य सांगणाऱ्या वसंत म्हापणकरांनी ४० वर्षं ‘धनुर्धारी’मधून अखंडपणे भविष्य लिहिलं. कन्नड, गुजराथी, इंग्रजीतूनही ते अनुवादित होत असे. भालजी पेंढारकर, लता मंगेशकर हे त्यांना खास भेटण्यासाठी १९५५ मध्ये मालवणला गेले होते.
सिंधुदुर्ग किल्ल्यासह मालवणच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी ‘सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती’द्वारे राजीव परुळेकर, गुरुनाथ राणे, भूषण साटम, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, हिरबा जोशी, ज्योती तोरस्कर आदींनी राबवलेली मोहीम कौतुकास्पद म्हणावी लागेल. दशावतारी नाटकं, भजन, कीर्तनं, गणेशोत्सवासह अनेक सणवार, यात्रा आणि विविध देवदेवतांच्या स्वच्छ आणि प्रसन्न मंदिरांनीच खरंतर कोकणचा गाभारा सदैव भरलेला आणि भारलेला असतो. कवी अनिल यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि २५ वर्षांपूर्वी झालेलं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे मालवणकरांच्या रसिकतेचंच प्रतीक!
‘करूच तसा भरूचा’ आणि ‘हातात नाय अर्धी नि बाजारभार गर्दी’ अशा खणखणीत मालवणी म्हणींचा रोखठोक वापर करीत समोरच्याला थंडगार करणाऱ्या मालवणी माणसाचं श्रीदेव रामेश्वरासह अनेक देव-देवतांना घातलं जाणारं गाऱ्हाणं अजूनही या भागाच्या विकासाला म्हणावी तशी गती देण्यासाठी का मान्य होत नसावं? हा बाहेरच्यांना हमखास पडणारा प्रश्न. वैभवशाली इतिहास, समोर अथांग सागर आणि वर अनंत आकाश रोजच्या रोज नजरेसमोर असताना आता मालवणकरांनी उराशी भव्य स्वप्नं बाळगून सर्वांगीण विकासाची ‘डबलबारी’ साधायला हवी!
(सदराचे लेखक पत्रकार असून, शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.