सहकारपंढरी!

वारणेच्या खोऱ्यात ७०-८० वर्षांपूर्वी मुरबाड जमीनच अधिक. शेती फारशी यशस्वी होत नसल्याने अनेकांनी लुटालूट, वाटमारी, दरोडे टाकणं हेच उदरनिर्वाहाचं साधन मानलं होतं.
S R Patil
S R PatilSakal
Updated on
Summary

वारणेच्या खोऱ्यात ७०-८० वर्षांपूर्वी मुरबाड जमीनच अधिक. शेती फारशी यशस्वी होत नसल्याने अनेकांनी लुटालूट, वाटमारी, दरोडे टाकणं हेच उदरनिर्वाहाचं साधन मानलं होतं.

‘सहकार’ ही पश्चिम महाराष्ट्राची, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याची विशेष ओळख आहे. सहकार हा कोल्हापूरकरांचा स्थायीभाव आहे. सहकारातील एक जुने जाणते नेते एस. आर. पाटील (पडळी खुर्द) यांच्या ३४ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘सहकार सुगंध’ या पुस्तकात एके ठिकाणी ते लिहितात, ‘‘विनोदाने काही लोक असं म्हणतात की, सर्वसाधारण मनुष्याच्या शरीरात रक्तामध्ये दोन पेशी असतात. एक तांबडी व एक पांढरी; परंतु कोल्हापूरच्या माणसाच्या रक्तात तिसरी सहकाराची एक पेशी आढळेल! इथं सहकारी तत्त्वावर काहीही करण्याची, किंबहुना परिस्थितीने अनुकूलता दर्शविल्यास ‘सहकारी संघराज्य’देखील उभं करण्याची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यात आहे.’

आजही हे सर्वार्थाने खरंच आहे. हजारो किलोमीटरवरून कापूस आणून इथं खासगी आणि सहकारी सूत गिरण्या यशस्वीपणे सुरू आहेत, निर्यात करतात; पण जिथं कापूस पिकतो, त्या विदर्भात मात्र हे दृश्य दुर्मीळ. अगदी विद्यार्थ्यांच्या सहकार भांडारापासून ते ॲल्युमिनिअमच्या कारखान्यापर्यंत आणि सा. रे. पाटील यांच्यासारख्या कल्पक नेत्याने लॉजपासून ते ‘इंद्रधनुष्य’ नावाच्या वृत्तपत्रापर्यंत सहकारी तत्त्वावर अनेक प्रकल्प पूर्वी यशस्वी करून दाखवले.

राजर्षी शाहू महाराजांनी सहकार चळवळीला मदत केली. पुढं महाराष्ट्रात धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, तात्यासाहेब मोहिते, रत्नाप्पाण्णा कुंभार आदी अनेकांनी या चळवळीसाठी योगदान दिलं. यातील एका नावाशिवाय भारताच्या सहकार चळवळीचा इतिहास अपुरा राहील, ते नाव म्हणजे वारणानगर वसविणारे आणि देशभरात सहकाराचं ‘वारणा मॉडेल’ प्रस्थापित करणारे वि. आ. तथा तात्यासाहेब कोरे!

वारणेच्या खोऱ्यात ७०-८० वर्षांपूर्वी मुरबाड जमीनच अधिक. शेती फारशी यशस्वी होत नसल्याने अनेकांनी लुटालूट, वाटमारी, दरोडे टाकणं हेच उदरनिर्वाहाचं साधन मानलं होतं. ऐतिहासिक पन्हाळा आणि महाराष्ट्राचं कुलदैवत श्रीक्षेत्र जोतिबाच्या आसपासचा हा परिसर. १९२० च्या दशकात कोडोली (ता. पन्हाळा) इथं तात्यासाहेबांचा जन्म झाला, तो एका शेतकरी कुटुंबात. पण, एक तर शेतीवर नैसर्गिक संकटं यायची (आजही येतातच!), वैज्ञानिक दृष्टीचा अभाव, शिक्षणाच्या सुविधा नाहीत, त्यामुळे पिकाला फारसा भावही मिळायचा नाही. बऱ्याच वेळा उसाचं पीक जाळून टाकावं लागायचं. खुद्द तात्यासाहेबांच्या घरावरही दरोडा पडला होता. अशा परिस्थितीत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या, प्रतिसरकारच्या भूमिगत क्रांतिकारकांना आश्रय देणाऱ्या, कोल्हापूरच्या प्रजा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या तात्यासाहेबांनी वारणेच्या खोऱ्यातील ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. ‘दरोडेखोरांचं आश्रयस्थान’ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर पूर्ण बदलण्याचा निर्धार त्यांनी केला, त्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी अक्षरशः पायाला भिंगरी लावून साखर कारखाना उभारणीसाठी रात्रंदिवस कष्ट घेऊ लागले. त्याकाळी साडेतीन वर्षांत ते घरातल्या एकाही सण-समारंभात सहभागी होऊ शकले नव्हते. पावसाचं पाणी साठवण्यासाठी त्यांनी वारणेवर चार बंधारे बांधून घेतले, ६५ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरू केल्या, ७० खेड्यांमधील कोरडवाहू जमीन हिरवीगार केली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि रत्नाप्पाण्णांच्या सहकार्याने १९५९ मध्ये सुरू झालेला वारणा सहकारी साखर कारखाना ही संस्था म्हणजे तात्यासाहेबांच्या अफाट परिश्रमाला आलेलं पहिलं फळ!

त्यानंतर मात्र तात्यासाहेबांनी निवडणुकांच्या पक्षीय राजकारणात कधीही सहभाग न घेता वारणा सहकारी साखर कारखाना आणि त्या माध्यमातून जीवनाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या प्रकल्पांची वारणा परिसरात मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी-कामगारांना या सर्व सहकारी संस्था त्यांच्या मालकीच्या असल्याने आपल्याच वाटाव्यात, आपली गाऱ्हाणी मांडता यावीत म्हणून तात्यांनी कारखान्याची प्रशासकीय इमारत भारताच्या संसदेच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात उभारली आणि तिला ‘कृषी संसद भवन’ हे नाव देण्यात आलं. कामगारांना राहण्यासाठी चाळी बांधण्यात आल्या. त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरू झाली. हनुमान मंदिराबरोबर कला, साहित्य, संस्कृती, साहित्यिक उपक्रमांसाठी ‘लालबहादूर शास्त्री भवन’ उभं राहिलं. वारणा साखर कारखाना आणि परिसरात जागा मिळेल तिथं वृक्षवेली फुलविण्यात आल्या. ‘वारणा’ने स्वतःची वीजनिर्मितीही सुरू केली.

पुढं वारणा शिक्षण मंडळामार्फत पूर्वप्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षण, आय.टी.आय., अभियांत्रिकी-फार्मसी महाविद्यालय, शिक्षक प्रशिक्षण विद्यालय, सैनिकी शाळा, महात्मा गांधी मेडिकल ट्रस्ट आणि रुग्णालय, दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, नर्सिंग स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वारणा सहकारी दूध उत्पादक संघ, वारणा बँक, वारणा महिला गृह उद्योग, वारणा भगिनी मंडळ, ग्रंथालय, सह्याद्री कुक्कुटपालन संस्था, अद्ययावत व्यायामशाळा, पशुखाद्य आणि कागद प्रकल्प, वाहतूक संघ, फळ प्रक्रिया प्रकल्प, पतसंस्था, बचत गट असे एक ना अनेक प्रकल्प ‘वारणे’त साकार होऊ लागले. ‘मॉल’ हा शब्दही कानावर येत नसे, अशा काळात १९७६ मध्ये ‘वारणा बझार’ची स्थापना करण्यात आली. डिपार्टमेंटल स्टोअर्स, ५० हून अधिक शाखा, १८ हजारांवर सभासद आणि कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली. या सर्व संस्था आणि वारणा औद्योगिक वसाहतीमुळे वारणानगरची ओळख ‘सहकार पंढरी’ म्हणून देशभरात झाली.

वारणा दूध संघाच्यावतीने दुधावर प्रक्रिया करून अनेक उत्पादनं सुरू झाली, आज अशा सर्व उत्पादनांचा आणि संस्थांचा ‘वारणा ब्रॅण्ड’ प्रस्थापित झाला आहे. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डस्‌ वारणेकडे आकर्षित झाले. आजही रोज सुमारे ७० टन इतका बोर्नव्हिटा वारणा प्रकल्पात तयार होतो. ड्रिंकिंग चॉकलेट, कॅडबरीही तयार होत असे. या सगळ्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी ५० वर्षांपूर्वी तात्यासाहेबांनी शंकरराव कुलकर्णी यांच्यासारख्या हाडाच्या संगीत शिक्षकाकडे नेतृत्व देऊन ‘वारणा बालवाद्यवृंदाची’ स्थापना केली. शेतकरी, कामगार आणि खेडेगावांतील मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी सर्व भारतीय वाद्यं त्यांना शिकवण्यास प्रारंभ झाला. पहिली ते दहावीपर्यंतची शंभर-सव्वाशे मुलं आजही शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि पाश्चात्त्य संगीत इथं शिकतात. प्रत्येक मुलामुलीला प्रत्येक वाद्य वाजवता आलं पाहिजे इतकी तयारी शंकररावांनी करून घेतल्याने युगोस्लाव्हिया, दक्षिण आफ्रिका, मॉरिशसमध्येही वारणा बालवाद्यवृंदाला व्यावसायिक कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. या बालकलाकारांची आठवण म्हणून मॉरिशसमध्ये ज्या भागात बालवाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला, त्याला ‘वारणा चौक’ असंही नाव देण्यात आलं. सध्या विजय पाठक याची जबाबदारी सांभाळतात.

तात्यासाहेबांनी निवृत्ती विठोजी घोरपडे, बापूसाहेब गुळवणी मामा यांच्यासह आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने उभारलेल्या या ‘सहकारपंढरी''चं नेतृत्व त्यांच्यापश्चात त्यांचे नातू आमदार विनय कोरे यांच्याकडे आलं. त्यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, शेती प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा केंद्र, मिलिटरी ॲकॅडमी, सुराज्य फाउंडेशन असे अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले. तात्यासाहेबांनी निवडणुकांच्या राजकारणात कधी भाग घेतला नाही; पण विनय कोरेंनी जनसुराज्य पक्ष स्थापन करून काही आमदार निवडून आणले आणि मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. वारणा खोऱ्यातील ७० खेड्यांचा समावेश असलेला माहिती-तंत्रज्ञानावर आधारित ‘वारणा वायर्ड व्हिलेज’ प्रकल्पदेखील त्यांच्याच कारकीर्दीत साकारला.

सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाबरोबरच सामान्य शेतकरी मंडळींचं दरडोई उत्पन्न वाढवणे, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक समृद्धी आणण्यासाठी जीवनोपयोगी शिक्षणाची सुविधा देणे या सगळ्यातून वारणा खोऱ्यात केवळ शेतीचा कायापालट झाला नाही, तर इथला माणूसही बदलला! तात्यासाहेब कोरे आणि त्यांचे सहकारी, विनय कोरे आणि त्यांचे सहकारी, शेतकरी सभासद-कामगार, व्यवस्थापक आणि शिक्षक या सर्वांनी सामूहिकपणे उभारलेलं सर्वांगीण विकासाचं मॉडेल म्हणून वारणानगरचा सखोल अभ्यास व्हायला हवा.

(सदराचे लेखक पत्रकार असून, शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.