शेजार महत्त्वाचा

विसाव्या शतकात एकत्र कुटुंब पद्धत होती. आता २१ व्या शतकात कुटुंबे छोटी व्हायला लागली. आई-बाबा आणि एक किंवा दोन मुलं.
Neighborhood
Neighborhoodsakal
Updated on
Summary

विसाव्या शतकात एकत्र कुटुंब पद्धत होती. आता २१ व्या शतकात कुटुंबे छोटी व्हायला लागली. आई-बाबा आणि एक किंवा दोन मुलं.

आपल्याला घडवण्यात निसर्ग, पालक, शाळा, कुटुंबासह खूप मोठा वाटा शेजाऱ्यांचाही असतो. लहान असल्यापासून सामाजिक सुसंवाद, सामाजिक वर्तन या सर्व गोष्टी शेजाऱ्यांशिवाय आपण व्यवस्थितरीत्या शिकू शकत नाही. समाजात कसे जगायचे हे आपल्याला शेजार शिकवत असतो. स्वत:ची ओळख, अस्तित्व कसे राखायचे या सर्वाचे भान ठेवून कसे जगायचे, वाईट परिस्थितीशी कसे लढायचे हे आपल्याला शेजार शिकवतो.

विसाव्या शतकात एकत्र कुटुंब पद्धत होती. आता २१ व्या शतकात कुटुंबे छोटी व्हायला लागली. आई-बाबा आणि एक किंवा दोन मुलं. त्यामुळे आई-वडिलांना एका वेळेस अनेक कामं करावी लागतात. घरगुती कामेही करायची आणि पैसेही कमवायचे. त्यात मुलांचे बालपण जपायचे आहे. आता मोठी कुटुंबे नाहीत, तसा शेजारधर्मही उरला नाही. शेजारच्यांच्या मुलांसोबत खेळायला, त्यांच्यासोबत राहायला वेळ राहिला नाही. मुलांना घरी सांभाळायला आजी-आजोबा किंवा शेजारचे नाहीत. त्याचा पर्याय म्हणून आता प्री स्कूल, प्ले स्कूल, डे केअर आणि पाळणाघर आहेत. अगदी सहा महिन्यांच्या पुढच्या मुलांना थेट पाळणाघरात घातले जाते. जे शिक्षण सहा वर्षांपुढे सुरू व्हायचे, ते आता सहा महिन्यांपासून सुरू झाले. हे खूप वाईट आहे असे नाही, पण आपल्याला घडवण्यात एक वाटा निसर्ग, पालक, शाळा, कुटुंबाचा असतो, तसाच खूप मोठा वाटा शेजारचाही आहे. लहान असल्यापासून सामाजिक सुसंवाद, सामाजिक वर्तन, नॉन वर्बल कम्युनिकेशन, वर्बल कम्युनिकेशन या सर्व गोष्टी शेजाऱ्यांशिवाय आपण व्यवस्थितरीत्या शिकू शकत नाही. समाजात कसे जगायचे हे आपल्याला शेजार शिकवत असतो. वेगवेगळ्या लोकांशी कसं वागायचं, स्वत:ची ओळख, अस्तित्व कसे राखायचे या सर्वाचे भान ठेवून कसे जगायचे, वाईट परिस्थितीशी कसे लढायचे हे आपल्याला शेजार शिकवतो. यासह संयम आणि शेअरिंग हेदेखील समाजातूनच आपल्याला शिकायला मिळतं.

लेट वायगॉस्की नावाच्या एका रशियन शास्त्रज्ञाने बालविकासावर अतिशय चांगले काम केले आहे. त्याची स्कॅफोल्डिंगची एक थेअरी आहे. लहान रोपटं वाढावं म्हणून त्याच्या बाजूला एक कुंपण तयार केलं जातं. त्या कुंपणाला धरून ते रोपटं वाढत असतं. ती वेल त्या कुंपणासारखीच आकार घेते. त्याचप्रमाणे मुलांची जी वाढ असते, ती समाजाने दिलेल्या आधारातून होत असते. ही स्कॅफोल्डिंग आपल्याला समाजात आणि शेजार यामध्ये मिळू शकते. यातून उत्तमरीत्या विकास होण्यास मदत होते. अर्थातच यात शाळेचा खूप मोठा वाटा आहे, पण शाळेच्या जाण्याआधी जी प्रगती होते ते समाजातून सुरू होते.

शाळेत एका विद्यार्थ्याला वैयक्तिक स्कॅफोल्डिंग मिळत नाही. तिथे मुलांना लेबलिंग केले जाते. हे मूल हायपर अॅक्टिव्ह आहे. पेन्सिल व्यवस्थित धरत नाही. शांत बसत नाही, मस्ती करतो, धडपड करतो, यातून मुलाला काही तरी समस्या आहे असे लेबलिंग केले जाते. आई-वडिलांनाही सांगितले जातं की मुलाला़ डॉक्टरांकडे दाखवायला हवं. यातून आई-वडिलांमध्ये नैराश्य येते, लाज वाटते. त्यांना वाटते की माझ्या मुलांमध्ये वेगळेपणा आहे, काही तरी नकारात्मक आहे.

आजही माझ्याकडे किमान दोन ते तीन थेरपी करून आलेली मुलं येतात. त्याची खरंच गरज आहे का हे तपासलं जात नाही. प्रत्येक मुलाच्या विकासाचा वेग हा वेगवेगळा असतो. तो कधी उभा राहील, कधी बोलेल याचा एक ठराविक टप्पा असतो, पण त्या ठराविक टप्प्यापूर्वी जर त्याने ते करून दाखवले तर तो फिटेस्ट झाला; पण ज्याने या सर्व क्रिया कमी वेगात केल्या तर त्याला स्लो आहे असं संबोधलं जातं. एखादं मूल अभ्यासात जर हुशार असेल; पण त्याच्या स्वभावात बरेचसे दोष असतील, एखादं मूल प्रेमळ असेल, पण त्याचे लेखन एकदम स्लो असेल. प्रत्येक मुलाला अडीच वर्षांत अ, ब, क, ड किंवा अ, आ, इ, ई लिहिता येईल असं नाही.

वारंवार होणाऱ्या चुका टाळण्यासाठी सरावाची गरज असते. सराव म्हणजे ट्यूशन किंवा थेरपी नाही. सराव देणे हे शिक्षकाचे काम आहे, पण हा सराव शिक्षकांपेक्षा शेजारातून जास्त होतो. शाळेत गेल्यावर एक वेळापत्रक सुरू होते. त्या वेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांवरही दडपण असते. ठरलेल्या वेळेत प्रत्येक मुलाकडून त्यांना सराव पूर्ण करून घ्यायचा असतो. शेजाऱ्यांत मात्र वेळेची मर्यादा नसते, पण दुर्दैवाने आपल्या मुलांना शेजार उरलेला नाही, पण कोणाला दोषही द्यायचा नाही. सध्या तंत्रज्ञानाची उत्क्रांती होतेय. मनुष्याची उत्क्रांती होत नाही. तंत्रज्ञानाची उत्क्रांती मनुष्याच्या उत्क्रांतीला सुधारक असावी; पण मुलांबाबत ते होते का, याचा विचार करण्याची गरज आहे.

या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी शोधावी. पहिल्यांदा आई-वडिलांनी स्वत:चे एक वेळापत्रक तयार करायला हवे. आपल्या मुलांना स्वत:सोबत, नातेवाईकांसोबत वेळ कसा घालवायला मिळेल, मॉलमध्ये जाण्यापेक्षा नातेवाईकांकडे घेऊन जाण्याकडे कल असावा. समाजात प्रत्येक व्यक्ती समजून घेईल असे नाही. त्यामुळे नातेवाईकांनी मुलांमधल्या चुका सांगितल्या तरी काहीही हरकत नाही. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दोन दिवस आपण साजरे करतो, पण त्यातही माझ्या मुलाने डान्स किती चांगला केला, गाणं किती छान म्हटलं. सर्वांत उत्तम कोण याकडे आपले लक्ष जास्त असते. कार्यक्रमात पहिला कोण, याकडे बघण्यापेक्षा त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मेहनत कोणी घेतली त्या मुलांकडे लक्ष द्या. पहिला आणि परफॉर्मन्स करणाऱ्यांकडे बघण्यापेक्षा ते आयोजित कोणी केलं होतं त्याकडे बघा.

प्रत्येक सण साजरे केले पाहिजेत. त्यांना चकली, लाडू, शिरखुरमा, केक या सर्व गोष्टी एकत्र खाऊ द्या, ते बनवण्यासाठी मदत करू द्या, वयस्कर शेजारी काका-काकू असतील तर त्यांच्या हातातील पिशव्या घेण्यास प्रवृत्त करा. मुलांचा जो काही शेजार असेल किंवा त्यांचे जे सामान्य आयुष्य असेल त्यावर नियंत्रण आणण्याची गरज नाही. जरी पावसात भिजले तरी काहीही हरकत नाही, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेय.

एका वेळेस सहा महिलांनी एकत्र यावं. एक दिवस सर्वांच्या मुलांना एका आईच्या घरी पाठवा. त्या दिवशीचा खाऊ तिने बनवायचा. तिथे ती मुले एकत्र खेळतील. असं करत प्रत्येक मुलाला सहा आई मिळतील. हे असं कुठेच होऊ शकत नाही, हे फक्त तुमच्या शेजारी होऊ शकतं. रविवारी सोसायटीमध्ये खेळाच्या स्पर्धा आयोजित करायला लावा किंवा इतर दिवशी संध्याकाळच्या वेळेस अंताक्षरीचे आयोजन करा. ज्यात पालकांनीही सहभाग घ्यावा. प्रत्येक वेळेस पालकांनी सहभागी व्हायची गरज नाही, पण तशी प्रत्येकाची ड्यूटी लावा. दर तीन महिन्यांनी सोसायटीची सहल काढा. सोसायटीच्या सर्व सदस्यांना घेऊन जा. आळीपाळीने सहभागी व्हा. तुमच्या मुलांचे आयुष्य चांगले करायचे असेल तर शेजार पुन्हा निर्मित करा!

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.