शाळा सुरू झाल्याने मुलांमध्ये उत्साह आहे. त्याचं ताबडतोब अभ्यासात रूपांतर करू नये. गेली दोन वर्षे मुलांनी प्रचंड त्रास सहन केला.
शाळा सुरू झाल्याने मुलांमध्ये उत्साह आहे. त्याचं ताबडतोब अभ्यासात रूपांतर करू नये. गेली दोन वर्षे मुलांनी प्रचंड त्रास सहन केला. निगेटिव्ह गोष्टी घरी पाहिल्या. ते सर्व त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना बोलू द्या, एकमेकांत मिसळू द्या, मित्र-मैत्रिणींचं ऐकू द्या. सर्वांना आपापली गोष्ट सांगू द्या. मुलांना मज्जा करू द्या. लगेच त्यांच्यावर अभ्यासाचे ओझे लादू नका.
जिथे कोविडची मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या होती त्या महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत शाळा सुरू झाल्याचे संपूर्ण देशात कौतुक आहे. दिल्लीतील काही पालक आणि शिक्षकांनी विचारणा केली की, ‘‘शाळा कशा सुरू करून घेतल्या?’’ त्यावर आपल्याकडे झालेले वेबिनार, ज्यात आम्ही सहभागी झालो त्याची माहिती दिली. काही ऑनलाईन पिटीशन, महाराष्ट्रातील टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांविषयी अवगत केले. आता दिल्लीचे इंडियन अकादमी ऑफ पिडीयाट्रीचे सहकारी बालरोगतज्ज्ञ व शिक्षण क्षेत्रातील काही सहकारी दिल्ली सरकारला निवेदन करत आहेत की, त्यांनी शाळा सुरू कराव्यात. याच प्रमाणे आता हळूहळू देशभर शाळा सुरू व्हायला हरकत नाही.
महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्यानंतर काही पालक व शिक्षक माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी अनुभवलेल्या काही गोष्टी खरोखरच नोंद करण्यासारख्या आहेत. मुलं शाळेत येत आहेत त्याचे प्रत्येक शिक्षकाला कौतुक वाटते. शिक्षकांचा आनंद आणि मुलांचा उत्साह टिकवून ठेवायचा आहे. त्याचं ताबडतोब अभ्यासात रूपांतर करण्याची गरज नाही. मुलांना वर्गात एकमेकांशी बोलू द्या. गेली दोन वर्षे मुलांनी प्रचंड त्रास सहन केला आहे. प्रचंड निगेटिव्ह गोष्टी घरी पाहिल्या आहेत. त्यातून ते गेलेसुद्धा आहेत. ते सर्व त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना बोलू द्या, एकमेकांत मिसळू द्या. ऐकू द्या. सर्वांना आपापली गोष्ट सांगू द्या. इतरांची गोष्ट ऐकल्यावर आपल्यालाही जरा बरं वाटतं. धीर येतो की, मी एकटाच या परिस्थितीत नव्हतो. इतरही आहेत. म्हणूनच ज्या असामान्य गोष्टी झालेल्या आहेत, त्यांना पुन्हा सामान्य दृष्टिकोनातून बघण्यास शिकवायला हवे.
मुलं शाळेतून घरी आल्यावर पालकांनी आज शाळेत काय झालं, त्याहूनही वाईट, आज तू काय शिकलास, असे प्रश्न विचारण्याची घाई करू नये. मजा आली का? किंवा आज काय मजा केलीस? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारा. शाळा ही मजा आणि गमतीसाठीच आहे, असं मुलांना काही दिवस वाटलं तरी हरकत नाही. त्यांना ती गंमत तुमच्याशी शेअर करू द्या. पालकांनी आणि शिक्षकांनी लगेच अभ्यासक्रमाकडे कूच करू नये.
ऑनलाईन अभ्यासासाठी सर्वच मुलांच्या घरी लॅपटॉप नव्हता. तेव्हा मुलांचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम मागे पडला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाचे आकलन मुलांनी किती केले आहे, हे बघणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी पहिले काही दिवस सरासरी प्रत्येक मुलाचे आकलन किती झाले आहे, याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानंतर काही दिवसांनी मूल्यांकन करायला हरकत नाही. अजूनही काही पालक आहेत, त्यांनी मुलांना शाळेत पाठवलेले नाही. त्यांना कदाचित अजूनही भीती वाटत असेल. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यांना आधार दिला पाहिजे. हळूहळू त्यांचे मन तयार करायला हवे. इतर मुले शाळेत जातायत, आनंदी आहेत, त्यांना कोरोनाची भीती नाही, आपल्याही मुलांना शाळेत पाठवायला हरकत नाही, हे सारे समजावून सांगावे लागेल.
ज्या मुलांना सर्दी, खोकला होईल आणि तो होणारच आहे. आता सर्दी, खोकला जसा नेहमी शाळेत गेल्यावर होतो तसा तो होणारच आहे. काही टक्के कोविडचा सर्दी-खोकला होईल. त्यातून काही टक्केवारी थोडीशी वाढेल. तेव्हा सर्दी, खोकला, ताप या सर्व गोष्टी कोविडच्या पूर्वीही होतच होत्या. त्याचप्रमाणे आता कदाचित थोडीशी संख्या वाढलेली असेल. ज्या मुलांना सर्दी, खोकला, ताप असेल त्या मुलांना काही दिवस शाळेत पाठवू नका, डॉक्टरांना दाखवा, उपचार करून घ्या. डॉक्टरांनी परवानगी दिली की त्यांना शाळेत पाठवा. अजूनही काही शाळा चाचण्यांबद्दल हट्ट करत आहेत. त्यांची समजूत घालावी की, वैज्ञानिकदृष्ट्या चाचण्या करण्याला काहीही अर्थ नाही. तेव्हा आरटीपीसीआर आणि रॅट चाचणी करण्याची गरज नाही. ज्या मुलांना आजार असेल त्यांना थोडे दिवस आराम करू द्या. ज्यांना काहीही लक्षणे नाहीत त्या मुलांना शाळेत जाऊ द्या आणि मजा-मस्तीचा आनंद घेऊ द्या.
samyrdalwai@gmail.com
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.