सामान्य-असामान्य : खरं जीवनशिक्षण

मित्रांनो, जागतिक साक्षरता दिन गेल्याच आठवड्यात साजरा झाला. हा जीवनातलं शिक्षणाचं महत्त्व सांगणारा दिवस. खरं जीवनशिक्षण कशाला म्हणायचं? सांगता येणार नाही.
education
educationsakal
Updated on

- डॉ. संजय वाटवे

मित्रांनो, जागतिक साक्षरता दिन गेल्याच आठवड्यात साजरा झाला. हा जीवनातलं शिक्षणाचं महत्त्व सांगणारा दिवस. खरं जीवनशिक्षण कशाला म्हणायचं? सांगता येणार नाही. ‘जीवन जगण्यासाठी असलेलं शिक्षण’ अशी व्याख्या केली तर प्रत्येकाच जीवन वेगळं. जीवनाकडून असणारी अपेक्षा वेगळी, म्हणजे जीवन शिक्षण वेगळं.

मग सर्वव्यापी व्याख्या कशी करणार? मग असं म्हणता येईल, का की जीवनात यशस्वी होण्याकरता लागणारं शिक्षण? आता तर अजूनच गोंधळ. यश कसं ठरवणार? चारचौघासारखं शाळा-कॉलेज शिकून चांगल्या पगाराची नोकरी (म्हणजे कोणातरीपेक्षा सरस पगार) मिळवणं म्हणजे यशस्वी बनणं का? की सुजाण, सुसंस्कृत, सभ्य, प्रगल्भ, जबाबदार नागरिक होणं म्हणजे यशस्वी बनणं? काही क्षेत्रांत दोन्ही होणं शक्य नसतं.

ठराविक साच्याचं शाळा-कॉलेज शिक्षण म्हणजे जीवनशिक्षण का? अर्थातच नाही. कारण सगळे शिकलेले यशस्वी नाहीत. आणि सगळे यशस्वी शिकलेले नाहीत. आता तर ‘ड्रॉप आऊट बाय चॉईस’चं प्रमाण फार वाढलं आहे.

खरं जीवन शिक्षण कुठेही मिळतं. घरात, दारात, पालकांकडून, मित्रांकडून, समाजाकडून, गुगलकडून- चहुबाजूंनी आपल्याला शिक्षण मिळत असतं. हवी फक्त डोळस चौकस बुद्धी, आणि आत्मसात करण्याची वृत्ती. सगळ्यात मोठा गुरू म्हणजे प्रत्यक्ष जीवन! त्यामुळे माझी व्याख्या अशी आहे, की जीवनाकडून मिळणारं शिक्षण म्हणजे खरं जीवनशिक्षण. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीतून, व्यक्तीतून, घटना-प्रसंगांतून आपल्याला शिकता येऊ शकतं.

पण शिकतं कोण? हवं तर सर्व शिक्षक, कौन्सेलर, सॉफ्ट स्कील ट्रेनर्स यांना त्यांचे अनुभव विचारा. त्यांचे क्लायंट्स डिग्री होल्डर असतात; पण शिकलेले नसतात, शिकत नसतात. अशा न शिकणाऱ्या लोकांना हे सुभाषित लागू पडतं:

‘ज्ञान सतत माझा पाठलाग करत असतं; पण नेहमी मीच शर्यत जिंकतो. ज्ञानाला जवळच येऊ देत नाही.’

बारामती तालुक्यातील एक महिला सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी आल्या होत्या. त्यांच्या १३-१४ वर्षाच्या मुलाला घेऊन. त्याला मतिमंदत्व आणि वर्तन समस्या होत्या. मी त्यांना सांगितलं, ‘वर्तन समस्यांचा इलाज होईल. या वयात बुद्धी फार वाढणार नाही. बुद्धी वाढवण्यापेक्षा वापरायला शिकवा.

काही गोष्टींना फारसा उपचार नसला, त्याला कोणत्याही शाळेत घेत नसले, तरी घरात गुळाचा गणपती करून ठेवू नका. त्याला जगाच्या शाळेत शिकू द्या. तुमच्या माघारी त्याचं काय? म्हणून तुमच्या डोळ्यादेखत त्याला स्वयंपूर्ण करा.’

त्याला घरी कोणतं ट्रेनिंग देता येईल? आणि समाजाकडून काय शिकता येईल याचं मार्गदर्शन केलं. ‘या केसमध्ये गोळ्यांचाही गुण खूप अवकाशानं येतो. दोन्ही चिवट प्रयत्न चालू ठेवा. ‘ये एक दिन में नहीं होगा, मगर एक दिन जरूर होगा!’, असं सांगितलं.

सुमारे चार वर्षांनी त्या माझ्याकडे परत आल्या. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा कोवळेपणा जाऊन प्रौढ भाव आले होते. मिशा फुटल्यामुळे मोठा दिसत होता. निर्बुद्ध, निस्तेज चेहरा जाऊन थोडा स्मार्ट दिसत होता. त्याच्या आई खूप आनंदात होत्या. त्याला घरी आणि बाहेर बऱ्याच प्रकारचं ट्रेनिंग यशस्वीरीत्या देऊन झालं होतं.

घड्याळ, पैशाचे व्यवहार, समाजव्यवस्था कळायला लागली होती. सायकल चालवता येत होती. नशिबानं एका किराणा दुकानात नोकरीही मिळाली होती. स्वतःपुरती कमाईही करत होता. जगाच्या शाळेत शिकत होता.

त्याच्या जीवनाला योग्य दिशा लागली म्हणून मला बरं वाटलं; पण माझ्या जीवनशिक्षणाच्या व्याख्येपेक्षा त्याच्या आईच्या संकल्पना वेगळ्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘गोळ्या मस्त आहेत, खूप फायदा झाला. आम्ही चार वर्षं त्याच गोळ्या देत आहोत.’ त्या बेसुमार हरखून गेल्या होत्या. त्यांच्या मते जीवनशिक्षण पूर्ण झालं होतं.... कारण त्या पुढे म्हणाल्या, ‘त्याचं आता मस्त चाललंय, ढापाढापी चांगली जमायला लागली.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.