सामान्य-असामान्य : ‘ सुइसाइड पॅक्ट’

मित्रांनो १० ऑक्टोबर हा जगभरात मनस्वास्थ्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा सगळा सप्ताहच मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी साजरा केला जातो.
Mental health
Mental healthEsakal
Updated on

- डॉ. संजय वाटवे

मित्रांनो १० ऑक्टोबर हा जगभरात मनस्वास्थ्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा सगळा सप्ताहच मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी साजरा केला जातो. आपल्या देशात, समाजात लोक मानसिक आजारांबाबत आणि आरोग्याबाबत संपूर्ण अनभिज्ञ आहेत. जीवनाला कलाटणी देणारं हे शास्त्र लोकांनी अजून अंगीकारलेलं नाही. आजची केस त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

मनीष एक डॅशिंग, बहुउद्योगी माणूस. अंगात प्रचंड एनर्जी, कायम उत्साही. बोलणं प्रभावी आणि परिणामकारक. कोणावरही छाप टाकण्याची कला अवगत असल्यामुळे आपल्या मनासारखं करवून घेणारा. देण्याघेण्याची किमया साध्य असल्यामुळे अपयश नाहीच. मनासारखं घडेपर्यंत धडपड करण्याची जिद्द होती. दुर्दम्य प्रयत्नवादी आणि आशावादी.

अनेक प्रकारचे उद्योगधंदे त्याच्या ऑफिसमध्ये चालत. कुठे पैसा मिळेल हे हेरून धंदा बदलायची तयारी असायची. ऑफिसमध्ये आणि घरामध्ये अगदी डॉमिनेटिंग. गरज पडेल तसं कोणाच्याही पाया पडायची, कोणालाही बाप बनवायची लाज वाटत नसे. जनसंपर्क दांडगा. त्यामुळे धंद्यात खूप बरकत येत गेली.

इतर सगळे व्यापार, व्यवसाय सांभाळून शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि त्याचे क्लासेस सुरू केले. आधीच हायपर- त्यात मार्केटवर लक्ष ठेवायचं म्हणून सेन्सेक्स, निक्केई, नासडॅकचा अभ्यास. म्हणजे चोवीस तास डोक्याला गिरमिट. जीवाला स्वास्थ्य नाहीच. ताण असह्य झाल्यामुळे माझ्याकडे आला. उपचार यशस्वी झाला. तो ताणातून मुक्त झाला.

चोवीस तास डोक्याला ताप नको म्हणून शेअर मार्केट बंद करून लॉटरीचा जोडधंदा सुरू केला. मनीषला एक मोठी खोड होती. धंद्यात आडवीतिडवी धाडसं करण्याची. नशीब असेपर्यंत बरकत. नंतर तोंडावर आपटायचा. अतोनात पैसे मिळवून शांतता, स्थिरता नाहीच. सापशिडीचा खेळ सततचा.

त्याला मूड स्विंगही असायचे. तेवढ्यापुरती ट्रीटमेंट घेऊन पुन्हा सापशिडी खेळत बसायचा. शांत जीवनपद्धती अंगीकारण्याचं माझं सांगणं कधी ऐकलं नाही. त्याला बायकोही छान मिळाली होती. सुस्वरूप, सुस्वभावी डॉक्टर बायको होती. स्वभावानं गरीब आणि पडखाऊ असल्याने त्याच्यापुढे गप्प बसायची. होला हो करून जीवन काढत होती. दोन गोंडस मुलंही होती. त्यांना अतिधाकात वाढवलेलं होतं. त्याच्या धिंगाण्यापुढे मुलंही मान तुकवायची.

बऱ्याच वर्षांनी त्याच्या बायकोचा फोन आला, ‘मनीष खूप खचलाय. ट्रीटमेंटला तयार नाही. काही नातेवाईक त्याला जबरदस्तीनं धरून घेऊन येत आहोत.’ मनीषला धरून आणलं. हवा गेलेल्या टायरसारखा दिसत होता. डोळ्याभोवती काळी वर्तुळं, पडेल, काळवंडलेला चेहरा, पिंजारलेले केस, मान खाली घालून बसला होता. मान वर केलीच, तर डोळ्यात पराभूत भाव दिसत होते.

संभाषण करण्याची शक्तीही नव्हती आणि इच्छाही नव्हती. ‘मला इथे पकडून आणलं आहे; पण मला ट्रीटमेंट घ्यायची नाही. माझ्यावर जबरदस्ती करू नका. ट्रीटमेंटचा काही उपयोग होणार नाही. सगळं संपलंय. खेळ खलास झालाय,’ एवढं बोलून मान टाकून बसला.

त्याला थोडंसं बळजबरीनं नार्को सीटिंग्ज दिली गेली. त्यात खूप धक्कादायक माहिती बाहेर आली. आपण बरे झाले आहोत या समजुतीमुळे गोळ्या केव्हाच बंद केल्या होत्या. वेडीवाकडी धाडसं अंगाशी येऊन अनेक ठिकाणी देणी झाली होती. इकडचे पैसे तिकडे फिरवण्याचे धंदे चालू होते. खासगीमध्येही लोन झाली होती. लोन फेडण्यासाठी लोन झाली होती. प्रॉपर्टी विकूनही फेड होत नव्हती. धंद्याचे आडाखे आणखीन आणखी फसत गेले.

फोनवर पैशाचे तगादे सुरू झाल्यामुळे फोन बंद ठेवायला लागला. मग लोक ऑफिसमध्ये यायला लागले. स्टाफसमोर धमक्या, अपमान सुरू झाले. मग घरी बसायला लागला. कुढत विचार करत बसायचा. पैसे मिळण्याची आशा वाटत नव्हती. सगळे मार्ग बंद. झोपायचा नाही, जेवायचा नाही. रात्री अंधारातसुद्धा लाईट न लावता केस पिंजारत बसायचा. भकास दिसायला लागला. मरणाचं बोलायला लागला.

बायकोनं अनेक वेळा प्रयत्न करूनही ट्रीटमेंट नाकारत गेला. तीही त्यामुळे खचत गेली. त्याचं सगळं ऐकत गेली. ‘माझ्या माघारी लोक तुम्हाला सोडणार नाहीत. हालहाल करतील,’ म्हणून तगमग करायचा. विचार विचार आणि विचार. तेही मरणाचे.

एक दिवस त्यानं भयानक प्रस्ताव मांडला. बायकोला म्हणाला, ‘‘तुझ्या सोन्यासकट सगळे पैसे संपले आहेत. आपले हाल कुत्रा पण खाणार नाही. मी तर जीव देणारच आहे. तुम्ही सगळे माझ्याबरोबर चला.’’ एरवीसुद्धा या तिघांची अवस्था ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी होती. आधी विरोध मग नाईलाजानं मूक संमती.

मनीषनं सगळं प्लॅनिंग केलं. दिवस निवडला. सगळ्यांचं घराबाहेर जाणं बंद केलं. मोबाईल्स काढून घेतले. दार खिडक्या लावून घेतल्या आणि स्वतःचा फोन ऑफ केला. अचानक एक कलाटणी मिळाली. पोस्टमन एक पाकीट घेऊन आला. मनीष तेव्हा वॉशरूममध्ये होता. पोस्टमनच्या फोनवरून बायकोनं माहेरी कळवलं आणि नातेवाईक त्यांच्या घरी पोचले आणि पुढचं अघटित टळलं.

स्वतः डॉक्टर असून ‘सुइसाइड पॅक्ट’ला मान्यता देणारी स्त्री पाहून मला आश्चर्य वाटलं, दुःखही झालं. मला सांगण्यात आनंद होतोय, की जबरदस्तीच्या उपचारांना यश आलं. मनीष सुधारत, सावरत गेला. पैशाची सोय झाली. कर्जफेडही झाली. मनीषला आपल्या चुका समजल्या. वेडीवाकडी धाडसं करणं बंद झालं. काही वर्ष झाली या घटनेला. अजूनपर्यत तरी तो शांत स्थिरमार्गानी येणाऱ्या पैशात समाधानी आहे.

‘सुइसाइड पॅक्ट’वर त्यांनी अॅक्ट करण्यापूर्वी मला ‘क्रायसिस इंटरव्हेंन्शन’ करता आलं. ही ईश्वरी कृपाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.