सामान्य-असामान्य : खोटी ‘वेडी’ ठरवणार

आपल्या समाजात मानसोपचाराला खूप दुय्यम महत्त्व आहे. आयुष्याला कलाटणी देणारी ही उपकारक ट्रीटमेंट वेडाशी निगडित करून महत्त्व कमी करून टाकलं आहे.
Psychotherapy treatment
Psychotherapy treatmentsakal
Updated on
Summary

आपल्या समाजात मानसोपचाराला खूप दुय्यम महत्त्व आहे. आयुष्याला कलाटणी देणारी ही उपकारक ट्रीटमेंट वेडाशी निगडित करून महत्त्व कमी करून टाकलं आहे.

- डॉ. संजय वाटवे

आपल्या समाजात मानसोपचाराला खूप दुय्यम महत्त्व आहे. आयुष्याला कलाटणी देणारी ही उपकारक ट्रीटमेंट वेडाशी निगडित करून महत्त्व कमी करून टाकलं आहे. पण वेड म्हणजे काय? दोष मान्य करायचा नाही. तसंच आयुष्य ढकलत राहायचं, नुकसान सोसत राहायचं, इतरांना सोसायला भाग पाडायचं. त्यासाठी कुठल्याही थराला जायचं. स्वतःत बदल करून घ्यायचा नाही. आयुष्य सुधारून घ्यायचं नाही. सायकियाट्रिस्टचा रागराग करायचा. त्यांचे सल्ले धुडकावत राहायचं. त्यांना खोट्यात पाडायचं.

आपला समाज आता खूप सुशिक्षित, मॉडर्न झाला आहे. ‘जेन नेक्स्ट’, ‘यंग इंडिया’ तर फार जागरूक आहे असं म्हटलं जातं; पण मानसोपचाराची जागरूकता स्वतःला अल्टामॉडर्न समजणाऱ्या तरुण पिढीतही नाही. नुसतं मोबाईल, सोशल मीडिया, फालतू फॅशन, हिरोगिरी दाखवणारी मूर्ख धाडसं, व्यसनं एवढीच हाय-फाय किंवा अल्ट्रा मॉडर्न झाल्याची लक्षणं आहेत. आयुष्यात प्रसंग आल्यावर हे हिरोज् कोसळताना दिसतात. कारण विचारसरणी किंवा सुसंस्कृतपणा विकसित नाही.

दिलीप कारंडे एक सुशिक्षित तरुण. घरचं सगळं व्यवस्थित, नोकरी चांगली. सीमा बेनकरशी वेळच्या वेळी लग्न झालं. सीमाही चांगली रुळली. दीड वर्षात पाळणाही हलला. सीमाला आनंद होईल असंच सगळ्यांना वाटलं होतं; पण ती विचित्रच वागायला लागली. केस पिंजारत एकटक बघत राहायची. तुटकतुटक वागायला लागली. बाळाला घ्यायची नाही, त्याला दूध पाजायची नाही, बाळ दिलं तर ढकलून द्यायची. तिचं हे रूप पाहून सगळ्यांच्या छातीत चर्र झालं. तिच्या मावशी म्हणाल्या, ‘‘पहिलटकरीण आहे. होतं असं कधी कधी.’’ दोन दिवसांनी आई-वडील आले. त्यांच्याकडे पाठ फिरवून बसली. तेही म्हणाले, ‘‘होतं असं कधीकधी.’’ तिचा विचित्रपणा वाढतच गेला. नुसतं पडून राहणं, अस्वच्छ राहणं याच्या जोडीला पुटपुटणं, स्वतःशी हसणं सुरू झालं. जेवण चिवडत बसायची. हळूहळू सीमाचं ‘वेड’ वाढत गेलं. एकटीच बडबडत बसायची, हातवारे करायची. तंद्री मोडली, तर संतापानं थयथयाट करायची.

दिलीप माझ्याकडे आला. सीमा येणार नव्हती, आणणंही शक्य नव्हतं, मी कौन्सिलिंग केलं. आजार व उपचार यांच्याबाबत समजावून सांगितलं. तिच्या आई-वडिलांचा सहभाग आवश्यक असल्याचं सांगितलं. दिलीपनं त्यांना बोलावणं पाठवलं. ते यायला तयार नव्हते. कसंतरी पटवून त्यांना आणलं.

बेनकर कुटुंबीय म्हणून ७, ८ माणसं माझ्या खोलीत शिरली. आल्यापासून ‘झू’मधील प्राणी बघावा तसं माझ्याकडे बघत होते. प्रश्नांची उत्तर देत नव्हते. काहीतरी आजार आहे हे मान्य करत नव्हते. मी विचारलं, की पूर्वी असा मानसिक त्रास कधी झाला होता का? तेव्हा ७, ८ जण माझ्यावर तुटून पडले. ‘‘आम्हाला माहीतच होतं, की सीमाला खोटी वेडी ठरवून शिक्का मारणार आणि डायव्होर्स देणार. मागे असा त्रास झाला होता का, विचारून तिच्या अब्रूवर शिंतोडे उडवू नका.’’ मी म्हणालो, ‘‘तिला एखादा आजार नसेल, तर कसा सिद्ध करणार? तुम्हाला टीबी आहे, हे मला सिद्ध करता येईल का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘कारंड्यांच्या डावात तुम्ही पण आहात.’’ मी म्हणालो, ‘‘हा दवाखाना आहे.

कसले डाव आणि कसला पेच? कारंडे कशाला लबाड्या करतील? आणि मी कशाला सामील होईन? आता तर बिघाड आहे ना? माझी मदतच होईल तिला.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘नाही आमची मुलगी सायकायट्रिस्टसमोर बसणार.’’ मी म्हणालो, ‘‘असं करू नका. लवकर उपचार घेऊन तिला बरी करा.’’ ते म्हणाले, ‘‘आम्हाला दिसतंय इथे काय धंदे चालतात ते. आम्ही आमच्या पोरीला विश्वासात घेऊन बोललो आहे. आजारबिजार काही नाही. सासरच्या छळामुळे हे सगळ झालं आहे. तिला मदत करायचा आव आणून इथं आणायची आणि खोटी वेडी ठरवायची हा डाव आम्ही ओळखला आहे. आम्ही बघतोच एकेकाकडे.’’

बेनकर कुटुंब हातपाय आपटत निघून गेले. दिलीप हताश होऊन डोकं धरून बसला. उपचार होणार नसल्यामुळे माझा केसशी संबंध राहिला नाही; पण दिलीपला रेफर केलेल्या त्याच्या मित्रांकडून पुढची फरपट कळत राहिली. बेनकरांनी आपलं आर्थिक, राजकीय व पोलिसी बळ वापरून ४९८ ची डोमेस्टिक व्हायोलन्सची केस लावली. कारंड्यांचे हालहाल केले. सीमाला माहेरी घेऊन गेले. तिला तिथेच ठेवली.

सगळ्यांची खोड मोडली, डाव हाणून पाडला म्हणून बेनकर उन्मादात होते. सीमात मात्र काही फरक होत नव्हता. ती बिघडत चालली. ‘खरी वेडी’, ‘खोटी वेडी’, ‘आजार’, ‘मनोरुग्ण’, ‘डॉक्टरांना हाताशी धरून केलेले डावपेच’, ‘धडा शिकवला’, ‘रग जिरवली’ ही शब्दांची आवर्तनं नुसतीच चर्चेत घुमत राहिली, धुमसत राहिली

अजिबात उपचार न करण्यात किंवा ‘नाही आमची मुलगी सायकायट्रिस्टसमोर बसणार’ या मस्तीत बेनकर मग्न असतानाच एक दिवस सीमानं माहेरच्या वाड्यात गळफास घेतला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.